भास्कर समूहात पुन्हा 'कात्री' चालणार?

             वाढत्या महागाईत प्रिंट कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड कोसळण्याची दाट शक्यता



भोपाळ/मुंबई (विशेष प्रतिनिधी): मीडिया वर्तुळातून एक मोठी आणि धक्कादायक आतली खबर थेट बाहेर आलीये! 'देशातील नंबर वन' असल्याचा डंका पिटणाऱ्या आणि हिंदी, गुजरातीसह महाराष्ट्रात 'दिव्य मराठी' चालवणाऱ्या 'डी. बी. कॉर्प' (दैनिक भास्कर समूह) मध्ये सध्या जोरदार हालचाली सुरू असून, देशभरातील प्रिंटच्या कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार लटकल्याची कुजबूज ऐकू येतेय.

खर्च आटोक्यात आणण्याच्या नावाखाली भास्कर मॅनेजमेंटने आता पुन्हा एकदा 'कॉस्ट कटिंग'चा जुनाच फॉर्म्युला बाहेर काढला असून, यावेळेस मोठ्या प्रमाणावर पत्रकार आणि इतर प्रिंट कर्मचाऱ्यांची गच्छंती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

नफ्यात २६ टक्क्यांची घसरण; मालक मंडळी टेन्शनमध्ये!

आता हे सगळं अचानक कसं सुरू झालं? तर कंपनीने नुकतेच जाहीर केलेले Q2 चे आर्थिक निकाल! हे ताळेबंद पाहिल्यावर अग्रवाल बंधूंचे (पवन आणि गिरीश अग्रवाल) कपाळ मोक्ष झाल्यासारखी अवस्था झालीये.

  • नफ्याला घरघर: गेल्या वर्षी याच तिमाहीत ९३ कोटींचा असणारा निव्वळ नफा यंदा थेट २६ टक्क्यांनी घसरून ६९ कोटींवर आला.

  • कमाई घटली: एकूण महसूल ३.३ टक्क्यांनी घसरून ६१४ कोटींवर थांबला, तर जाहिरातींचा गल्ला ४३९ कोटींवरून थेट ४११ कोटींवर आटला.

  • कागदाचा भडका: आंतरराष्ट्रीय तणाव, वधारलेला डॉलर आणि आयात शुल्कामुळे वृत्तपत्रीय कागदाचा (न्यूजप्रिंट) भाव प्रतिटन तब्बल ५७ हजार रुपयांवर (१४ ते २० टक्क्यांची वाढ) पोहोचला आहे.

कंपनीने नवरात्रीचा सण पुढे ढकलल्याचे कारण पुढे केले असले, तरी अंतर्गत तिजोरीत लागलेली गळती लपत नाहीये!

'ऑपरेशनल एफिशियन्सी'चा बुरखा आणि AI चे भूत!

तिमाही निकालाच्या कागदपत्रांमध्ये व्यवस्थापनाने वारंवार 'कॉस्ट ऑप्टिमायझेशन', 'ऑपरेशनल एफिशियन्सी' आणि 'खर्च नियंत्रण' यांसारखे गोंडस कॉर्पोरेट शब्द वापरले आहेत. पण मीडियाच्या खाचाखोचा जाणणाऱ्या बेरक्याच्या वाचकांना वेगळं सांगायला नको की या कॉर्पोरेट भाषेचा खरा अर्थ काय असतो!

आतल्या गोटातून मिळालेली पक्की बातमी अशी: 

१. प्रिंटवरच संक्रांत: डिजिटल किंवा इमर्जिंग मीडिया सुरक्षित असला, तरी वृत्तपत्रांचा घटता खप आणि जाहिरातींची वानवा पाहता संक्रांत थेट प्रिंट एडिशनच्या पत्रकारांवर आणि कर्मचाऱ्यांवर येणार आहे. 

२. AI आणि ऑटोमेशन: एडिटोरियल विभागात माणसांची गरज कमी करण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आणि ऑटोमेशन वेगाने आणण्याची तयारी सुरू आहे. म्हणजे जिथे पाच सब-एडिटर लागायचे, तिथे एकाच माणसाकडून काम उरकून घेण्याचा घाट घातला जातोय.

 ३. मोठ्या साहेबांनाही फटका? फक्त छोट्या कर्मचाऱ्यांवरच गाजर फिरेल असं नाही, तर मॅनेजमेंटच्या 'M3' आणि त्यावरील उच्च पदस्थ, गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारात थेट कपात करण्याचा किंवा त्यांना घरचा रस्ता दाखवण्याचा पर्यायही चर्चेत आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये घबराट; पुढचा बळी कोण?

इंडियन न्यूजपेपर सोसायटीने (INS) १५ टक्के सरचार्ज लावण्याचा सल्ला दिला असला, तरी जाहिरातदार भाव देत नसल्याने मूळ खर्च कापल्याशिवाय नफा वाढणार नाही, या निष्कर्षाप्रत भास्करचे थिंकटँक आले आहेत. त्यामुळे अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी देशभरातील वेगवेगळ्या आवृत्त्यांमध्ये 'लिस्ट' तयार होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

दसरा-दिवाळीच्या तोंडावर बोनसची वाट पाहणाऱ्या भास्करच्या सामान्य कर्मचाऱ्यांच्या छातीत मात्र आता धडधड वाढली आहे. आता ही गच्छंती नेमकी कोणापासून सुरू होते आणि व्यवस्थापन कोणाचा 'नारळ' फोडतं, याकडे संपूर्ण मीडिया जगताचे डोळे लागले आहेत.

बघूया, पुढे भास्करच्या दरबारात काय काय 'उद्योग' घडतात ते... बेरक्याची नजर खिळलेली आहेच!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या