पुण्यात घृणास्पद कृत्य करणाऱ्या पत्रकारावर कठोर कारवाई करा

पुणे श्रमिक पत्रकार संघाची पोलीस आयुक्तांकडे मागणी


पुणे: शहरातील बुधवार पेठ भागातील एका लॉजमध्ये महिलेसोबत घृणास्पद कृत्य करणाऱ्या पत्रकारावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी पुणे श्रमिक पत्रकार संघाने केली आहे. याप्रकरणी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना संघाच्या वतीने एक अधिकृत पत्र देण्यात आले असून, आरोपीला पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी करण्यात आली आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील आणि सरचिटणीस मंगेश फल्ले यांच्या स्वाक्षरीने १० एप्रिल २०२६ रोजी हे पत्र पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे.

तीन दिवसांपूर्वी पुण्यातील बुधवार पेठ परिसरातील एका लॉजमध्ये एका पत्रकाराने महिलेसोबत अत्यंत घृणास्पद कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच पत्रकार संघाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे पुण्याच्या वैभवशाली पत्रकारितेच्या परंपरेला गालबोट लागले असून, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांची नाहक बदनामी झाली आहे. त्यामुळे या कृत्याचा पुणे श्रमिक पत्रकार संघाने जाहीर निषेध केला आहे.

या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे, हे प्रकरण बाहेर आल्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी एक यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. यावर पत्रकार संघाने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. "गुन्हा दाखल होऊ नये यासाठी प्रयत्न करणारे पत्रकार किंवा अन्य कोणत्याही मंडळींचा यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यास, त्यांच्यावरही कोणतीही दया न दाखवता कठोर कारवाई करण्यात यावी," अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

या संदर्भात पोलीस उपायुक्त (झोन १) हृषीकेश रवळे यांची भेट घेऊन, या प्रकरणात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यासाठी पत्रकार संघाने आपले पूर्ण समर्थन दर्शवले आहे. "पुणे श्रमिक पत्रकार संघ चुकीचे काम करणाऱ्या कोणत्याही पत्रकाराच्या पाठीशी उभा राहणार नाही. उलट त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही नेहमीच आग्रही राहू," असे संघाने स्पष्ट केले आहे.

पुण्यातील पत्रकारांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी पत्रकार संघ नेहमीच कटिबद्ध राहिला आहे. पुणे पोलिसांनीही नेहमी पत्रकारांसोबत समन्वयाची आणि सहकार्याची भूमिका घेतली आहे. मात्र, अशा अपप्रवृत्तीच्या विरोधात संघ ठामपणे उभा असून, या प्रकरणातील आरोपी किंवा त्याला मदत करणाऱ्या कोणत्याही सहकाऱ्याला संघाचा अजिबात पाठिंबा नसेल, असे या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या