मुंबई: बुधवारी सकाळची शांतता भंग पावली ती थेट लोकशाही चॅनलच्या अंधेरी एमआयडीसीतील स्टुडिओवर झालेल्या आयकर विभागाच्या धाडीने! एरव्ही ब्रेकिंग न्यूज देणाऱ्या चॅनलवरच 'ब्रेकिंग' कारवाई झाल्याने माध्यम जगतात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साधारण साडेसहा वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाचे सहा ते सात अधिकारी लोकशाही चॅनलच्या स्टुडिओत धडकले. त्यांनी तात्काळ स्टुडिओचा ताबा घेत सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढल्याचं समजतंय. इतकंच नव्हे तर, ज्या न्यूजरूममधून बातम्यांचा रतीब सुरू असतो, त्या न्यूजरूमलाच सील ठोकण्यात आलं आहे. त्यामुळे सकाळपासून चॅनलवर नेहमीचे कार्यक्रम आणि बातम्यांऐवजी रिपीट शो सुरू असल्याचं चित्र आहे.
धाडीमागचं 'कनेक्शन' काय?
ही धाड का पडली, याबद्दल तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईचा संबंध गुजरात राज्यातील 'गुजरात समाचार ' या वृत्तपत्राशी जोडला जात आहे. लोकशाही चॅनलचे गुजरात पत्रिकेशी कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
आरोप काय आहेत?
सर्वात गंभीर बाब म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काही विशिष्ट राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात देणग्या स्वीकारून त्यांच्या बाजूने बातम्या चालवल्याचा आरोप लोकशाही चॅनलवर करण्यात आला आहे. याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी सुरू असल्याची चर्चा आहे.
पुढे काय?
सध्या तरी आयकर विभागाचे अधिकारी स्टुडिओमध्ये कागदपत्रे आणि इतर गोष्टींची तपासणी करत असल्याची माहिती आहे. या धाडीतून काय निष्पन्न होतं, आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे आणि लोकशाही चॅनल या सर्व प्रकरणावर काय अधिकृत भूमिका घेतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, या घटनेमुळे मराठी पत्रकारितेत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
0 टिप्पण्या