एरंडाचे गुऱ्हाळ !

'उघडा डोळे, बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला सावरकर डीबेट प्रकरणी अखेर माफी मागावी लागली, इतकेच काय तर गेल्या काही दिवसांपासून  माझा विशेष हा डिबेट शो बंद करावा लागला आहे.
मराठी न्यूज चॅनलवर होणाऱ्या डिबेट शो ला टीआरपी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. भविष्यात हे  एरंडाचे गुऱ्हाळ  सर्व चॅनल्सनी बंद केल्यास आश्चर्य वाटू नये.

ज्येष्ठ आणि नामवंत पत्रकार निखिल वागळे जेव्हा आयबीएन लोकमतला होते तेव्हा सुद्धा त्यांच्या 'आजचा सवाल' या डिबेट शो टीआरपी नव्हता.  नंतर वागळे मी मराठी, महाराष्ट्र 1, टीव्ही 9  मध्ये गेले तरीही  त्यांच्या डिबेट शोला टीआरपी मिळाला नव्हता.  वागळे मुख्य प्रवाहातून बाहेर पडल्यानंतर साम मध्ये संजय आवटे यांनी वागळे होण्याचा प्रयोग केला,पण टीआरपी 0 टक्के होता.  नंतर निलेश खरे आल्यानंतर आवटे मास्तरचा डिबेट शो  प्राईम टाईमवरून 5 वाजता करण्यात आला. आवटे गेल्यानंतर 'आवाज महाराष्ट्रचा' डिबेट  शो बंद करण्यात आला.उलट सामने डिबेट शो बंद करून खास बातम्या सुरू केल्यानंतर हे चॅनल नंबर 1 वर आले. तेव्हापासून साम 1 ते 3 मध्ये आहे.नंतर एबीपी माझा, टीव्ही 9 आदी चॅनल्सनाही डिबेट शो ला टीआरपी मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर हा शो प्राईम टाईमवरून पाच वाजता केला. सावरकर डिबेट शो प्रकरणी एबीपी माझा तोंडावर पडल्यानंतर   माझाने डिबेट शो बंद केला. हळूहळू अन्य चॅनल्स डिबेट शो बंद करतील. 

फालतू विषय, तेच ते चेहरे, विरोधासाठी विरोध, हमरीतुमरी, रटाळ आणि कंटाळवाणी चर्चा यामुळे डिबेट शो किती लोक पाहतात ? हा एक गहन प्रश्न आहे. या चर्चेमधून काहीही निष्पन्न होत नाही.निरर्थक आणि कंटाळवाणा चर्चेला  ग्रामीण भागात एरंडाचे गुऱ्हाळ म्हणतात, मराठी न्यूज चॅनल्सवरील एरंडयाचे गुऱ्हाळ पाहणाऱ्याची संख्या टीव्ही पाहणाऱ्या संख्येच्या फक्त 1 ते 3 टक्का आहे. 

मुळात टीव्ही किती लोक पाहतात ? पाहिले तर न्यूज चॅनल्स किती लोक पाहतात ? महत्वाचे म्हणजे 6.30 ते रात्री 10.30 पर्यंत  टीव्हीचा रिमोट बायकांच्या हातात असतो. टीव्हीवर चालणाऱ्या मालिका बायकांच्या आवडीच्या असल्याने न्यूज चॅनल खूप कमी लोक पाहतात.

स्मार्ट फोनवर 4 जी इंटरनेट  स्पीड आल्यापासून बहुतांश लोक बातम्या मोबाईलवर पाहतात. वेबसाईट, अँप, फेसबुक, युट्युबच्या माध्यमातून लोकांना बातम्या कळतात. जे पेपर आणि चॅनल्स मजबूत कंटेंट देतील, तेच लोक पेपर वाचतील आणि टीव्ही चॅनल्स पाहतील.येत्या 5 वर्षात अनेक वृत्तपत्र आणि  चॅनल्स बंद पडतील, त्याची जागा डिजिटल माध्यमे घेतील, असा अनेकांचा अंदाज आहे.

एव्हडे मात्र खरे आहे की, मराठी न्यूज चॅनल्सवरील  एरंडाचे गुऱ्हाळ बंद झाल्यामुळे फक्त  टीव्हीवर चमकोगिरी करणाऱ्यांचे दुकान बंद झाले आहे. 

बेरक्या उर्फ नारद
पत्रकारांच्या बातम्या देणारा पत्रकार