जरांगेंच्या बॉम्बने राजकीय वर्तुळात धुरळा!
पुणे/मुंबई: विधानसभेच्या आखाड्यात पडद्यामागून नेमक्या कोणत्या चाली खेळल्या जात होत्या, याचा एक ‘ऑडिओ स्फोट’ मनोज जरांगे पाटलांनी थेट पत्रकार परिषदेत घडवून आणला आहे. “माझ्याविरोधात तीन वर्षं बदनामीचा उद्योग सुरू होता,” असा घणाघात करत जरांगेंनी एक कथित ऑडिओ क्लिप ऐकवली अन् राजकीय वर्तुळात एकच पळापळ सुरू झाली. ही क्लिप म्हणे भाजपच्या एका अंतर्गत कॉन्फरन्स मीटिंगची असून, त्यात एका आयटी सेलशी संबंधित महिलेचा आवाज असल्याचा दावा जरांगेंनी केला आहे.
या व्हायरल ऑडिओमध्ये मीडिया कसा ‘मॅनेज’ करायचा, कोणाला पुढे करून कोणाचा गेम करायचा आणि जनमताचा ‘नॅरेटिव्ह’ कसा फिरवायचा, याचा असा काही कच्चाचिठ्ठा समोर आलाय की ऐकणाऱ्याचे कान टवकारले आहेत.
टीव्हीचा पडदा आणि पडद्यामागची ‘स्क्रिप्ट’
क्लिपमध्ये कथितपणे ऐकू येणाऱ्या संवादांवर नजर टाकली, तर राजकारणात टीव्ही आणि सोशल मीडियाचा वापर हत्यारासारखा कसा होतो, याची धक्कादायक झलक पाहायला मिळते:
- मराठ्यांवर मराठाच आदळा: जरांगे भाजपला ‘मराठाद्रोही’ ठरवत असताना त्यांच्याविरोधात पक्षाने थेट अंगावर न जाता “आपल्या हाताने करायचं नसेल तर दुसऱ्याच्या हाताने करू,” असा फॉर्म्युला ठरवला गेला. यासाठी उदयनराजे भोसले, प्रवीण दरेकर आणि नितेश राणे यांच्यासारख्या आक्रमक चेहऱ्यांना टीव्हीवर पुढे रेटण्याची रणनीती आखली गेली.
- लक्ष वळवण्यासाठी अर्णब गोस्वामींचा वापर: जरांगेंचा रोख आणि मूळ मुद्द्यावरून जनतेचं लक्ष भरकटवण्यासाठी थेट अर्णब गोस्वामी यांचे व्हिडिओ पुढे करा, देशाची आर्थिक स्थिती आणि राहुल गांधींवर नॅरेटिव्ह तयार करून सोशल मीडियावर ढकला, असा अजब सल्लाही या क्लिपमध्ये दिला गेला आहे.
- खिशातून पैसे टाका, पण हवा करा: वृत्तपत्रं आणि सोशल मीडियावर जरांगेंविरोधात हवा तयार करण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रसंगी वैयक्तिक खर्चातूनही मीडिया मॅनेजमेंट करावं, असा सूर या संवादात उमटल्याचा दावा आहे.
‘५०० कोटी’चा वादग्रस्त उल्लेख आणि जरांगेंचा सवाल
क्लिपच्या दुसऱ्या भागात आणखी एक स्फोटक दावा करण्यात आला आहे. जरांगेंपर्यंत म्हणे ‘श्रीकांत शिंदेंमार्फत ५०० कोटी पोहोचले आहेत,’ अशी चर्चा एका महिलेकडून केली जात आहे. यावरून जरांगेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला असून, “सलग तीन वर्षे माझ्याविरोधात कट रचणाऱ्या या मीडिया सिंडिकेटची सखोल चौकशी करा,” अशी मागणी केली आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या धामधुमीत नॅरेटिव्ह सेट करण्याचे हे कथित उद्योग बाहेर आल्याने सोशल मीडियावर ‘ट्रोलर्स विरुद्ध जरांगे समर्थक’ असा नवा सामना रंगला आहे. ही क्लिप कितपत खरी आणि कितपत बनावट, यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नसले, तरी या ‘ऑडिओ बाँब’ने राजकीय आणि मीडियाच्या गोटात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे एवढं मात्र नक्की!

0 टिप्पण्या