जरांगेंच्या ऑडिओ बॉम्बने पत्रकारितेच्या पडद्यामागची ‘दुकानदारी’ चव्हाट्यावर!
मुंबई (विशेष प्रतिनिधी): चौथ्या स्तंभाची ‘कमान’ नेमकी कुणाच्या दावणीला बांधलीय, यावर आजवर फक्त कुजबूज चालायची; पण मनोज जरांगे पाटलांच्या एका ‘ऑडिओ बॉम्ब’ने थेट नावानिशी महाराष्ट्राच्या पत्रकारितेची अब्रू चव्हाट्यावर आणून ठेवली आहे. जरांगेंनी पत्रकार परिषदेत वाजवलेल्या कथित ऑडिओ क्लिपने राजकीय वर्तुळात जेवढी खळबळ उडाली नाही, त्याहून भयंकर हादरा मीडियाच्या तथाकथित ‘तटस्थ’ इमल्याला बसला आहे. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी या क्लिपचा पंचनामा करत थेट फेसबुकवर असा काही जाब विचारलाय की, पत्रकारांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आता नुसती सामसूम आहे!
“बघतो कसा छापत नाही ते!”: भाजपची संपादकांना भाईगिरी?
चौधरींच्या दाव्यानुसार, जरांगेंनी ऐकवलेली क्लिप भाजपच्या अंतर्गत बैठकीतली आहे. त्यात एक महाभाग विचारतो, “लेख लिहितो पण लोकसत्ता छापेल का?” त्यावर पलीकडून कथित भाजप कार्यकर्ता (चौधरींच्या भाषेत ‘गुंड’) अजय ठोकून सांगतो— “बघतो कसा छापत नाही ते!”
म्हणजे विचार करा! ज्या ‘लोकसत्ता’ने इतिहास घडवत भाजपच्या ‘पहिल्या बाजू’साठी अख्खं अर्धं पान आंदण दिलं होतं, त्याच वृत्तपत्राच्या संपादकाला थेट गल्लीतल्या भाईसारखी दमदाटी? विरोधी भूमिका घेतली म्हणून थेट गिरीश कुबेरांना ‘डीप स्टेट’वाले ठरवायचे आणि लेख छापून आणण्यासाठी ‘कसा छापत नाही ते बघतो’ असा माज दाखवायचा, ही कुठली लोकशाही? असा थेट सवाल चौधरींनी डागला आहे.
पराग करंदीकर ‘नॉर्मल’ आहेत म्हणजे नेमकं काय रे भाऊ?
सगळ्यात जास्त धुरळा उडालाय तो या क्लिपमधल्या एका कोडवर्डमुळे! क्लिपमध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’चे (मटा) संपादक पराग करंदीकर यांच्या नावाचा उल्लेख येतो आणि म्हणे, “करंदीकर नॉर्मल आहेत!”
आता बेरक्याच्या भाषेत सांगायचं तर, भाजपच्या राजकीय थर्मामीटरवर करंदीकरांचं ‘नॉर्मल’ असणं म्हणजे नेमकं काय?
- विरोध न करता सरकारची री ओढतात म्हणून ते ‘नॉर्मल’?
- की हवा तसा मलिदा आणि बातम्यांची मांडणी हवी तशी करून देतात म्हणून ते भाजपसाठी ‘कम्फर्टेबल’ आहेत?
- कुबेरांना धमक्या आणि करंदीकरांना ‘आपला माणूस’ म्हणून सर्टिफिकेट, हा पत्रकारितेतल्या ‘मॅनेजमेंट’चा कोणता पॅटर्न आहे?
विश्वंभर चौधरींनी नेमका हाच दुखरा कोपरा दाबला आहे. संपादकांची अशी ‘कॅटेगरी’ पाडण्याइतपत मजल राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची जातेच कशी, हा खरा सवाल आहे.
माध्यमांनी आतातरी आरशात बघावं!
“माध्यमांना भाजप स्वतःचे नोकर असल्यासारखं वागवतेय, गुंडासारख्या धमक्या देतेय. जर ‘लोकसत्ता’ आणि ‘मटा’सारख्या मोठ्या ब्रँडची ही किंमत करत असतील, तर बिचाऱ्या स्थानिक आणि छोट्या वृत्तपत्रांना तर हे खिशातच घेऊन फिरत असतील!” असा सज्जड इशाराही चौधरींनी दिला आहे.
अर्थात, जरांगे पाटलांनी ऐकवलेल्या या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक किंवा अधिकृत पुष्टी झालेली नाही, हा नेहमीचा कायदेशीर सोपस्कार बाजूला ठेवला, तरी जे बाहेर आलंय ते मराठी पत्रकारितेसाठी प्रचंड लाजीरवाणं आहे.
‘मटा’ आणि ‘लोकसत्ता’च्या गोटात सध्या या क्लिपवरून कमालीची अस्वस्थता पसरली असून, संपादक महोदय स्वतःचा हा ‘नॉर्मल’ कारभार कसा जस्टिफाय करतात, याकडे संपूर्ण मीडिया जगताचं लक्ष लागलं आहे!

0 टिप्पण्या