'लोकसत्ता'च्या संपादकीय मंडळात नक्कीच कुणी 'धुरंधर' घुसल्याचा संशय! नित्यनेमाने सुरू आहेत 'सेल्फ गोल'ची हॅटट्रिक!


वाचकहो, एकेकाळी आपल्या दर्जेदार भाषेसाठी आणि अचूक बातम्यांसाठी ओळखला जाणारा आपला लाडका ‘लोकसत्ता’ सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. तुम्ही अगदी बरोबर ओळखलंत, पेपरमध्ये सध्या बातम्यांपेक्षा 'चूकभूल द्यावी घ्यावी' हे सदर जास्त वाचनीय (आणि मनोरंजक) ठरू लागलं आहे! असं वाटतंय की, संपादकीय विभागात कुणीतरी असा 'धुरंधर' घुसलेला आहे, ज्याने 'रोज एक तरी भारी चूक करायचीच' असा चंगच बांधला आहे.

गेल्या काही दिवसांतील 'लोकसत्ता'चे हे 'सेल्फ गोल' पाहिले, तर तुम्हीही कपाळावर हात मारून घ्याल. चला तर मग, नजर टाकूया या 'महान' मुद्रणदोषांवर:

१. AI चा प्रताप आणि भोंदूबाबाच्या बातमीत थेट 'राहुल गांधी'!

सगळ्यात मोठा कहर म्हणजे डिजिटल आवृत्तीवर झालेला गोंधळ. बातमी होती "पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणाऱ्या भोंदूबाबाला १० वर्षे सक्तमजुरी". आणि या बातमीला AI च्या मदतीने फोटो कोणता लावला? तर चक्क काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा हात जोडलेला फोटो! आता AI ने चूक केली असं स्पष्टीकरण दिलं असलं तरी, एवढा मोठा फोटो प्रसिद्ध होईपर्यंत कुणाच्याच नजरेतून कसा सुटला, हा संशोधनाचा विषय आहे.

२. जिवंत माणसाला थेट श्रद्धांजली!

चायनीज खाद्यपदार्थांचे प्रणेते आणि 'चायना गार्डन'चे मालक नेल्सन वांग यांच्या निधनाची बातमी थेट 'विचार' पानावर छापून आली. नंतर काय? तर वांग यांचे सुपुत्र खुलासा करतायत की, "माझे वडील जिवंत आहेत आणि त्यांची प्रकृती ठणठणीत आहे!" कुणीतरी रात्री साडे नऊ वाजता ईमेल केला आणि संपादकीय मंडळाने कसलीही शहानिशा न करता दुसऱ्या दिवशी थेट श्रद्धांजली वाहून मोकळे झाले.

३. श्रद्धांजलीच्या बातम्यांमध्ये 'कॉमेडी ऑफ एरर्स'

मृतांच्या बातम्या देताना तरी काळजी घ्यावी? पण नाही!

  • 'नाडकर्णी'चे झाले 'आदकर्णी': दिवंगत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांना आदरांजली वाहणाऱ्या लेखात 'नाडकर्णी' ऐवजी 'आदकर्णी' छापून आले. चूक लेखिकेची नसून आमचीच आहे, अशी प्रांजळ (आणि नामुष्कीजनक) कबुली पेपरला द्यावी लागली.

  • माऊली टाकळकरांच्या बातमीत 'सस्पेन्स': माऊली टाकळकर यांच्या निधनाच्या बातमीत पहिल्या तीन परिच्छेदानंतर चौथ्या परिच्छेदापासून अचानक भलत्याच बातमीचा मजकूर छापून आला! श्रद्धांजली वाचता वाचता वाचक अचानक दुसऱ्याच जगात पोहोचला.

४. 'लाल किल्ला' की 'उलटा चष्मा'?

  • 'लाल किल्ला' सदरामध्ये तर अर्थाचा अनर्थच झाला. "तुटवडा होणार नाही, याची दक्षता सरकार घेत आहे" याऐवजी "तुटवडा होणार, याची दक्षता केंद्र सरकार घेत आहे!" असं छापून आलं. (काय सांगावं, कदाचित बातमीदाराने चुकून खरं तेच लिहून टाकलं असावं!)

  • आणि या गोंधळात 'व्यक्तिवेध' हे सदर चक्क 'उलटा चष्मा' या नावाखाली प्रसिद्ध झाले!

बेरक्याचा टोला: एकूणच काय, तर 'लोकसत्ता'मध्ये सध्या 'उलटा चष्मा' लावूनच काम सुरू असल्याचं स्पष्ट दिसतंय. वाचकांना आता एक नम्र विनंती आहे, सकाळी पेपर हातात आल्यावर आधी मुख्य बातम्या वाचण्यापेक्षा, आतल्या पानावरची 'चूकभूल' नक्की वाचत जा. आदल्या दिवशी पेपरमध्ये काय 'गुल' खिलवले आहेत, याचा आनंद तिथंच मिळतोय!

बाकी, त्या 'धुरंधर' संपादकाला आमचा कडक सॅल्युट! असेच 'सेल्फ गोल' करत राहा, आम्हाला ब्लॉग लिहायला विषय मिळत राहतील!








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या