संजीवनी हॉस्पिटलला आधी १० हजारांचा गंडा, नंतर ५० हजारांची मागणी; महिला पत्रकारासह साथीदारावर गुन्हा दाखल
जालना (बेरक्या विशेष): हातात माईक किंवा सोशल मीडियाचं पेज आलं की स्वतःला थेट जिल्ह्याचे ‘सुलतान’ समजणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. जालन्यात अशाच एका ‘तोतयागिरी’ आणि ब्लॅकमेलिंगच्या उद्योगाचा पंचनामा झाला असून थेट कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हॉस्पिटलची बदनामी करण्याची भीती दाखवून आधी १० हजार रुपये उकळायचे आणि भूक वाढल्यावर थेट ५० हजारांची खंडणी मागायची, असा प्रताप एका महिला पत्रकाराने तिच्या साथीदारासह केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
अंबड-मंठा बायपास रोडवर डॉ. बळीराम प्रभाकरराव बागल यांचं ‘संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ आहे. तिथे शुभम केशव बडे नावाचा रुग्ण महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत योजनेतून पायाच्या फ्रॅक्चरवर मोफत उपचार घेऊन हसतमुखाने घरी गेला. रुग्णाने किंवा नातेवाईकांनी कोणताही दमडीचा खर्च केला नाही आणि त्यांची कोणतीही तक्रार नव्हती.
पण म्हणतात ना, "मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांची नजर कुठेही पडते!"
१६ सप्टेंबर रोजी ‘एन.के. न्यूज’ नावाने एका फेसबुकवर बदनामीकारक पोस्ट पडली की म्हणे, संजीवनी हॉस्पिटल रुग्णांकडून पैसे लाटतंय! डॉक्टरांनी शहानिशा करण्यासाठी फोन केला असता समोरून ‘मी पत्रकार निकीता काळे बोलतेय’ असा तोरा मिरवण्यात आला.
दहा हजार खिशात अन् पुन्हा ५० हजारांची हाव!
निकीता काळे हिने तिचा साथीदार सचिन सर्वे याला सोबत घेऊन थेट हॉस्पिटल गाठलं. "माझ्याकडे पुरावे आहेत, मी ते व्हायरल करेन, प्रशासनाकडून कारवाई घडवून आणेन," अशी दमबाजी सुरू झाली. शेवटी हॉस्पिटलची विनाकारण बदनामी नको म्हणून एचआर मॅनेजरने १० हजार रुपये रोख दिले, तेव्हा बाईसाहेबांनी पोस्ट डिलीट केली!
पण खंडणीखोरांची भूक एवढ्यावर भागेल तर नवल! २० सप्टेंबरला पुन्हा सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट टाकण्यात आली. हॉस्पिटलचे सिक्युरिटी इन्चार्ज शंतनू कुलकर्णी यांनी संपर्क साधला असता, त्यांना मोतीबाग चौकात बोलावून थेट ५० हजार रुपयांच्या नव्या खंडणीची मागणी करण्यात आली. "पैसे दिले नाही तर पुन्हा हॉस्पिटलची बदनामी करू," अशी खुली धमकीच देण्यात आली.
पोलिसांचा दणका; बीएनएस अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल
वारंवार होणाऱ्या या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर डॉ. बळीराम बागल यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी निकीता काळे आणि सचिन सर्वे (दोघे रा. जालना) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०८(२), ३०८(३), ३०८(६) (खंडणी), ३५६(२), ३५६(३) (मानहानी), ३५१(२) (धमकावणे) आणि ३(५) अन्वये गुन्हा (गु.र.क्र. ०५३२/२०२६) दाखल केला आहे.
दरम्यान , पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक केली असून, न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे.
बेरक्याचा सवाल:
चार ओळींची बातमी टाईप करता येत नाही, पत्रकारितेचा ‘प’ माहिती नाही; पण गळ्यात आयकार्ड अडकवून खाजगी संस्था, डॉक्टर्स आणि व्यापाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या अशा खंडणीखोर ‘डिजिटल खंडणीबहाद्दरांवर’ वेळीच चाप बसणार का? याकडे संपूर्ण जालन्याचं लक्ष लागलंय!
0 टिप्पण्या