वृत्तपत्रांचा कडेलोट, नव्हे पोपटाने मान टाकली का ?



कोरोना च्या टाळेबंदीचा तिसरा टप्पा सुरू आहे. कदाचित आणखी दोन-तीन टप्पेसुध्दा होतील. हा दिर्घ पल्ला गाठता येणे ज्यांना अशक्य आहे त्यांच्या नाकातोडात पाणी जायची वेळ आली आहे. या महापुरात कितीतरी दिग्गज बुडतील, मात्र लव्हाळे वाचतील. त्यात कोणा कोणाचा समावेश आहे ते लवकरच कळेल. जंत्री तयार करण्याचे काम कोरोनारुपी राक्षसाकडेच आहे. ही धोक्याची घंटा वाजली त्यावेळी पहिली बांग कोणी दिली असेल तर ती वर्तमानपत्रांनी. अगदी स्पष्ठच सांगायचे तर जगभरातील छापील माध्यमांचा कडेलोट झाला आहे. बदलत्या काळाच्या आघात आणखी आठ-दहा वर्षांनी छापील वर्तमानपत्र इतिहास जमा होतील असे तमाम मालक कंपनी जाहीरपणे सांगत होती. ते मरण इतके अलिकडे येईल अशी कल्पना त्यांनाही नव्हती. पोपट मेला म्हटले तर राजा मुंडके छाटले जाईल याची भिती म्हणून पोपटाने मान टाकली असे म्हटले तरी चालेल. मित्र हो, हे कटू सत्य आहे. अगदीच मनाचे समाधान करायचे तर आपण शेवटची धुगधुगी म्हणू या. जन्माला आलेला प्रत्येकजण संपणार हा निसर्गाचा नियम आहे, तो प्रत्येकाला लागू आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात छोटे मोठे अनेक धंदे संपले, आता पेपरवाल्यांची बारी आली इतकेच.

वृत्तपत्रसृष्टीचा इतिहास पावणे दोनशे वर्षांचा आहे. ६ जानेवारी १८३२ मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी `दर्पण` हे पहिले मराठी वृत्तपत्र छापले. पुढे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा केसरी, कामगार नेते नाराण मेघाजी लोखंडे यांचे दिनबंधू असे करत करत आज देशभरात आज सुमारे एक लाख छापील पेपर (दैनिक, साप्ताहीक, पाक्षिके आदी) निघतात. मराठीत मोठी म्हणावी अशी २६ दैनिके आहेत. २२ भाषांतून सुमारे २५ कोटी लोकांपर्यंत हे माध्यम पोहचते. आजवरच्या इतिहासात प्रथमच तब्बल दीड-दोन महिने छपाई बंदची आणीबाणीची वेळ आली. खरे तर, आजच्या बाजारपेठेतील जीवघेण्या स्पर्धेत काही अंशी सरकारच्या मेहरबानीवर (जाहिरातींवर) हा लोकशाहिचा चैथा स्तंभ टिकून आहे. आता कोरोनाच्या संकटात सारी सरकारेच खंक झालीत. एकादशीच्या घरी महाशिवरात्र असे झाल्याने काळ कठिण आहे. काळावर मात करण्यासाठी काँग्रेसच्या एका जेष्ठ नेत्याने पुढची तीन वर्षे वृत्तपत्रांच्या जाहिराती बंद करण्याची सुचना केली. मोदीजींनी ते मान्य केलेच तर बुडत्याला कुठे काडीचा आधार होता तोही गेल्यात जमा आहे.

समाजसेवा संपली, निव्वळ धंदा झाला 

मित्रांनो देशाच्या स्वातंत्र लढ्यात वृत्तपत्रांचा सिंहाचा वाटा होता. जनमत घडविण्यात आणि त्याचे रुपांतर चळवळीत करण्याचे मोठे काम त्यावेळच्या वर्तमानपत्रांनी केले. स्वातंत्रपूर्व काळातील ते योगदान सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावे असेच आहे. स्वातंत्रोत्तर काळात त्यांनी जागल्याची भूमिका घेतली. लोकांना शहाणे करायचे काम केले. आता समाजसेवा जवळपास नव्हे तर १०० टक्के संपली आहे. हा निव्वळ जाहिरातीचा धंदा झाला आहे. मग, जाहिराती मिळविण्यासाठी वाट्टेल ते चालते. अगदी ब्लॅकमेलींग पर्यंत घसरगुंडी झाली. वर्तमानपत्र हातात असले की जनमत आपल्या बाजुने बनविता येते, दुसरे अनेक धंदे चालवता येतात हे गुंतवणूकदारांनी ओळखले. त्यामुळे हे क्षेत्र भांडवलदारांचे बटीक झाले. समाजसेवाचा बुरखा घातलेल्या या सृष्टीचे कोरोनामुळे पुरते वस्त्रहरण झाले. आजवर दिवसाची सुरवातच पेपर वाचल्याशिवाय होत नव्हती. कोरोनामुळे आता पेपर नसला तरी चालते हे लक्षात आले. लोकांची गरज संपली आहे. मुळात कागदाच्या किंमती, छपाईचा खर्च, पत्रकारांसह तमाम कर्मचाऱ्यांचे पगारपाणी हे मालकांच्या आवाक्याबाहेर चालले होते. त्यातच आजची पिढी पेपर वाचत नसल्याने पुढे हे माध्यम चालणार नाही हे सर्व मालकांनीही ज्ञात आहे. डिजीटल विश्वाकडे सारे जग धावते आहे. जीवनशैली झपाट्याने बदलते आहे. विश्वासार्हता हे सर्वात मोठे भांडवल होते ते निवडणुकीच्या काळात पेड बातम्या सुरू झाले तेव्हा लयाला गेले. खरे खोटे करताना पूर्वी लोक म्हणत, “अहो, हे सत्य आहे पेपरात छापून आले “.आता म्हणतात “अरे, ती बातमी पैसे देऊन छापून आणली आहे.“ विश्वासार्हता रसातळाला गेली. पत्रकारांना एक सन्मान होता तो मातीमोल झाला.

डिजिटल माध्यमांचा जमाना 

कोरोनामुळे आता नव्हे तर अगोदरच आजच्या जगाचे माध्यम सोशल मीडिया झाले. प्रत्येक नागरिक हा स्वतःच पत्रकार झाला. माहितीचा नुसता वाहक नाही तर विश्लषक बनला. प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी मिळाली. एखाद्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी चूक की बरोबर हे सांगायचेच तर वृत्तपत्रांची मक्तेदारी असती तर समजले नसते. आता गल्लीतला बाळूसुध्दा व्हाटस्अप, फेसबूक, इन्टाग्राम, ट्विटर अथवा युवकांध्ये लोकप्रिय असलेल्या टिकटॅक मधूनही व्यक्त होतो, बोलतो. छापील वर्तमानपत्रांचा जमाना गेला आणि ई पेपर आला. तशी ई पेपरची सुरवात १९९६ मध्येच (हिंदुस्थान टाईम्स मधून) झाली. छपाईचा एक रुपये खर्च नाही. आज देशातील ६७ कोटी लोकांकडे मोबाईल, इंटरनेट आहे. ते जगभरातले पेपर घरात बसून जवळपास फुकटात वाचतात. अशा परिस्थितीत मुले कदाचित आजोबा अथवा बाबांसाठी सवय म्हणून घरात पेपर घेतीलही, पण ते प्रमाण ३०-४० टक्के असेल. छापील १६ पानी पेपरचा खर्च १७ रुपये तो मालकालाही परवडत नाही. आता जाहिरातींना पेपरमध्ये प्रतिसाद नसतो. पिंपरी महापालिका दरवर्षी १५-२० कोटींच्या निविदांच्या जाहिराती केवळ सोपस्कर म्हणून देते. केवळ जनतेचा आवाज म्हणून काम करणारे हे माध्यम जीवंत ठेवण्यासाठी हा खटाटोप आहे. त्याचा काडिचाही फायदा ना जनतेला ना पालिकेला होतो. कारण पालिकेच्या वेबसाईटवर त्या असतात. आता बिल्डर मंडळीसुध्दा जाहिरातीसाठी सोशल मीडियाच पसंत करतात. अशात पेपर तग धरून राहतील का हा प्रश्न आहे. कोरोनाने त्याचा निकाल लावला आहे. कोरोनामुळे आर्थिक संकट कोसळल्याची कोल्हेकुई करत मालकांनी पत्रकार व पत्रकारेतर कर्मचाऱ्यांची कपात, वेतन कपात सुरू केली. सुमारे १० हजार पत्रकारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्यात, असे माध्यमकर्मीच सांगतात. पोपटाने मान टाकली हे सांगायला आणखी कोणते पुरावे पाहिजेत. एका कोरोनामुळे हे सारे उजाड झाले. राष्ट्रीय भावनेचा हुंकार असलेल्या वृत्तपत्र सृष्टीला दृष्ट लागली. पुन्हा ताठ मानेने पुर्वीच्या वैभवाने हा लोकशाहिचा चैथा स्तंभ उभा राहिल अपेक्षा कशी करायची.

 – अविनाश चिलेकर

Post a Comment

2 Comments

  1. वर्तमानपत्रे पूर्णपणे व्यावसायिक झाली आहेत. चौथास्तंभ वगैरे म्हणण्यात काही अर्थ नाही. हे एक वेळ खरे मानले तरी लेखक म्हणतात त्याप्रमाणे वृत्तपत्र सृष्टी लोप पावेल असे वाटत नाही. यावरून एक निष्कर्ष मात्र काढता येईल की वर्तमानपत्रांचे आर्थिक गणित वर्ष-दोन वर्षं तरी बिघडलेले असेल.
    राहिला प्रश्न डिजिटल माध्यमांचा तर अनेकांनी नोकर कपात केली आहे कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे सर्वच माध्यम गृहांंच्या नाकातोंडात पाणी गेले आहे.

    ReplyDelete
  2. होय .... अंतिम घटिका समीप आली

    ReplyDelete