> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

समालोचटांचे महाकव्हरेज ...

आमच्या वृत्तवाहिन्यांना नेमकं काय चावलंय कळायला मार्ग नाही.काय बोलावे,किती बोलावे,कोणत्या विषयावर बोलावे याला काही धरबंधच राहिलेला नाही.व्यावसायिकता वगैरे सगळं ठीक आहे हो.पण लाळ किती गाळायची,किती सरपटायचं,अकलेचं किती दिवाळं काढायचं याला काही तरी मर्यादा असायला हवी की नाही .निदान आपण प्रसारमाध्यमात पत्रकार म्हणून काम करतो.लोक आपल्याला पहातात,ऐकतात,याचं तरी भान.मनाची नाही (च) पण किमान जनाची तरी काही लाज लज्जा शरम.कमरेचं सोडून वेशीला टांगायचं तरी किती.एकतर सध्या वृत्तवाहिन्यांवर जे समालोचट आणि समालोचाटिका अहोरात्र आपल्या अकलेचे दिवे पाजळताना दिसतात ते सगळं उबग आणणारं आहे.काल तर कहरच झाला.निमित्त होते राज ठाकरेंच्या ईडी चौकशीचे.सकाळी ७ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत तमाम वृत्तवाहिन्यांवर राज ठाकरे आणि त्यांच्या ईडी भेटीचे महाकव्हरेज चालू होतं.बातमी एका ओळींचीच होती,राज ठाकरेंची  कोहिनुर मधील भागीदारी विक्री व्यवहार संबंधात ईडी म्हणजे अंमलबजावणी संचालनालयाची आलेली नोटीस आणि त्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी राज ठाकरेंची ईडी कार्यालयात भेट,आणि अर्थात चौकशी.आता ही बातमी ताणून ताणून किती ताणता येऊ  शकते.पण आमच्या वृत्त 'वहिन्या' म्हणजे विचारू नका.ताकात पाणी घालून सगळ्या पाहुण्यांना पुरून उरेल एवढा मठ्ठा वाढवण्याची मठ्ठ कला आमच्या तमाम 'वहिन्या' आणि त्यावरील समालोचट तितक्याच मठ्ठ पणे प्रदर्शित करीत असतात.पहात रहा राज ठाकरेंच्या चौकशीचे एक्सलीजिव्ह रिपोर्ट, क्षणा क्षणाची अपडेट माहिती फक्त आमच्या चॅनलवर .चला ग्राउंड झिरोवर.चुकवू नका पहात रहा,फक्त आमचे चॅनल,सर्वात पुढे..एक पाऊल पुढे,उघडा डोळे,बघा नीट,मराठी माणसांच्या हक्काचं व्यासपीठ,थेट अचूक बिनधास्त,कुठेही जाऊ नका..वगैरे वगैरे.वृत्त 'वहिन्यां'चे समालोचट सरळ सरळ धमक्याच देतात.बरे बातम्या काय ? तर त्याच त्या.बोहरी साड्या दाखवतात तशा.एकदा नुसता पदर दाखवायचा.पलटी मारून एकबाजू दाखवायची,पलटी मारून दुसरी बाजू दाखवायची.तसलाच मामला.लोकही हा सगळा डोंबाऱ्याचा खेळ मुर्खासारखे ( किंवा नाईलाज म्हणून ) पहातात.अगदी सकाळी सात वाजता एका वृत्त वाहिनीचा ग्राउंड रिपोर्टर राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर पोहचला.स्टुडिओत समालोचाटिका होतीच.लाईव्ह कव्हरेज सुरु झालं.राज ठाकरे सध्या काय करताहेत .कृष्णकुंजवर काय वातावरण आहे.पोलीस काय करताहेत.कार्यकर्ते जमलेत काय,आत कोणी गेले का .बाहेर कोणी आले का.निव्वळ बाष्कळ,बालिश फालतू प्रश्न.त्याला तितकीच निर्बुद्ध उत्तरं.पोलीस बंदोबस्त तगडा आहे.कार्यकर्ते जमत आहेत.आत काय चाललय माहिती नाही,बहुतेक राज ठाकरे टॉयलेट किंवा बाथरूमला गेले असावेत.( काय पण दिव्यदृष्टी ! ) पुन्हा पुन्हा हेच चालू होतं.आतून कुत्र्यांच्या भुंकण्याचे,कुकरच्या शिट्यांचे,आवाज आल्याचेही अपडेट सांगण्यात आले.( निखिला आई थोर तुझे उपकार ) सापाच्या बिळापुढे गारुड्यानी पुंग्या वाजवीत साप बाहेर पडण्याची वाट पाहावी अगदी त्याप्रमाणे विविध वृत्तवाहिन्यांचे ग्राउंड रिपोर्टर्स कृष्णकुंजच्या दरवाज्या पुढे कॅमेरे आणि बूम धरून उभे होते.कुठे फूस वाजलं की तिकडे पळत होते.त्यालाच आम्ही बातमीवर 'पाळत'ठेवून आहोत असे ठणकावून ( अर्थात प्रेक्षकांना ) सांगत होते.अखेर एकदाचे राज ठाकरे बाहेर आले .तेही सहकुटुंब.त्यावर अंजली दमानिया म्हणाल्या,ईडीच्या चौकशीला निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला.झाले नवा विषय मिळाला.त्यातच काळे ती शर्ट घातले म्हणून काही मनसैनिकांना ताब्यात घेतले.मग काय दुधात साखरच पडली,दमानिया बाईने त्यात केशर घातले.मग दिवसभर तीच चर्चा.इकडे राज ठाकरेंनी कोणते कपडे घातले,बूट घातले की चपला.( सॅन्डल घातलेत असे एका वृत्त वाहिनीने एक्सलीजिव्ह सांगितले ) गाडी कोणत्या कंपनीची,गाडीचा रंग,नंबर,असं सगळं इत्यंभूत.(एवढं मायक्रो जर्नालिझम यांना शिकवतं तरी कोण ? नासाच्या एखाद्या अंतराळ यानाच्या प्रक्षेपणाचे सुद्धा एवढे बारकावे शोधले जात नाहीत.एका वृत्त वाहिनीने तर चक्क ' राज ठाकरेंचा ईडीच्या दिशेने अंतिम प्रवास सुरु' असे वाक्य उच्चारले.मग ईडीच्या कार्यालयापुढे,राज ठाकरे एकटेच आत गेले.कुटुंब बाहेरच राहिले.कुटुंब हॉटेलात बसले आहे.हे कमी म्हणून की काय राज ठाकरे तपास अधिकाऱ्यांना कसे उत्तरे देत असतील,त्यांचा स्वभाव तापट आहे,ते संयम राखत असतील की खडाजंगी चालली असेल,यावर तर्क लढवले गेले.काही वाहिन्यांनी या विषयावर चर्चाही ठेवल्या,त्यावर बोलायला पक्ष प्रवक्ते आणि अभ्यासक तज्ज्ञही भेटले.हा सगळा अत्याचार आता थांबेल मग थांबेल म्हणून आम्ही दिवसभर ..रात्री उशिरापर्यंत वाट पहात होतो .पण कसचं काय अन कसचं काय .पाण्यात म्हैस अन वर सौदा. बाजारात तुरी अन भट भटणीला मारी,मूठभर घुगऱ्या अन सारी रात मचमच चालूच होती.अखेर  आम्हीच डोळे मिटले.( कायमचे नाही हो.झोपलो.आज राज ठाकरेंच्या आधी )

-  बोरूबहाद्दर


शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९

कन्फर्म : जय महाराष्ट्र चॅनल अखेर विकले !

मुंबई - जय महाराष्ट्र चॅनल  अखेर इंडिया न्यूज ( हिंदी) चॅनलला विकल्याचे कन्फर्म झाले आहे. मालक सुधाकर शेट्टी यांनीच ही घोषणा कर्मचाऱ्यांच्या मिटिंगमध्ये परवा केली. मात्र त्यांनी जय महाराष्ट्रकडे ५० टक्के तर इंडिया न्यूजकडे ५० टक्के शेयर्स असतील, असे सांगून कर्मचाऱ्यांना धीर दिला आहे.

एकेकाळी लेडीज डान्स बार  चालवणाऱ्या सुधाकर शेट्टी यांनी २०१३ मध्ये जय महाराष्ट्र न्यूज चॅनल सुरु केले होते. सुरुवातीला मंदार फणसे, रवी आंबेकर, तुळशीदास भोईटे हे  त्रिकुट संपादकीय मंडळावर   होते. नंतर शैलेष लांबे, समीरन   वाळवेकर,निलेश खरे, प्रसन्न जोशी, विलास आठवले ,  तुळशीदास भोईटे ( दुसरी वेळ ) संपादक झाले होते.  सध्या  आशुतोष पाटील, मनोज भोयर, आशिष जाधव, विनोद राऊत , तुषार शेटे हे रथी - महारथी आहेत. मात्र या चॅनलचा टीआरपी कधीच ४ च्या वरती गेला नाही. सध्या तर २ वरती टीआरपी आहे. वाढलेला खर्च आणि येणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने सुधाकर शेट्टी यांनी अखेर  चॅनल विकण्याचा निर्णय घेतला.

जय महाराष्ट्र चॅनल हे इंडिया न्यूज ( हिंदी) चॅनलला विकल्याची बातमी गेल्या दोन महिन्यापासून पसरली होती. मात्र आता कन्फर्म झाले आहे. जय महाराष्ट्र चॅनल अंधेरीहुन बीकेसी ( बांद्रा - कुर्ला कॉम्प्लेक्स ) मध्ये लवकरच शिफ्ट होणार आहे. सध्या येथे नव्या स्टुडिओचे काम सुरु आहे. 
टीव्ही ९ मराठी सोडलेल्या रोहित विश्वकर्मा यांच्याकडे  जय महाराष्ट्रचा  चार्ज असेल व तेच संपादक असतील असे सांगितले जात आहे. तसेच टीव्ही ९ मराठीमध्ये अनेक वर्ष इनपुट हेड राहिलेल्या व सध्या इंडिया न्यूज ( हिंदी) मध्ये  महाराष्ट्र ब्युरो असलेल्या प्रीती सोमपुराकडे इनपुट हेड पद असेल, असे कळते. नव्या टीममध्ये काही नवे चेहरे दिसणार  आहेत.

सध्या जय महाराष्ट्र मध्ये असलेल्या आशुतोष पाटील, आशिष जाधव, तुषार शेटे यांच्यावर टांगती तलवार दिसत आहे. त्याचबरोबर काही  निष्क्रिय कर्मचाऱ्यांना लवकरच नारळ देण्यात येणार असल्याचे कळते.  चॅनल विकल्यामुळे काहींना आनंद तर काहींना दुःख झाले आहे.

पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’ची एक कोटीची मदत

पुणे -  कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत जलप्रलयाने थैमान घातलं आहे. हजारो संसार उघड्यावर आले असताना, लाखों लोकांवर हे महासंकट कोसळलं असताना अशा आपत्तीत धावून जाण्याची परंपरा कायम ठेवत ‘सकाळ रिलीफ फंडा’ने आपद्‌ग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच या फंडासाठी लोकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.

या संकटात केवळ शासनाची मदत पुरी पडणारी नाही. समाजानेही पुढे यायला हवे. अनेक संस्था, संघटना पुढे येतही आहेत.मदत आणि पुनर्वसनाचे काम महाप्रचंड आहे. यात  सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था, संघटनांमध्ये समन्वय साधण्याची भूमिकाही ‘सकाळ’ निभावणार आहे.

यासाठी आपण पुढीलपैकी कोणत्याही स्वरूपात मदत करू इच्छित असाल तर ‘सकाळ’शी संपर्क साधा.
सकाळ रिलीफ फंडात रोख मदत. ही मदत प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमान्वये प्राप्तिकर सवलतीस पात्र आहे. यासाठी राज्याभरातल्या ‘सकाळ’च्या कोणत्याही कार्यालयाशी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधा. रोख रक्कम स्वीकारण्याची व्यवस्थाही ‘सकाळ’च्या सर्व कार्यालयांमध्ये शनिवारपासून (ता.१०) करण्यात येत आहे.

पत्ता : ५९५, बुधवार पेठ, पुणे-४११ ००२

आपद्‌ग्रस्तांपर्यंत नेमकी मदत पोचविण्यासाठी हजारो स्वयंसेवक लागणार आहेत. आपण स्वयंसेवक म्हणन काम करू इच्छित असाल तरीही ‘सकाळ’शी संपर्क साधा.
पुणे आणि अन्य भागांतून मोठ्या प्रमाणात स्वयंसेवी संस्था संघटना मदतीसाठी ‘सकाळ’शी संपर्क साधत आहेत, अशा सर्वांना आपण कोणत्या स्वरूपात मदत करू इच्छता हे ‘सकाळ’कडे कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

संपर्क - 98810999081
मिस्ड कॅाल द्या -  98810999081
फोन - 9881598815
email - Support@sakalrelieffund.com
गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९

साम पुन्हा नंबर १ ! एबीपी माझामध्ये झाले बदल !!

मुंबई - सकाळ माध्यम समूहाचे साम टीव्ही न्यूज चॅनल सलग दुसऱ्या आठवड्यात सर्व मराठी न्यूज चॅनल्समध्ये  पुन्हा एकदा नंबर १ ठरले आहे.एबीपी माझा दुसऱ्या  तर टीव्ही ९  तिसऱ्या क्रमांकावर गेले आहे.न्यूज १८ लोकमतने आपला पाचवा क्रमांक कायम ठेवला  आहे.

मागील आठवड्यात साम पुन्हा एकदा नंबर १ वर आले  होते. सलग दुसऱ्या आठवड्यात  सामने आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे. कधी साम तर कधी टीव्ही ९ पहिल्या क्रमांकावर येत असताना एबीपी माझाची दिवसेंदिवस घसरण होत आहे. त्यामुळे एबीपी माझाची झोप उडाली असून, माझामध्ये बदल करण्यात आले आहेत.

गेली अनेक वर्ष इनपुट हेड असलेल्या भारती अत्रे उर्फ सहस्त्रबुद्धे  यांना  या  पदावरून हटवून अभिजित करंडे यास इनपुट हेड करण्यात आले आहे. आऊटपुट हेड म्हणून राहुल खिचडीकडे पदभार देण्यात आला आहे.

भारती अत्रे उर्फ सहस्त्रबुद्धे यांच्याकडे विविध कार्यक्रम आणि नियोजन विभाग देण्यात आला आहे. त्यांच्या हाताखाली सिनियर असलेल्या शेफाली साधू यांना देण्यात आले आहे. ऍग्रोचे बुलेटिन बंद करण्यात आले असून ऍग्रोचे संदीप रामदासी यांना इनपुट हेडच्या हाताखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या दोघांत एकप्रकारची नाराजी आहे.

नाशिकहून मुंबईत आलेल्या नितीन भालेराव यांना माझातून नारळ देण्यात आला आहे. त्यांनी जाता जाता वरिष्ठांना मेल केल्यामुळे भारतमाताचे अधिकार गोठवल्याचे सांगण्यात येत आहे.
रविवार, ४ ऑगस्ट, २०१९

मुख्यमंत्र्यानी एबीपी माझाचे कान टोचले !

उघडा डोळे, बघा नीट म्हणणाऱ्या एबीपी माझाने सावरकर जयंती दिवशीच 'सावरकर नायक की खलनायक' या विषयावर चर्चात्मक कार्यक्रम घेतल्यामुळे माझाला ट्रोलिंग व्हावे लागले होते.

त्याची धग अजूनही संपलेली नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही,सावरकर प्रकरणी माझाचे कान त्यांच्यात कार्यक्रमात टोचले. माझाच्या वतीने कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यात अगदी शांतपणे, अजिबात चिडचिड न करता मुख्यमंत्री फडणवीस यांनी, संपादक राजीव खांडेकर आणि माझाच्या टीमला कानपिचक्या दिल्या ..

पाहा, काय म्हणाले मुख्यमंत्री...

शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१९

प्रसिद्ध पत्रकार रवीश कुमार यांना मॅगसेसे पुरस्कार

नवी दिल्ली : प्रसिद्ध पत्रकार रवीश कुमार यांना प्रतिष्ठेचा 'रॅमन मॅगसेसे 2019' हा पुस्कार जाहीर झाला आहे. तळागाळातील वंचितांसाठी पत्रकारितेचा प्रभावी वापर‌ केल्याबद्दल‌ रविश कुमार यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार‌ जाहीर झाला आहे.‌ फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे या पुरस्काराचे 9 सप्टेंबरला वितरण होईल. आज (ता. 2) या पुरस्काराच्या नावांची घोषणा झाली.   

रवीश कुमार हे रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळणाऱ्या पाच मान्यवरांपैकी एक असतील. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीची चेहरा समजले जाणारे रवीश कुमार 'इंडियाज् प्राईम टाईम शो' प्रवाभीपणे चालवतात. यामुळेच त्यांना मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे रॅमन मॅगसेसे फाऊंडेशनने सांगितले आहे. 'सत्यासाठी उभे राहणे, नैतिक पत्रकारिता, नैतिक धैर्य, तथ्यावर आधारित पत्रकारिता, वंचितांचा आवाज बनून त्यांचे प्रश्न सरकासमोर मांडणे या विशेष कारणांसाठी त्याला मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे,' असे फाऊंडेशनने सांगितले. 

रवीश कुमार यांच्यासह म्यानमारमधील पत्रकार को स्वी विन, थाई हक्कांसाठी काम करणारे अगाखान निलापैजीत, दक्षिण कोरियातील समाजसेवक किम जाँग की आणि फिलिपीनमधील संगीतकार रेमुंडो पुंजाते केब्याब यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
1975 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कारास सुरवात झाली. लोकशाहीत जनहितार्थ आणि निरपेक्ष काम करणाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान कण्यात येतो.  व्यक्तीला पुरस्काराने शोभा येते पण एखाद्या व्यक्तीमुळे त्या पुरस्काराला शोभा येते,’ असे व्यक्तीमत्व म्हणजे #रवीशकुमार.

लोकशाही ज्या चार स्तंभांवर उभी आहे त्यापैकीचा चौथा स्तंभ म्हणजे प्रसारमाध्यमे आज कमकुवत होताना दिसतोय. कारण लोक कागदावर छापून येणाऱ्या शब्दांवर विश्वास ठेवून दोन-पाच रुपये खर्चून दररोज लोक वर्तमानपत्र वाचतात, ‘इंडियन इडियट बॉक्स’ अर्थात टिव्हीवर शिव्या देत का होईना पण हिंदी, इंग्लिश आणि मराठी न्यूजचॅनेल्स अजुनतरी  पाहत आहेत. दररोज रात्री सात वाजल्यानंतर काही चॅनल्सवर विविध पक्षाचे प्रवक्ते, राजकीय विश्लेषक, सिनेअभिनेते, अभिनेत्री, मानसोपचार तज्ज्ञ यांना घेऊन स्वतः सूत्रसंचालकाच्या भुमिकेत बसून (उन्हाळ्यात सुद्धा ब्लेझर,टाय घालून) ‘दशमुखी रावण’ अशी फ्रेम तयार करून जे अपेक्षित चर्चानाट्य घडविले जाते. आपल्या मालकाच्या भुमिकेला (हितसंबंधांना) पूरक अशाच गोष्टी ऐकून घेत, चर्चेतील अन्य पाहुण्यांची एकमेकांमध्ये भांडणे लावत, सत्य बोलणाऱ्याचा अपमान करत, विरोधी मत मांडणाऱ्यांचा आवाज ‘म्यूट’ करत, सत्ताधाऱ्यांच्या प्रचारकी टिमक्या वाजवित, अखेर चर्चेचा ४५ मिनीटांचा वेळ संपला की विजयी झालेल्या अभिनिवेशामध्ये जे तथाकथित पुरूष आणि महिला पत्रकार (?), केबीनकॉक संपादक (केवळ वातानुकुलीत केबीनच्या त्या खुर्चीवर बसले म्हणून संपादक झालेले) (अर्थात काही सन्माननीय वगळता) या चर्चांना रोज लोक सहन करत आहेत. एकांगी चर्चा आणि आरडाओरडा सहन न झाल्यावर हळूच रिमोटचे बटन दाबून मनोरंजनासाठी दुसऱ्या चॅनेलवर शिफ्ट होत आहेत.

केंद्र किंवा राज्यातील सरकार अडचणीत येणारी देशात एखादी मोठी घटना होणार असेल तर लोकांचे त्यावरून लक्ष दुसरीकडे हटविण्यासाठी प्रचारकी सुपाऱ्या घेऊन सनसनाटी, तिखट मीठ लावून, घशांच्या शिरा ताणून, प्रसंगी धावत, मोठ्या देशभक्ताच्या आवेशात घडविल्या जाणाऱ्या चर्चा, बातम्या वारंवार टिव्हीच्या आणि मोबाईलच्या स्कीन्सवर आदळली जात आहेत. यामाध्यमातून सत्तेतील पक्ष त्यांचा अजेंडा रेटत आहेत. संभ्रम निर्माण करून वैचारीक गोंधळातील जनमत तयार करत आहेत. तर सर्व चॅनेल मात्र जणू काही देशातील सर्वात मोठी ‘ब्रेकिंग (कि बार्किंग) न्यूज’ आमचीच, या आठवड्यात आम्हीच नंबर वन, असा आकड्यांचा खेळ खेळला जातोय. लोक अजुनतरी त्यांचा सयंम राखत दररोजचा सावळा गोंधळ ऐकून झोपायला जात आहेत.

एकीकडे काही भांडवलशाहीचे पुरस्कर्ते मालक संपादकांकरवी आर्थिक फायद्यासाठी, लाभांची पदे, राज्यसभा खासदारकी पदरात पाडून घेण्यासाठी, मालकांसह स्वतःचे हितसंबंध जोपासण्यासाठी मेकअप करून बसलेल्या संपादक, निमंत्रित, पूर्वनियोजित यजमानांचा रोज गोंधळ सुरू आहे.तर दुसरीकडे एक आशेचा किरण म्हणजे एनडीटिव्ही. त्यावरच्या निष्पःक्ष, विचार करायला लावणाऱ्या बातम्या, विश्लेषण, शांत आणि सयंमी खेळकर वातावरणामध्ये खरेखुरे तज्ज्ञ, विश्लेषक आणि अभ्यासू प्रवक्त्यांसोबत घेतल्या जाणाऱ्या चर्चा आणि रवीश कुमार.

‘साम टीव्ही’ पुन्हा ‘नंबर वन’ !

मुंबई - ‘सकाळ माध्यम समूहा’चे ‘साम टीव्ही न्यूज’ चॅनेल हे मराठीतील सर्व मराठी न्यूज चॅनेल्समध्ये पुन्हा एकदा सर्वोत्तम ठरले आहे. बार्क (BARC) या संस्थेच्या ३ व्या आठवड्याच्या रेटिंगनुसार ‘साम टीव्ही न्यूज’ने मराठीतील सगळ्या प्रस्थापित न्यूज चॅनेल्सना मागे टाकले आहे. या आठवड्यात २३.३ टक्के प्रेक्षकांची पसंती ‘साम टीव्ही न्यूज’ला मिळाली आहे. विशेष म्हणजे, सर्व मराठी न्यूज चॅनेल्समधील टॉप १०० बातमीपत्रांमध्ये ‘साम टीव्ही न्यूज’चे तब्बल ५७ कार्यक्रम झळकले आहेत. हा न्यूज चॅनेल्सच्या इतिहासातील नवा विक्रम ठरला आहे. सर्वच वयोगटांतील प्रेक्षकांमध्ये ‘साम टीव्ही न्यूज’ लोकप्रिय असल्याचे ‘बार्क’च्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
मुंबई आणि उपनगरासह ग्रामीण भागातील प्रेक्षकांनीही ‘साम टीव्ही’वर पसंतीची मोहोर उमटवली आहे. शहरांपासून खेड्यापाड्यांपर्यंत संपूर्ण राज्यात ‘साम टीव्ही’च्या बातमीपत्रांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘बार्क’च्या अहवालातून ‘साम टीव्ही’च्या याच लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. बातमी मागची बातमी आणि त्यातील सत्य उलगडणे, हे ‘साम टीव्ही’च्या बातम्यांमधील वेगळेपण आहे. सर्व स्तरावर याची नोंद प्रामुख्याने घेतली गेली आहे.

‘साम टीव्ही न्यूज’ने कायमच राजकीय, निष्पक्षपाती आणि लोकाभिमुख बातम्यांना प्राधान्य देत आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. त्यामुळेच ‘साम टीव्ही न्यूज’चा टाइम स्पेंडही इतर सर्व न्यूज चॅनेल्सच्या तुलनेत सर्वाधिक आहे. ‘व्हायरल सत्य’, ‘टॉप ५०’, ‘स्पॉटलाइट’, ‘मेगा प्राइम टाइम’, ‘आज दिनांक’, ‘सरकारनामा ३६०’, ‘महाराष्ट्र एक्‍स्प्रेस’, ‘आज काय विशेष’, ‘३६ जिल्हे ३६ रिपोर्टर’ यासारख्या बातमीपत्रांना प्रेक्षकांची सातत्याने पसंती मिळाली आहे. बातम्यांमधील वेगळेपणा आणि सत्याची बाजू मांडत सकारात्मकतेला दिलेले प्राधान्य, यामुळे ‘साम टीव्ही न्यूज’ चॅनेलने अल्पावधीत लोकप्रियतेची नवनवी शिखरे सर केली आहेत. ‘बार्क’च्या ३०व्या आठवड्याच्या प्रेक्षकांच्या रेटिंगनुसार ‘एबीपी माझा’, ‘झी २४ तास’, ‘नेटवर्क १८ लोकमत’, ‘टीव्ही ९’ यांसारख्या प्रस्थापित न्यूज चॅनेल्सना मागे टाकण्याची किमया ‘साम टीव्ही न्यूज’ने पुन्हा एकदा साधली आहे. ‘साम’च्या निष्पक्ष बातमीपत्रातूनच ही किमया साधली गेली आहे.

फेसबुक वर शेअर करा

Facebook