तुळशीदास भोईटे यांच्या "शालजोड्या"तलं कौतुक की चपराक?

 


पुढारी न्यूजचे माजी कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली, आणि ती वाचून पत्रकारिता विश्वात कुजबुज सुरू झाली. त्यांनी पुढारी न्यूजच्या डिश टीव्हीवरील एन्ट्रीचं कौतुक केलंय की आपल्या जुन्या चॅनलकडे मारलेल्या शालजोड्यातून दुखावलेलं मन मोकळं केलंय, हा प्रश्न अनेकांना पडला!

भोईटे यांनी आपल्या पोस्टमध्ये थेट नाव न घेता अनेकांच्या नाकावर टिच्चून सवाल उभे केले. "मनुष्यबळ कमी झालं, चांगली माणसं घेण्याऐवजी दुर्लक्ष केलं, निर्णय प्रक्रिया संपादकाकडे नव्हतीच, काही सल्लागारांचेच आदेश चालायचे" — हे सगळं कोणाला उद्देशून? ते आता सर्वश्रुतच आहे.

संपादकांचा संपादक, पण अधिकार सल्लागारांकडे?

भोईटे म्हणतात की, त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत पहिल्यांदाच त्यांना संपादकीय जबाबदारी होती, पण निर्णयाचे अधिकार नव्हते! यावरूनच कळतं की पुढारी न्यूजमध्ये "संपादक" फक्त नावापुरते होते, आणि सूत्र कुणाच्या हातात होती यावर आता चर्चेला उधाण आलंय.

त्यांची मागणी होती –
✔ सक्षम मनुष्यबळ
✔ १००% डिस्ट्रिब्युशन
✔ संपादकाला अधिकार

पण त्यांनी राजीनामा दिल्यानंतरच या मागण्या पूर्ण झाल्या! म्हणजे इतके महिने भोईटे यांनी "देव पाण्यात ठेवला, पण साळसूद व्यवस्थापनाने पाय भिजवले नाहीत!"

कौतुक की शालजोडी?

आता भोईटे म्हणतात, "मी गेल्यावरच १० लोकांची भरती झाली, आणि डिश टीव्हीवर चॅनल दिसू लागलं!" – हे त्यांचं स्वतःच्या मागण्याचं समर्थन आहे की व्यवस्थापनाच्या हळव्या ठिकाणी मारलेला टोला?

त्यांच्या पोस्टच्या शेवटच्या ओळी अधिकच बोलक्या –
"टीमला साथ मिळाली तर पुढारी न्यूज खरंच ‘पुढारी’ बनेल! फक्त पुन्हा कुणाचं दुर्लक्ष बाधू नये!"

याचा अर्थ, त्यांनी व्यवस्थापनाला शेवटचं सावधगिरीचं इशारा दिला आहे.

भोईटे निघून गेले, पण प्रश्न कायम!

भोईटे यांनी पोस्टमध्ये टीव्ही ९ मराठीच्या डीडी फ्री डिशवरील एन्ट्रीचंही कौतुक केलं, पण तिथेही त्यांनी संपादकीय व्यवस्थापनाच्या महत्त्वावर जोर दिला.

बेरक्याचं विश्लेषण:

1. भोईटे यांना पुढारी न्यूजबद्दल खरंच आत्मीयता आहे, पण त्यांच्या शब्दांमध्ये व्यवस्थापनाच्या अनागोंदी व्यवस्थेवर तीव्र नाराजीही आहे.
2.  "मी गेल्यावरच सगळं सुधारलं" ही भावना व्यवस्थापनाने गांभीर्याने घ्यायला हवी!
3. मनुष्यबळ आणि डिस्ट्रिब्युशन म्हणजेच चॅनलचं अस्तित्व. पण जर संपादकाचाच आवाज व्यवस्थापन ऐकत नसेल, तर पुढचं भवितव्य काय?

भोईटे यांनी आपलं म्हणणं मोकळेपणाने मांडलंय, आता पुढारी व्यवस्थापन त्यावर काय उत्तर देतंय ते बघूया! नाहीतर... ‘शालजोड्या’ जोरात बसल्या म्हणायच्या!



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या