> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

सोमवार, २९ सप्टेंबर, २०१४

बेरक्या इम्पॅक्ट

औरंगाबाद दैनिक भास्करच्या रिपोर्टर उज्वला साळुंके संदर्भात बेरक्यावर वृत प्रसिद्ध होताच त्यांचा दीड महिन्याचा पगार तब्बल दोन महिन्यानंतर देण्यात आला आहे.
उज्वला साळुंके यांना कसलीही नोटीस न देता कामावरुन काढण्यात आले होते व त्यांनी पगाराची मागणी केली असता राजीनामा दिल्यानंतरच पगार दिला जाईल असे सांगत दोन महिने झाले तरी पगार दिला नव्हता.
यासंदर्भात बेरक्यावर वृत्त प्रसिद्ध होताच सोमवारी उज्वला साळुंकेचा राजीनामा न घेता पगार देण्यात आला. त्यांना परत कामावर घेऊन भास्कर व्यवस्थापन न्याय देते की नाही हे महत्त्वाचे आहे.

बुधवार, २४ सप्टेंबर, २०१४

दैनिक भास्करमधील झाशाहीला अनेकजण कंटाळले

औरंगाबाद - दैनिक भास्करच्या औरंगाबाद आवृत्ती कार्यालयात गेल्या वर्षभरापासून झाशाही सुरू आहे.युनिट हेड एस.के.झा यांच्या मनमानी कारभारामुळे सर्व कर्मचारी आणि अनेक रिपोर्टर कंंटाळले आहेत. त्यामुळे दैनिक भास्करचा खप दिवसेंदिवस घटत चालला आहे.बिझीनेसपण सर्वात खाली आला असून,युनिट तोट्यात सुरू आहे.मात्र जबलपूरला बसलेल्या भास्करच्या मालकाला झा शाहीची कल्पना कोण देणार,हे कोडेच आहे.
काही दिवसांपुर्वी भास्करमध्ये रिपोर्टींगचे काम करणा-या उज्वला साळुंके या युवतीस कामावरून अचानक काढण्यात आले आणि तिच्या जागेवर झाची चमचेगिरी करणा-या युवतीस घेण्यात आले,त्याची खमंग चर्चा सध्या औरंगाबादेत रंगली आहे.
यासंदर्भात उज्वला साळुंके यांनी मुख्य संपादक दुबे यांना पाठवलेले पत्र बेरक्याच्या हाती लागले असून,ते येथे प्रसिध्द करीत आहोत.दुबे सर आणि अग्रवाल शेठना विनंती आहे की,औरंगाबाद आवृत्तीतील झा शाही थांबवावी आणि उज्वला साळुंके हिला न्याय मिळवून द्यावा...

शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०१४

संजय आवटे यांचा 'पुढारी'ला रामराम

पुणे - दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक संजय आवटे यांनी अखेर पुढारीला रामराम ठोकला आहे.ते लवकरच सकाळ जॉईन करणार असून,त्यांच्याकडे सकाळमध्ये वेगळी जबाबदारी देण्यात येणार आहे.
संजय आवटे यांची पत्रकारितेची सुरूवात सकाळपासूनच झाली होती.नंतर संचार,लोकमत,लोकसत्ता,पुढारी,पुन्हा लोकमत,कृषीवल असा प्रवास करीत पुन्हा पुढारीत कार्यकारी संपादक म्हणून जॉईन झाले आहे.अखेर त्यांनी पुढारीचा राजीनामा दिला असून,ते लवकरच सकाळमध्ये जॉईन होणार आहेत.त्यांच्याकडे सकाळमध्ये नवी जबाबदारी देण्यात येणार आहे.

मंगळवार, १६ सप्टेंबर, २०१४

'नो पेड न्यूज'! छे, छे; चक्क 'पेड पेज'!

महाराष्ट्राच्या काही भागात नव्याने आलेल्या एका बाहेरच्या राज्यातील दैनिकाने 'नो पेड न्यूज'ची टिमकी मिरवीत स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र, सध्याच्या व्यावसायिक युगात हा चक्क वाचकांना 'उल्लू बनाविंग'चा प्रकार आहे. अर्थात महाराष्ट्रातील वाचक काही दुधखुळा नाही. आणि राजकारणी तर पक्के मुरलेले आहेत. अनेक राजकारणी सुशिक्षित आहेत. त्यांना आज उल्लू बनविले जाईल; पण उद्या ते या भंपक वृत्तपत्राला किंवा या वृत्तपत्राच्या भंपकपणाचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत.
 'पेड न्यूज' आता तशा सर्रास सर्वच छापतात. तो व्यवसायाचा भाग आहे. मंत्र तसे धंदेही करायचे आणि 'मी नाही त्यातली' असा आव आणायचा, असे काम 'बाहेरच्या बाजारबसव्या'च करू शकतात. यांनी सरळ-सरळ धंदा केला असता तर कुणाला काही वावगे वाटले नसते. मात्र, सती सावित्रीचा आव आणायचा आणि व्यवसायाच्या बाजारात 'छुपके-छुपके' पद्धतीने 'बारगर्ल'सारखा धंदा करायचा, ही कुठली पत्रकारितेतील नीतिमत्ता आणि पवित्रता आहे. जर हा फतवा भोपाळशेठचा नसेल तर मग खाली कोणीतरी गोल-माल करतेय!
आता या भोपाळशेठकडे काही राम उरलेला नाही. जसा डेप्युटी इंजिनीअर म्हणजे उप-अभियंता; डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हणजे उप-मुख्यमंत्री तसा डेप्युटी एडिटर म्हणजे कोण? - उप संपादक! मग 'सब'वाला उपसंपादक मोठा की 'डेप्युटी'वाला? असो! तर 'नो पेड न्यूज'वाले गावोगाव हिंडत आहेत. ऑफर आहे 'पेड पेज'ची. निवडणूक प्रकार काळात उमेदवाराचे कार्य एक पानभर 'एडिटोरिअल कंटेंट' म्हणून छापायचे. म्हणजे एक फुल पेज जाहिरात. रेट? ही जरा हाय-फाय, बाहेरची 'गर्ल' आहे; तिचा रेट आहे एक लाख!
एकावेळचे एक लाख म्हणजे वाचकांना उल्लू बनवून जाहिरात वाटणार नाही अशा पद्धतीने एका फुल पेजचे एक लाख! त्यावार फ्री काय - प्रचाराच्या बातम्या, चांगले-चांगले, गुडी-गुडी लिखाण! अरेच्या, ही पण तर 'बाजारबसवी'च निघाली की! च्या, आयला मग 'नो पेड न्यूज' म्हणत सती-सावित्री बनून हिंडते कशी कपाळावर पत्रकारितेच्या पावित्र्याचे कुंकू लावून? आता राजकारण्यांसमोर तिचा 'खरा धंदा' उघड होत आहे. तालुक्या-तालुक्याला 'डीलिंग' होत आहेत. 'नो पेड न्यूज' म्हणत-म्हणत ही 'नखरेल' नवी-नवेली रोजच्या पानाचा धंदा बुक करीत आहे. जिथे संस्था बुक करणार नाही तिथे कारभार हाती असलेले 'उप-संपादक' धंदा बुक करतील .... ऐश करेंगे; कैश करेंगे.... क्या करेंगे गंदा है; पण धंदा है! अरे, मूर्खानो, उद्या या राजकारण्यांसमोर कोणते तोंड घेवून जाणार? तुम्ही तुमची इज्जत तर एका लाखात विकून मोकळे होताय ना! त्यापेक्षा कशाला भंपक आव आणता ... सरळ सांगून 'धंदा' करा ना..

रविवार, १४ सप्टेंबर, २०१४

प्रहार मध्ये अनेकांची 'हार'

मुंबई - महेश म्हात्रेंनी खास दृष्टी मिळवून दिलेल्या  प्रहारमध्ये अनेकांची  हार  होऊ  लागली आहे. एकेकाळी कर्मचार्‍यांनी गच्च  भरलेले प्रहारचे कार्यालय मागील काही दिवसांपासून सुने..सुने भासू लागले आहे.
 राणेनी एकेकाळी मुंबईतील मिडीयात सर्वाधिक पगार आपल्या कर्मचार्‍यांना दिले. (आता पगार वेळेवर होत नाहीत, हा भाग वेगळा ) सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न केला. दक्षिण मुंबईतील परेल सारख्या महागड्या भागात अलिशान कॉर्पोरेट ऑफीस उभे केले. मुंबईतील अनेक मोठ्या पत्रकारांना प्रहारमध्ये आणले.  म्हापसेकर यांच्यासारखे जाणते कला आर्टिस्टही अगदी हसत..हसत प्रहारमध्ये दाखल झाले. त्यामुळे मुंबईच्या मिडीयात प्रहारचा वकूब काहीसा औरच होता. प्रहारमध्ये जॉब करतो ही मुंबईतील पत्रकारांसाठी अभिमानास्पद बाब होती, ते वैभव कर्मचार्‍यांवर अती विश्‍वास टाकल्यामुळे आता  काळवंडत चालले आहे.
 याबाबत छोटे मालक खुद्द नितेश  राणेनी लक्ष घालूनही कर्मचार्‍यांची गळती थांबायला तयार नाही.एका जोडगोळीच्या जाचाला कंटाळून अनेकांनी प्रहारला रामराम ठोकला तर अनेक जण सोडण्याच्या तयारीत आहेत. या दोन्ही जोडगोळीची दहशत इतकी सर्वदूर पसरली आहे की, आठवडाभर जाहीरात देवूनही कोणी प्रहारकडे फिरकेनासे झाले आहे. ( एकेकाळी जाहिरात प्रसिध्द होताच कार्यालयात रांगा लागत)  एक 'कर' तर अगदी खालच्या थराला जावून महिला कर्मचार्‍यांना अश्‍लिल भाषेत सुनावत असल्याने अनेकींनी थेट राजीनामा देवून दुसर्‍या वृत्तपत्राची वाट धरली. ( त्यामधील एक पोलीस स्टेशनची पायरी चढता चढता थांबली… ) दोन उपसंपादक आणि एका आर्टिस्टला तर काही न सांगताच काढून टाकले.
 झी चोवीस तास मधून हाकलण्या अगोदर तेथे गेलेल्या एका 'करा'ला धड एक कॉपी नीट लिहता येत नसताना त्याला न्यूज हेड बनवून व्यवस्थापनाने आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे.  हा कर प्रत्येकाशी सिंगल मिटींग घेवून कार्यालयातील जुन्या कर्मचार्‍यांना टार्गेट करतोय. आता राज्यातील विधानसभेच्या निवडणुका त्यात दैनिकाचा वर्धापन दिन ( 8 ऑक्टोबर) तोंडावर आलेला असताना ही अवस्था झाल्याने छोटे मालक तथा नितेश साहेबांचा पारा चांगलाच वाढला आहे, त्यांनी शुक्रवारी कार्यालयात येवून दोन म्होरक्यांची चांगलीच कानउघडणी केली. मागील वर्षी एकाने   सर्व कार्यालयीन यंत्रणा वापरून आपला खाजगी दिवाळी अंक येथेच बनवला होता आता या वर्षी असे प्रकार खपवून घेणार नाही असेही त्यांना छोट्या मालकांनी सुनावले. आता नवीन संपादक कोण येतात याकडे कर्मचार्यांना छळनाऱ्या त्रिकुटाचे लक्ष लागले आहे, ते आले की आपली खाट पडणार याची धास्ती त्यांना लागून राहिली आहे.

गुरुवार, ११ सप्टेंबर, २०१४

'जनशक्ति' दैनिकाच्या पुणे आवृत्तीसाठी हवे आहेत

'जनशक्ति' दैनिकाच्या पुणे आवृत्तीसाठी (आकुर्डी कार्यालयात) हवे आहेत - 

सहाय्यक संपादक, वृत्तसंपादक, मुख्य बातमीदार, मुख्य उपसंपादक, उपसंपादक, व्यवस्थापक, शहर बातमीदार, छायाचित्रकार, तालुका/ग्रामीण वार्ताहर, तसेच कार्यालयीन जाहिरात, वितरण विभागातील सर्व पदे व व्यवस्थापन/संपादकीय प्रशिक्षणार्थीं तसेच डीटीपी विभागातील सर्व पदे तातडीने भरावयाची आहेत. 
असिस्टंट एडिटर - 1
न्यूज एडिटर - 1 
पात्रता - कोणत्याही शाखेचा पदवीधर, वृत्तपत्रविद्या पदवी अथवा पदविका, वृत्तपत्रातील कामाचा 5 ते 8 वर्षांचा अनुभव, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व. संगणकाचे ज्ञान, शहरातील, प्रादेशिक पातळीवर राजकीय, सामाजिक घडामोडींचे विविध क्षेत्रातील ज्ञान आवश्यक, विश्‍लेषणाची क्षमता. शहरात दांडगा जनसंपर्क हवा.
चीफ सब-एडिटर -2
सब एडिटर - 6
पात्रता - कोणत्याही शाखेचा पदवीधर, वृत्तपत्रविद्या पदवी अथवा पदविका, वृत्तपत्रातील कामाचा किमान 3 ते 5 वर्षांचा अनुभव. मराठी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व. भाषांतर येणे आवश्यक, संगणकाचे ज्ञान, महाराष्ट्र तसेच देश पातळीवरील राजकीय, सामाजिक, घडोमीडींचे ज्ञान आवश्यक, विश्‍लेषणाची क्षमता.
मॅनेजर - 1
पात्रता - एमबीए, बीबीए, पदवीधर अथवा तत्सम पदवी अथवा पदविका आवश्यक, वृत्तपत्रांच्या जाहिरात मार्केटिंग क्षेत्रातील किमान 5 वर्षांचा अनुभव, उत्तम संभाषण कौशल्य, स्वतःची दुचाकी असणे आवश्यक. वितरणाचा अनुभव हवा.
मार्केटिंग एक्झीक्युटीव्ह - 4
पात्रता - 12 वी उत्तीर्ण अथवा पदवीधर, जाहिरात मार्केटिंग क्षेत्रातील किमान 3 ते 5 वर्षांचा अनुभव, उत्तम संभाषण कौशल्य, स्वतःची दुचाकी असणे आवश्यक. आऊटस्टॅडींग फ्रेशर्स अर्ज करू शकतात.
सिटी रिपोर्टर (पूर्णवेळ) 8
पात्रता - कोणत्याही शाखेचा पदवीधर, वृत्तपत्रविद्या पदवी अथवा पदविका असल्यास प्राधान्य, शहरात राहणारा असावा. उत्तम जनसंपर्क हवा.

तालुका प्रतिनिधी/वार्ताहर 
(गाव तेथे वार्ताहर नेमणे आहे)
पात्रता - दहावी, बारावी, पदवीधर असल्यास प्राधान्य. परिसरात उत्तम जनसंपर्क हवा.
इच्छुकांनी अर्ज, बायोडाटा, दोन फोटो खालील पत्त्यावर पाठवावेत अथवा ईमेल करावे. 30 सप्टेंबर 2014 पर्यंत आलेल्या अर्जांचाच विचार केला जाईल. व्यवस्थापन/पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनीही शिकावू म्हणून अर्ज करावेत.
संपर्क  ए, 228, जय गणेश व्हिजन, दुसरा मजला, आयनॉक्स मल्टिप्लेक्सजवळ, आकुर्डी, पुणे - 411035
फोन : 7767012222
          7767012223
फॅक्स  9595226930
इ-मेलvikrant@janashakti.in
वेबसाईट  - www.janshakti.co.in

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे मीडियावर नाराज


ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे मीडियावर नाराज आहेत.पत्रकारांना मूळ तत्वांचा विसर पडल्याचे ते म्हणतात.सध्या अर्धसत्य बातम्या दिल्या जातात,असे त्यांचे म्हणणे आहे.त्यामुळेच मी माध्यमांना मुलाखती देण्याचे टाळत असल्याचेही म्हटले आहे.
आण्णा हजारे यांनी याबाबत एक खास लेख लिहिला असून,तो आम्ही प्रसिध्द करीत आहोत.शनिवार, ६ सप्टेंबर, २०१४

सकाळने घेतला विरोधकांचा समाचार


सकाळच्या पुणे 'बस डे' आणि इतर उपक्रमाबाबत सोशल मीडियावर बदनामी सुरू होती.त्याची दखल बेरक्याने घेवून,सर्वप्रथम सकाळची बाजू मांडली.त्यानंतर सकाळनेही त्याचा समाचार घेतला असून,आजचा संपादकीयच त्यावर आहे. काय आहे, हा संपादकीय लेख तो वाचा...
............................................................................................................
हा भविष्यवेध समाजाच्या भल्यासाठी
धन्यवाद, आमच्या सगळ्या वाचकांना, सकाळच्या प्रत्येक उपक्रमात आपलं घरचं काम असल्यासारखं सक्रिय होणाऱ्या प्रत्येकाला, समाजबदलाच्या संघर्षात आपलं योगदान द्यायला पुढं आलेल्या सगळ्यांना! महाविद्यालयीन तरुणांच्या कल्पनांना वाव देणारा ‘हम मिलकर भारत बदलेंगे’ हा उपक्रम आज जाहीर होतो आहे. त्यालाही असाच प्रतिसाद मिळेल, याची खात्री आहेच.
‘सकाळ’च्या या समाजाभिमुख उपक्रमांच्या वाटचालीत चांगल्याला चांगलं म्हणून साथ देणारे भेटतात, तसं मूठभरच का असेनात नाकं मुरडणारे, खुसपटंं काढणारेही असतात. सगळी वृत्तपत्रं बातम्याच देतात. ‘सकाळ’ त्याशिवाय समाजबदलाचे उपक्रम सगळ्या शक्तीनिशी का राबवतो, हा शंकासुरांचा नेहमीचा प्रश्‍न आणि जोडही असते, आम्हाला बातम्या द्या हो... कधीतरी सांगायलाच हवं, ‘सकाळ’ हे सगळं का करतो. आमची भूमिका स्पष्ट आहे, काळ बदलतो तसं माध्यमं आणि त्यांचं कामही बदलायला हवं. काल काय घडलं हे समजायला हवंच; पण उद्या काय होईल आणि उद्या कसा हवा, यात माध्यमांनी सक्रिय राहायलाच हवं. आणि आमचे उपक्रम भरात असतानाही सर्वंकष बातम्यांचं भान कधीच सुटलं नाही.
पाणी असेल नाहीतर पुण्यातला बसेसचा मुद्दा; आम्ही लोकांना घेऊन रस्त्यावर उतरतो... कशासाठी? आमच्या मते हे माध्यमांचंही काम आहे. हाच आमचा वारसाही आहे. ‘सकाळ’ आला तोच वृत्तपत्रसृष्टीत नव्या युगाची द्वाही फिरवत. वेगळं, समाजाच्या भल्याचं जेव्हा जेव्हा आम्ही काही करतो तेव्हा स्थितिशील शंकेखोरांची टीका होते, हेही ‘सकाळ’च्या जन्मापासून घडत आहे.
‘सकाळ’ नाव लोकांना विचारून निवडलं त्यावर टीका झाली. पेपरचं नाव ठरवू न शकणारे पेपर काय चालवणार, असं म्हणणारे काळाच्या ओघात फेकले गेले. ‘सकाळ’ची घोडदौड सुरूच आहे. ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक नानासाहेब परुळेकरांनी कधीच असल्या प्रवृत्तीची फिकीर केली नाही. ‘सकाळ’च होता पहिल्यांदा बाजारभाव प्रसिद्ध करणारा, ‘सकाळ’नेच सुरू केली गावोगावी बातमीदार नेमून गावच्याही बित्तंबातम्या देण्याची प्रथा, मध्यपूर्व आणि युरोपातील राजकीय स्थितीवर प्रत्यक्ष फिरून सरकारला अभ्यासपूर्ण अहवाल देणारे नानासाहेब होते, साऱ्या जगातल्या घडामोडींची माहिती भाषेचा बडेजाव न मिरवता देणारा ‘सकाळ’च तर होता.असले कितीतरी पायंडे ‘सकाळ’नं पाडले, यासाठी ‘सकाळ’वर टीका करणारे, खिल्ली उडवणारे नंतर याच वाटेनं गेले.
थोडं इतिहासात डोकवायचं कारण एवढंच, की उद्याच्या समाजाला काय हवं, हे समजण्याची कुवत आणि त्यासाठी रूढ मार्ग सोडून पावलं टाकण्याचं धाडस सकाळ समूहाच्या डीएनएचाच भाग आहे, हे एकदा समजलं, की ‘सकाळ’ पुण्यात ‘बस डे’ का साजरा करतो, राज्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटावा म्हणून आटापिटा कशासाठी आणि महिलांना एकत्र करणारं तनिष्का व्यासपीठ किंवा आता महाविद्यालयीन तरुणाईच्या खळाळत्या ऊर्जेला वाव देणारं ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ कशासाठी उभं करतो, याची उत्तरं समजतात. आता ‘सकाळ’ला पाठिंबा मिळतो तो आमच्या कमावलेल्या, जोपासलेल्या विश्‍वासार्हतेमुळे, त्यामुळेही पोटदुखी झालेले कमी नाहीत. विश्‍वासार्हता अचानक मिळत नाही. विकत घेता येत नाही आणि टीका करून, बदनामीच्या मोहिमा चालवून संपवताही येत नाही.
‘सकाळ’ला मिळणाऱ्या प्रतिसादानं पित्तप्रकोप झालेले काही ही भडास सोशल मीडियाच्या सार्वजनिक घाटावर काढू लागले आहेत. या बिननावाच्या उठवळांची दखल घ्यायचं कारण नाही; पण यानिमित्तानं आमचा वारसा पुन्हा सांगायलाच हवा. ‘सकाळ’ला काय पडलं आहे समाजाच्या प्रश्‍नांचं, असं वाटणाऱ्यांच्या आठवणीसाठी... पुणं बदलायचं तर चांगले लोकप्रतिनिधी निवडून यायला हवेत म्हणून नागरी संघटनेच्या माध्यमातून नगरपालिकेसाठी उमेदवार ‘सकाळ’च्या पुढाकारानंच परुळेकरांनी दिले. त्यांच्यासाठी रकाने खर्ची घातले.
टीका तर तेव्हाही झाली. त्याला त्यांनी भीक घातली नाही. आजही रिकामटेकड्या आक्षेपांना, त्यांच्याआडनं पोळी भाजू पाहणाऱ्या; हात काळे झालेल्या स्पर्धकांना भीक घालायचे कारण नाही. मुद्दा हेतूच्या शुद्धतेचा तेव्हाही होता; आताही आहे. आमच्यासाठी तोच शास्त्रकाटा आहे. पारदर्शकता हा ‘सकाळ’च्या सगळ्या सामाजिक उपक्रमांतला ठळक धागा आहे. ‘सकाळ’च्या लोकप्रियतेनं पोटदुखी झालेल्या संशयात्म्यांसाठी काही उदाहरणं... पुण्यात ‘बस डे’ साजरा झाला त्या वेळी पुणेकरांनी दिलेल्या आर्थिक मदतीचा आणि झालेल्या खर्चाचा ताळेबंद प्रसिद्ध करणारा ‘सकाळ’च होता. आजवर कोणी असा उपक्रम घेऊन त्याचा आढावा दर महिन्याला दिला आहे? आम्ही ते उत्तरदायित्व मानले आणि ते निभावतो आहोत.
सकाळ रिलीफ फंड ५० वर्षे आपत्तीत अडकलेल्यांच्या मदतीला धावतो आहे, तसाच तो पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर कडा कोसळला तेव्हाही सक्रिय झाला. त्यात जमलेल्या देणग्यांतून त्या परिसरात लोकोपयोगी कामच होईल, यात ना देणगीदारांच्या मनात शंका आहे ना वाचकांच्या. तनिष्काच्या चळवळीत हजारो महिला स्वखुशीनं सहभागी झाल्या. आता या नेटवर्कचं कुतूहल राज्य आणि देशांच्या सीमा ओलांडून बाहेर पसरत आहे. ज्या जलदिंडीच्या अपूर्व यशानंतर रिकामटेकड्यांची कुजबूज मोहीम सुरू झाली त्यावर सांगायलाच हवं... राज्यातील घराघरांत जलसंपन्न महाराष्ट्राचा सांगावा या मोहिमेनं नेला. त्यानंच टाळकं सटकलेले त्यात जमा झालेल्या देणग्यांवर कुजबुजू लागले. होय, यात देणग्या घेतल्या. त्यातून पाणीप्रश्‍नावरच होणाऱ्या कामांचा तपशील नक्की जाहीर करू आणि देणग्या मागण्याआधी ‘सकाळ’नं २० कोटी रुपये याच प्रश्‍नासाठी दिलेत, याचं अप्रूप लोकांना आहे.
वृत्तपत्र हे आपल्याला ज्या प्रकारचा समाज भविष्यात हवा त्या दिशेनं वाटचाल करण्याचं साधन आहे, असं आम्ही मानतो. हा भविष्यवेध, उपक्रम आणि चळवळी चालवण्याची प्रेरणा समाजाच्या भल्याची आहे. यात साथ देत आलात त्याबद्दल धन्यवाद! प्रत्येक चांगल्या बाबींत संशय घेणारे सर्व काळांत असतात. असल्या खुसपटबहाद्दरांनी ना ज्ञानेश्‍वर माउलींना छळायचं सोडलं ना संतश्रेष्ठ तुकोबारायांना. रामायणात अग्निपरीक्षा द्यायला लावणाऱ्या प्रवृत्ती असल्याच होत्या. या संशयजंतूंमुळे ना ‘सकाळ’चं काम थांबलं ना प्रतिसाद कमी झाला.
खात्री बाळगा, समाजाच्या भल्याचं घेतलं व्रत टाकणार नाही, स्तुतीनं हुरळून जाणार नाही आणि शंकासुरांच्या करंटेपणानं नाउमेदही होणार नाही. ‘जर्नालिझम टू पॉझिटिव्ह ॲक्‍टिव्हिजम’ हे आम्हीच मांडलेलं सूत्र लोकांच्या साथीनं जगण्याचा प्रयत्न आहे. नव्या जमान्याची नवी क्षितिजं धुंडाळण्याच्या या प्रवासात सर्वांचं स्वागतच आहे!
esakal 

गुरुवार, ४ सप्टेंबर, २०१४

सकाळच्या बदनामीमागे कोणाचा 'हात' ?

सकाळला बदनाम करण्याचे काम सध्या प्रतिस्पर्धी दैनिकाकडून सुरू आहे.या दैनिकाच्या मालकाने सकाळला बदनाम करण्यासाठी एक टीमच तयार केली असून, सोशल मीडियावर एक पोस्ट फिरत आहे.या पोस्टमध्ये पुणे बस डे चा हिशोब तसेच अन्य उपक्रमाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
त्याला किरण कोल्हे यांनी उत्तर दिले आहे.ते असे...
.................................................................
सकाळला धन्यवाद

प्रश्न पाण्याचा असो नाहीतर पुण्यातल्या बसचा. सरकारनं करायला हवं ते काम सकाळ समाजासाठी करतो आहे आणि तेही लोकांना बरोबर घेऊन यासाठी सकाळविषयी कृतज्ञताच व्यक्त करायला हवी.
मी बस डे चा साक्षीदार आहे आणि पुढच्या घटनाक्रमाचाही...
सकाळने नुसता एक दिवस उपक्रम केला नाही दर महिन्याला आढावा दिला... अनेक मुद्दे सुटायला लागले काही अडले ते झारीतल्या शुक्राचार्यांमुळे... त्यांना सरळ करायचे तर समाजानेच पुढे व्हायला हवे... बस डे चा जमाखर्च पारदर्शपणे मांडला तो सकाळनेच...मला आठवते ती तारिख...
माळिण गावावर आपत्ती आली तेव्हा पहिल्यांदा मदतीचा हात पुढे केला सकाळनेच ...
रिलीफ फंडातून कित्येक कामे उभी राहिली आहेत...
तनिष्का नावाची एक चळवळच राज्यात उभी राहिली ती सकाळच्या परंपरेला साजेशीच आहे. तनिष्का सदस्यांनी स्वतःहून फी भरुन सहभाग घेतला त्यापलिकडं यासाठी कुणाकडून निधी गोळा केल्याचं एेकिवात नाही आता कंड्याच पिकवणारयांना किती महत्व द्यायचं.
सर्व जल अभियान तर एक वर्तमानपत्र काय करु शकते याचा आदर्श नमूनाच आहे. राज्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी सकाळने आधी पदरचे २० कोटी रुपये दिले नंतर लोकांकडे मदत मागितली आणि तिचा उपयोग पाण्यासाठीच होईल याची खात्रीच आहे. कारण तसा माझा अनुभव आहे...
समाजाच्या भल्यासाठी जागा, वेळ, पैसा, सारी साधनं देणारया सकाळला साथच द्यायाला हवी. खरंतर आपल्या भविष्याचा विचार करतानाही वर्तमानातल्या सगळ्या घडामोडी सकाळ देतोच...त्यातलं तर काहीच चुकत नाही...
म्हणूनच सकाळ वाचयचा मह्णजे समाज बदलायचा, आयुष्य घडवायचं पाहा, पटलं तर तुमच्या ग्रुपवर शेअर कराच...
किरण कोल्हे

फेसबुक वर शेअर करा

Facebook