डिजिटल टीआरपीची गटारगंगा


( भाग-१७ वा )

एका जेष्ठ पत्रकाराने मीडियातील वाढत्या धंदेवाईक (अनैतिक ) स्पर्धे बाबत सांगितलेला हा किस्सा.बाजारात दोन केळीवाल्या आपापल्या पाट्या घेऊन ग्राहकाची वाट पाहत बसलेल्या असतात.एक गिऱ्हाईक येतं.कशा दिल्या केळी ? एका केळीवालीला विचारतं.२० रुपये डझन.ती भाव सांगते.तेवढ्यात बाजूची केळीवाली 'साहेब १५ रुपयांनी घ्या.तुमच्यासाठी सस्ती' गिऱ्हाईक तिकडे वळणार तोच आधीची तिच्या केळीचा भाव दहा रुपये डझन सांगते.सोबत जळगावची,गोड,बिनडागी,पिवळी धम्मक,टपोरी (म्हणजे लांब-जाडी) अशी जाहिरात करते.त्यावर दुसरी हा नमुना बघा म्हणत पाच रुपये डझन घेऊन जावा म्हणते.मग पहिली फुकट घ्या भाऊसाहेब म्हणत थेट मासलाच सोलून देते.किस्सा इथे संपत नाही.खरी एक्सलीजिव्ह इन्साईड इस्टोरी पुढेच आहे.दुसरी उठते आणि केळीची पाटीच गिऱ्हाईकाच्या डोक्यावर देत,'भाऊजी चला मी बी सोबत येते' म्हणत थेट गळ्यात पडते.


मीडियातली स्पर्धा यापेक्षाही खालच्या स्तराला पोहचली आहे.आम्हीच नंबर वन.हे सांगण्यासाठी प्रिंट मीडियात कशी स्पर्धा चालते.त्या साठी काय काय क्लुप्त्या-कुटाणे-भानगडी केल्या जातात हे काही आता लपून राहिलेले नाही.बोगस सर्क्युलेशन दाखवणे.वाढवणे.पेड सर्व्हेक्षण रिपोर्ट तयार करणे,सर्क्युलेशनची सूज वाढवण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम,बक्षिसे काय काय अन काय काय.त्यावरून स्वतःच स्वतःच्या नंबर वन असल्याच्या जाहिराती करणे.दुसऱ्याचे आकडे कमी दाखवणे.त्यावरून झालेली नळावरची भांडणे.आपण पहिली.लोकांना हे कळत नाही का ? तुम्ही पेपर सोबत सोनेनाणे,फ्लॅट,कार,बाईक्स,लॅपटॉप-कंप्यूटर रगी,चादरी,ब्लँकेट्स,बॅगा,घड्याळी,फ्रिज,टीव्ही,ताटल्या-वाट्या का देताय ते.पेपर चालवताय की कटलरी सामानाचे दुकान.


हे कमी म्हणून की काय न्यूज चॅनल्सनी त्यांचा टीआरपी वाढवण्यासाठी चक्क पैसे देऊन रोजंदारीवर बघेच ठेवले.त्यांनी फक्त अमुक एक चॅनल चालू ठेवायचं.चोवीस तास.त्याचे पैसे.नंतर हे प्रकरण उघडकीस आलं.म्हणजे तेही स्पर्धेतून.म्हणजे अर्णब गोस्वामी हा सापडलेला चोर.याचा अर्थ बाकीचे सगळे साळसूद-साव असा मात्र नाही.सगळेच हौदात पाणी टाकतात.थोडक्यात ही लबाडी खूप आधीपासून सुरु आहे आणि अजूनही संपलेली नाही.

पुढला प्रकार आणखी भयानक आहे.म्हणजे आंबट शॉकीन वाचकांना किंवा प्रेक्षकांना चाळवून पेपरचे सर्क्युलेशन  ,चॅनलचा टीआरपी किंवा वेबसाईटचा रीडर-फॉलोअर-सबस्क्राइबर वाढवायचा.पूर्वी अशी काही बदनाम दैनिके साप्ताहिके,पाक्षिके,मासिके होती.जी सरळ सरळ पीत पत्रकारिता करायची.अजूनही यातली काही दैनिके,साप्ताहिके बाजारात आहेत जे केवळ करमणूक म्हणून  किंवा  निव्वळ आंबट शॉक म्हणून विकली वाचली जातात.संध्यानंद,पोलीस टाइम्स,काली गंगा,अशाच नावाची आणखीही काही वर्तमानपत्रे आहेत.काही तर फक्त मटक्याचे आकडे छापले जातात म्हणून विकले जातात.ब्लॅक व्हाईट मध्ये चार पाने.किंमत १२ रुपये,१५ रुपये,२० रुपये.( रंगीत १६ पाने चार रुपयात देणाऱ्या बहाद्दरांना लाज वाटली पाहिजे )


पण यांना का नावे ठेवायची ? जाहिरातदारांच्या मजकुराची आणि दाव्यांची हमी न घेता पैसे घेऊन जाहिराती स्थापण्याची किमया तर मानबिंदू सुद्धा करतात.निधन वार्तांचे सुद्धा रोख पैसे घेण्याचे पुण्यकर्म करणारे सुद्धा आहेत मीडियात.आणि शिवाय क्राईमच्या बातम्यांना,त्यातही बातमी प्रेमी युगुल,लव्ह ट्रँगल,बलात्कार,इत्यादी विषयाची असेल तर तिला जास्तीत जास्त चटकदार बनवण्यासाठी आग्रही असणारे.अशा बातमीला पहिल्या पानावर किंवा ठळक दर्शनी स्थान देणारे 'संस्कारी बाबू' के क्या कहने.


आता जवळपास सर्वच मोठ्या  वर्तमानपत्रांनी  डिजिटल माध्यमात प्रवेश केला आहे. त्यांच्या ज्या न्यूज वेबसाईट आहेत.तिथेही नंबर वन ची स्पर्धा आहेच.नुकतेच त्याचे रिपोर्ट घोषित झाले.आपल्या वेबसाईटचा युझर किती आहे  ? हे  तपासण्यासाठी कॉमस्कोअर comscore नावाची आंतरराष्ट्रीय संस्था आहे. भराभर आणि भाराभर रीडर मिळवण्यासाठी ही वर्तमानपत्रे आपल्या वेबसाईट चालवणाऱ्या टिमला अत्यंत विकृत अश्लील भावना चालवणाऱ्या बातम्या टाकायला सांगतात.या सगळ्या वेबसाईटवर काम करणारे जवळपास सगळे नव्याने पत्रकारितेत आलेले यंगर्स आहेत.यात मुले आणि मुलीही आहेत.त्यांना ना मीडियाचे इथिक्स माहित आहेत ना मर्यादा.त्यांना बहुतेक मार्गदर्शन करण्याच्या कोणी भानगडीत पडत नसावे.कोणी प्रयत्न केला तर ते एकतही नसावेत.म्हणूनच मग त्यांच्या डोक्यातली सगळी विकृती वेबसाईटवर उतरते.सेक्स पावर वाढवण्यासाठीचे उपाय,आहार,व्यायाम.शृंगारातील आनंद वाढवण्याच्या,जोडीदाराला खुश करण्याच्या टिप्स,अमुक ठिकाणी एका बाईने १२ नवरे केले.त्यासोबत व्यभिचाराच्या,फिल्मी किंवा सेलिब्रेटीजच्या अफेअर आणि लफड्यांच्या,बनावट किस्स्यांच्या अशा कितीतरी बातम्या,जवळपास न्यूड फोटो,आणखी काय काय गचाळ.निव्वळ गटारगंगा.हे सगळं कशासाठी ? तर युझर, पेजह्युज, व्हिजिटर,लाईक्स आणि सबस्क्राइबर्स वाढवण्यासाठी.त्यासाठी हा सगळा नंगानाच.धक्कादायक म्हणजे नामांकित वर्तमानपत्रे सुद्धा यात हिरिरीने पुढे  आहेत.वेबसाईट चालवणाऱ्या सैराटाना ते थांबवत तर नाहीतच.उलट प्रोत्साहन देतात.रिंगण घालणाऱ्याची तक्रार कोणाकडे करायची ? गच्चीवरून खाली पन्हाळ सोडणाऱ्याकडे ?

(क्रमशः)

- रवींद्र तहकिक

7888030472


Post a Comment

2 Comments

  1. अगदी वास्तव परीस्थिती आहे... आम्ही आठरा वर्षापूर्वी सध्यानंद पेपर घेत होतो... ते पण चार नंतर आणि त्यात नट्यांचे अंगप्रदर्शन फोटो छापून येत असे...
    आता तर लाईव्ह सोशल मीडियावर शारीरिक संबंध कसे असावेत इतपत बातम्या प्रसिद्ध होत आहेत... तेही नावाजलेल्या वाहिन्या, वेब पोर्टल, इ. अवघड परीस्थिती आहे... म्हणून समाज मन बिघडत गेले...

    ReplyDelete
  2. मराठी प्रेक्षक आणि सर्वसामान्य लोक आता वर्तमान पत्रक सोडा साधे न्यूज चॅनेल सुद्धा ढुंकून बघत नाही।
    मराठी वर्तमान पत्रे आणि न्यूज चॅनेल बघितल्यावर मुलांची बौद्धिक पातळी आणि तर्क बुद्धी खालावते आणि ते लखोबा होतात।
    याला कारण मराठीतील वर्तमानपत्रांची खोटे बनावटी राजकारण, खोटे मथळे आणि कथा प्रथमदर्शनी तर्कबुद्धी आणि विवेकाला न पटणाऱ्या असतात सामान्य बुद्धीने त्याचे आकलन कन्या इतके ते बनावटी आणि खोटे असल्याचे तात्काळ सिद्ध होते।

    ReplyDelete