जळगाव 'दिव्य मराठी'त आता 'जामनेर पॅटर्न'! प्रदीप राजपूतांच्या हाती 'निवासी'ची धुरा...

 हरवलेली आक्रमकता परत येणार का?



गेली काही वर्षे जळगाव 'दिव्य मराठी'ला जणू मरगळ आली होती. 'भास्कर' समूहाचा आत्मा असलेली आक्रमकता कुठेतरी हरवली होती आणि 'लोकमत'च्या तगड्या स्पर्धेत हे वर्तमानपत्र पिछाडीवर पडत चाललं होतं. दीपक पटवे यांच्या राजीनाम्यानंतर तर 'आता पुढे काय?' असा प्रश्न निर्माण झाला होता. पण, आता या मरगळलेल्या 'दिव्य'मध्ये नवचैतन्य फुंकण्यासाठी एका शेतकरीपुत्राची 'बॉस' म्हणून एन्ट्री झालीय!

ग्रामीण विभागाचे रिजनल हेड म्हणून काम पाहणाऱ्या प्रदीप राजपूत यांची जळगाव 'दिव्य मराठी'च्या निवासी संपादकपदी (Resident Editor) वर्णी लागली आहे. राज्य संपादक प्रणव गोळवेलकर आणि नॅशनल एडिटर नवनीत गुर्जर यांनी २५ मार्च रोजी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि जळगावच्या मीडिया वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली ती एका भन्नाट 'योगायोगाची'!

काय आहे हा 'जामनेर'चा दुर्मीळ योगायोग?

जळगावच्या राजकारणात 'जामनेर पॅटर्न'ची नेहमीच चर्चा असते, तसाच काहीसा पॅटर्न आता 'दिव्य मराठी'त जुळून आलाय.

  • युनिट हेड: संजीव पाटील (जामनेर तालुक्यातील)

  • नवे निवासी संपादक: प्रदीप राजपूत (जामनेर तालुक्यातील भारूडखेडा गावचे)

  • जळगावचे राजकीय 'बॉस': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासम-खास, मंत्री गिरीश महाजन (हे देखील जामनेरचेच!)

आता युनिट हेड आणि निवासी संपादक दोघेही जामनेरचे, आणि जिल्ह्याचे सर्वेसर्वा गिरीशभाऊही जामनेरचेच! त्यामुळे या नव्या बदलांनंतर सत्तेच्या विरोधात 'दिव्य मराठी'ची लेखणी किती धारदार राहते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून असणार आहे.

शांत स्वभाव, पण लेखणीला धार!

प्रदीप राजपूत हे तसे शांत आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्वाचे. सहकाऱ्यांना सोबत घेऊन चालणारा हा गडी. पण त्यांच्या शांत स्वभावावर जाऊ नका, त्यांच्या बातम्यांनी थेट सरकारला घाम फोडलाय!

  • 'भास्कर'चा पुरस्कार: 'दिव्य मराठी'च्या स्टेट इन्व्हेस्टिगेशन टीम (SIT) आणि 'आयआरटी'मध्ये काम करताना त्यांनी अनेक भ्रष्टाचारांची पाळेमुळे खणून काढली.

  • दणकेबाज बातम्या: कामगारांच्या मध्यान्ह भोजन योजनेत मारलेला डल्ला असो किंवा शिक्षकांचे बोगस 'शालार्थ आयडी' रॅकेट; राजपूतांच्या बातम्यांची शासनाने थेट दखल घेत कारवाईचा बडगा उगारला होता. या कामासाठी त्यांना 'भास्कर'च्या नॅशनल आणि स्टेट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलंय.

कसा राहिलाय राजपूतांचा प्रवास?

२००६-०७ मध्ये पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून एमसीजे (MCJ) पूर्ण केल्यानंतर 'दैनिक केसरी'तील इंटर्नशिपपासून त्यांचा प्रवास सुरु झाला. देशोन्नती, लोकपत्र, देशदूत करत २०११ साली जळगावात 'दिव्य मराठी' लाँच झाले, तेव्हापासून ते तिथे खंद्या शिलेदारासारखे उभे आहेत. राजकारण, कृषी, सहकार, पाटबंधारे ते महसूल अशा सर्वच 'बीट्स'वर त्यांनी आपली पकड मजबूत केली. २०२३ ते २०२५ या काळात त्यांनी रिजनल हेड म्हणून ग्रामीण भागाची नस ओळखली.

मातीशी नाळ जोडलेला संपादक

सर्वांत महत्त्वाची आणि हटके बाब म्हणजे, पत्रकारितेच्या या धकाधकीच्या जीवनातही त्यांनी आपली मातीशी असलेली नाळ तुटू दिलेली नाही. शेती हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय! 'दिव्य मराठी'च्या कामातून जो काही मोकळा वेळ मिळतो, तो हा संपादक थेट स्वतःच्या शेतात राबण्यासाठी देतो.

पुढचं आव्हान काय?

सध्या जळगावात 'लोकमत'ने चांगलीच आघाडी घेतली आहे. कंटेंट आणि बिझनेस या दोन्ही आघाड्यांवर 'दिव्य मराठी'ला नव्याने उभं करण्याचं मोठं शिवधनुष्य आता राजपूत यांना पेलायचं आहे.

आपल्या शांत आणि संयमी कार्यशैलीने प्रदीप राजपूत हे आव्हान कसे पेलतात आणि 'भास्कर'ची हरवलेली 'आक्रमकता' पुन्हा कशी परत आणतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे. 'बेरक्या'कडून या नव्या इनिंगसाठी त्यांना 'दिव्य' शुभेच्छा!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या