मोठा ट्विस्ट: विलास बडे ‘न्यूज १८ मराठी’ सोडणार नाहीत; मॅनेजमेंटच्या मनधरणीला यश, चॅनलमध्ये खांदेपालट!

 


टीव्ही मीडियाच्या कॉरिडोअरमधून आत्ताची सर्वात मोठी आणि ताजी अपडेट समोर येतेय. ‘न्यूज १८ मराठी ’चे स्टार अँकर विलास बडे यांनी चॅनल सोडल्याची आणि ते पुढारी न्यूजच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगत असतानाच, या संपूर्ण प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. विलास बडे ‘न्यूज १८ मराठी ’ सोडून कुठेही जाणार नसून, ते चॅनलमध्येच कायम राहणार असल्याचं पक्कं झालं आहे.

प्रशासनाच्या मनधरणीला अखेर यश!

‘बडे मुद्दे’ डिबेट शोचा लोकप्रिय चेहरा असलेले विलास बडे बाहेर पडण्याच्या तयारीत होते. मात्र, चॅनल प्रशासनाने तातडीने सूत्रे हलवत त्यांची मनधरणी केली आणि त्यांना थांबवण्यात अखेर यश मिळवले. केवळ थांबवलेच नाही, तर बडे यांना आता चॅनलमध्ये मोठी आणि नवी जबाबदारी देण्याची जोरदार तयारी सुरू आहे.

‘न्यूज १८ मराठी’च्या न्यूजरूममध्ये मोठी उलथापालथ

विलास बडे यांच्या थांबण्यासोबतच चॅनलच्या अंतर्गत रचनेत आणि वरिष्ठ पदांवर मोठे खांदेपालट करण्यात आले आहेत:

  • विलास बडे: विलास बडे यांच्या खांद्यावर आता थेट 'आउटपुट हेड' (Output Head) पदाची अत्यंत महत्त्वाची आणि जबाबदारीची धुरा सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे.

  • अमित मोडक: यापूर्वी आउटपुट हेड म्हणून कार्यरत असणाऱ्या अमित मोडक यांच्याकडे आता चॅनलच्या संपूर्ण 'यूट्यूब' (YouTube / Digital Video) विभागाची स्वतंत्र आणि मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

  • प्रताप काळोखे: तर न्यूजरूममधील अनुभवी चेहरे प्रताप काळोखे यांच्याकडे 'इनपुट हेड' (Input Head) पदाची सूत्रे देण्यात आली आहेत.

एकीकडे विलास बडे यांच्या पुढारी न्यूजमधील संभाव्य एन्ट्रीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे, तर दुसरीकडे अंतर्गत पातळीवर झालेल्या या मोठ्या फेरबदलांमुळे ‘न्यूज १८ मराठी’ची न्यूजरूम आता नव्या जोशात मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसतेय.


जाता-जाता:

‘पुढारी’ला पुढारी मिळणार का? प्रसन्न जोशींच्या खुर्चीवर आता कोणता ‘भिडू’ बसणार?

न्यूज १८ मराठी मध्ये विलास बडेंना रोखण्यात तिथल्या मॅनेजमेंटला यश आलं खरं, पण यामुळे खरा पेच निर्माण झालाय तो नवी मुंबईतल्या ‘पुढारी न्यूज’च्या कार्यालयात!

प्रसन्न जोशी यांनी राजीनामा देऊन ‘एनडीटीव्ही मराठी’ची वाट धरल्यामुळे पुढारीत कार्यकारी संपादकाची मुख्य खुर्ची रिकामी झाली आहे. त्या जागेवर विलास बडे यांना आणून चॅनलला एक आक्रमक ‘पुढारी’ चेहरा देण्याचा मॅनेजमेंटचा १०० टक्के प्लॅन होता; पण शेवटच्या ओव्हरमध्ये बडेंनी ‘यू-टर्न’ मारला आणि पुढारीच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं.

पुढारीच्या रिकाम्या झालेल्या या तख्तावर आता कोणता नवा ‘भिडू’ येऊन बसतो आणि चॅनलची सूत्रं हाती घेतो, याकडे अवघ्या मीडिया जगताच्या नजरा लागल्या आहेत. बेरक्याची नजर या घडामोडींवर कायम आहे... बातमी फुटणारच!

- बेरक्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या