निकिता काळे, सचिन सुर्वेला ५ दिवसांची कोठडी; अनेक ‘युट्यूब पत्रकारां’चे धाबे दणाणले!
जालना (बेरक्या विशेष):
गळ्यात आयकार्ड, हातात मोबाईलचा कॅमेरा आणि तोंडावर ‘पत्रकारिते’चा बुरखा... जालन्यात संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला ब्लॅकमेल करून खंडणी उकळणाऱ्या निकिता काळे आणि सचिन सुर्वे या दोघांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता या प्रकरणाची व्याप्ती वाढू लागली आहे. न्यायालयाने या दोघांनाही पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, कदीम जालना पोलिसांनी आता या दोघांच्या कॉल डिटेल्स आणि व्हॉट्सॲप चॅट्सचा पंचनामा सुरू केला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे जालन्यातील खंडणीखोर ‘युट्यूब पत्रकारां’चे धाबे पुरते दणाणले आहेत!
नेमकं प्रकरण काय?
अंबड-मंठा बायपासवरील संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. बळीराम बागल यांना सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट टाकण्याची भीती दाखवून आधी १० हजार रुपये उकळण्यात आले. पण म्हणतात ना, चटावलेल्यांना हडपल्याशिवाय चैन पडत नाही! त्या १० हजारांनंतर थेट आणखी ५० हजारांची नवीन मागणी करण्यात आली. अखेर डॉक्टरांनी या ब्लॅकमेलिंगला भीक न घालता पोलिसांकडे धाव घेतली. कदीम जालना पोलिसांनी गुन्हा दाखल करत निकिता काळे आणि सचिन सुर्वे या दोघांना बेड्या ठोकल्या आणि कोर्टात हजर केले. कोर्टाने दोघांचीही पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
तपासाचा केंद्रबिंदू: या खंडणी बाजाराचे ‘मास्टरमाईंड’ कोण?
निकिता काळे आणि सचिन सुर्वे हे फक्त ‘मोहरे’ आहेत की यामागे एखादी मोठी टोळी सक्रिय आहे? हाच सध्या कदीम पोलिसांच्या तपासाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे.
पोलिसांनी आता खालील मुद्द्यांवर तपास केंद्रित केला आहे:
कॉल डिटेल्स आणि चॅटिंग: निकिता आणि सचिनच्या संपर्कात जालन्यातील आणखी कोणते तथाकथित ‘पोर्टल’ व ‘युट्यूब चॅनल’ चालक होते?
आर्थिक लागेबांधे: १० हजार रुपयांच्या खंडणीत कुणाकुणाचा वाटा होता? ऑनलाइन व्यवहार कुणाकुणाच्या खात्यावर झाले?
सोशल मीडिया सिंडिकेट: एकाने बदनामीकारक बातमी लावायची, दुसऱ्याने ती शेअर करायची आणि तिसऱ्याने ‘सेटलमेंट’साठी मध्यस्थी करायची, अशी पद्धतशीर साखळी जालन्यात सुरू होती का?
जालन्यातील तोतया पत्रकारांची पळापळ!
या दोघांना कोठडी मिळताच, त्यांच्यासोबत चहाच्या टपरीवर बसून ‘सेटलमेंट’चे आडाखे बांधणाऱ्या अनेक ‘युट्यूब बहाद्दरांचे’ फोन अचानक नॉट रिचेबल झाले आहेत. काहींनी तर आपल्या चॅनेल्सवरील जुन्या संशयास्पद पोस्टही घाईघाईने डिलीट करायला सुरुवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या खंडणी प्रकरणात लवकरच आणखी काही ‘युट्यूब पत्रकारां’वर कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची दाट शक्यता आहे.
बेरक्याचा थेट सवाल:
जिल्ह्यात पत्रकारितेच्या नावाखाली खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि शासकीय-खाजगी यंत्रणांना वेठीस धरणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. निकिता आणि सचिनची पाच दिवसांची कोठडी ही केवळ ‘झांकी’ आहे; आता पोलीस या संपूर्ण ‘सिंडिकेट’ची मुळे खणून काढणार का? की ‘अर्थपूर्ण’ तडजोडीत प्रकरण इथंच थांबणार? याकडे संपूर्ण जालना जिल्ह्याचे डोळे लागले आहेत!

0 टिप्पण्या