बूम, बोलेरो अन् भुरट्या वसुलीची ‘सेटिंग’! गडचिरोलीत ‘त्या’ तोतया पत्रकाराचा महाबाजार!

 

गडचिरोली / चंद्रपूर: पत्रकारितेचा ‘बूम’ हातात आला की काही लोकांना आपण थेट जिल्ह्याचे मालक झाल्यासारखं वाटायला लागतं. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर सध्या अशाच एका ‘हायप्रोफाइल’ कथित पत्रकाराच्या वसुलीचा धंदा चांगलाच तेजीत आहे. वाळू कंत्राटदार, तलाठी, ग्रामसेवक दिसला की भाईंचा खिसा गरम व्हायलाच हवा, असा अलिखित नियमच या महाशयांनी बनवलाय. पण म्हणतात ना, ‘पापाचा घडा एक दिवस भरतोच’... सध्या या तोतया पत्रकाराची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर अशी काही व्हायरल झालीये की, चॅनलच्या इज्जतीचे धिंडवडे निघालेत!

🚗 कंपनीचं पेट्रोल, चॅनलचा बूम अन् 'कलेक्टर'शी सेटिंग!

हा पठ्ठ्या राहणारा चंद्रपूर जिल्ह्यातील मुलचा. तिथल्या एका मोठ्या खाजगी कंपनीत नोकरीला. पण नोकरीला दांडी मारून, कंपनीचीच 'बोलेरो' गाडी आणि तिथलंच पेट्रोल उडवत हा महाशय हातात चॅनलचा बूम घेऊन गडचिरोलीत धुमाकूळ घालत असतो.

बढाया मारताना "मला कंपनीत लाखोंचा पगार आहे," असं सांगायचं, आणि दुसरीकडे ५-१० हजारांच्या भुरट्या वसुलीसाठी कोणाचेही पाय चाटायचे, हा याचा रोजचा धंदा. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा एका वाळू कंत्राटदाराला याने थेट "कलेक्टर साहेबांसोबत माझी थेट सेटिंग आहे, तुमचं काम करून देतो" असं आमिष दाखवलं.

कलेक्टरची संतापलेली 'एंट्री'!

ही 'सेटिंग'ची बातमी जेव्हा थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर गेली, तेव्हा त्यांनी थेट चॅनलच्या मुख्य संपादकांना फोन लावून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. आता देशातल्या एवढ्या मोठ्या सनदी अधिकाऱ्याने तक्रार केल्यावर चॅनल याला हाकलून देईल असं वाटलं होतं, पण पिक्चरमध्ये ट्विस्ट तर पुढेच आहे!

🎁 कारवाई तर दूरच... चॅनेलने दिलं 'थ्री-इन-वन' गिफ्ट!

सामान्यतः अशा चोरांना चॅनलमधून हाकललं जातं, पण हा पठ्ठ्या ज्या 'देशातल्या सर्वात मोठ्या आणि नेहमी चर्चेत असणाऱ्या उद्योगपतीच्या' नव्या मराठी राष्ट्रीय वृत्तवाहिनीसाठी काम करतोय, तिथली गोम काही वेगळीच आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर याच्यावर कारवाई होण्याऐवजी, चॅनलच्या वरिष्ठांनी याच्यावर दाखवलेली 'मेहेरबानी' पाहून प्रामाणिक पत्रकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. चॅनलने याला चक्क चंद्रपूर जिल्ह्यातील आणखी तीन तालुक्यांचा अतिरिक्त कार्यभार 'गिफ्ट' म्हणून सोपवला! म्हणजे, "बाबा रे, तू गडचिरोलीत कमी लुटतोयस, आता चंद्रपूरमध्ये पण हात साफ कर!" असाच काहीसा हा प्रकार.

📱 ५ हजारांसाठी थेट धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल!

स्वतःला राष्ट्रीय चॅनलचा मोठा तोफ समजणाऱ्या या वसुलीबाजाची लायकी अवघ्या ५ हजार रुपयांवर येऊन ठेपली आहे. एका व्यक्तीकडे ५ हजार रुपयांची मागणी करताना आणि त्याला फोनवर थेट धमकावतानाची याची एक कथित 'ध्वनिफीत' (Audio Clip) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपने या तोतयाच्या पत्रकारितेचा बुरखा टराटरा फाडलाय.

🤔 ...तर मग 'वरदहस्त' नेमका कोणाचा?

यापूर्वीही एका चॅनलमध्ये असताना या महाशयांनी असेच कारनामे केले होते, तिथून हाकलल्यावर या मोठ्या चॅनलमध्ये याची वर्णी लागली कशी? चंद्रपुरात राहून गडचिरोलीची पत्रकारिता कशी होते? आणि खाजगी नोकरी सांभाळून २४ तास चॅनलची हुजरेगिरी कशी चालते? याकडे चॅनलच्या व्यवस्थापनाने हेतुपुरस्सर डोळेझाक केली आहे का?

मोठ्या उद्योग समूहाची ही वृत्तसंस्था नेहमी 'प्रामाणिक पत्रकारितेचा' आव आणते, मग अशा खंडणीबहाद्दर पत्रकारावर कारवाई करायला चॅनलचे हात का थरथरत आहेत? या 'वसुली सम्राटा'च्या पाठीवर चॅनलमधील कोणत्या मोठ्या माशाचा वरदहस्त आहे, याचीच चर्चा आता दोन्ही जिल्ह्यांच्या कट्ट्यांवर रंगली आहे.

आता तरी हे राष्ट्रीय चॅनल या 'बोलेरो'वाल्या तोतयाला नारळ देणार की त्याची पाठराखण करून स्वतःची उरलीसुरली अब्रू वेशीवर टांगणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

- बेरक्या ब्युरो

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या