पनवेल - पनवेल शहरातील एका किराणा दुकानदाराला आणि त्याच्या काकांना मारहाण करून, छेडछाडीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी कल्याणमधील तीन तथाकथित पत्रकारांविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास सहकारनगर येथील बलवी किराणा स्टोअर्स बाहेर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीश देविदास वळसे वय २५) असे फिर्यादी दुकानदाराचे नाव आहे. २३ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता ते त्यांच्या दुकानात असताना, एका पांढऱ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट कार (MH 02 CV 7840) मधून रिता यादव ( कल्याण पूर्व ), ममता यादव ( उल्हासनगर ) आणि रवी पवार हे तिघे जण आले. कार मधून उतरताच त्यांनी दुकानाचे फोटो आणि व्हिडीओ शूटिंग करण्यास सुरुवात केली.
फिर्यादीचे काका यांनी त्यांना फोटो काढण्याबाबत विचारणा केली असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या अंगावर धावून गेले. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, ममता यादव हिने दुकानातील काउंटरच्या ड्रॉव्हरमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने तिला अडवण्याचा प्रयत्न केला असता, तिने फिर्यादीवर छेडछाड केल्याचा (छातीला हात लावल्याचा) खोटा आरोप केला आणि तशी तक्रार दाखल करण्याची धमकी दिली.
त्याचवेळी, रवी पवार नावाच्या व्यक्तीने आपण पत्रकार असल्याची बतावणी करत, फिर्यादी आणि त्यांच्या काकांना शिवीगाळ केली आणि हाताने मारहाण केली. 'तुमची ताकद दाखवतो' अशी धमकी देत प्रकरण मिटवण्यासाठी आरोपींनी ५० हजार रुपयांची मागणी केली, असे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेनंतर गिरीश देविदास वळसे यांनी तात्काळ पनवेल शहर पोलीस स्टेशन,(नवी मुंबई ) गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी रिता यादव, ममता यादव आणि रवी पवार यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 351 (2) 352, 115 (2) 3 (5) 308 (3) अन्वये गुन्हा (FIR क्र. 200 /2025) दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील केदार पुढील तपास करत आहेत. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
0 टिप्पण्या