संपादक महोदय आणि पत्रकारांच्या संघटना कुठे पाणी भरतात ?



कोरोना आपत्तीच्या नावाखाली वर्तमानपत्राचे आर्थिक गणित सांभाळण्यासाठी महाराष्ट्रातल्या लोकमत ,दिव्यमराठी ,पुढारी , महाराष्ट्र टाइम्स , लोकसत्ता ,पुण्य नगरी यां सारख्या बड्या वर्तमानपत्र समूहांनी जी कॉस्ट कटिंग केली त्यात महाराष्ट्रातल्या जवळपास दहा ते बारा हजार ( कदाचित याहून अधिक ) पत्रकार आणि जाहिरात, व्यवस्थापन, वितरण , मार्केटिंग , डीटीपी , प्रिंटिंग , छायाचित्रकार , या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत ,

महाराष्ट्रातल्या कोणत्याही क्षेत्रात एकाच वेळी कोणतेही विशेष सबळ कारण नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात नोकरकपात झाली असती तर आपण पत्रकारांनाच तो विषय बातम्या आणि लेखातून गाजवला असता आणि त्या अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला असता , पण पत्रकारांची हतबलता पहा ; वर्तमानपत्रांच्या मालकशाहीने केलेल्या  पत्रकारांच्या या गळचेपीला कोणताच पत्रकार वाचा फोडू शकत नाही , आपण उगाच निर्भीड ,निस्पृह ,तत्वनिष्ठ पत्रकारितेच्या गोष्टी करतो , वृत्तपत्रीय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा हाणतो , पण काल काल परवा पर्यंत आपल्या भोवताली वावरणारी , आपल्या सोबत काम करणारी , भेटल्यावर हाय हॅल्लो करणारी अडलं तर सल्ला विचारणारी , मागितल्यावर मदत मार्गदर्शन करणारी एकत्र चहा -नाश्ता करणारी दुपारचा डबा शेअर करणारी , एखाद्या बातमी आणि लेखाबद्दल लाईक- कमेंट करणारी माणसं अचानक जथ्या जथ्याने गायब होतात आणि आपल्याला त्याचं काहीच सोयर सुतक वाटत नाही ? ना खंत ना खेद ! पत्रकार ना आपण ? अन्यायाला वाचा फोडणारे ! आपल्यावर आपल्या सहकाऱ्यांवर झालेल्या अन्यायाचे आपण परिमार्जन करू शकत नाही ? त्यांना न्याय मिळवून देऊ शकत नाही ? महाराष्ट्रातल्या एकही वर्तमानपत्रात किंवा इलेक्टॉनिक मीडियात वृत्तपत्र क्षेत्रात झालेल्या या पडझडीची एका ओळीची सुद्धा बातमी छापून आली नाही किंवा कुठे अवाक्षरानेही चर्चा सुद्धा झाली नाही , पत्रकारितेच्या क्षेत्रात इतक्या थंड डोक्याने कुठेही आवाज न होता , कुणाला चाहूल न लागता हजारो मुडदे पडतात ? 

होय ; दुर्दैवाने हे सत्य आहे ! आज घडीला वृत्तपत्र क्षेत्रात असलेल्या कोणाही संपादकाच्या किंवा पत्रकाराच्या लेखणीत या बाबत आवाज उठवण्याचा दम नाही ; ही वस्तुस्थिती आहे , मालकाच्या पेपरात मालकाच्याच धोरणाबद्दल कसा आवाज उठवणार ? असा  सवाल काही भ्याड  अश्वत्थामे आम्हाला करतील ; पण हे षंढ समाधान आहे हे लक्षात घ्या , आपल्या सहकाऱ्यांच्या नोकऱ्या वाचवणे , त्यांची पगार कपात वाचवणे , त्यांची वेतनवाढ रद्द न होऊ देणे आणि त्यासाठी वर्तमानपत्रांच्या मालकांशी चर्चा विनिमयातून मार्ग काढणे ही त्या त्या वर्तमानपत्रांच्या संपादकांची नैतिक जबाबदारी आणि कार्य -कर्तव्य होते , पण कोणीही माई का लाल या बाबत मालकांच्या समोर ताठ मानेने उभा राहिला नाही , उलट या सगळ्या कणाहीन सरीसृपांनी मालकांच्या बंदुकीला आपला खांदा दिला आणि कर्तव्याला अर्थात मूठमाती , हे असे पाप करणाऱ्यांना नियतीने आजवर इथेच शासित केलेले आहे याचीही अनेक उदाहरणे आहेत त्यामुळे स्वतःच्याच साथीदारांची कत्तल होताना शहामृगासारखी वाळूत मान खुपसणाऱ्या या निबर संपादकांना नियतीच कधीतरी मऊ करेल हे लक्षात घ्या ; 

ते असो पण ही अशी सगळी वाताहत घडूनही पत्रकारांच्या संघटना काहीच का आवाज उठवत नाहीत ? रस्त्यावरचे आंदोलन वगैरे सोडा , निदान एखादे शिष्टमंडळ घेऊन त्या त्या वर्तमानपत्रांच्या मालकांना जाऊन भेटा , त्यांना सांगा की या कर्मचाऱ्यांनी दहा-दहा,वीस-वीस वर्षे तुमच्यासाठी रक्त ओकलंय खस्ता खाल्ल्यात , उन्हा -पावसात सुट्या न घेता अहोरात्र काम केलंय प्रसंगी जीव धोक्यात घातलाय कौटुंबिक अडचणी बाजूला सारून कामाला प्राधान्य दिलंय यांच्या परिश्रमा मुळेच तुमच्या वर्तमानपत्राला वैभव प्राप्त झालंय , पन्नास -पन्नास वर्ष कमाई केलीत त्या नफ्याची कधी भणक सुद्धा लागू दिली नाहीत , आणि आता कोरोना काय आला ; तुमच्या साठी घरादारावर तुळशीपत्र ठेऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही गोचीडासारखे तोडून फेकताय ? काय तर म्हणे कॉस्ट कटिंग ! 

तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना तीन चार महिने सांभाळून घेऊ शकत नाही ? मग सरकारी कर्मचाऱ्यांच्या , कंपनी कामगारांच्या नोकऱ्या वाचावा , पगार कापू नका म्हणून संपादकांना बातम्या छापायला लावताय त्याची शरम नाही वाटत ? का ...तर ते सगळे मध्यमवर्गीय पेपरचे वाचक आहेत म्हणून ! वा ..वा रे वा ! भले शाब्बास !! शेळी जाते जीवानिशी ;खाणारा म्हणतो वातड ! हे कान धरून , डोळ्यात अंजन घालून सांगा वर्तमानपत्रांच्या मालकांना , पण आम्हाला माहित आहे , पत्रकार संघटना हे करणार नाहीत , या पैकी एखादी संघटना निदान मुख्यमंत्री किंवा विरोधी पक्षांकडे तरी जाऊन किमान एखादे निवेदन तरी देईल का ? 

मला नाही वाटत देईल म्हणून ; त्यांना थोडीफार जरी समज उमज असती तर एव्हाना त्यांनी नोकरकपात करणाऱ्या वृत्तपत्र मालकांना जाब विचारला असता , पत्रकारावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एखादी पत्रकार परिषद घेऊन पडद्याआड घडलेले हे शिरकाण जनतेसमोर उघड केले असते , किमान मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , विरोधीपक्षनेते यांना निवेदन सादर करून या बाबत न्यायाची मागणी केली असती , न्यायालयात एखादी याचिका दाखल केली असती . पण या पैकी काहीही घडलेले नाही , तुम्ही म्हणाल लोकांना एवढे ब्रह्मज्ञान सांगताय , तुमच्या काळ्या पाषाणात कोणता पाण्याचा झरा आहे ? तर आहे ; आहे म्हणूनच इतका अधिकारवाणीने बोलतोय , मी काही वर्तमानपत्राचा मालक नाही , आहे पत्रकारच , म्हणजे कार्यकारी संपादक , आमचा पेपर नक्कीच छोटा आहे , अत्यंत छोटा , खपाचा आकडा आम्ही सांगू नये आणि तुम्ही विचारू नये इतका कमी , दर्जा 'ब' ! वय वर्ष ३२ आहे , पण तब्येत म्हणाल तर तोळा मासाच. पण छाती मात्र छप्पन्न इंची बरंका .उगाच आत्मस्तुती नव्हे पण आमचा पेपर आत्मनिर्भर आहे , म्हणजे मालकाला तोशिष नाही , खर्च भागून शिल्लक काही उरत नाही पण पंगत आरामात उठते .तेवढ्यावर आम्ही समाधानी आहोत , तुम्हाला सांगतो कोरोना काळात आम्ही कॉस्ट कटिंग केलेले नाही , कामगार कपात केलेली नाही , कोणाचे पगार कापलेले नाहीत , इतकेच नाही आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना या वर्षी नियमित वेतनवाढ देखील दिली , ( तुम्ही सत्यता पडताळू शकता ) थोडक्यात काय ? पत्रकार संघटना आणि संपादक मंडळींनी हिकमत केली पाहिजे , पळपुट्या बाजीरावाप्रमाणे सहकाऱ्यांना वाऱ्यावर सोडून लुगड्यात लपण्याच्या नतद्रष्टपणा करू नये .जरा तिखट बोललो काय ? त्या बद्दल क्षमस्व ...पण ' आपणा चिमोटा घेतला । तेणे जीव कळवळला । आपल्यावरून दुसऱ्या । वळखीत जावे ।। ' इतकेच.

- रवींद्र तहकिक
7888030472

Post a Comment

3 Comments

  1. धर्म आणि कर्म दोन्ही भ्रष्ट असलेला मयत आणि त्याच्या मड्यावर रडणारा देखिल तोच..

    ReplyDelete