कोंबड्याचा बळी? म्हसोबाचं काय ?


एबीपी माझाचा उस्मानाबादचा रिपोर्टर (तथाकथित राष्ट्रीय पत्रकार) राहुल कुलकर्णीला फेक न्यूजप्रकरणी अटक झाली. आज त्याला जामीनही मिळाला. पण, त्याच्या बातमीने पत्रकारितेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. कोरोनाच्या काळात एखाद्या जबाबदार वाहिनीने फालतू न्यूज कोणतीही शहानिशा न करता दिली. ही गंभीर चूक आहे. त्याबाबत एबीपी माझाचा खुलासा अत्यंत हास्यास्पद आहे. रेल्वेने फक्त प्रस्ताव दिला होता. प्रस्ताव म्हणजे अंतिम निर्णय असे होत नाही. विशेषतः मंत्रालयीन स्तरावर असे विविध प्रस्ताव रोज येत असतात. मग, प्रत्येक प्रस्तावाची बातमी करणार का? प्रस्ताव असेल तर प्रस्ताव आहे, असे स्पष्ट न सांगता ट्रेन सोडणार, अशी धडधडीत पुडी सोडून `माझा` बोभाट झाला. 

त्यानंतर दिवसभर आपल्या कार्यकर्त्यांचे (फुकट चमकोगिरी) बाईटस दाखविणारे कार्यक्रम सुरू केले. महत्त्वाच्या बातम्या सोडून राहुल कुलकर्णी हा `राष्ट्रीय` विषय असल्याचे दाखवून बुलेटिनला पहिली हेडलाईन देणे सुरू केले. बाकीच्या बातम्या दुय्यम झाल्या. हीच का तुमची पत्रकारिता ? हाच काय तुमचा अजेंडा? एरव्ही पारदर्शी भूमिका मांडणारे पत्रकार लाळघोटेपणा, आपल्याच सहकाऱ्याला वाचवून आपली कातडी बचाव मोहिमेत सहभागी झाले. I Support Rahul Kulkarni ही मोहिम सुरू केली. तद्दन फालतुपणाचा कळस म्हणावा लागेल. राहुल कुलकर्णी हा काही भगतसिंग नाही, त्याला एवढी प्रसिध्दी कशासाठी?

मुळात एबीपी माझाची ही बातमी चुकीची होती. राहुल कुलकर्णीमुळे ही गर्दी झाली आहे का? मजुरांना मराठी येते का? असले फालतू प्रश्न विचारून आपण आपलेच झाकून ठेवतोय ना? याबाबत आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. मुळात राहुल कुलकर्णीने दिलेली बातमी फेकन्यूज होती की नाही? हे संपादक महाशय राजीव खांडेकर यांनी सांगावे. बाकीचे प्रश्न नंतर येतात. एबीपी माझाने ही फेकन्यूज पहिल्यांदाच दिली आहे असे नाही. याआधीही कित्येक फेकन्यूज दिल्या आहेत. महिनाभरापू्र्वीच रश्मी पुराणिकने सरकारी कार्यालये सात दिवस बंद होणार, मंत्रिमंडळाचा निर्णय अशी फेकन्यूज दिली होती. त्यानंतर तसे काही घडलेच नाही. याबाबत एबीपी माझाने साधा खेदही व्यक्त केला नाही. आजची एमपीएसी व युपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याची बातमी होती. त्याला त्यांनी परीक्षाच रद्द, अशी बातमी चालवली. 

आपण ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यात काय करतो आहे, याचे भान एबीपी माझाला राहिले नाही, हे यावरून स्पष्ट होते. कॉलेजमधून नुकतीच पासआऊट झालेली नवाट पोरं कमी पैशात घेऊन सर...सर म्हणणारी मुले यांना हवी आहेत. अनुभव असणारी मुले यांना वरचढ ठरत असल्याने त्यांना ते घेत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. दोन खंदे समर्थक एकीकडे राहुल खिचडी तर दुसरीकडे अभिजित करंडे ही सर्जा-राजाची जोडी असल्यावर संपादक महाशयांना काय चिंता? पण, अशा गंभीर चुका झाल्याने याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एरव्ही कोणत्याही चुकीबाबत संपादकांंवर कारवाई होते, मात्र, या घटनेत रिपोर्टरचा बळी घेतला आहे. त्यामुळे कोंबड्याचा बळी घेतला, म्हसोबाचे काय? असा प्रश्न पडला आहे. 

राहुल खिचडी, प्रसन्न जोशी, रामदासी तसेच इतर आजी-माजी सहकारी राहुल कुलकर्णीची भलावण करीत आहेत. परंतु, वस्तुस्थिती तुम्ही लपवून ठेवू शकत नाही. फेकन्यूज दिली आहे, ती वेबसाईटवर प्रसारित झाली आहे. तर माफी का मागत नाही? उलट आम्हीच कसे बरोबर आहे, हे सांगत आहात. पण, महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे...खात्री वाटत नसेल तर एबीपी माझाने दिलेल्या राहुल कुलकर्णींच्या बातम्या, व्हिडिओ पाहा आणि त्या खालच्या कॉमेंटस वाचा, म्हणजे तुम्हाला तुमची `न्यूजव्हॅल्यू` कळेल. सत्य पराजित नही होता, परेशान होता है! असले फिल्मी डायलॉग गळून पडतील. 

स्पर्धेच्या युगात फास्ट न्यूजवर भर दिला जात आहे, पर्यायाने चुकीच्या बातम्या देताना माध्यमांनी भान ठेवायला हवे. नाहीतर  व्हॉटसअप रिपोर्टर आणि तुमच्यात काय फरक? रात्री झोपताना छातीवर `हात` ठेवून स्वत-शी प्रामाणिक आहे का? याची टेस्ट करा. 

खांडेकर आत्मपरीक्षण करणार का ? 

यश मिळविणे जितके कठीण आहे, तितके यश टिकवणे त्याहून कठीण आहे. 'उघडा डोळे, बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझाचे तसेच झाले आहे. गेल्या काही महिन्यात या चॅनल्सवर अपुऱ्या माहितीवर न्यूज दिल्या जात आहेत, अनेक वेळा फेक न्यूज दिल्या जात आहेत. त्यामुळे एबीपी माझा अनेक वेळा तोंडावर पडत आहे. चॅनल मध्ये काही विशिष्ठ लोकांची मक्तेदारी झाल्यामुळे बातम्यांची 'खिचडी' कच्ची होत आहे. एकेकाळी  सतत नंबर १ वर राहिलेल्या या चॅनलवर कधी टीव्ही ९ मराठी तर कधी साम वरचढ ठरत आहे.टीआरपी घसरत चालल्यामुळे एबीपी माझाच्या बातम्यांचा दर्जाही घसरत चालला आहे. 

या चॅनलला कधी  'BJP माझा' हॅशटॅग चालवून ट्रोल केले जात आहे तर कधी  BAN ABP माझा म्हणून ट्रोल  केले जात आहे. हे सर्व कश्यामुळे होतेय ? याचे आत्मपरीक्षण  संपादक असलेले खांडेकर करणार आहेत की चुकीवर पांघरून घालून 'खोटं बोल, पण रेटून बोल'  हे मिशीवर पीळ  मारत चालू ठेवणार आहेत ? 

राहुल कुलकर्णीप्रश्नी संपादक राजीव खांडेकरांनी नैतिकदृष्ट्या माफी मागावी. जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी. राहुल कुलकर्णींची ही फेकन्यूज काही एबीपी माझाची शेवटची फेकन्यूज आहे, असे समजू नये. भविष्यात दिल्या जाणाऱ्या फेकन्यूजचाही आम्ही समाचार घेऊ. कारण, आमची बांधिलकी सत्याची आहे. चांगल्याला चांगलं, आणि वाईटला वाईट म्हणण्याची हिंमत बेरक्या बाळगून आहे. ते केवळ सच्च्या पत्रकारामुळे...लक्षात ठेवा...उघडा डोळे...मिटा नीट...!

- बेरक्या उर्फ नारद 

हेही वाचा 
राहुल कुलकर्णी याची आणखी एक फेक न्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या