'त्या' महा-पत्रकार संघटनेत लगीनघाई; दिल्ली-मुंबई व्हाया 'सागर' नि 'वर्षा' सुंदोपसुंदी!

राजकारण्यांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या पत्रकारांच्या जगात सध्या एक भलतंच 'महायुद्ध' पेटलंय. काही वर्षांपूर्वीच एकदम 'उदय' पावलेली आणि अल्पावधीतच सत्तेच्या गल्लीबोळात थेट मुख्यमंत्र्यांपासून ते उपमुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत बनलेली ती एक 'खास' संघटना सध्या भलतीच चर्चेत आलीये. चर्चा कशाची? तर अंतर्गत निवडणुकीची! पण ही निवडणूक पत्रकारांची राहिलीये कुठे? इथे तर थेट राज्याचे 'बॉस' विरुद्ध 'डिप्टी बॉस' यांचे छुपे गट एकमेकांसमोर दंड थोपटून उभे ठाकलेत.

'सागर'चा 'विनायक' की 'दाढी'चा 'उदय'?

सध्या गल्लीत जोरदार कुजबूज सुरू आहे की, उपमुख्यमंत्र्यांच्या छायेत वावरणाऱ्या एका गटाला सध्याचा अध्यक्षच गादीवर कायम हवाय. पण दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' आणि 'सागर' बंगल्यावर ज्यांचा रोजचा राबता असतो, उठबस असते, अशा एका लाडक्या 'विनायका'ला अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवण्यासाठी एका 'विनोदी' चाणक्याने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कंबर कसली आहे. थोडक्यात काय, तर हा सामना आता पत्रकारांचा उरलेलाच नाही, तो थेट 'सागर' विरुद्ध 'वर्षा' असा प्रतिष्ठेचा बनला आहे.

या संघटनेचं एक वैशिष्ट्य मानावं लागेल, संपूर्ण महाराष्ट्रात ही एकमेव अशी पत्रकारांची संघटना असेल जिथे निवडणुकीत पत्रकारांपेक्षा राजकीय नेत्यांचा आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांचा हस्तक्षेप जास्त पाहायला मिळतो.

ऐनवेळी 'पंच' पळाले; आता २० तारखेला काय होणार?

घोडा मैदान जवळ आलं असतानाच या महायुद्धात एक नवा ट्विस्ट आलाय. येत्या २० तारखेला रणसंग्राम ठरला होता. पण ऐन मोक्याच्या क्षणी, दोन्ही निवडणूक अधिकाऱ्यांवर (पंचांवर) कुणाचा तरी 'अदृश्य' दबाव आला नि त्यांनी थेट आपले राजीनामे फेकून मारले! 'आम्ही बाबा या भानगडीत पडत नाही' म्हणत पंचांनी पळ काढल्यामुळे आता निवडणुकीला खो बसलाय.

आता सगळ्यांचे डोळे २० तारखेच्या त्या 'महा-एजीएम' (AGM) कडे लागलेत. त्या दिवशी सभेत नेत्यांचे हे 'पोपट' एकमेकांचे पिसं उपटणार की सामोपचाराने मलिदा वाटून घेणार? याकडे संपूर्ण माध्यम जगताचं लक्ष लागलंय.

- तुमचाच, 'बेरक्या' (खऱ्या बातम्यांचा खमंग कट्टा!)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या