> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

रविवार, ३० सप्टेंबर, २०१२

पत्रकार संजय मालाणी यांच्यावर प्राणघातक हल्ला

बीड  - दै.सुराज्यचे वृत्तसंपादक संजय मालाणी यांच्यावर शुक्रवारी दि.२८ रोजी रात्री दहा वाजता अज्ञात लोकांनी सुभाष रोडवर ( सांगली बँकेजवळ ) प्राणघातक हल्ला केला.  यात मालाणी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दै.सुराज्यचे वृत्तसंपादक संजय मालाणी आणि हिंदजागृतीचे संपादक अभिमन्यू घरत हे दोघे जण रात्री दहाच्या सुमारास जिल्हा रूग्णालयात स्वाईन फ्लुबाबतच्या वार्ता संकलनासाठी गेले होते.तेथून ते दुचाकीवरून कार्यालयाकडे परतत असतांना सांगली बँकेजवळील रस्त्यावर पुढून आलेल्या पांढ-या रंगाच्या दुचाकीने त्याना रोखले व काही कळायच्या आत मागून आलेल्या एका दुचाकीवरील अज्ञात दोघांनी घरत यांना बाजूला केले व संजय मालाणी यांना मारहाणीस सुरूवात केली.या हल्ल्यात मालाणी यांना गंभीर मार लागला असून उपचारासाठी त्यांना रात्री जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती शहरात पसरताच पत्रकार,छायाचित्रकार,सामाजिक क्षेत्रात काम करणा-या,राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी रुग्णालयात धाव घेतली,दरम्यान रात्री उशीरा पोलिस अधिक्षक दत्तात्रय मंडलीक,अतिरीक्त पोलिस अधिक्षक माधव कारभारी,पोलिस उपअधीक्षक  संभाजी कदम,पोलिस उपअधीक्षक गृह विद्यानंद काळे यांनी रूग्णालयात भेट देऊन या मारहाणीबाबतची माहिती जाणून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेक-याविरूंध गुन्हा दाखल केला .
बीड जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हयातील पत्रकार संघटनानी निवेदन देवून या हल्ल्याची सखोल चौकशी करून गुन्हेगारास कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे .या  घटनेचा बीडच्या सर्व पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

 अंबाजोगाईत निषेध..

बीड येथील दैनिक सुराज्यचे उपसंपादक संजय मालाणी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा अंबाजोगाईत पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध करून मारेकर्‍यांना तात्काळ अटक करण्याची व पत्रकार संरक्षण कायदा तातडीने अस्तित्वात आणण्याची मागणी उपजिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
या संदर्भात शनिवारी नगरपालिकेत अंबाजोगाई पत्रकार संघाची बैठक होवून या बैठकीत पत्रकार मालाणी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. अशा प्रकारचे हल्ले पत्रकारांवर वारंवार होत असून शासन मात्र या बाबतीत बघ्याची भूमिका घेत आहे. परिणामी या संदर्भात शासनाने तात्काळ पाऊले उचलावीत अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल अशा तीव्र भावना पत्रकारांनी व्यक्त केल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब, संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ, प्रशांत बर्दापूरकर, दत्तात्रय अंबेकर, विरेंद्र गुप्ता, जगन सरवदे आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगन सरवदे यांनी केले. सूत्रसंचालन विरेंद्र गुप्ता यांनी केले. त्यानंतर या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. यावेळी अभिजीत गुप्ता, बालाजी खैरमोडे, अविनाश मुडेगावकर, प्रकाश लखेरा, प्रशांत बर्दापूरकर, अ.र.पटेल, परमेश्‍वर गित्ते, रवि मठपती, प्रदीप तरकसे, अशोक कदम, सुदर्शन रापतवार, रमाकांत उडाणशिव, रमाकांत पाटील, अशोक कचरे, अरुण सोमवंशी, गोविंद खरटमोल, महादेव गोरे, नागेश औताडे, ऍड.जे.बी.साबने, दादासाहेब कसबे, अशोक गुंजाळ, संतोष बोबडे,श्रावण चौधरी, दत्तात्रय दमकोंडवार, रणजित डांगे, सलीम गवळी, पोखरकर, निर्मळे, पी. एस. परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.  त्याचबरोबर  केज येथील पत्रकारांनी मुक मोर्चा काढून मालानी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला.

तीव्र शब्दात धिक्कार
बीड येथील सुराज्य दैनिकाचे पत्रकार संजय मालानी यांच्यावर समाजकंटंकांनी केलेल्या हल्ल्याचा मराठी पत्रकार परिषदेने तीव्र शब्दात धिक्कार केला असून हल्लेखोरांना तातडीने अटक करावी अशी मागणी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्याकडे केली आहे.महाराष्ट्रात पत्रकारांवर सातत्यानं हल्ले होत असून पत्रकारांना निर्भयपणे काम करणे अशक्य झाले आहे.त्यामुळे पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा तात्काळ करावा अशी मागणीही परिषदेने केली आहे.

गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१२

लाडली मीडिया अवार्डने लोकमतचे रवी गाडेकर सन्मानित

औरंगाबाद : पॉप्युलेशन फस्र्ट या सामाजिक संस्थेतर्फे राष्ट्रीय स्तरावर दिल्या जाणारा लाडली मीडिया अवार्ड २०१२ प्रिंट मिडियातून महाराष्ट्र विभागासाठी दोघांना २२ सप्टेंबर रोजी जयपूर (राजस्थान) येथे प्रदान करण्यात आला. त्यात दैनिक लोकमतचे उपसंपादक रवी गाडेकर (औरंगाबाद) यांचा समावेश आहे. 
रविंद्र सांस्कृतिक मंच येथे झालेल्या शानदार सोहळ्यात सन्मानचिन्ह, प्रमाणपत्राने सूचना आणि माहिती संचालनालयाचे मंत्री (राजस्थान) जितेंद्र सिंग यांच्या हस्ते श्री. गाडेकर यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातून अनिता बडे (प्रहार, मुंबई) यांचाही या कार्यक्रमात पुरस्काराने सन्मान करण्यात आला. आदित्य बिर्ला ग्रुपच्या सहकार्याने २००७ सालापासून लाडली मीडिया अवार्ड पॉप्युलेशन फस्र्ट तर्फे दिला जातो. सर्वश्रेष्ठ शोध बातमीसाठी रवी गाडेकर यांना पुरस्कार जाहीर झाला होता. स्त्री भ्रूण हत्येवर त्यांनी चालविलेली मालिका आणि त्यामुळे झालेले जनजागरण याची दखल पुरस्कारसाठी घेण्यात आली. यापूर्वी श्री. गाडेकर यांना उस्मानाबाद पत्रकार संघाचा कै. अनंत भालेराव पत्रकारिता पुरस्कार, अप्रतिम मिडियाचा चौथा स्तंभ पुरस्कारही मिळाले आहेत. जयपूरला झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजस्थान पत्रिकेचे समूह संपादक गुलाब कोठारी, समाजसेविका डॉली ठाकूर, आदित्य बिर्ला ग्रुप बिझनेस रिन्यू कौन्सिलचे चेअरमन ए. के. अग्रवाल, संस्थेच्या अध्यक्षा एस. व्ही. शिष्ठा यांची उपस्थिती होती. या पुरस्कारासाठी राजस्थान, गुजरात, गोवा आणि महाराष्ट्र या चार राज्यांमधून एकूण ५०० नामांकने प्राप्त झाली होती. त्यापैकी १७ जणांची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली. त्यात केवळ महाराष्ट्रातील qप्रट मीडियासाठी रवी गाडेकर आणि अनिता बडे यांचा समावेश आहे. या वेळी सर्वश्रेष्ठ डॉक्यूमेंट्रीसाठी आयबीएन लोकमतच्या प्राजक्ता धूलप यांनाही सन्मानित करण्यात आले. अन्य पुरस्कार प्राप्त विजेत्यांची नावे : शर्मिष्ठा चौधरी (द वीक), प्रदीपqसग बिगावत (राजस्थान पत्रिका), अलका आशलेश (हमारा महानगर), टीना बैरागी (डेली न्यूज), सरस सलील (पत्रिका), तारु कजारिया (qप्रट मिडिया), पूजा कश्यप (कच्छमित्र), प्रिती शहा (आजकल गुजरात समाचार), मनिषा शर्मा (दूरदर्शन), शाई व्यंकटरमण (एनडीटीव्ही), सुनिता कसेरा (व्हिडिओ वॉलियेंटीरियर्स), अमी याज्ञनिक (दिव्य भास्कर) आदी. मिडिया प्लस हे लाडली मीडिया अवार्डसाठी मराठवाडा मीडिया पार्टनर होते.

वाचक काय म्हणतात...

राजमान्य राजश्री डोंगरकीपर यांनी अखेर आपल्या आरोपांवरील उत्तर देण्यासाठी तोंड उघडले. पण त्यांचा हा खुलासा म्हणजे 'मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली' अशा पद्धतीचा आहे. मुंबईत एका संपादकाला कारमध्ये रासक्रीडा करताना पोलिसांनी पकडले होते? तो संपादक कोण, हे तमाम पत्रकारांना माहीत आहे. तसेच केबिनमध्ये महिला पत्रकारांना पत्रकारीताबाह्य उपक्रमांसाठी दोन-दोन तास घेऊन बसणारा संपादक कोण, हेही मुंबईतील मिडीयाला चांगलेच ठाऊक आहे. तेव्हा डोंगरकीपर आता आपली उरलीसुरली लाज वाचवण्याचा केविलवाणा खटाटोप करत आहेत.  डोंगरकीपर यांचे चारित्र्य कसेही असो, ते आक्रमक व शैलीदार पत्रकार म्हणून ओळखले जातात. मात्र खुलासे करताना त्यांनी त्यांच्या कथित शत्रूंची टोपणनावे (चांदोबा, लष्कर-ए-होयबा इ) वापारली. त्यांनी खरी नावे का उघड केली नाहीत. कर नाही त्याला दर कशाला? पण चारित्र्य गमावलेल्या माणसाकडून सत्याची अपेक्षा काय करणार? हा बाबा आता मला काढले नाही, तर मीच चांगल्या संधीसाठी नोकरी सोडली असं  म्हणतोय! आता याला काय म्हणावे?
 - ना. मा. निराळे 

गुरुवार, २० सप्टेंबर, २०१२

पत्रकार मित्रने गाठला 10 हजारचा टप्पा

औरंगाबाद - बेरक्या उर्फ नारदचा नवा साथीदार पत्रकार मित्र ने केवळ एक महिन्यात दहा हजार हिटस् चा टप्पा गाठला आहे.बेरक्या उर्फ नारद ब्लॉगला चुकून धक्का लागला किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे हा ब्लॉग बंद पडला तर एक पर्याय म्हणून पत्रकार मित्र ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे.
वात्रटिकाकार विलास फुटाणे यांचे फटका हे खुमासदार सदर या वेबसाईटचे खास आकर्षण आहे.त्याचबरोबर बेरक्या उर्फ नारद ब्लॉगवर ज्या बातम्या येवू शकत नाहीत,त्या बातम्यांना पत्रकार मित्रवर जागा देण्यात येत आहे.तेव्हा पत्रकार मित्रांना विनंती आहे की,या नव्या पत्रकार मित्रलाही दररोज भेट द्या...

पत्रकार मित्र 

चव्हाण, नलवडे, शाळिग्राम यांना परुळेकर पुरस्कार

पुणे - 'सकाळ'च्या मुंबई आवृत्तीचे वरिष्ठ वार्ताहर ज्ञानेश चव्हाण, कोल्हापूर आवृत्तीचे वार्ताहर लुमाकांत नलवडे आणि पुणे आवृत्तीचे वार्ताहर संतोष शाळिग्राम यांना या वर्षीच्या स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार (कै.) ना. अ. पेंडसे पुरस्कृत डॉ. नानासाहेब परुळेकर पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. "सकाळ'चे संस्थापक-संपादक डॉ. ना. भि. तथा नानासाहेब परुळेकर यांच्या 115व्या जयंतीनिमित्त येत्या शुक्रवारी (ता. 21) हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

ऑलिंपिक पदक विजेते नेमबाज गगन नारंग यांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता टिळक स्मारक मंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कार वितरण होईल. "सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.

राज्याच्या सीमा तपासणी नाक्‍यांवरील दलाल आणि अधिकाऱ्यांची साखळी, तेथे होणारी अवैध वसुली याबाबत ज्ञानेश चव्हाण यांनी या वर्षी मे महिन्यात राज्यस्तरीय मालिका केली होती. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर अच्छाड या सीमा तपासणी नाक्‍यावर छायाचित्रे घेताना अधिकारी आणि नाक्‍यावरील दलाल यांनी त्यांना पकडून जिवे मारण्याच्या धमक्‍या दिल्या होत्या. त्यांच्या कॅमेऱ्यातील मेमरी कार्डही त्यांनी काढून घेऊन त्यांना गुजरातेत नेऊन सोडून दिले होते. त्यानंतरही चव्हाण यांनी नेटाने माहिती गोळा करून, सीमा तपासणी नाक्‍यांवर नेमणूक व्हावी यासाठी होणारा पैशाचा वापर ते राज्य शासनाचा बुडणारा कोट्यवधी रुपयांचा महसूल असा विषय प्रभावीपणे मांडला. त्यामुळे त्या नाक्‍यांवरील अधिकाऱ्यांच्या अन्यत्र बदल्या झाल्याच; शिवाय राज्य सरकारने सर्व सीमा तपासणी नाक्‍याचे संगणकीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

कोल्हापूरजवळील गांधीनगरमधील सरकारी जमीन काही धनदांडग्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून नावावर करून घेऊन तेथे कमर्शिअल कॉम्प्लेक्‍स उभारले होते. बाजारभावाप्रमाणे जवळपास 60 कोटी रुपयांच्या या मालमत्तेचा गैरव्यवहार लुमाकांत नलवडे यांनी उघडकीस आणला. ऑक्‍टोबर 2010 पासून सातत्याने हा विषय "सकाळ'मधून मांडल्यानंतर या वर्षी ऑगस्ट महिन्यात 51 पैकी 37 मालमत्ता पोलिस बंदोबस्तात सील करण्यात आल्या. सुमारे पंचवीस कोटी रुपये किमतीच्या या मालमत्तांबाबत आता अधिकृतपणे सरकारी मालकीच्या नोंदी झाल्या आहेत.

गॅस सिलिंडरचा पुरवठा व वितरण हा प्रश्‍न पुण्यात मोठ्या प्रमाणावर भेडसावत असतो. सिलिंडर घरपोच मिळत नाही; तसेच नव्या सिलिंडरची मागणी एकवीस दिवसांनंतरच नोंदविण्याचा वितरकांचा आग्रह होता. शाळिग्राम यांनी हा प्रश्‍न प्रभावीरीतीने मांडला. "सकाळ'ने पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि वितरक यांची बैठकही घेतली. त्याचा परिणाम होऊन एकवीस दिवसांची अट रद्द झाली. सिलिंडरची मागणी संगणकीकृत झाली, त्याची पोच मोबाईलवर येऊ लागली आणि सिलिंडर कधी दिला जाणार याची माहिती नागरिकांना मिळू लागली. एक सिलिंडर धारकांना चोवीस तासांत, तर दोन सिलिंडरधारकांना आठ दिवसांत सेवा मिळू लागली.

शाळिग्राम यांनी पुणे जिल्ह्यातील अनधिकृत टेकडीफोड आणि अनधिकृत बांधकामांच्या प्रश्‍नावरही सातत्याने लेखन केले. त्याचा परिणाम होऊन टेकडीफोड करणारांविरुद्ध प्रशासनाने फौजदारी गुन्हे दाखल केले आणि अनधिकृत बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या. काही बांधकामे पाडण्यात आली.

साभार : ई - सकाळ  

मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१२

मराठी पत्रकार परिषदेच्या विविध पदांवर पत्रकारांची नियुक्ती

मुंबई -सुमारे ७३ वर्षाचा गौरवशाली इतिहास लाभलेल्या व पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारीणी मंडळावर विभागीय चिटणीस, उपाध्यक्ष व विविध पदांवर प्रतिथयश व अनुभवी पत्रकारांची नियुक्ती करण्यात आली.
 मुंबई येथे झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या एका बैठकीत अध्यक्ष माधवराव अंभोरे यांनी हा निर्णय घेतला. यावेळी मराठी पत्रकार परिषदेने माजी अध्यक्ष एस.एम. देशमुख, कार्याध्यक्ष किरण नाईक, सरचिटणीस सिध्दार्थ शर्मा आदी उपस्थित होते.यामध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्षपदी लोकसत्ता मुंबईचे पत्रकार प्रसाद मोकाशी, पुण्याचे सुभाष भारव्दाज, चंद्रपुरचे बंडू लाडके, कोषाध्यक्षपदी आशुतोष जोशी तसेच विभागीय चिटणीसपदाच्या नियुक्तीमध्ये मुंबई विभागासाठी तरुण भारत बेळगांवचे मुंबई प्रमुख नरेंद्र कोठेकर, कोकण विभागासाठी लोकमत रायगडचे मिलिंद अष्टीवकर, पुणे विभागासाठी दैनिक सकाळ मंचर पुणेचे दिलीप वळसे-पाटील, कोल्हापूर विभागासाठी प्रहार सिंधुदुर्गचे उमेश तोरसकर, नाशिक विभागासाठी तापीकाठ नंदूरबारचे चंद्रशेखर बेहरे, लातूर विभागासाठी लोकमत लातूरचे जयप्रकाश दगडे, औरंगाबाद विभागासाठी दैनिक पाश्र्वभूमी बीडचे लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, नागपूर विभागासाठी चंद्रशेखर श्रीखंडे, अमरावती विभागासाठी दैनिक प्रतिदिन अमरावतीचे नानक आहुजा या पत्रकारांची नियुक्ती करण्यात आली. अशी माहिती अध्यक्ष माधवराव अंभोरे यांनी दिली आहे.

सोमवार, १७ सप्टेंबर, २०१२

बीडमध्ये मटक्याच्या पार्श्वभूमीवरून वृत्तपत्रांत जुंपली

बीड - मटक्याच्या पार्श्वभूमीवरून बीडमध्ये सध्या काही वृत्तपत्रात सामना रंगला आहे.  दै.पार्श्वभूमीविरूध्द आठ दैनिके असा हा सामना आहे.हे दैनिके ऐकमेकांविरूध्द बातम्या छापत असल्यामुळे वाचकांची चांगलीच करमणूक होत आहे.
काही दिवसांपुर्वी बीडच्या जिल्हाधिका-यांनी मटका छापणा-या दैनिकाविरूध्द कारवाई करण्याचा इशारा दिला होता.त्याचे वृत्त देताना दैनिक पार्श्वभूमीने लोकाशा, झुंजार नेता, चंपावती पत्र, बीड संकेत आदी आठ दैनिकाचे नावे घालून दि.१५ सप्टेंबर रोजी बातमी दिली.त्याच्या दुस-या दिवशी विरोधी काही दैनिकांनी पार्श्वभूमीचे संपादक गंमत भंडारी यांच्या  हितसंबधातील एका शाळेचे प्रकरण उकरून काढून, वर्मावर बोट ठेवले.  त्यानंतर भंडारीने आजच्या १७ सप्टेंबरच्या दैनिकात  खुलासा दिला आहे.बीडमधील वृत्तपत्रातील ही जुगलबंदी कोणते मोड घेणार,याकडे वाचकांचे लक्ष लागले आहे.


दै.पार्श्वभूमी 

शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१२

मराठी पत्रकार परिषदेचे पुरस्कार जाहीर

मुंबई  - मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवषी देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत .या पुरस्काराची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माधवराव अंभोरे यांनी  केली.  यावेळी मराठी पत्रकार परिषदेने माजी अध्यक्ष एस.एम. देशमुख, कार्याध्यक्ष किरण नाईक, सरचिटणीस सिध्दार्थ शर्मा आदी उपस्थित होते.
    सुमारे ७३ वर्षाची प्रदीर्घ परंपरा असलेल्या आणि पत्रकारांची मातृसंस्था असा बहुमान प्राप्त असलेल्या मराठी पत्रकार परिषदेकडून दरवर्षी माध्यमांमध्ये भरीव व उल्लेखनिय पत्रकारिता करणा-या पत्रकारांसाठी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केले जातात. लवकरच मुंबई येथे एका मोठ्या समारंभात केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत  पत्रकारांना या पुरस्काराने पुरस्कृत व सन्मानित केले जाईल अशी माहीती अंभोरे यांनी दिली.
मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार मधु शेट्ये यांना ११ हजार रूपये रोख,स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र असे स्वरूप असलेला जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.त्याचबरोबर  नाशिकचे जेष्ठ पत्रकार सुरेश अवधुत यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, लोकमत पुणेचे पत्रकार अनंत दिक्षीत यांना आचार्य अत्रे पुरस्कार, आयबीएन लोकमत मुंबईच्या पत्रकार प्राजक्ता धुळप यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार, सिंधुदुर्गचे गजानन नाईक यांना रावसाहेब गोगटे (कोकण विभाग) पुरस्कार, अकोल्याचे शौकतअली मिरसाहेब यांना पा.वा. गाडगीळ पुरस्कार, यवतमाळचे न.मा. जोशी यांना भगवंतराव इंगळे पुरस्कार, रायगडचे नवीन सोष्टे यांना दत्ताजीराव तटकरे पुरस्कार, चंद्रपुरचे देवेंद्र गावंडे यांना प्रमोद भागवत पुरस्कार, झी-२४ तास लातुरचे शशिकांत घोणसे - पाटील यांना नागोजीराव दुधगावकर (मराठवाडा विभाग) पुरस्कार, आयबीएन लोकमतचे नागपूर विभागाचे ब्युरो चिफ प्रशांत कोरटकर यांना ग.त्र्यं. माडखोलकर पुरस्कार तसेच नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाला रंगा वैद्य यांच्या स्मरणार्थ जिल्हा मराठी पत्रकार संघ उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार व स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहेत.   

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१२

जय महाराष्ट्र की जय उत्तर प्रदेश चॅनल ?

मुंबई - लवकरच आपल्या भेटीला जय महाराष्ट्र नावाचे न्यूज चॅनल  येणार आहे. पण हा न्यूज चॅनल खरच मराठी आहे का, हा प्रश्न मला पडला आहे. आजचा तुम्हाला माझा अनुभव सांगतो, मी नविन येनारया `जय महाराष्ट्र` चॅनलचे  ऑफिस बघितले . या चॅनलच नाव जरी `जय महाराष्ट्र` असले  तरी या मध्ये  काम करणारा एकही व्यक्तीला  धड मराठी बोलता येत नव्ह्ते . त्यामुळे  काही वेळ मला असे वाटले की, मी मराठी चॅनलच्या ऑफिस मध्ये  आहे की हिंदी? 
मी बाहेर बसलो होतो, तेव्हा एक व्यक्ति येथे  आला. तो मराठी बोलत होता पण स्वागतासाटी बसलेल्या मुलीने त्यांना मुझे मराठी नहीं आती, आप हिंदी में बात करो असे सांगितले.`  मराठी न्यूज चॅनल असून या मुलीला मराठी येत नाही..मला स्वत: ला लाज वाटली....पण नंतर मला माहित झाले की, फक्त तिलाच नाही तर या न्यूज चॅनलच्या बहुतेक ज़णाना  निट मराठी येत नाही, आणि ते स्वाभाविकच आहे कारण या न्यूज चॅनलचे   मालक  सुधाकर शेट्टी आहेत. ते व्यवसायाने बिल्डर आहेत, या न्यूज चॅनलचे  हेड वाहिद अली खान  हेही उत्तर भारतीय आहे..यांना   मराठीचा की ममताचा हेच माहित नाही....मराठी न्यूज चॅनलचा  हेड असून सुद्धा त्याला मराठी येत नाही....अरे लाज वाटायला पाहिजे न्यूज चॅनलच्या मालकाला ....काय या शेट्टीना कुणी मराठी हेड भेटलाच नाही की काय असे मला वाटले. 
या न्यूज चॅनलचा  बहुतेक स्टाफ हे उत्तर भारतीय आहेत. आता हेडलाच मराठी येत नाही म्हटल्यावर त्यांना  तरी कशी येणार?...एवढच नाही तर या न्यूज चॅनलचा वेब डीझांयनर   अजय कुमार मिश्र हाही मूळचा उत्तर भारतीय आहे तसेच एक्सिक्युटीव्ह  प्रोडूसर प्रीती गुप्ता हीपण बाहेरची आहे. यांना कुणालाच जर धड मराठी बोलता येत नसेल तर या न्यूज चॅनलला आपण  मराठी न्यूज चॅनल म्हटले तर पाप आहे..त्यांचा एक रिपोर्टर ABP माझा न्यूज चॅनल वरून  पॉइंट लिहत होता आणि बातमी करत होता.त्यामुळे  या न्यूज चॅनलचे  नाव `जय महाराष्ट्र` नसून `जय उत्तर प्रदेश चॅनल` असे केले पाहिजे.....
एक अनामिक 

मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१२

अभय मोकाशींना बातम्यांचे 'गमक' काही जुळेना...

मुंबई : मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या  ' मुंबई मित्र ' दैनिकात आता ' मिड डे ' च्या अभय मोकाशीनी ' मैत्री ' केली आहे . संपादकीय विभागाचा धुरा आता तेच सांभाळत आहे. मात्र इतर दैनिकांचे काय आणि ' यांचे ' काय. (असो प्रत्येकाची आवड निवड , विचारशैली असते, ' नवाकाळ ' सारखे ) पण मुंबईच्या ' मार्केट ' मध्ये  टिकायचे असेल तर वृत्तसंपादन हे कलात्मक, आणि तिथल्या वातावरणाला अनुरूपच हवे. पण हेच गमक मोकाशींना काही जुळवता आले नाही. ' मुंबई मित्र ' ला मोकाशींची एन्ट्री झाल्यावर ' मित्र ' चे रूपच पालटे होवून काहीतरी नवीन, धडाकेबाज वाचायला मिळेल असे वाटत होते. पण ' यांचे ' अजून सूरच काही गवसत नाहीये. अंकात  अतिरिक्त  मोठ्या-मोठ्या फोन्टच्या  हेडिंग मधून यांना काय साधायचे ? असा प्रश्न पडून चक्क भ्रमनिराशा होते. मोकाशींनी तरुणाची फौज निर्माण केली. संपादकीय पानावर हे तरुण खर्या अर्थाने झुंजतायात. त्यात तिळमात्र शंका नाही.  त्यांचे दर्जेदार लिखाण वाखण्याजोगे असते पण मुळात वर्तमानपत्राचा ' आत्मा ' असलेला बातम्यांवर संस्कार केलेले दिसत नाहीच तर बातम्यांची सांगड , वृत्तसंपादनाचा  कडेलोटच झालेला दिसतो. आठवतोय तो मुंबई मित्र.. जेव्हा राजेश सावंत कार्यकारी संपादकपदी होते. तेव्हा तर मुंबई मित्राची एक्सप्रेस सुसाटss धावत होती. ' मुंबई चौफेर ' नेही देव पाण्यात ठेवले होते. ट्याबलेट मध्ये असणार्या तेव्हाच्या मुंबई मित्रला दुपारी १२-१ सुमारास स्टोलला पेपर दिसतच नसे. सावंत ' मित्र ' सोडून गेल्यानंतर सामनातून अजय महाडिक ' मित्र ' च्या  कार्यकारी संपादकपदी आले. महाडिकहि जरा ' अवली ' होते. त्यांच्या ' नजरांनी '  अनेकांची डोकेदुखी बनली होती. पण त्यांची सौरक्षणविषयक, जागतिक, राष्ट्रीय राजकारणावर लिखाणाची चांगली पकड होती. त्यानंतर बर्याच कालावधिनी मोकाशींची एन्ट्री झाली. तसे मुंबई मित्रचे मालक, समुह संपादक अभिजित राणे हि चांगलेच चर्चेत असतात. ' देण्या - घेण्या ' च्या बाबतीत ' मार्केट ' मध्ये पुरते नाव खराब आहे त्यांचे, पण एक हाती सत्ता लढवायची त्यांना चांगले जमले आहे. तिशीतल्या आत असलेल्या राणेंनी गेल्या ७-८ वर्षापासून मुंबई मित्र समूहाचे ४ -४ दैनिक काही का होईना चालवले आहे. हि एक जिकरीची बाब आहे.

शनिवार, १ सप्टेंबर, २०१२

सोलापूर अपडेट...

  • आजपासून सोलापूरात लोकमतची सहामाही स्किम संपल्याने दिव्य मराठी, सकाळ, संचार ची मागणी वाढली. त्यातच विकेते 35 टक्के कमिशन मागणीचे तीन पञ लोकमतला दिले आहे जर नाही दिले तर येत्या आठवड्यात संप करणार आहेत
  • गेल्या दोन महिन्यापूर्वी सकाळच्या कमिशन वाढीसाठी संप दत्त चौकातील विकेत्यांनी पुकारला त्यास आसरा चौकातील विकेत्यानी पतिसाद दिला नव्हता. त्यामुळे आता लोकमतच्या आसरा चौकातील संपाला पतिसाद द्यायचा की नाही असा विचार दत्त चौकातील विकेते करीत आहेत. तसेच सकाळ संपाच्यावेळी इतर दैनिकानी पर्यायी अंक वाढ नाही दिले. त्यामुळे लोकमतचे व्यवस्थापन इतर दैनिकाच्या व्यवस्थापनास आमच्या दैनिकाच्या संप काळात पर्यायी अंक वाढ न देण्यासाठी साकडे घालत आहे. सध्या सोलापूरात फक्त दिव्य मराठी व सुराज्य 35 टक्के कमिशन देत आहेत.

फेसबुक वर शेअर करा

Facebook