..आणि पंचरंगी पोपटाच्या भूमिकेत सुशील बापूसाहेब रेणापूरकर- कुलकर्णी !

 


सुमारे चाळीसेक वर्षांपूर्वी आचार्य प्र.के. अत्रे यांनी लखोबा लोखंडे नावाच्या एका निपाणीचा तंबाखू व्यापाऱ्याच्या पाच लग्नाच्या भानगडींवर तो मी नव्हेच ! नावाचे एक फर्मास फार्सिकल नाटक लिहिले होते. ही एक सत्यकथाच होती. लखोबा लोखंडे नावाच्या या महाभागाने निपाणी (कर्नाटक ),कोल्हापूर,सांगली,नाशिक (महाराष्ट्र )आणि सुरत (गुजरात ) अशा तीन राज्यातील पाच वेगवेगळ्या असहाय निराधार महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी घरोबा करून चक्क संसार थाटले होते ! विशेष म्हणजे या पठ्ठ्याने अनेक वर्ष यातल्या एकाही बायकोची दुसरीला कानोकान खबर लागू दिली नव्हती. एवढा हा चालबाज आणि करामती ! पण पादलेला वास झाकत नाही ; कर्माची फळे चुकत नाहीत म्हणतात त्याप्रमाणे अखेर त्याच्या भानगडींचा भांडाफोड झाला. तो पकडला गेला. त्यावेळी हि केस भलतीच गाजली होती. एवढी की अत्र्यांनी त्यावर चक्क नाटक लिहिले ! नाट्यवर्य प्रभाकर पणशीकरांनी हे नाटक (फिरत्या ) रंगमंचावर आणले. यातल्या लखोबा लोखंडेची भूमिका स्वतः पणशीकरांनी केली होती ! ...आणि पंचरंगी पोपटाच्या भूमिकेत प्रभाकर पणशीकर ! अशी या नाटकाच्या जाहिरातीची टॅगलाईन देखील त्याकाळी भलतीच गाजली होती. 


हे सगळं लखोबा पुराण आज आठवण्याचं कारण असं की महाराष्ट्रात पुन्हा एकदा एक नवा लखोबा लोखंडे अवतरला असून यावेळी पंचरंगी पोपटाच्या भूमिकेत सुशील कुलकर्णी नावाचा युट्युब रतीबर आहे ! त्या लखोबा प्रमाणेच हा लखोबा देखील सगळं करून सवरून नामनिराळा होत ; काखा वर करून, साळसूद शहाजोगपणे ; तो मी नव्हेच असा कांगावा करत आहे ! जरांगे यांच्या ऑडिओ किल्प स्फोटानंतर आणि महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी  एसआयटी नेमल्यानंतर नॉट रिचेबल ( फरार ) झालेला हा लबाड लखोबा काल पुन्हा युट्युबवर उगवला ; आणि साळसूदपणाचा आव आणत ; तो मी नव्हेच ! अशी अजीजी करायला लागला.


हे अपेक्षित होतेच ;खुनाला वध म्हणून नॉर्मलाईझ करण्याची वामन्यांची ही नथुरामी वृत्ती नवी नाही.त्यानुसार सुशील कुलकर्णीचे तो मी नव्हेच ! चे नाट्यप्रयोग सुरु झाले आहेत ! मनोज जरांगे यांनी सार्वजनिक करून चव्हाट्यावर आणलेल्या त्या ऑडिओ क्लिपमधील तो आवाज माझा नाही ; मी अशा कोणत्याही झूम किंवा प्रत्यक्ष मीटिंगमध्ये नव्हतो. संबंधित चर्चेशी माझा कोणताही संबंध नाही. असा स्टॅन्ड घेत ; या क्लिपची सायबर सेल मार्फत फॉरेन्सिक चाचणी करा.माझ्यावर संशय असेल तर माझ्या आवाजाचे नमुने घ्या. त्याची पडताळणी करा.सत्य काय ते बाहेर येईल ! पण मला मराठ्यांचा शत्रू ; जरांगे विरोधक, एकनाथ शिंदेंचा अहितचिंतक, षड़यंत्रकारी ठरवू नका. काही लोक मला पाताळयंत्री कपट कारस्थानी ठरवायला निघाले आहेत. माझ्यावर आलेले गंडांतर पाहून अनेकांना आनंद देखील झाला आहे. काही लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन माझी प्रतिमा खलनायक म्हणून गिरवायला निघाले आहेत. माझे कुलकर्णी आडनाव बघून आणि माझ्यावर गुदरलेले बालंट बघून अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटताहेत. पण बांधवांनो (हे मराठा समाजाला उद्देशून !) नाव कुलकर्णी असले तरी मी जातीयवादी नाही. मी मराठवाड्यातल्या खेडेगावातून (रेणापूर ) मधून आलेलो आहे. शेतकरी कुटूंबात वाढलेलो आहे. (लहानपणी शेती केलेली आहे ; मातीत खेळलेलो आहे !) माझे अनेक मित्र आणि सहकारी बहुजन समाजातील (मराठे सुद्धा !) आहेत. होय ; हे खरे आहे की मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी ,अमित शहाजी, देवेन्द्रजी फडणवीसजी यांचा चाहता समर्थक आहे. माझ्या अनलायझर या युट्युबवर मी सातत्याने भाजप तसेच मोदी- शहा- फडणवीस यांच्या समर्थनाच्या पोस्ट टाकत असतो. मी कट्टर हिंदुत्ववादी आहे ; आणि तितकाच काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस  तसेच अन्य सर्व भाजप विरोधी पक्षांचा कडवा विरोधक आहे ! मनोज जरांगे यांना व्यक्तिशः  आणि त्यांच्या ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीला माझा विरोध आहे काय ? तर आहे ! जरांगे यांच्या भाषेला, शिवीगाळीला, आंदोलनाच्या पद्धती आणि कार्यशैलीला देखील माझा वैचारिक आणि भूमिकात्मक विरोध आहे ! पण म्हणून मी खलनायक कसा ? तिरस्करणीय कसा ? एखाद्या व्यक्ती अथवा विचारधारेचे समर्थन किंवा एखाद्या व्यक्ती अथवा विचारधारेचा विरोध करण्याचा भारतीय नागरिक म्हणून मला घटनात्मक अधिकार आहे ; पत्रकार म्हणून मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ; मी त्याचा मुक्त वापर करतो. याला आक्षेप असण्याचे कारण काय ? इत्यादी इत्यादी वगैरे वगैरे !


सुशील बापूसाहेब  रेणापूरकर उर्फ कुलकर्णीने खूपच पापभिरुपणाचा आव आणत आपली करुण (सवरून ) कहाणी मांडली. मापात पाप केल्यावर काय वेळ येते बघा. म्हणजे कालचा तो व्हिडीओ पाहून आम्हाला चक्क गलबलून आले हो ! काय तो ताठा,काय तो तोरा, काय ती आकड आणि हेकडी...अबाबाबा ! केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे, आणि ती कधी जाणारच नाही या अविर्भावात सुश्या कैफात असल्यासारखा बोलायचा. राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे अशी कोणाचीही उडाणटप्पू भाषेत टिंगल टवाळी करायचा ; जो मोदी -फडणवीस विरोधक तो याचा शत्रू ! मग तो कोणी का असेना ; हा त्याच्याबद्दल काहीही बोलणार ! अगदी अनर्गल आणि अर्वाच्च देखील. विरोधी पक्षातील महिलांबाबत देखील गलिच्छ भाषा ! जरांगे बाबत तर विचारूच नका ! म्हणजे त्या बाबतीत सुश्या म्हणजे परशुराम आणि जरांगे म्हणजे इंद्र, आणि जरांगे  समर्थक म्हणजे क्षत्रिय ! याची प्रतिज्ञा पृथ्वी निक्षत्रीय करण्याची ! पण हा परशुराम क्लिपच्या फाशात अडकला ; ज्यांच्यावर तंगडी वर केली त्यांना आता बांधवानो वाचवा म्हणून गयावया करतोय ! का म्हणून विचारा ? वरचे आका आणि खालच्या काकांनी हात वर केलेत ! म्हणून हा लखोबा आता मराठा बांधवांसमोर दोन्ही कर जोडून ; तो मी नव्हेच ! म्हणत गयावया करतोय.पण त्यात पश्चाताप नाही .चुकीची जाणीव नाही, उपरतीही नाही !  आहे तो कावा ! गनिमी नव्हे हो ... कोणता ? तो तुम्हाला चांगला माहित आहे ,आम्हाला कशाला बोलायला लावता ? 


-रवींद्र तहकिक 

7888030472


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या