> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

न्यूज १८ लोकमतच्या संपादकपदी महेश म्हात्रे

मुंबई - न्यूज १८ लोकमत चॅनलच्या संपादकपदी ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांची निवड झाली असून  त्यांनी आपल्या पदाची सूत्रे सोमवारी घेतली आहेत. म्हात्रे यांच्या निवडीबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे.

उमेश कुमावत यांनी राजीनामा दिल्यानंतर न्यूज १८ लोकमतच्या संपादकपदी कोणाची निवड होणार ? याकडे लक्ष वेधले होते. या पदासाठी मंदार फणसे, तुळशीदास भोईटे आदी  इच्छूक होते. मात्र न्यूज १८ इंडिया ( हिंदी) चे राजकीय संपादक असलेल्या महेश म्हात्रे यांच्याकडेच न्यूज १८ लोकमत चॅनलच्या संपादकपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

महेश म्हात्रे यांचा पत्रकारितेचा प्रवास लोकप्रभा या साप्ताहिकापासून सुरु झाला होता. सर्वात कमी वयात ते नागपूर सकाळचे संपादक झाले  होते. इंडियन एक्स्प्रेस, प्रहार आदी वृत्तपत्रातही त्यांनी काम केले आहे. दूरदर्शनमध्ये त्यांनी काम केले आहे.  न्यूज १८ लोकमत चॅनलमध्ये त्यांची ही दुसरी इनिंग आहे. मंदार फणसे ( दुसरी टर्म ) संपादक असताना म्हात्रे कार्यकारी संपादक होते. आता त्यांच्याकडे स्वतंत्र पदभार आला आहे.

प्रसाद काथे जय महाराष्ट्रमध्ये
झी २४ तास मधून बाहेर पडलेले प्रसाद काथे आज किंवा उद्या जय महाराष्ट्र मध्ये संपादक म्हणून जॉईन होत आहेत. जय महाराष्ट्रचे राजकीय संपादक आशिष जाधव झी २४ तास मध्ये कार्यकारी संपादक होताच काथे जय महाराष्ट्रमध्ये गेले आहेत.
महेश म्हात्रे आणि प्रसाद काथे यांच्या नव्या इनिंगला बेरक्याच्या शुभेच्छा !

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९

आशिष जाधव झी २४ तास मध्ये रुजू

मुंबई - प्रसाद काथे यांचा तडकाफडकी राजीनामा घेण्यात आल्यानंतर झी २४ तासचे कार्यकारी संपादक म्हणून आशिष जाधव रुजू झाले आहेत. त्यामुळे राहा एक पाऊल पूढे मध्ये नवा गडी नवा राज सुरु झाला आहे.

आर्थिक  संकटात सापडलेल्या झी २४ तास मधून सध्या अनेकांना नारळ देण्यात येत आहे. कार्यकारी संपादक असलेल्या प्रसाद काथे यांचाही तडकाफडकी राजीनामा घेण्यात आल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यांना अचानक नारळ का देण्यात आला ? याची उलटसुलट चर्चा सुरु आहे.

जाधव आयबीएन लोकमत,  महाराष्ट्र १ असा प्रवास करीत जय महाराष्ट्र मध्ये राजकीय संपादक म्हणून काम पाहत होते. त्यांनी जय महाराष्ट्रला जय महाराष्ट्र करीत एक पाऊल पुढे टाकले आहे.

उमेश कुमावत टीव्ही ९ मराठी मध्ये जॉईन

मुंबई - बेरक्याचे वृत्त पुन्हा एकदा तंतोतंत खरे ठरले आहे. न्यूज १८ लोकमतमधून बाहेर पडलेल्या उमेश कुमावत यांनी टीव्ही ९ मराठी  मध्ये एंट्री  केली आहे. त्यांच्याकडे संपादक पदाची सूत्रे देण्यात आल्यामुळे तुळशीपत्राच्या स्वप्नावर पाणी पडले आहे.

कुमावत यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच टीव्ही ९ मराठी मध्ये मुलाखत दिली होती. पण टीव्ही ९ मराठीची मालकी अन्य ग्रुपकडे गेल्याने कुमावतचे घोडे आडले होते. दरम्यान तुळशीपत्र उघडा डोळे बघा नीट सोडून टीव्ही ९ मराठी मध्ये जॉईन झाला होता. तो संपादक  पदाची स्वप्ने पाहत असतानाच उमेश कुमावत संपादक म्हणून जॉईन झाले आहेत. त्यामुळे तुळशीपत्राची प्रचंड गोची झाली आहे. ज्युनिअर कुमावतच्या हाताखाली काम करावे लागणार असल्याने त्याची पुन्हा एकदा चुळबुळ वाढली आहे. त्यामुळेच त्याने  न्यूज १८ लोकमतमध्ये डाळ शिजते का ? याची चाचपणी केली.

दरम्यान, न्यूज १८ लोकमतमध्ये एंट्री करण्यासाठी विग कमांडर, तुळशीपत्र, दरवळणारा फणस असे जुने नवे तब्बल ८ ते १० जण  चकरा मारत आहेत. तसेच राहा एक पाऊल पुढे मध्येही अनेकजण खेटे  मारत आहेत. न्यूज १८ लोकमत आणि राहा एक पाऊल पुढे मध्ये कोणाचा नंबर लागणार हे लवकरच कळेल.

सोमवार, ९ सप्टेंबर, २०१९

उमेश कुमावत यांचा राजीनामा मंजूर


मुंबई - न्यूज १८ लोकमतचे संपादक उमेश कुमावत यांचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे. ते टीव्ही ९ (मराठी) च्या वाटेवर आहेत. दर एक - दोन वर्षाला संपादक बदलणाऱ्या न्यूज १८ लोकमतची धुरा आता कुणाच्या खांद्यावर पडणार ? याकडे लक्ष वेधले आहे.

उमेश कुमावत यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच अवघ्या तीन महिन्यात राजीनामा दिला होता. मात्र तो फेटाळण्यात आला होता. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली  असताना त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. कुमावत पुन्हा एकदा टीव्ही ९ मराठी मध्ये संपादक म्हणून जॉईन होणार असल्याचे कळते.

कुमावत संपादक म्हणून जॉईन होणार असल्याचे कळताच कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत असलेल्या तुळशीपत्राची चुळबुळ वाढली आहे. त्यांनी न्यूज १८ लोकमतमध्ये लग्गा लागतो का म्हणून चाचपणी केली मात्र अजून तरी डाळ शिजलेली नाही.

न्यूज १८ लोकमतमध्ये संपादक म्हणून कोणाची वर्णी लागणार ? याकडे लक्ष लागले आहे. कुणीही आला तरी टीआरपी १२ च्या पुढे सरकत  नाही. चॅनल नेहमी पाचव्या क्रमांकावर राहत असल्याने मॅनेजमेंट हतबल झाले आहे.

जाता - जाता
'राहा एक पाऊल पुढे' चॅनलमध्ये विग कमांडरचा अचानक राजीनामा घेण्यात आला आहे. विग कमांडर पुन्हा न्यूज १८ लोकमत मध्ये जॉईन होऊ शकतात , अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मोरू परतुनी आला...

संघ कृपेंकरुन निवृत्तीच्या वयात मराठवाड्यातुन  थेट त्रिपुरात गेलेला मोरू अखेर बदनाम होऊन परतला.तो सन्मानाने परतला असता तर किती चांगले झाले असते.म्हणजे महाराष्ट्राची -मराठवाड्याची इभ्रत राहिली असती.कदाचित कुलगुरू पदाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मोरूला एखाद्या राज्याचा राज्यपाल किंवा गेला बाजार कुठे तरी सल्लागार म्हणून तरी बसवले असते.पण विनाश काले विपरीत बुद्धी म्हणतात तसे झाले.

धारूरकर यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे त्रिपुरा उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील रघुनाथ मुखर्जी यांनी म्हटले आहे.म्हणजे तूर्तास राजीनामा देऊन धारूरकर मराठवाड्यात येत असले तरी ससेमिरा काही सुटणार नाही अशी चिन्हे आहेत,हे प्रकरण त्यांना चांगलेच भोवणार असे एकंदर दिसते आहे.गुरुजींनी आजवर हात दाखवून अवलक्षण अनेकदा केले,त्यांचा हातगुण सर्वानाच माहिती होता,पण पायगुणही बुडत्या डोहाचा असेल हे माहित नव्हते,पाय डोहात बुडाले तेव्हाच ते कळले.बरे या बुडत्याला तिथे त्रिपुऱ्यात काडीचा आधार घ्यायला काही चान्सही नव्हता,झाला,मग व्हायचा तो अण्णू गोगट्या झाला.जे झाले ते वाईटच.म्हणजे तशी मोरूची या आधीची ओळख काही निरपेक्ष निरासक्त गुरुब्रम्ह म्हणून होती असे नाही.शिष्य मंडळींकडून हक्काने गुदक्षिणा उकळणारे गुर्जी असा त्यांचा दुर्लौकिक आधीपासून होताच.म्हणजे एखादा शिष्य आदरभावाने गुरुजींच्या पाया पडला तर त्याच्या डोक्यातील टोपी काढून घेण्याची शिताफी गुरुजींच्या हातगुणात होती.

१७२ पीएचडी देण्याचे रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.गुरुजींच्या या पीएचडी अभियानाचे अनेक रंजक मनोरंजक खमंग किस्से सध्या खाजगी चर्चा आणि सोशल मीडियातून चिवडले जात आहेत.खरे तर माणूस तसा निरुपद्रवी,पापभिरू,सशाच्या काळजाचा इत्यादी वगैरे.म्हणजे सकृत दर्शनी तरी तसा वाटायचा,पण गोगलगाय आणि पोटात पाय असं अनेकदा असतं.गोगलगाय दूध देत नाही,पण ही द्यायची. कधी शिंगेही काढत नसे,त्यामुळे त्यांच्या अनधिकृत कुरापतीकडे लोकांनी अंमळ दुर्लक्षच केलं.इथपर्यंत सगळं ठीक ठाक होतं,गुर्जी त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू झाले तेव्हा मराठवाड्यात आणि औरंगाबादेत त्यांच्या फक्त आरत्या उतरवणेच बाकी उरले होते.पण गुर्जी त्रिपुरात गेले आणि गोगलगाईचं रूपांतर नीलगायीत झालं.कुलगुरूंचं पद,त्यामुळे बऱ्यापैकी अमर्याद अधिकार.मोकळं रान ,हिरवंगार गवत,नीलगाय चरायला लागली.चरतच सुटली.रवंथ कराय
 हा अनेकांना प्रश्न पडला आहे.
लाही थांबेना.अखेर गळ्यापर्यंत आलं.म्हणजे संपलंच सगळं.नुसतं प्रिंटिंगच्या सहा लाखाचं झेंगट नाही म्हणे,बरच काही आहे अजून,जवळपास १४-१५ जणांकडून विद्यापीठात कायम प्राध्यापक म्हणून वर्णी लावण्यासाठी गुरुजींनी मोठ्या दक्षिणा घेतल्यात,शिवाय अनेक कामांची,दौरे आणि मीटिंगाची,विमान प्रवास,हॉटेल आदींची बोगस बिले लाटल्याचेही लचांड आहेच.अनेक जण गुरुजींच्या या कलंकित आध्यायला संघाशी जोडताहेत.ते काही बरोबर नाही,संघाने त्यांना आपला माणूस म्हणून मोठी संधी दिली इतकेच,पण तिथे जाऊन हे असे उद्योग करायला थोडेच सांगितले असणार.असो,मोरू आता आपले बिऱ्हाड पाठीवर घेऊन त्रिपुरातून परतीच्या प्रवासाला निघालाय.त्याचे स्वागत कोणत्या मिषाने करावे ?

-रवींद्र तहकिक
7888030472


शनिवार, ७ सप्टेंबर, २०१९

खाबुगिरीची ' विल ' पावर !

डॉ .बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जर्नालिझम डिपार्टमेंट मध्ये प्रोफेसर,गाईड,विभागप्रमुख, मार्गदर्शक वगैरे पदावर असताना खाबुगिरीच्या बाबतीत सर्वात अव्वल आणि 'अग्रेसर' असणाऱ्या वि.लं.नी त्रिपुरा विद्यापीठात कुलगुरू म्हणून गेल्यापासून काय घ्यायला सुरुवात केली माहिती नाही,पण 'देणाऱ्याचे हात घेताना' एरवी अत्यंत काटेकोरपणे सावधगिरी आणि 'दक्ष'ता बाळगणाऱ्या वि.लं.चा साळसूद चेहरा काल उघडा पडला. 
 
तिथल्या एका चॅनलने स्टिंग ऑपरेशन करून त्यांची पोलखोल केली.त्यात ते विद्यापीठाच्या छपाई कामाचे कंत्राट दिलेल्या एका पुरवठादाराकडून लाच स्वीकारताना दिसत आहेत.साठ लाखांच्या बिलावर दहा टक्के कमिशन.हे कमिशन त्यांनी कुलगुरू कार्यातील अँटी चेंबरमध्ये स्वीकारले.त्यासाठी हस्तक म्हणून खास गावाकडून ( धारूर जिल्हा बीड ) खास आयात करून आणलेल्या आणि त्रिपुरा विद्यापीठात स्वतःचा पीआरओ म्हणून नेमलेल्या पंटरचा वापर केला,या घटनेचे स्टिंग ऑपरेशन पश्चिम बंगाल मधील सर्व स्थानिक चॅनल्सवर दाखवण्यात आले.शिवाय द हिंदू या प्रसिद्ध दैनिकातही पत्र महर्षींच्या या कारनाम्याचा इतिवृत्तांत छापून आला आहे.
 
विशेष म्हणजे हे पत्र महर्षी मराठवाड्यात ते 'पीएचडी'वाले सर म्हणून देखील 'शी' प्रसिद्ध आहेत.
( 'कु' आणि 'सु' पेक्षा वेगळा शब्द ) म्हणजे त्यांना गाईड केलं की पीएचडी पक्की.शिष्याने फक्त 'सेवा' करायची,आणि पुरवायची,बस.गुरु प्रसन्न झाले की पुढचं काम सोप्प ! प्रबंधांच्या विषय निवडीपासून त्याला स्वीकृती मिळवणे,प्रबंधाचा ढाचा,मजकूर, त्याचे ड्राफ्टींग,डीटीपी,सबमिशन,मान्यता आणि पिएचडीची डिग्री.सगळं घरपोच.शिष्याचे ओझे असे शिरावर वाहणारा गुरु खरे तर विरळाच.ज्यांना शिष्य म्हणून स्वीकारले ते कौरव असोत की पांडव,त्यांना पाहिजे ते धडे देणार,पण त्यातही अर्जुनासाठी एकलव्याचा अंगठा कापण्याचे,कर्णाला स्पर्धेतून बाद ठरवण्याचे विलंचे कसब आणि कौशल्य द्रोणाचार्यानाही लाजवणारे.पुलं महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असतील हो,पण आमचे विलं मराठवाड्याचे 'लाट'के व्यक्तिमत्व आहेत.जिथे जातील तिथे ते काही ना काही लाटतातच.
त्यांचा संपर्क तसा दांडगा.म्हणजे सर्व पक्ष संघटना गट-तटातल्या लोकांशी ओळख उठबस,ज्याच्याकडून काम साधायचे तिकडे खनपटीला बसून काम साधून घेण्याची चिकाटी.जी कोणत्याही संघवाल्यात असतेच,तशीच ती विलं मध्येही आहेच.पण तरी हातचा कधी सोडणार नाहीत.अगदी विद्यापीठात सार्वजनिक शिक्षणाचे काम करतानाही त्यांनी संघाची शिस्त आणि बाणा सोडला नाही,संघ कार्यात कुचराई नाही,त्याचेच बक्षीस त्यांना त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून मिळाले,फक्त त्यांनाच नाही त्यांचे बंधू दिलीप धारूरकर यांनाही मराठवाडा विभागाचे माहिती आयुक्त म्हणून काम करण्याची मोठी संधी मिळाली आपल्याला मिळालेले पद कोणाच्या डोळ्यावर येऊ नये म्हणून दिलीप धारूरकर बिचारे काही कामच करत नाहीत.कुठल्या कार्यक्रमातही दिसत नाहीत.लोकांना सोडाच माध्यमांनाही काही माहिती देत नाहीत.गुरवाचे पोर महादेवावर वाहिलेली नारळे नंदीच्या मागे लपून गुपचूप खाते तसेच दिलीप धारूरकर माहिती आयुक्त पदाचा उपभोग घेत आहेत.खरे तर विलंनी देखील बंधूंच्या या गुप्तचौर्याचा आदर्श घेऊन त्रिपुरातला काळ अज्ञातवासात घालवला असता तर किती बरे झाले असते.म्हणजे आम्हाला त्यांच्या बद्दल हे असे वेडेवाकडे लिहावे लागले नसते,पण कोंबडीने अंडं दिलं की तिला वाटतं फार कठीण नाही आपण आता चंद्रही जन्माला घालू शकतो.घ्या चंद्र !
------------------------------------------

-रवींद्र तहकिक
7888030472

बुधवार, ४ सप्टेंबर, २०१९

'एमआरयूसी'च्या अध्यक्षपदी प्रतापराव पवार यांची निवड

मुंबई, : माध्यम सर्वेक्षणात अग्रेसर असलेल्या 'मीडिया रिसर्च यूझर्स कौन्सिल' (एमआरयूसी) या संस्थेच्या अध्यक्षपदी 'सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांची आज निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी आयपीजी "मीडिया ब्रॅंड'चे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी सिन्हा यांची निवड झाली.

'एमआरयूसी'च्या संचालक मंडळाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत आज हा निर्णय झाला. त्यापूर्वी संस्थेची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभादेखील झाली. पवार यापूर्वी 'एमआरयूसी"चे उपाध्यक्ष होते. मावळते अध्यक्ष आशिष भसिन यांच्याकडून पवार यांनी सूत्रे स्वीकारली. अध्यक्ष पदाचा त्यांचा कार्यकाल दोन वर्षांचा असेल.

उपाध्यक्षपदी निवड झालेले शशी सिन्हा हे माध्यम आणि जाहिरात क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आहे. पार्ल्यातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरवात केली व त्यानंतर लोड स्टार अॅडव्हर्टायझिंग एजन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली. सध्या ते आयपीजी मीडिया ब्रॅंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
उच्चविद्याविभूषित असलेल्या प्रतापराव पवार यांनी अनेक प्रतिष्ठित अशा देशी आणि विदेशी कंपन्यांचे संचालक म्हणून काम पाहिले आहे. अनेक औद्योगिक संस्थांशी संबंधित असलेल्या पवार यांनी यापूर्वी इंडियन न्यूज पेपर सोसायटीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. त्यांना 2014 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'एमआरयूसी'ची स्थापना 1994 मध्ये झाली. त्यांच्यातर्फे गेल्या दोन दशकांपासून माध्यम क्षेत्रातील विविध पैलूंवर शास्त्रशुद्ध सर्वेक्षण केले जाते. इंडियन रीडरशिप सर्व्हे (आयआरएस) हे भारतातल्या वृत्तपत्र वाचकांचे सर्वांत मोठे आणि सर्वांत विश्‍वासार्ह सर्वेक्षण 'एमआरयूसी'च्या वतीने केले जाते. माध्यम क्षेत्रातील बदलांचा वेळीच अंदाज घेऊन भविष्यकालीन धोरणांचा विचार करण्यासाठी "एमआरयूसी'च्या सदस्यांना या सर्वेक्षणांचा; तसेच वेळोवेळी करण्यात येत असलेल्या अभ्यासाचा फायदा होतो.
अध्यक्षपदी निवड झाल्यावर पवार यांनी एमआरयूसीच्या सर्व सदस्यांचे आभार मानले. कौन्सिलची जबाबदारी आतापर्यंत समर्थपणे सांभाळलेल्या भसीन यांचेही त्यांनी विशेष आभार मानले.
या पुढच्या काळात आपण सर्वांनी एकत्र काम करून "आयआरएस'ला विशिष्ट उंची गाठून देऊ. त्याचप्रमाणे माध्यम समूहांना विश्वासार्ह, अचूक आणि अभ्यासपूर्ण सर्वेक्षणाचा तपशील देऊ. माध्यम समूहांपुढील अडचणी सोडण्याबाबत आपण लोकशाही पद्धतीने प्रयत्नशील राहू आणि सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. त्यायोगे माध्यम समूहांना आपल्या कामात अचूकता गाठता येईल.
- प्रतापराव पवार, नवनिर्वाचित अध्यक्ष एमयूआरसी, अध्यक्ष सकाळ 

कौन्सिलचे उद्देश 
1. प्रसारमाध्यमांसाठी आणि जाहिरातदारांसाठी वाचक-प्रेक्षक आदींचे सर्वेक्षण करणे.
2. या सर्वेक्षणांमध्ये सर्वोच्च दर्जाची विश्वासार्हता आणि अचूकता कायम राखणे.
3. सर्वेक्षणाच्या तपशिलाचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेणे.
4. माध्यम सर्वेक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती विकसित करणे.
5. माध्यम सर्वेक्षणाबाबत कौन्सिलच्या सदस्यांना माहिती देणे व मार्गदर्शन करणे.
6. सर्वेक्षणासंदर्भातील माहितीची देवाण-घेवाण व तक्रार निवारण यासाठी सदस्यांना सुयोग्य व्यासपीठ पुरवणे.

फेसबुक वर शेअर करा

Facebook