पुणे: "अरे देवा, आता पुण्यात जायचं तरी कुणाकडे?" असा प्रश्न सामान्य पुणेकरांना पडावा, अशी एक भन्नाट पण तितकीच किळसवाणी घटना समोर आली आहे. पुण्यात आजवर गुंड सुपाऱ्या घेत होते, मग पोलिसांनी सुपाऱ्या घेतल्या, पुढे जाऊन नेत्यांनीही सुपाऱ्या फोडल्या... पण आता हद्दच झाली; पुण्यात आता 'पत्रकारांची' नवी सुपारी गँग जन्माला आली आहे! स्टिंगच्या नावाखाली लोकांच्या बेडरूममध्ये डोकावणाऱ्या 'जय महाराष्ट्र'च्या रोहन कदमवर अखेर विश्रामबाग पोलीस ठाण्यात रीतसर FIR (गु.र.नं. ११९/२०२६) फाटला आहे.
🎥 'कॅमेरामॅन'चा फ्लॉप शो आणि तुळशीबागेतील तो 'अजय' लॉज!
तारीख होती ८ एप्रिल २०२६. मध्यरात्रीचा १ वाजलेला. ठिकाण: लक्ष्मी रोडवरचा तुळशीबागेतील 'अजय लॉज'. इथे रूम नंबर ३२-अ आणि ३२-ब च्या मधल्या लोखंडी जाळीवरून 'जय महाराष्ट्र'चा रिपोर्टर रोहन कदम (वय २८, रा. वाल्हे, पुरंदर) आणि त्याचे साथीदार एक 'खास' शूटिंग करत होते. पलीकडच्या रूममध्ये एक महिला (फिर्यादी) चक्क साडी नेसत असताना या महाशयांचा कॅमेरा तिथे चालू होता! पण या 'पीपिंग टॉम' (डोकावून बघणाऱ्या) पत्रकाराचा डाव फसला आणि महिलेने त्याला रंगेहात पकडून जो काही चोप दिलाय, की 'जय महाराष्ट्र'चा 'हाय व्होल्टेज' ड्रामा तिथेच सुरू झाला!
🥊 'मास्टरमाईंड' वाचला, पण मित्राने 'प्रसाद' खाल्ला!
या सगळ्या खंडणी आणि ब्लॅकमेलिंगच्या नाटकात रोहन कदम एकटा नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गँग्ज ऑफ दांडेकर सुपारी गँगचा एक 'वैभव'शाली 'मास्टरमाईंड' आहे (जो एका मोठ्या वृत्तवाहिनीचा शिलेदार आहे!). पण हा पठ्ठ्या हुशार! साहेब लॉजच्या खालीच उभे होते, त्यामुळे रूममध्ये महिलेच्या हातून जेव्हा रोहन कदम आणि त्याच्या एका 'अभिजात' मित्राची यथेच्छ धुलाई सुरू होती, तेव्हा हा मास्टरमाईंड खाली असल्यामुळे मार खाण्यापासून वाचला!
💰 रूपाली ताईंचा दणका आणि 'सुपारी गँग'ची भंबेरी:
ॲड. रूपाली पाटील-ठोंबरे यांनी या सगळ्या प्रकाराची पोलखोल केली आहे. या सुपारी गँगमध्ये फक्त रोहन किंवा तो मास्टरमाईंड नाही, तर एका महिला पत्रकारासह आणखी ३-४ नामवंत पत्रकारांचा समावेश आहे. या सर्वांनी मिळून पैसे उकळण्याचा हा भन्नाट 'कार्यक्रम' आखला होता.
📱 पोलिसांचं 'मॅनेजमेंट' आणि अण्णांची 'फोनाफोनी'
मार खाल्ल्यानंतर हे पत्रकार महाशय प्रकरण दाबण्यासाठी पळाले. पुण्याचे 'सीपी' (पोलीस आयुक्त) साहेबही जवळपास 'मॅनेज' झालेच होते. अगदी मध्यस्थी करण्यासाठी एका राजकीय 'अण्णा'ला मध्ये घालून काल दिवसभर भारी 'फोनाफोनी' आणि फिल्डिंग लावली गेली. पण पुण्यात अजून काही प्रामाणिक पत्रकार शिल्लक आहेत! इतर पत्रकारांनी जेव्हा या किळसवाण्या प्रकाराविरुद्ध रान उठवलं आणि पोलिसांवर दबाव टाकला, तेव्हा कुठे जाऊन १० एप्रिलच्या रात्री १०.२६ वाजता विश्रामबाग पोलिसांनी नाईलाजाने BNS कलम ७७ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला.
🔥 बेरक्याचा सवाल:
पुण्याची ओळख 'विद्येचे माहेरघर' होती, ती आता 'सुपारीचे माहेरघर' झालीय का? बातमीदारीच्या नावाखाली लोकांच्या साडीत डोकावणाऱ्या आणि खंडणीसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या या 'पांढरपेशा' पत्रकारांच्या टोळीला पोलीस बेड्या ठोकणार की 'भाई-भाई' करून सोडून देणार?
(या प्रकरणातील इतर 'बडे' चेहरे कोण आहेत, याचाही पर्दाफाश 'बेरक्या' लवकरच करणार... वाचत राहा!)

0 टिप्पण्या