> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

गुरुवार, २८ डिसेंबर, २०१७

25 स्ट्रींजर रिपोर्टरना नारळ

मुंबई - News 18 लोकमतने राज्यातील जवळपास 25 स्ट्रींजर रिपोर्टरना कॉस्ट कटिंगच्या नावाखाली नारळ दिल्यामुळे  संताप व्यक्त केला जात आहे.
IBN लोकमतचे नामकरण होवून आता कुठे एक महिना  होत आहे. त्यात मुख्य संपादक म्हणून डॉ. उदय निरगुडकर जॉईन झाले आहेत. चॅनलचा घसरलेला टीआरपी वर येईल, असे वाटत असताना, स्ट्रींजर रिपोर्टरचे जाळे खिळखिळे करण्यात आले आहे. पूर्वी 78 स्ट्रींजर रिपोर्टर होते,त्याची संख्या 60  वर आणण्यात आली होती. आता त्यातील २५ जणांना नारळ देण्यात आला आहे. गेल्या ८ ते १० वर्षापासून काम करणाऱ्या रिपोर्टरना नारळ देण्यात आल्यामुळे त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

मंगळवार, २६ डिसेंबर, २०१७

अखेर पत्रकारच धावलेत पत्रकाराच्या मदतीला !

नागपूर (विजय खवसे ) : पत्रकार किती संवेदनशील असतात याची प्रचीती नागपुरात दिसून आली. गंभीर जखमी झालेल्या एका जेष्ठ पत्रकाराला रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची हलाखीची आर्थिक परिस्थिती बघता नागपुरातील पत्रकारांना त्यांची कळवळ आली व धडपड करीत या पत्रकारांच्या चमूने मुख्यमंत्री निधीतून जखमी पत्रकाराच्या ऑपरेशन करिता मुख्यमंत्री मदत निधीतून ५०,०००/- (पन्नास हजार रुपये) चा धनादेश मिळवून देत माणुसकीचे दर्शन घडवून दिले.

सविस्तर वृत्त असे कि, हिवाळी अधिवेशन दरम्यान मोर्चाचे वृत्तसंकलन करीत असतांना एका दुचाकीस्वाराने उभे असलेल्या पत्रकाराला आकस्मिक धडक दिली आणि हे वरिष्ठ पत्रकार खाली कोसळले व त्यांच्या शरीराला गंभीर दुखापत झाली. लगेच त्यांना नागपुरातील लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना आयसीयुमध्ये ठेवण्यात आले. नंतर त्यांना डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात हलविण्यात आले.

अतुल शरारा असे त्या जखमी पत्रकाराचे नाव असून ते दैनिक देशोन्नति व राष्ट्रप्रकाश चे वार्ताहर आहेत. सोमवार दिनांक 18 डिसेंबर रोजी विधान भवन येथे वृत्त्तसंकलन करण्यासाठी अतुल शरारा येत असताना मॉरिस कॉलेज टी पॉइंट येथे दुचाकी ने त्यांचा अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाले. डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात ते सध्या भरती आहेत. त्यांची घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना एक मुलगी व मुलगा असून पत्नीचे निधन झाले आहे. अशात घरचा भार अतुल शरारा हेच सांभाळतात. अपघात झाला तेव्हा त्यांच्या बँक खात्यात फक्त ५००/- रुपये असल्याचे समजले. अश्यातच डॉक्टरांनी त्यांच्या पायाचे ऑपरेशन सांगितले. ही घटना पत्रकार भीमराव लोनारे, पत्रकार जितेंद्र धाबर्डे व इतर पत्रकार मित्रांना कळताच त्यांचे हृदय पाझरले. संकटात असलेल्या शरारा यांच्या मदतीला पत्रकारांची ही चमू धाऊन आली. लगेच धावपळ करीत त्यांनी हैद्राबाद हाउस येथील मुख्यमंत्री कार्यालयाकडे धाव घेतली. सर्व पत्रकार विधानभवनात कर्तव्यावर होते. विधानभवन ते हैद्राबाद हाउस येथपर्यंत पायी प्रवास करीत त्यांनी हैद्राबाद हाउस येथील मुख्यमंत्री कार्यालय गाठले. त्यांनी स्वत: स्वाक्षरी केलेले निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री फड़नवीस यांनी देखील मुख्यमंत्री आर्थिक सहायता निधितुन 50 हजार रूपयाचा या नावाने असलेला धनादेश भीमराव लोणारे व जितेंद्र धाबर्डे यांच्या स्वाधीन केला. पत्रकार विजय तायड़े, जानकिराम वानखेडे, अनिल शेंडे, सुभाष गोडघाटे, विकास विष्णुकांत बनसोड,परेश जाटवे ईत्यादी पत्रकार बांधव देखील त्यांच्या सोबतीला होतेच.
हा धनादेश घेऊन ही टीम डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात गेली. जखमी असलेले पत्रकार अतुल शरारा यावेळी रुग्णालयातील बेडवर चिंतामग्न अवस्थेत होते. ऑपरेशन करिता लागणारी मोठी रक्कम कुठून आणायची जणू याच चिंतेत ते असावेत! अशातच पत्रकार भीमराव लोनारे, पत्रकार जितेंद्र धाबर्डे, पत्रकार विजय तायड़े, जानकिराम वानखेडे, अनिल शेंडे, सुभाष गोडघाटे, विकास विष्णुकांत बनसोड,परेश जाटवे ईत्यादी त्यांच्या समोर येऊन उभे झालेत. तब्येतीची विचारपूस केल्यानंतर पत्रकार भीमराव लोनारे यांनी "मुख्यमंत्री मदत निधीतून ५०,०००/- रुपयांचा धनादेश घेऊन आल्याचे" सांगताच अतुल शरारा यांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रूंच्या धारा वाहू लागल्यात. मिळालेल्या मदतीने शरारा यांनी सर्वांचे आभार मानले. पत्रकार भीमराव लोणारे यांनी डॉक्टरांसोबत सविस्तर फोनवर बोलणे केले. आम्ही ऑपरेशनची तयारी करतो असे डॉक्टर म्हणाले. नंतर सर्वांनी हा धनादेश पत्रकार अतुल शरारा यांच्या स्वाधीन केला. "तब्येतीची काळजी घ्या..." असे म्हणत सर्वजन नागपूरकडे रवाना झाले. याप्रकारे पत्रकारांनी संकटात सापडलेल्या आपल्या पत्रकार बांधवाला मदत करून मानवतेचे दर्शन घडवून दिले.

'दबंग दुनिया'च्या संपादकपदी उन्मेष गुजराथी

मुंबई - ज्येष्ठ पत्रकार उन्मेष गुजराथी दैनिक 'दबंग दुनिया'मध्ये निवासी संपादकपदी रुजू झाले आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे दैनिकात अमुलाग्र बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

उन्मेष गुजराथी सन २००० पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. एशियन इजमधून श्रीगणेशा केल्यानंतर त्यांनी डे व्ह्यू, द फ्री प्रेस जर्नल आदी इंग्रजी वृत्तपत्रांबरोबरच लोकमत, पुढारी, सामना इत्यादी आघाडीच्या मराठी वृत्तपत्रांतून स्वतःचा ठसा उमटवला. लालबागचा राजा गणेश मंडळातील भ्रष्टाचार, समृद्धी जीवनचा महाघोटाळा, मुंबई विद्यापीठातील अनेक गैरप्रकार त्यांनी उघडकीस आणले. केवळ भांडाफोडीवर न थांबता, सातत्याने पाठपुरावा करून संबंधित यंत्रणेला कारवाई करण्यास भाग पाडले. सरकारच्या कारभारावर लेखणीचे फटकारे मारण्यातही त्यांनी कधी संकोच केला नाही. 

निवासी संपादक या नात्याने उन्मेष गुजराथी यांच्याकडे मुंबई आवृत्तीची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. मराठी आणि इंग्रजी बरोबरच आता हिंदी माध्यमात त्यांचे पदार्पण चर्चेचा विषय आहे. बहुश्रुत व्यक्तिमत्त्व आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे दबंग दुनियाच्या टीममध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 


शुक्रवार, १५ डिसेंबर, २०१७

वृत्तपत्र विक्रेत्याच्या अत्यावश्यक सेवेत समावेश करा

नागपूर -  वृत्तपत्र विक्रेत्याची स्थिती आजही असंघटीत कामगारासारखी असून वृत्तपत्र जनमानसात  पोहोचविणारी व वृत्तपत्राची प्रतिष्ठा वाढविणारी हि सेवा आजही शासन दरबारी उपेक्षित असल्याने या सेवेची जोरदार मागणी आमदार संजय केळकर यांनी आज औचित्याच्या मुद्याद्वारे विधान सभेत केली.

आज विधान सभेत आमदार संजय केळकर यांनी वृत्तपत्र विक्रेत्याच्या समस्या व मागण्या शासना समोर मांडल्या वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्याची प्रतिष्ठा राखण्याचे काम वृत्तपत्र विक्रेते करीत असतात. परंतु त्याचेवर महापालिका क्षेत्रात अनधिकृत  फेरीवाल्यासारखी कारवाही केली जाते. सदरचा व्यवसाय हा वर्षानुवर्ष करीत असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना अशा कारवाइतून वगळून त्यांना पालिका क्षेत्रात कायम स्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच वृत्तपत्र विक्रेत्याचे कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्या द्वारे शासनाच्या विविध योजनाचा उदा. घरे, स्टॉल परवाना आधीचा लाभ द्यावा त्यासाठी शासनाने तातडीने धोरनात्मक निर्यण घ्यावा अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी यावेळी केली.

मंगळवार, १२ डिसेंबर, २०१७

डॉ.उदय निरगुडकर News 18 लोकमतमध्ये जॉईन

मुंबई - बेरक्याचे भाकीत नेहमीप्रमाणे खरे ठरले आहे. डॉ. उदय निरगुडकर अखेर News 18 लोकमतमध्ये  मुख्य संपादक तथा ग्रुप एडिटर म्हणून आज जॉइन झाले आहेत. ते आल्यामुळे हे चॅनल नंबर 1च्या  स्पर्धेत येणार का ? हे आता काळच ठरवेल.
झी 24 तासला  नेहमी  नंबर 1आणणाऱ्या डॉ. उदय निरगुडकर यांना 31 ऑक्टोबर रोजी तडकाफडकी राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ते News 18 लोकमतमध्ये जाणार, असे भाकीत बेरक्याने वर्तविले होते. त्यानंतर ९ डिसेंबर रोजी   डॉ उदय निरगुडकर News 18 लोकमत'च्या वाटेवर  हे वृत्त दिले होते.हे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.
पत्रकारितेचा कसलाही अनुभव नसताना, डॉ. उदय निरगुडकर झी 24 तास मध्ये संपादक म्हणून जॉईन झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या,पण त्याच निरगुडकर यांनी झी 24  तासला नंबर 1 मध्ये आणताच अनेकांनी तोंडात बोटे घातली होती. आता नंबर चारवर गेलेले News 18 लोकमत नंबर 1 वर आणण्यासाठी निरगुडकर यांच्यासमोर मोठे आव्हान असेल.
डॉ. निरगुडकर मुख्य संपादक तथा ग्रुप एडिटर म्हणून जॉईन झाले आहेत. ते चॅनलचे संपादक प्रसाद काथे आणि वेबचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांचे हेड असतील.

सगळ्यांनी रिजेक्ट केलेले पुन्हा सामनात

मुंबई - काही वर्षां पुर्वी सामना सोडून गेलेले दोन सामना वीर पुन्हा सामना त परतले आहेत. विशेष म्हणजे या दोघांनाही सगळ्यांनी रिजेक्ट केले आणि पुन्हा सामना ने त्यांना पदरात घेतले आहे. 
 यातील एकाने प्रथम सकाळ मध्ये जाऊन पाहिले. पण तीथे चुरीदारपणा चालला नाही. पण वशिला लावला आणि मटा मध्ये उडी मारली. तीथे महापालिका आणि मंत्रालय बीट ची जबाबदारी देण्यात आली पणा पालिकेतील दुकानदारी उघड झाली तर मंत्रालयात काहीच जमेना म्हणून हेल्थ बीट च्या काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. ती भोगून आता  हा दादरचा शिलेदार सामनात परतला आहे. 
दुसऱ्या ची कहाणी तर मजेशीरच आहे. मटा मध्ये स्पोर्टस् बीट करणार्‍या या कोकणी माणसाला आपल्याला राजकीय चांगले कळते असा गर्व झाला आणि थेट राजकीय बातमीदारी मिळवली आणि सामना ते दिव्य मराठी असा दिव्य प्रवास केला.पण आडात नाही तर परबात कुठून येणार... प्रेसरूम मधे बसून काॅपी पेस्ट बातमीदारी करून आपला उदरनिर्वाह करणार्‍या या कोकण विराला काॅस्टकटींगचा फटका बसला. अशा प्रकारे बेरोजगार झालेल्या आणि रिजेक्टेट केलेल्या या दोघांना अखेर सामना ने पदरात घातले आहे. कारण सामना लाही चांगली माणसे मिळत नाहीत त्यामुळे ते तरी काय करणार ?

शनिवार, ९ डिसेंबर, २०१७

डॉ उदय निरगुडकर ' News 18 लोकमत'च्या वाटेवर

मुंबई - झी 24 तासमधून तडकाफडकी राजीनामा देवून बाहेर पडलेले डॉ. उदय निरगुडकर News 18 लोकमत च्या वाटेवर आहेत. ते पुढील आठवड्यात मुख्य संपादक म्हणून जॉईन होणार असल्याची माहिती बेरक्याच्या हाती आली आहे.
भाजप सरकरला तीन वर्ष पूर्ण झाली आणि त्याच दिवशी डॉ. उदय निरगुडकर यांची झी २४ तास मध्ये विकेट पडली होती. ३१ ऑक्टोबर रोजी झी 24 मधून बाहेर पडलेले डॉ.निरगुडकर News 18 लोकमत मध्ये जातील,असा  अंदाज बेरक्याने त्याचवेळी वर्तविला होता. अखेर तसेच घडतंय.
डॉ. उदय निरगुडकर मुख्य संपादक म्हणून जॉईन होताच, संपादक प्रसाद काथे यांचे अधिकार कमी करण्यात येतील, असा अंदाज आहे. त्याचबरोबर रात्री ८ वाजता होणारा डिबेट शो डॉ निरगुडकर स्वतः करतील. त्यामुळे प्रसाद काथे आणि राजेंद्र हुंजे अस्वस्थ झाले आहेत.
News 18 लोकमत चा TRP प्रचंड घसरला आहे. तो 11 टक्क्यावर आला आहे. क्रमांक चारवर हे चॅनल  गेले आहे. सर्व यंत्रणा असताना चॅनेल चारवर गेल्याने कंपनीने डॉ. उदय निरगुडकर यांना मुख्य संपादक म्हणून घेतले आहे. मात्र यामुळे जुनी टीम अस्वस्थ झाली आहे.

शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

महाराष्ट्रनामा...

नाशिक - गावकरीचे वंदन पोतनीस यांचे पाय आणखी मातीत
फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल...
दोघा बंधूंना अटक...
वंदन पोतनीस फरार

.....

तुषार शेटे यांचा टीव्ही ९ ला रामराम
मुंबई- टीव्ही ९ ला गळती सुरूच आहे. गेल्या ९ वर्षांपासून कार्यरत असलेल्या तुषार शेटे यांनी टीव्ही ९ ला रामराम ठोकला आहे. शेटे टीव्ही ९ मध्ये प्रिंसिपल करस्पॉडन्ट होते. ते लवकरच जय महाराष्ट्र मध्ये न्यूज एडिटर म्हणून जॉईन होणार असून, त्यांच्याकडे इनपुट हेडची जबाबदारी दिली जाणार असल्याचे समजते.अवघ्या 32 व्या वर्षी वृत्त संपादक आणि  इनपुट हेड बनण्याचा मान शेटे यांनी मिळविला आहे.

 ......

मुंबई - 'एग्रोवर्ल्ड पब्लिकेशन'च्या पशुसंवर्धन विषयक पुस्तकांचे (फायदेशीर दुग्धव्यवसाय, व्यावसायिक शेळीपालन, व्यावसायिक कुक्कुटपालन) गुरुवारी, मंत्रालयातील कार्यालयात प्रकाशन करतांना राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा पाटील, 'एग्रोवर्ल्ड'चे संपादक शैलेंद्र चव्हाण. जितेंद्र पाटील यांनी ही पुस्तके संकलित केली आहेत.


मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

तरुण भारतमध्ये 'जाणता राजा'ची जबरदस्तीने तिकिट विक्री

बेळगावच्या तरुण भारतमध्ये कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने 'जाणता राजा' या नाटकाची तिकिटे विक्रीस भाग पाडण्यात येत आहे. हे नाटक पेपरच्या तरुण भारत ट्रस्टकडून आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येक कर्मचार्याने किमान एक हजाराची तिकीट विक्री करावी असा फतवा सीईओ दीपक प्रभू यांनी काढलाय. नाटकाच्या तिकिटांची विक्री न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या गळ्यात मारण्यात येत आहेत. मात्र कर्मचाऱ्यांत नाराजी आहे. स्थायिकांना तिकीट विक्री करणे सोपे आहे, मात्र बाहेरच्यांना हे अवघड आहे. पगारवाढ करताना मात्र महागाई असल्याचे कारण सांगत आहेत. गेल्या एका वर्षांपासून होणारी पगारवाढ अजूनही रखडलीय. मालक किरण ठाकुर पेपरवर लक्ष देण्याऐवजी लोकमान्य या आपल्या बँकेचा विस्तार करत आहे, तर मुलगा प्रसाद ठाकुर नेहमी विदेशात असतो. पेपरमध्ये कोणाचेही लक्ष्य नसल्याने कर्मचारी कंपनी सोडून जात आहेत. प्रभू यांनी सर्व अधिकार आपल्याकडे ठेवलेत. संपादक जयवंत मंत्री यांच्यावर भर मीटिंगमध्ये रागाने बोलत अपमान केला जातो. 

 

सागर वैद्य याचा एबीपी माझाला रामराम

नाशिक - बिबट्याच्या राजकारणाला कंटाळून 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एपीबी माझातून अजून एक मेहनती रिपोर्टर बाहेर पडणार आहे. त्याचे नाव सागर वैद्य आहे . तो दिल्लीला News 18 lokmat जॉईन करतोय. एपीबी माझातील चांडाळ चौकडीच्या राजकारणाने अनेक जण बाहेरच्या वृत्तवाहिनीत जागा शोधत आहेत. प्रामाणिक काम करणाऱ्याचे मानसिक छळ केला जातोय.रिकामटेकडे लाखभर पगार घेवून टाईमपास करत असल्याने या वाहिनीत अस्वस्थता पसरली आहे.

..असा होता टीव्ही ९ मराठीचा राजीनामा!

टीव्ही ९ मध्ये कर्मचाऱ्यांची कशी पिळवणूक केली जाते, याचे नवनवीन किस्से बाहेर येत आहेत. यावर नुकताच राजीनामा दिलेल्या सिद्धेश सावंतने बरंच काही लिहिलंय ... नक्की वाचा... 
.........................

 अमोल मोरे नावाचा एक मित्र टीव्ही ९ मध्ये भेटला. मध्यंतरी त्याचा फोन आला. नंबर सेव नव्हता म्हणून ओळखलं नाही. उशिरानं ट्यूब पेटली. अमोल मूळचा कोकणातला. मी ही कोकणातलाच. त्यामुळे लगेच आपुलकी निर्माण होतेच. हल्लीचीच गोष्ट. मी जॉईन झालो होतो नुकताच टीव्ही ९ मराठीला. आणि अमोल सोडून चालला होता चॅनेल. अमोल आता गावी असतो. लांजा-राजापूर जवळ त्याचं गावंय.

मला वाटलं चांगली संधी मिळाली म्हणून अमोल टीव्ही ९ सोडून जात असावा. पण तसं नव्हतं. अमोल कंटाळला होता. वैतागलेला. गावी जाऊन शेती करायचं अमोलनं मनाशी पक्क केलं. अमोल गावी गेलाय. मी जेव्हा टीव्ही९ मराठी सोडलं. तेव्हा त्यानं फोन केला. फोनवर बोलणं झालं. त्यावरना तो समाधानी वाटत होता. दोन पैसे कमी कमवेन. पण कटकटीचं आयुष्य नको रे बाबा, असं अमोल सोडून जाताना बोल्ला होता, ते डोक्यात एकदम घट्ट बसलं होतं. असा धाडसी निर्णय घेणारे अमोलसारखे फार कमी जण उरलेत माध्यमांत काम करणारे. अमोलच्या हिमतीला सलाम.

महिन्याभरापूर्वी मी ही टीव्ही ९ सोडलं. माझी कारणं वेगळी होती. टीव्ही ९ मध्ये मी २०१३ सालीही काम केलं होतं. तिथे काय माहौल आहे, टेक्नीकली चॅनल किती कमजोर आहे, आणि काम करण्यासाठी लागणारं वातावरण पूरक कसं नाहीये, हे सगळं मी जाणून होतो. तरीही गेलो. खाज म्हणा किंवा नवीन काहीतरी करुन बघण्याची इर्षा म्हणा, मला टीव्ही ९ मध्ये जावंस वाटत होतो म्हणून गेलो. योग्य अयोग्य, चूक बरोबर असा कोणताही विचार न करता, मनाला जे वाटलं ते केलं. त्याचा पश्चाताप आजही जाणवत नाहीच. उद्या जाणवेल, याचीही आशा थोडी विरळच.

टीव्ही ९ चार-पाच वर्षांपूर्वी जसं होतं, तसंच ते आजही आहेच. हे असलं सातत्य राखायला केवढी मेहनत घेतली असेल तिथल्या वरिष्ठांनी, हॅट्स ऑफ. गेल्या काळात तिथले अनेक वरिष्ठ चॅनेल सोडून गेलेत. उमेश कुमावत संपादक म्हणून आले. पण फार काळ तिथे थांबले नाहीत. अनेक वर्षांपासून असलेले अभिजीत कांबळे हे टीव्ही ९ मधलं मोठं नावं. टॅक्नीकली स्ट्रॉँग, सेन्सिबल आणि अपडेटेट असे अभिजीत सरही चॅनेल सोडून गेले. इनपुटच्या प्रीती सोनपुराही चॅनेल सोडून गेल्यात. निलेश खरेदेखील गेले. प्रमोद चुंचूवार गेले. माझ्यासारखी चिल्लर आणि छोटीमोठी प्रोड्यूसर लोकही येत-जात राहिले. मध्यंतरी असंही कानावर आलं की परमेश्वर गडदे नावाच्या एका आउटपूटमधल्या मित्राला राजीनामा द्यायला लावला. खरंखोटं टीव्ही९चा एचआर जाणो. असंही ऐकून आहे की, गजानन कदम नावाच्या माणसाचं ऐकण्यासाठी काहींना ताकीदही देण्यात आली.

टीव्ही ९ चे आधीचे संपादक रेड्डी सर होते. ते ही गेले. मोठमोठी अनेक माणसं गेली. खरंतर टीव्ही९ हे चॅनेल मराठी. पण त्यांचा संपादक कधीच मराठी नव्हता. निलेश खरे, उमेश कुमावत ही मराठी कोळून प्यायलेली माणसं होती. पण त्यांना फार काळ तिथं टिकता येणार नाही, असं वातावरणच तयार करण्यात आलं. विनोद कापरी सध्या तिथं सल्लागार संपादक आहेत. पण त्यांनाही मराठी कळत नाही. विनोद कापरी टीव्हीतला मोठा माणूस. पण ज्या भाषेचं चॅनेल आहे, ती भाषा संपादकाला कळलीच पाहिजे, असा काहीही नियम नसतो, हे मला टीव्ही९ मध्ये आल्यानंतर कळलं. ही टीव्ही९ची परंपराच आहे, असं म्हणायलाही वाव आहे. शमीत सिन्हा नावाचे मोठे हिन्दीतले पत्रकार तिथे आहेत. ते तिथे काय करतात, हे टीव्ही९ मध्ये काम करणाऱ्या कुणालाही किंवा खुद्द शमीत सरांनाही विचारायला हरकत नाही.

हे एवढं सगळं उघड-नागडं लिहीण्यामागे कारण आहे. माध्यमांमध्ये काम करणा-या अनेक प्रस्थापित लोकांनी एकतर लगेचच नोक-या सोडल्या पाहिजेत किंवा त्यांना काढून तरी टाकलं पाहिजे. खूप जुन्या काळापासून टीव्हीत काम करतो आहोत, या एका कारणामुळे मराठी वृत्तवाहिन्यांचं ८०पेक्षा जास्त टक्के नुकसान झालेलं आहे. या ८० टक्के लोकांनी मराठी वृत्त वाहिनीत काम करणं सोडलं, तर फार बरं होईल. तसं झालं तर वृत्तवाहिन्यांचच भलं होईल. अर्थात हे निव्वळ माझं मत आहे. या माझ्या मतावरुन तुम्ही मला हव्या तेवढ्या शिव्या घालू शकता. त्या मी आवडीनं पचवीन.

माध्यमं बदलताएत. बदलत्या माध्यमांत काम करण्याची पद्धत बदलली नाही, तर कसं चालेल?

असो, अमोलसारखा निर्णय घेण्याची ताकद आणि मानसिकता देव या सगळ्या प्रस्थापितांना देवो.
टीव्ही९ मध्ये खूप छान माणसं काम करतात. या छान माणसांनी आपलं छानपण सोडून दिलं, तर हे चॅनेल आपली विश्वासार्हता परत मिळवू शकेल, असा मला विश्वास नाही तर खात्री आहे.

बाकी घर काय सगळ्यांनाच चालवायचं असतं, बिलं सगळ्यांनाच भरायची असतात. पण मूल्यांशी तडजोड करुन बिलं भरायची की मूल्यांशी प्रामाणिक राहून समाधानी आयुष्य जगायचं, एवढाच प्रश्नंय.

तसं आपण कधीच आपले राजीनामे सार्वजनिक करत नाही. मी तर आतापर्यंत ब-याच नोकऱ्या केल्या. सोडल्या. त्यावेळी मी इतका मोठा राजीनामा कधीच लिहीला नव्हता. चार ओळींपलिकडे कधी मी राजीनामा लिहीलाच नसेन. पण टीव्ही९ ला दुसरा राजीनामा लिहीत असताना खूप छान वाटत होतं. मनापासून असं वाटलं की तो राजीनामा वाचला गेला पाहिजे, म्हणून हा खटाटोप.

राजीनामा मराठीत लिहीला होता. पण सल्लागार संपादक आणि एचआर दोघांनाही मराठी कळत नाही. त्यामुळे अॅड एजेन्सीमधला माझा कॉपी राईटर मित्र प्रतिक, कॉलेजमधली मैत्रिण पूर्वा आणि फेसबूक फ्रेन्ड विशाल यांनी तो इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करुन दिला. या तिघांनीही राजीनामा वाचून मनापासून दाद दिली आणि शिव्याही घातल्या होत्या. मज्जा आली होती. लिहीणाऱ्याला अजून काय हवं असतं.

राजीनामा पुढे कॉपी पेस्ट..


आदरणीय,

सांगायला फारसा आनंद होत नसला तरी अतिव दुःखदेखील होत नाहीये. हा मेल लिहीताना एका मोठ्या ताणातून मुक्त होत असल्याची भावना आता माझ्या मनात आहे. माफ करा, पण उद्यापासून म्हणजे १० नोव्हेंबरपासून मी ऑफिसला येणार नाहीये. हा माझा राजीनामा समजावा, आणि तो स्वीकारावा, ही कळकळीची विनंती. मला यापेक्षा जास्त चांगली संधी मिळाल्यानं मी नोकरी सोडतोय. पण नोकरी सोडण्याचं कारण फक्त चांगली संधी नाही आहे. तर बरंच काही आहे.

गेल्या दोन पेक्षा जास्त आठवड्यांपासून मी एकटा एका विनोदी शो वर काम करतोय. ऐनवेळी टाकलेली जबाबदारी एक आव्हान म्हणून मी स्वीकारली. पण नंतर त्या जबाबदारीचं ओझं माझ्यावर लादलं जातंय की काय, अशी शंका मला वाटू लागली. स्क्रीप्ट, शूट, कॉस्ट्यूम, लोकेशन, दिग्दर्शन, जुने कॉमेडी शो आरकाईव्ह करणं, लेखकांकडून वेळेत स्क्रीप्ट मागवून घेणं, प्रॉडक्शनवाल्या गणेशच्या प्रत्येक टुकार प्रश्नांना उत्तरं देणं, अभिनेत्यांना भेटणं, त्यांच्या रिहर्सल करणं, स्क्रिप्ट हिंन्दीमध्ये समजावून सांगणं, लेखकांसोबत मीटिंगा करणं, हे सगळं कोऑरडिनेशन निव्वळ मी एकटा करत होतो. कोऑरडीनेशन करण्यासाठी मी पत्रकारीता शिकलो नाही. गेले काही दिवस मी करत असलेल्या कामाचा पत्रकारीशी संबंध आहे का, हा प्रश्न मला गेले काही दिवस सतावतोय. याचा ताण म्हणा किंवा मग वैताग, आता माझा निर्णय झालाय. मी थांबतोय.

मी सांगितलेला माणूस मला मदतीसाठी दिला गेला नाही. एक शो काढणं आणि तो ही विनोदी, हे काही हसण्याइतकं सोप्प तर नक्कीच नाही, हे तरी तुम्हाला पटलं असेलच ना. इतकंच काय तर या शो चं बजेट काढणंदेखील मीच केल. पत्रकारीतेचा आणि या सगळ्या कामांचा काही संबंध आहे, असं मला तरी वाटत नाही. राहता राहिला प्रश्न लिहीण्याचा, तर मी स्वतःही स्क्रिप्ट लिहीलं आणि नको त्या जबाबदारींतून मला मुक्त करण्याची मागणीही केली. पण त्यावरही मला काही ठोस उपाय कुणी केल्याचं जाणवलं नाही. माफ करा, पण इतकं सगळं काम पोटतिडकीनं करुनही माझा पगारही वेळेत आला नाही. तो न येण्यामागे तांत्रिक कारणं नक्कीच असतील. ती कारणं मला मान्यही आहेत. पण त्या तांत्रिक अडचणींतून मार्ग काढण्यासाठी पाठपुरावाही मलाच करावा लागला. त्याचा जो मनस्ताप भोगावा लागला, त्याची किंमत तुम्ही करु शकाल का ? आशा करतो की या महिन्यात जे काही थोडे दिवस मी काम केलं, त्या कामाचा आर्थिक मोबदला किमान वेळेत मिळेल.

मला खात्री आहे, तुम्हाला माझ्यापेक्षा चांगला प्रोड्यूसर कॉमेडी शो साठी मिळेल. कुणामुळे कधी कुणाचं काही अडत नाही हे तर तुम्हाला माहित आहेच. त्यामुळे माझ्याशिवायही टीव्ही९ मराठी गगनभरारी घेईल, याचा मला विश्वास वाटतो. कृपा करुन मला थांबवण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न करु नका. पगार झालेला नसतानाही मी मनापासून या शो साठी धडपडलो. पण अहमदनगरहून आलेल्या छोट्या घनश्यामच्या कुटुंबियांना देण्यात आलेली वागणूक पाहिली आणि काळजाचे तुकडे झाले.

मराठी माणसाच्या हक्काचा नारा देणा-या चॅनेलची चॅनेलमध्ये जीव ओतून काम करणा-यांचं कौतुक करावं अशी अपेक्षा नाही. पण किमान माणसाला समजून घ्यायचा तुम्ही मनापासून प्रयत्न कराल, अशी मी आशा बाळगतो.

मला संधी दिलीत, त्याबद्दल मी तुमचा कायम ऋणी राहिन. टीव्ही ९ मध्ये काम करण्याचा अनुभव अफलातून आहे. हे दिवस माझ्या कायम लक्षात राहतील. तुम्ही सगळे खूप थोर आणि हुशार आहात. तुमच्याकडून मी खूप काही शिकलो. अशावेळी नेहमी आपण काय करायचं हे शिकतो. यावेळी मी काय करायचं नाही, हे शिकलो. त्याबद्दलही तुम्हा सगळ्यांचे पुनश्च मनापासून शतशः आभार.

विश यू लव लक एन्ड सकसेस…

गुड बाय

तुमचा,
सिद्धेश

Siddhesh Sawant 

सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

टीव्ही 9 मध्ये कर्मचाऱ्यांची शिफ्ट लावताना भेदाभेद


मुंबई - टीव्ही 9 मधल्या प्रशांत विधाटे या कर्मचा-याचं काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं. प्रशांतला तीन दिवसांपासून त्रास होत होता. पण ऑफिसमध्ये शिफ्ट लावणा-या माणसाने त्याला सुट्टी दिली नाही. उपचाराला वेळ मिळाला नाही आणि कामाच्या ताणामुळे विधाटेचं निधन झालं. हे त्याचा मृत्यूचं खरं कारण होतं, असे सांगितलं जात आहे.
शिफ्ट लावणा-या माणसाची बदनामी होवू नये यासाठी ही बाब लपवली गेली. मात्र त्या नंतरही शिफ्ट लावलेला माणूस सुधारला नाही. उलट त्याचा ताप वाढत चालला आहे, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
आजारी असलेल्या माणसांना ऑफीसमध्ये बोलावणे, आजारी व्यक्ती घरी आराम करत असेल तर त्याला वारंवारपणे फोन करून त्रास देणे या प्रकाराला कंटाळून आतापर्यंत अनेकांनी टीव्ही 9 सोडलं आहे. पण हा  माणूस त्याच्या जवळच्या ठराविक लोकांना 7-7 दिवसांच्या सलग सुट्ट्या देतो. पण डेस्कवरील इतर कर्मचारी आणि फ्लोअरवरील कर्मचारी यांची अडवणूक करतो. या  माणसाला शिफ्टही सांभाळता येत नाही. हा माणूस  कशाला पोसला असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. हा  माणूस इतर सिनीअर्सची नाईट लावतो. पण स्वतहा कधी नाईट करत नाही. या  व्यक्ती बरोबर डे शिफ्टच काय तर नाईट शिफ्टमध्येही काम करायला कोणी तयार नसतं.

नियमानुसार नाईट शिफ्ट ही पाच दिवसांची असते. पण या  माणसाने ती सहा दिवसांची केली आहे. सर्वच शिफ्ट ह्या नऊ तासांच्या केल्या आहेत. नऊ तासांची शिफ्ट असेल तर फाईव्ह डेज वीक असतो. पण हा नियमही गुंडाळला आहे. जगात झालेल्या अन्यायाच्य बातम्या दाखवणा-या चॅनेलमध्येच अन्याय सुरू आहे.

कॅन्टीनमध्ये जेवण करणा-या कर्मचा-यांमागे हा माणूस पळत जातो, आणि काम सांगत बसतो. कोणाही खरं वाटणार नाही, पण कोणी महिला कर्मचारी जर टॉयलेटला गेली तर बाहेरून आवाज देण्याचा नालायकपणाही हा माणूस करतो. या असल्या घाणेरड्या प्रकारांमुळे इतर चॅनेलमधून टीव्ही 9 मध्ये कोणी येत नाही. आणि कोणी आलं तरी टिकत नाही. जो पर्यंत शिफ्ट लावणारी व्यक्ती काढली जात नाही किंवा त्याचं काम बदललं जात नाही तो पर्यंत टीव्ही 9ची दुर्दशा कायम राहणार आहे.
  या वृत्ताची मुंबई मराठी पत्रकार संघ, टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशन आणि मुंबई पोलीस यांनी दखल घ्यावी. कारण एकाचा जीव तर गेलेला आहे. हा माणूस अजून कोणाचा जीव घेण्याआधी त्याला रोखणं गरजेचं आहे, असे कळकळीचे आवाहन मेल लिहिणाऱ्या कर्मचाऱ्याने केली आहे.

फेसबुक वर शेअर करा

Facebook