तुषार खरात यांना खंडणीच्या आरोपाखाली अटक; पत्रकार संघाचा निषेध

 

सातारा: ‘लय भारी’ या न्यूज पोर्टलचे संपादक तुषार खरात यांना मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे खंडणीच्या आरोपाखाली दहिवडी पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय, त्यांच्यावर वडूज येथे अ‍ॅट्रोसिटी आणि इतर कलमांखाली स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरात यांच्यावर दाखल गुन्ह्यांच्या कायदेशीर आणि न्यायालयीन प्रक्रियेतून सत्य बाहेर येईल, मात्र पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता त्यांना तातडीने अटक केल्याने पत्रकार संघटनांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

तुषार खरात यांचे म्हणणे आहे की, जयकुमार गोरे यांच्याविषयी न्यूज पोर्टलवर दिल्या जाणाऱ्या बातम्या थांबवण्यासाठी त्यांच्यावर ही कारवाई केली जात आहे. ही थेट मुस्कटदाबी असून, पत्रकारितेवरील हल्ला आहे, असे त्यांचे मत आहे.

या प्रकरणी मुंबई मराठी पत्रकार संघाने मुख्यमंत्र्यांकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालून अशा प्रकारची मुस्कटदाबी थांबवावी, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.

ही घटना पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर घाला असल्याचा आरोप अनेक पत्रकार संघटनांनी केला असून, यासंदर्भात लवकरच राज्यभरात निषेध नोंदवला जाईल, अशी माहिती मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या