पंढरीच्या पांडुरंगावर सॅनिटायझरचा अभिषेक ! पण हाडामासाच्या पांडुरंगाचे काय ?



टीव्ही नाईनचा पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या निधनानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क होईल,राज्यातील रुग्णालये सुसज्ज होतील,सरकारला जाग येईल,सर्वांना (पत्रकार आणि संपादक-मालक-वाहिन्या तसेच वर्तमानपत्रांचे व्यवस्थापनासकट उपरोल्लेखित सर्वांना ) आपली जबाबदारी कळेल अशी अपेक्षा आहे पण असे काही घडण्याची शक्यता मात्र वाटत नाही.सरकारी दवाखान्यांतील असुविधा,अस्वच्छता,गैरसोयी,डॉक्टर-परिचारक-परिचारिकापासून सफाई कर्मचारी,औषधी,व्हेन्टिलेटर्स,बेड,अँब्युलन्स अशा सगळ्याच गोष्टींचा अभाव यामुळे पांडुरंग रायकर याचा मृत्यू झाला आहे.वयाच्या ४२ व्या वर्षी,अन्य कोणताही गंभीर आजार नसताना त्यांचा मृत्यू झाला आहे.ही दुर्दैवी घटना आहेच.पण हा काही महाराष्ट्रातला सरकारी दवाखान्यात झालेला पहिलाच मृत्यू नव्हे हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.

कोरोनाची लागण होऊन निधन झालेले पांडुरंग रायकर हे एकमेव आणि पाहिलॆच पत्रकार आहेत असेही नाही.ग्रामीण आणि शहरी क्षेत्रातील वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यातील कार्यरत-निवृत्त असे मिळून किमान आठ ते दहा पत्रकारांचे कोरोनामुळे बळी गेलेले आहेत.त्यापैकी बहुतेकांना केवळ खाजगी रुग्णालयांची बिले भरण्याची कुवत नसल्यामुळे सरकारी रुग्णालयात भरती करावे लागले.पांडुरंग रायकरलाही कोपरगावच्या एका खाजगी रुग्णालयात ४० हजार रुपये ऍडव्हान्स भरता आले नाहीत म्हणून त्याला पुण्यातल्या सरकारी कोवीड सेंटर मध्ये भरती करावे लागले.

हीच दुर्दैवी परिस्थिती राज्यातल्या कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या इतरही पत्रकारांची होती.लातूरच्या एका पत्रकाराने तर मृत्यूपूर्वीच  काय घडणार याचा अंदाज आल्याने चिठ्ठी लिहून 'आपण जगणे खरेदी करू शकत नसल्याची' खंत व्यक्त केली होती.सरकारने पत्रकारांसाठी पन्नास लाखांचा विमा वगैरे काढलाय.आरोग्य विमाही आहे म्हणे.कोणाला मिळतात हे लाभ.मुळात मिळतात तरी का ? कोणाला मिळालेत ? एक्रिजेशन मिळवणारे पत्रकार हत्तीच्या कानातून आलेले असतात आणि इतर काय शेपटाखालून ? पत्रकारांना सरसकट एक्रिजेशन कार्ड का देत नाही सरकार ? नाहीतरी त्यातून मिळून मिळून मिळते तरी काय ? 

आज पांडुरंग रायकरच्या मृत्यूनंतर सगळेच राजकीय नेते नक्राश्रू ढाळत आहेत.तो ज्या वृत्तवाहिनीत काम करीत होता त्या टीव्ही-९ या वृत्तवाहिनीने तर रायकर यांच्या मृत्यूचे गांभीर्य लक्षात आणून देण्यापेक्षा दिवसभर 'रुदाली'चाच प्रयोग केला.केवळ अश्रुपात करून किंवा एकमेकांवर आगपाखड करून काहीच होणार नाही.आरोग्य यंत्रणा,सरकार आणि हॉस्पिटलला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून काय साध्य होणार ?  रायकर ज्या वृत्तवाहिनीत काम करीत होते त्यांनी जीव धोक्यात घालून गर्दीत शिरणाऱ्या,फिल्डवरील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी काय उपाय योजना केल्या होत्या.रायकर यांना कोरोनाची लागण झाल्यापासून त्यांच्या दुर्दैवी निधनापर्यंत वाहिनीच्या सहकाऱ्यांनी त्याचे जीव वाचावेत म्हणून जीवाचे रान केले असेल पण वाहिनीच्या मालक आणि व्यवस्थापनाने काय केले ? 

रायकरांचा जीव वाचवण्यासाठी लागणारे पैसे आणि सुविधा मिळवण्यासाठी वाहिनीच्या स्टुडिओत बसलेल्या संपादक आणि व्यवस्थापनाने,वाहिनीच्या मालकांनी काय प्रयत्न केले? हा प्रश्न फक्त एका वृत्तवाहिनीसाठी नाही,सगळ्याच वृत्त वाहिन्या आणि वर्तमानपत्रांसाठी आहे.पेपरवर सॅनिटायझर फवारून कोरोना विषाणूला मारणारे आता का पेपर फवारात नाहीत ? तो एका दिवसाचा इव्हेन्ट होता की त्याचा काही उपयोग नाही याचे 'दिव्यज्ञान' त्या वर्तमानपत्राला झाले ? सारांश:  सगळेच खापर सरकार,आणि आरोग्य यंत्रणेवर कसे फोडता येईल? रायकरांच्या मृत्यूनंतर आता तरी सरकार आणि त्याची वाहिनी त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेणार आहे काय ? त्यांना मदतीचा हात देणार आहेत काय ?

 पंढरीच्या पांडुरंगाचे दरवाजे उघडण्यासाठी,टाळ कुटणारे,देवळांचे दरवाजे उघडण्यासाठी घंटानाद करणारे,मशिदी उघडण्यासाठी अल्ला हो अकबरचा कल्ला करणारे,आम्ही माणसे सजीव माणसांच्या जगण्यासाठी काय करीत आहोत ? पंढरीतल्या दगडी पांडुरंगावर सॅनिटायझरचा अभिषेक करताय पण हाडामासाच्या पांडुरंगाचे काय ? तो तर गेला ना जीवानिशी !

-रवींद्र तहकिक 

हेही वाचा 

पत्रकारीतेतला पांडुरंग हरपला..

Post a Comment

0 Comments