तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात ‘शर्टलेस पत्रकारगिरी’चे नवे प्रकरण

धाराशिव  तुळजापूर म्हणजे आई तुळजाभवानीची पवित्र नगरी ! या पवित्र नगरीत ड्रग्जचा धूर, त्यावर पत्रकारिता नावाचा धुराडा, आणि आता पत्रकाराचाच 'बिअर बार'मधला शर्टलेस अवतार चर्चेचा विषय! होय, होय – हे काही वेब सिरीजचं प्रमोशन नाही, तर तुळजापूरच्या लाईव्ह स्क्रिप्टचा ताजा भाग आहे!

ड्रग्ज प्रकरण तापलेलं, आरोपी फरार, आणि तुळजापूरची प्रतिमा काहिली झालेली असताना, विजय गंगणे आणि पुजारी इंद्रजित साळुंके यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेने वातावरणात सनसनाटीचा झणझणीत चव मसाला टाकला. त्यांनी थेट धाराशिवच्या  एका पत्रकारालाच कटात सामील असल्याचा आरोप करत, "तोच तोंड, तीच बातमी आणि तेच फोटो – दोन महिन्यांपासून कॉपीपेस्ट करत तुळजापूरची बदनामी करतोय!" असा टोला लगावला.

गंगणे यांचा दावा म्हणजे थेट बॉम्बच  – "हा पत्रकार फरार आरोपी पिटू उर्फ विनोद गंगणे (बघा बघा, माझाच भाऊ!) याला धाराशिवमधल्या एका हॉटेलात भेटला!" आता तुम्हीच सांगा, हा इंटरव्ह्यू होता का इन्फ्लुएन्सिंग मीटिंग?

तेवढ्यात पुजारी साळुंकेंचा व्हिडीओ धमाका – "हा पत्रकार एका बिअर बारमध्ये शर्ट काढून नाचतो! त्याची लायकी काय?" असं विचारून त्यांनी थेट धमकी दिली – "बघा, जर बदनामी थांबवली नाही, तर व्हिडीओ व्हायरल करू!"

आता प्रश्न असा –
पत्रकार हा ‘पत्र’कार आहे की ‘पिटर’कार’?
बातमी करतो की ‘बार’त नाचतो?
फरारांना भेटतो की बातमीच्या नावाखाली ‘हॉटेल डील’ करतो?

या सगळ्यात संपादक मंडळ, पत्रकार संघ, आणि पोलीस प्रशासन काय भूमिका घेतंय?
की हे सगळं व्हायरल व्हिडीओच्या रिलीज डेटपर्यंत थांबणार?

बेरक्याचं भाष्य –
"पत्रकाराने जर टीआरपीसाठी टॉयलेट रिपोर्टिंग पद्धती अंगीकारली, तर त्याला बातमी नाही, बाथरूम सीन म्हणतात!"
बाकी, ‘सत्य’ नसेल तर पत्रकारिता नसते –
आणि जर ‘सत्य’ विकत घेता आलं, तर ते चिप्सच्या पुडीत गुटखा शोधण्याइतकंच सोप्पं असतं!



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या