"काकी कोणाची? सुप्रियाची की संपादकाची?"


पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी सुरू आहेत, पण या सगळ्यापेक्षा एका वृत्तपत्रातील 'संपादकीय' गोंधळाने सोशल मीडियावर आणि सुज्ञ वाचकांमध्ये एकच हशा पिकवला आहे! निमित्त ठरलंय ते म्हणजे नात्यांची नवी 'व्याख्या' लावण्याचा एका अग्रगण्य वृत्तपत्राचा (नाव नको, तुम्ही ओळखाच!) अजब प्रयत्न!

झाले ऐसे की, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब, त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय प्रतिभा पवार आणि त्यांची कन्या (जी आता खासदार आहेत) सुप्रिया सुळे यांच्याबद्दल माहिती देताना संबंधित संपादकाची तार कुठेतरी 'विस्कटली' असावी!

आपल्या सगळ्यांना माहितीये की, शरद पवार हे सुप्रियाताईंचे 'पिता' आहेत आणि प्रतिभा पवार या त्यांच्या 'आई'. हे सरळसोट नातं आपल्या सामान्य बुद्धीला पटतं. पण नाही! ज्या संपादकांनी हे 'दिव्य' काम केलं, त्यांच्यासाठी शरद पवार म्हणजे 'साहेब' (इथपर्यंत ठीक होतं!). पण प्रतिभा पवार मात्र त्यांच्यासाठी थेट 'काकी' बनल्या!

आता खरा 'सस्पेन्स' इथेच सुरू होतो! फोटोसोबत छापलेल्या त्या चार ओळी वाचून अनेकांना प्रश्न पडलाय की, ही 'काकी' नेमकी कोणाची?

  • ती सुप्रियाताईंची 'काकी' आहे का? (ज्यांच्या त्या प्रत्यक्षात 'आई' आहेत!)
  • की, ज्या संपादकांनी हा 'नात्यांचा शोध' लावला, त्यांची ती वैयक्तिक 'काकी' आहेत? आणि चुकून त्यांनी ती माहिती छापली?

आजकाल सोशल मीडियावर चार ओळींचा इन्फो नीट न देता स्वतःला 'नंबर वन' म्हणवणारी मंडळी दिसतातच. पण आता प्रिंट मीडियातील काही 'महान' संपादकही त्याच मार्गावर निघालेत की काय, अशी शंका यानिमित्ताने बळावली आहे!

एका साध्या कुटुंबातील पिता-आई-लेक या नात्याला 'साहेब-काकी-लेक' असं बनवण्याचं हे 'संपादकीय कसब' पाहून अनेकांनी डोक्याला हात लावला आहे. असो, सध्या अशाच 'अजब संपादकांचे' दिवस भरभराटीचे आहेत हे मात्र खरं!



एका वाचकाने कमेंट केलीय – “आता पवार कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं संपादकांनी आमच्याशी नातं जोडून द्यावं – आमच्या पुढच्या बातम्यांमध्ये वाचनाचा थरार वाढतोय!”

तोपर्यंत हसत राहा आणि नाती जपत राहा... निदान आपल्या घरातली तरी!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या