ब्रेकिंग बेरक्या: विलास बडेंचा 'न्यूज १८ लोकमत'ला रामराम; 'पुढारी न्यूज'च्या कार्यकारी संपादकपदी लागणार वर्णी?


टीव्ही मीडियाच्या आखाड्यातून आणखी एक मोठी आणि आतली खबर बाहेर येतेय... 'न्यूज १८ लोकमत'चा (न्यूज १८ मराठी) बडा चेहरा आणि 'बडे मुद्दे' या गाजलेल्या डिबेट शोचे होस्ट विलास बडे यांनी चॅनलचा राजीनामा ठोकल्याची जोरदार चर्चा मीडियाच्या गल्लीबोळात सुरू झाली आहे.

मिळालेल्या पक्क्या माहितीनुसार, विलास बडे आता 'पुढारी न्यूज'च्या वाटेवर असून, त्यांना तिथे थेट 'कार्यकारी संपादक' (Executive Editor) पदाची मोठी ऑफर मिळाल्याचं समजतंय.

थांबवण्याचे प्रयत्न निष्फळ?

बडे यांनी राजीनामा दिल्यानंतर 'न्यूज १८'च्या मॅनेजमेंटकडून त्यांना थांबवण्यासाठी मनधरणी सुरू असल्याचे समजते. मात्र, बडे यांनी आपला निर्णय पक्का केल्याचे दिसते. जर ते बाहेर पडले, तर पुढारी चॅनलची धुरा ते लवकरच हाती घेतील.

तिकडे पुढारी न्यूजमध्येही मोठी उलथापालथ झाली आहे. पुढारीचे विद्यमान कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांनी राजीनामा दिला असून तो मंजूरही झाला आहे. जोशी आता 'एनडीटीव्ही मराठी'च्या (NDTV Marathi) वाटेवर असल्याची पक्की खबर आहे. त्यामुळे पुढारीत रिकामी झालेली ही बडी खुर्ची विलास बडे सांभाळणार हे आता जवळपास निश्चित मानलं जातंय.

प्रिंट ते प्राइम टाइम... असा राहिलाय प्रवास

विलास बडे यांचा पत्रकारितेतील प्रवास चांगलाच तगडा आणि घामाचा राहिला आहे:

  • २००७: पत्रकारितेची सुरुवात 'दैनिक सकाळ'मधून केली. त्यानंतर 'साप्ताहिक लोकप्रभा'मध्ये उपसंपादक म्हणून अनुभव घेतला.

  • २०१२: टीव्ही मीडियात उडी घेत तत्कालीन 'IBN लोकमत'मध्ये उपसंपादक म्हणून इनिंग सुरू केली (३ वर्षे).

  • त्यानंतर: 'जय महाराष्ट्र' चॅनलमध्ये एक वर्ष थेट ग्राउंड रिपोर्टिंग, मग 'एबीपी माझा'मध्ये ३ वर्षे अँकर म्हणून स्वतःची छाप पाडली.

  • घरवापसी: पुन्हा 'न्यूज १८ लोकमत'मध्ये परतले आणि गेली सलग ९ वर्षे ते या चॅनलचा मुख्य कणा बनून राहिले.

टीव्ही स्टुडिओत बसून 'बडे मुद्दे' डिबेट गाजवणारे बडे नुसते एसी स्टुडिओतले अँकर नाहीत; वेळ पडेल तेव्हा भर उन्हात-पावसात ग्राउंडवर उतरून रिपोर्टिंग करणारा हा हाडाचा पत्रकार आहे.

आता 'न्यूज १८'चा हा बडा मोहरा 'पुढारी न्यूज'च्या स्क्रीनवर आणि न्यूजरूममध्ये काय नवीन धमाका करतो, याकडे सगळ्या मीडिया विश्वाचे डोळे लागले आहेत.

- बेरक्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या