एक काळ असा होता जेव्हा 'संपादक' हा शब्द उच्चारला तरी समोर एका अभ्यासू, तपस्वी आणि समाजाला दिशा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची प्रतिमा उभी राहायची. पूर्वी संपादक म्हटला की तो समाजाचा एक निर्विवाद आदर्श असायचा. मराठवाड्यात अनंतराव भालेराव आणि पश्चिम महाराष्ट्रात रंगाअण्णा वैद्य यांच्यासारख्या दिग्गजांनी आपल्या लेखणीने पत्रकारितेचा एक सुवर्णकाळ गाजवला. या पिढीनंतरही असे अनेक संपादक होऊन गेले, ज्यांनी पत्रकारितेची मूल्ये जपली आणि जे खऱ्या अर्थाने समाजासाठी दीपस्तंभ ठरले. त्यांचा शब्द म्हणजे प्रमाण आणि त्यांचा अग्रलेख म्हणजे राजकीय व सामाजिक वर्तुळातील चर्चेचा केंद्रबिंदू असायचा.
डिजिटल युगातील स्वयघोषित 'मुख्य संपादक'
आज डिजिटल मीडियाच्या काळात या अत्यंत सन्माननीय पदाचे अक्षरशः हसे झाले आहे. ऊठसूठ कोणीही आपली एक मोफत वेबसाईट तयार करतो, एखादे यूट्यूब चॅनेल काढतो आणि स्वतःच्या नावापुढे थेट 'मुख्य संपादक' (Chief Editor) अशी मोठी पाटी लावून मोकळा होतो. या तथाकथित संपादकांकडे ना पत्रकारितेचे साधे शिक्षण असते, ना कोणत्याही विषयाचे सखोल ज्ञान. हातात स्मार्टफोन आणि स्वस्त डेटा असल्याच्या जोरावर 'संपादक' या बिरुदाची प्रतिष्ठा मातीमोल झाली आहे.
तंत्रज्ञानाचे अतिक्रमण आणि प्रिंट मीडियाची गळचेपी
यात भर म्हणून आता कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI) आव्हान उभे राहिले आहे. आता बातम्या गोळा करण्यापासून ते सविस्तर लेख आणि आकर्षक ग्राफिक्स तयार करण्यापर्यंतची सर्व कामे AI च्या माध्यमातून सेकंदात होत आहेत. ज्या अचूकतेसाठी आणि विश्लेषणासाठी पूर्वी संपादकीय मंडळाची गरज भासायची, ते काम आता अल्गोरिदम करत आहे. यामुळे बातमीतील 'माणूस' आणि संपादकाची 'दृष्टी' हरवत चालली आहे.
या सगळ्या रेट्यामध्ये मूळ प्रवाहातील प्रिंट मीडियासाठी हा अतिशय कठीण आणि कसोटीचा काळ बनला आहे. वाचकांची अभिरुची इतकी उथळ झाली आहे की सखोल वाचनाची सवयच संपत चालली आहे. याचेच एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी उदाहरण म्हणजे, पुण्याच्या एका अग्रगण्य दैनिकाने गेले तीन महिने आपले 'संपादकीय' (अग्रलेख) छापणेच बंद केले आहे. "वाचक आता एवढे मोठे लेख वाचत नाहीत, मग कशाला ती जागा वाया घालवायची?" हे त्यामागचे विदारक सत्य आहे.
ज्या पदाने अनेक दशके समाजाला विचार करायला शिकवले, व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धाडस दिले, ते 'संपादक' हे पद आता केवळ नावापुरते उरणार की काळाच्या ओघात कायमचे नष्ट होणार, हाच खरा चिंतेचा विषय आहे.

0 टिप्पण्या