एक होती कहाणी… पण खरी वाटावी अशीच, म्हणजे डोळ्यात अश्रू, पण हसून गाल दुखावं, अशी!
तर झालं असं की… एका गाढवाला झाडाला बांधून ठेवलेलं होतं. कारण काय? तर मालकाला वाटलं, गाढव दुसऱ्याच गाढवाशी प्रेमात पडलंय!
रात्री अचानक भूत आलं. आता हे भूत म्हणजे ‘स्वतंत्र पत्रकारितेचं प्रतीक’! काही न कळतं, काहीच न समजतं, पण जिथे गोंधळ नाही तिथे गोंधळ करायचं हेच त्याचं काम.
तर भूत आलं आणि म्हणालं — “ही दोरी कसली रे? हा तर सत्याचा शोधक आहे!” आणि ते गाढव सोडलं!
गाढव काय म्हणेल? “आता माझं स्वातंत्र्य आहे! आता मी पिकांवर ताव मारतो!” आणि शेतात घुसून पिकं फस्त केली.
शेतकऱ्याची बायको संतापली. ती म्हणाली, “हे काय चाललंय? नको का मला ‘व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी’चं सर्टिफिकेट?” आणि दगड घालून गाढव ठार केलं.
आता गाढवाचा मालक म्हणाला, “हा माझा जीवाभावाचा गाढव होता — मी याच्यावर LIC चा हप्ता भरला होता!” आणि त्या शेतकऱ्याच्या बायकोला ठार केलं.
मग शेतकरी म्हणाला, “हे तर personal झालं!” आणि हातात विळा घेऊन गाढवाच्या मालकालाच संपवलं.
आता काय? हाय व्होल्टेज ड्रामा सुरू — मालकाची बायको आणि पोरं आली रडत, संतापून, आणि शेतकऱ्याच्या घराला आग लावली!
शेतकरी राख पाहून उरला तो ‘काळा फ्युज’ झाला… आणि म्हणाला, “सगळे संपवा!” आणि गाढवाच्या घरचं शेवटचं पीसही संपवलं.
शेवटी, झोप उडालेल्या शेतकऱ्याला वाटलं, “हे सगळं भूतामुळे झालं…”
आणि त्याने भूताला विचारलं — “का रे? हे सगळं का केलंस?”
भूत म्हणालं — “मी फक्त गाढव सोडलं… मारामारी, विळा, आग, आणि शेवटी कोर्ट केस — ते सगळं तुम्ही केलंत!”
तात्पर्य?
आजची माध्यमं म्हणजे गाढव सोडणारी भुते आहेत!
त्यांचं काम काय? दररोज एक गाढव सोडायचं, मग त्यावर ट्वीट, पोस्ट, कमेंट, रील, डिबेट्स…
आणि आपण लोक? त्या गाढवावर ताव मारायचा, आपले मित्र, नातेवाईक, कुटुंब सगळ्यांशी भांडायचं…
नाहीतर चांगलं उभं आयुष्य ‘कमेंट सेक्शन’ मध्ये गमवायचं…
सांगा बरं, शेवटी गाढव कोण?
आणि खरी भूतं कोण?
उत्तर शोधा, पण विळा घेऊ नका!
– बेरक्या म्हणतो, दररोज गाढवं सोडली जातील… पण तुम्ही विचार न करता हल्ला केला, तर तुमचं आयुष्यही गोंधळात जाईल!
बाकी, गाढवं सन्मानानं जगावीत, आणि माणसं थोडं विचार करून वागावीत — एवढंच मागणं आहे!
बेरक्या – जो भुते ओळखतो आणि गाढवांवर हसतो…!
0 टिप्पण्या