> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

पत्रकार निशा पाटील-पिसे यांची आत्महत्या

पिंपरी- चिंचवड -  दैनिक प्रभातच्या जेष्ठ पत्रकार  आणि  पिंपरी चिंचवड महिला पत्रकार संघाच्या माजी अध्यक्षा निशा पाटील-पिसे यांनी काल (गुरूवारी) रात्री नऊच्या सुमारास नेहरूनगर येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू व अभ्यासू पत्रकार म्हणून त्या ओळखल्या जात. दैनिक केसरीतून त्यांनी पत्रकारितेच्या कारकिर्दीस सुरूवात केली होती. ‘लोकसत्ता’च्या ‘पिंपरी-चिंचवड अंतरंग’ पुरवणीसाठी त्या नियमित लेखन करायच्या. सध्या त्या दैनिक ‘प्रभात’मध्ये उपसंपादक म्हणून त्या कार्यरत होत्या.

काल रात्री पावणेनऊ वाजता त्या कार्यालयातून घरी गेल्या. त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी खोलीचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला. या प्रकाराबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. पंचनामा करून मृतदेह यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठविण्यात आला. सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

या प्रकरणी निशा पाटील-पिसे यांचे बंधू महेश शिंगोटे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कौटुंबिक वादातून आलेल्या नैराश्यातून निशा यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले अाहे. पोलिसांनी निशा यांचा पती प्रशांत पांडुरंग पिसे याला ताब्यात घेतले आहे. निशा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.


म्हणे...आमचं पोट बोलतं !

बेरक्या मध्ये,'चॅनल चालवताय की जत्रेतले बायोस्कोप' हा पहिला भाग प्रसारित झाल्यानंतर माध्यमातील अनेक पत्रकार मित्रांचे (नाव न छापण्याच्या अटीवर ) फोन आले.तरी बरं की लेखाखाली माझा मोबाईल नंबर नव्हता.तरी अनेकांनी शोधून मिळवून फोन केलेच.( शोध पत्रकारिता ) अनेकांनी  मान्य केलं (अर्थात खाजगीत,आपल्या भाषेत ऑफ दि रेकॉर्ड ) की तुम्ही लिहिलंय ते खरं आहे.म्हणजे सगळ्या वृत्तवाहिन्या,सगळी वर्तमानपत्रे (म्हणजे माध्यमातले लहान भाऊ,मोठे भाऊ,वंचित-बहुजन,एमआयएम , मनसे, बंडखोर,अपक्ष,मित्रपक्ष,'भिज भाषणाने' 'कोंभ'फुटलेले विरोधी इत्यादी वगैरे ) आता जनसंपर्कांची माध्यमे राहिलेलीच नाहीत.थोडक्यात करमणुकीची साधने बनली आहेत,ती देखील उथळ-उठवळ आंबटशौकिनांच्या करमणुकीची.

आजकाल दिवसभर टीव्हीवरच्या वृत्तवाहिन्यांवर खऱ्या खोट्या बनावट बातम्या आणि अफवांचा रात्रंदिवस उबग यावी इतका अखंड रतीब चालू असतो.पुन्हा त्या खोट्या अफवांवर बनावट बातम्यांवर शहानिशा न करता चर्चा सुद्धा घडवून आणल्या जातात.त्यात वाहिन्यांचे अँकर आणि पक्षांचे प्रवक्ते ( संबंधित विषयातील स्वयंघोषित तथाकथित तज्ज्ञ सुद्धा) तोंडाला येईल ते बोलतात.मला आश्चर्य याचे वाटते की हे विविध पक्षांचे प्रवक्ते,आणि तज्ज्ञ मंडळी या वृत्तवाहिन्यांच्या स्टुडिओत इतक्या तातडीने कसे काय उपल्बध होतात.काही काही महाभाग तर सकाळपासून दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत या नाही तर त्या वाहिन्यांवर वटवट करताना दिसतात .( तिथेच आडोशाला जागा पकडून झोपतात की काय माहिती नाही)  देवही इतक्या क्षणार्धात त्रिलोकात भ्रमण करू शकत नसेल इतक्या झटपट वेष पालटून हे 'बडबडे' लोक या वाहिनीच्या स्टुडिओतून त्या वाहिनीच्या स्टुडिओत कसे काय प्रगटतात या मागचे रहस्य मला एका मराठी वृत्तवाहिनीत काम करणाऱ्या परीचितेनेच सांगितले.

सगळ्या मराठी वृत्तवाहिन्यांचे स्टुडिओ शक्यतो मुंबईतल्या अंधेरी परिसरात,किंवा 'महालक्ष्मी'ला आहेत.त्यामुळे या मंडळींना 'तळ्यात-मळ्यात'करणं सोपं जातं.हे लोक जणू काही ड्युटी असल्या प्रमाणे नित्य नियमाने तिथे जातात.खालच्या मजल्यावरील कॅंटीन मध्ये चहा-कॉफी घेत बसून राहतात.मग आम्ही आम्हाला पाहिजे तो कन्टेन्ट ( तिला नमुना असं म्हणायचं होतं ) त्यातून उचलतो. या मंडळींना आपले विचार प्रदर्शनाचे चॅनलकडून पैसे ही मिळतात म्हणे.वरतून चहा-कॉफी-बिस्किटे-नाश्ता वगैरे सुद्धा.थोडक्यात वृत्तवाहिन्यांवर फक्त अँकर्स किंवा  अन्य कर्मचारीच नाही तर बडबड सेवा पुरवणारेही पैसे कमावतात.जो जास्त वादंग घालेल त्याला जादा मागणी असते म्हणे.  माझ्या लक्षात आलं, ही टवळी मला मूळ विषयापासून भरकटवतेय.मी म्हटलं,हे जाऊदे.तू मला फोन कशासाठी केलास ते सांग.त्यावर ती ( अत्यंत मादक आणि लडिवाळ आवाजात ) म्हणते कशी 'अहो,तहकिक महाराज.तिकडे बसून पत्रकारितेचे इथिक्स सांगणं सोप्पंय हो..इकडे येऊन पहा म्हणजे कळेल आम्हाला काय सर्कस करावी लागते ते.आणि हो,तुम्ही सांगितलंत ते खरंय सगळं पण आमची नावं कशाला टाकलीत ? माझंही नाव आहे त्यात.हे नाय आवडलं मला.नावं ठेवा काय ठेवायची ती,पण नावं नका टाकत जाऊ.' मी म्हटलं 'अच्छा म्हणजे चोरी झाली,दरोडा पडला,खिसा कापला,लूट झाली,ब्लॅक मेलिंग केलं,खंडणी घेतली हे सांगायचं.चोर-दरवडेखोर-खिसेकापू-लुटारू-ब्लॅकमेलर-खंडणीखोर पकडले हेही सांगायचं,फक्त त्यांची नावे सांगायची नाहीत.अप्रतिष्ठा आणि बदनामी होते म्हणून.' या वर आमच्या त्या भगिनींचा अभिप्राय असा की ' चोर-लुटारू -दरवडेखोर-खिसेकापू-ब्लॅकमेलर-खंडणीखोर असतील तर ते वाहिन्यांचे मालक.आम्ही फक्त पंटर.शार्प शुटर,चॅनल मालक 'सुपारी' घेतात आम्ही पार्टीचा 'गेम'करतो.पंटर-शार्पशुटरच्या हातात 'घोडा'असतो.आमच्या हातात 'बूम '! गंधा है पर धंदा है ..काय करणार ? आमचं तोंड नाही,पोट बोलतं ! ' या वर काय बोलावं हे मला पाच मिनिटं सुचलंच नाही.तरी मी म्हणालोच.काहीतरी-थोडं तरी तारतम्य ठेवायला काय हरकत आहे.विधानसभा मतदानानंतर निकालाच्या आधी सगळ्या वाहिन्यांनी जे एक्झिट पोल जाहीर केले ते नेमकं काय होतं ? ' ' खरं सांगू काय.ती सरळ सरळ बतावणी होती.कोणीही काहीही सर्व्हे केलेला नव्हता.ती आकडेवारी कोणी दिली ते आम्हाला माहिती नाही,वरतून आदेश होते,हेच चालवा.आम्ही चालवलं.' हे असं असेल तर निवडणूक आयोगाने अशा भंकस बोगस एक्झिट पोलवर बंदीच घालायला पाहिजे.दुसरा अत्यंत फालतू प्रकार म्हणजे खोट्या बातम्या,अफवा आणि व्हायरल व्हिडीओचे प्रसारण.या सगळ्या बाष्कळ गोष्टींचा आणि जनतेचा काय संबंध ? हा इकडे गेला,तो तिकडे गेला,हा याला भेटला,तो त्याला भेटला,अशी शक्यता आहे,तशी शक्यता आहे.हे सरकार येणार,तमुक फार्मुला,जे घडलेच नाही तेही रंगवून सांगायचे.चॅनलच पक्षांना ऑफर द्यायला लागल्यावर आणि सरकार बनवायला -पाडायला निघाल्यावर राजकीय पक्षांनी करायचं काय ? बरं हा सगळा ओला-सुका कचरा  जनतेच्या माथी का मारता ? पब्लिकचं डोकं म्हणजे काय डम्पिंग ग्राउंड वाटलं तुम्हाला ?  वृत्तवाहिनीतल्या ज्या ट्वळीने मला फोन केला तिनंच चार दिवसापूर्वी 'वर्षा'बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती श्रीमती अमृता फडणवीस यांची मुलाखत घेतली होती.कन्टेन्ट काय होता माहित आहे ?

" आता आपण आहोत महाराष्ट्राच्या 'राज' महालात ( लोकशाहीत 'राज महाल ! ' ) अर्थात मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा'बंगल्यावर.महाराष्ट्राच्या पोटाची चिंता (?)करणाऱ्या (नशीब पोट भरणाऱ्या नाही म्हणाली) मुख्यमंत्र्यांच्या पोटाची काळजी वाहणाऱ्या होम मिनिष्टर अमृता वहिनींच्या किचन मध्ये.वाहिनी काहीतरी करताहेत..काय करताय वाहिनी...काही तरी खास बेत दिसतोय..वाहिनी : हो,गेला जवळपास महिनाभर साहेबांची धावपळ दगदग सुरु होती,आता निकाल लागला आहे.त्यांचे मी पुन्हा येणार,हे वाक्य खरे ठरले आहे.आता जरा उसंत आहे,म्हणून त्यांच्या आवडीचे थालीपीठ,कोथिंबीर-मुगाचे,अळूवड्या,तूप-धिरडे,वगैरे करणे चालू आहे.' हे सगळं इतकं लाळघोटेपणाने चाललं होतं की विचारू नका.मी म्हटलं 'अगं टवळे हे असलं बाष्कळ काहीतरी दाखवण्यापेक्षा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची झालेली वाताहत,त्यांच्या शेतातलं,डोळ्यातलं पाणी,वाहून गेलेली उद्याची स्वप्न हे दाखवलंत आणि त्यांना न्याय मिळवून दिलात तर पुण्य तरी पदरात पडेल.निदान त्यांची दुआ मिळेल.त्यावर ती टवळी म्हणते कशी 'शेतकऱ्यांचे अश्रू दाखवून टीआरपी मिळत नाही,टीआरपी साठी असच काहीतरी लागतं " मी मनोमन टवळीला हात जोडले.टवळीची 'टीआरपी'ची टकळी आजही चालूच आहे,उद्याही चालूच राहील,का ? तर म्हणे त्यांचं तोंड नाही पोट बोलतं !

-रवींद्र तहकिक  

(भाग तिसरा : लवकरच )

रविवार, २७ ऑक्टोबर, २०१९

चॅनल चालवलाय की जत्रेतील बायोस्कोप?

सोशल मीडियावरचे संघ-भाजपचे संमोहित मोदीभक्त असोत,काँग्रेसचे गोंधळी असोत,पवारांचे भोपे असोत,शिवसेनेचे वाघे असोत,किंवा मनसे,वंचित,एमआयएम इत्यादींचे गारुडी,डोंबारी,मदारी-दरवेशी-रायरंद असोत.राजकीय पक्ष,त्यांचे नेते,कार्यकर्ते आणि समर्थक ही सगळी जमात कायम एका भ्रमात जगत असते आणि जगाला संभ्रमित करीत असते.त्यांचे ते कामच आहे.कोणताच पक्ष किंवा उमेदवार जनतेचे कल्याण करण्यासाठी,राज्याचे किंवा देशाचे भले करण्यासाठी राजकारण करत नाही,किंवा निवडणुका लढवत नाही.हा सगळा खेळ सत्तेसाठी असतो.त्यामुळेच हिंदुत्व,पुरोगामीत्व,राष्ट्रीयत्व,जनतेबद्दलचे दायित्व हे सगळे तत्वज्ञान केवळ मुखशुद्धीसाठी असते.
 
खाल्लेल्या शेणाचा वास येऊ नये म्हणून.गायीचं काय अन म्हशीचं काय,ओलं काय आणि वाळलेलं काय शेवटी शेण ते शेणच.त्यात शुचिर्भूतपणा नाहीच.काही म्हणतात त्यांनी गायी म्हशींचे मोठाले पोवटे खाल्ले,आम्ही शेळ्या-मेंढ्यांच्या लेंड्या खाल्ल्या.हा निर्लज्जपणाचा कळस झाला.प्रचारात तुम्ही बघितलेच असेल.एकमेकांच्या बायका पर्यंत गेले हे लोक.आया-बहिणी पर्यंत पोहचले.बाकी मग बोलण्यात मान,मर्यादा,भान काहीच नव्हतं.जाणते तसेच आणि नेणतेही तसेच.पैलवानकी काय,नटरंग काय,आणखी काय काय.रेटा रेटा किती खरी किती खोटी ते जाऊद्या,पण निदान धनंजय मुंडे नेमके काय म्हणाले.कोणाला उद्देशून कोणत्या संदर्भात बोलले याची निदान शहानिशा करायला काय हरकत होती ? म्हणजे त्यांच्या रेटा रेटीचं सोडा ,आपल्या म्हणजे पत्रकारांच्या-प्रसार माध्यमांच्या रेटा-रेटीचं काय करायचं हा मला पडलेला प्रश्न आहे.मला वृत्तवाहिन्यात चालणाऱ्या अँकर्स आणि संपादक-प्रतिनिधींच्या खो-खोच्या खेळाबद्दल काहीही म्हणायचं नाही.खो-खो खेळा,आट्या-पाट्या खेळा ( पाट्या टाका ),लंगडी खेळा,सूर पारंब्या खेळा,लगोऱ्या खेळा,झिम्मा-पाणी,लपा-छापी,धप्पाकुटी खेळा,गोट्या खेळा हरकत नाही.म्हणजे लोकांनी नावे ठेवली म्हणून आदत से मजबूर शिंदळ  छिनालकी थोडेच सोडतात.पण प्रसार माध्यमांनी थोडीतरी मनाची नाही किमान जनाची तरी ठेवली पाहिजे.नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आम्ही पहिले,उमेवारांच्या दारात,घराच्या आजूबाजूला दिवसभर आणि रात्री बेरात्री उशिरापर्यंत मोठ मोठ्या खपाच्या नामांकित,मानांकित वर्तमानपत्रांचे पत्रकार,प्रतिनिधीं,जाहिरात विभागवाले,मार्केटिंगवाले,खुद्द कार्यकारी-निवासी,(मूलनिवासी) संपादक,वृत्तसंपादक वगैरे पदावरचे पत्रकार अक्षरशः झुंडीने घिरट्या घालताना दिसले.एखाद्या मंदिर-दर्ग्यासमोर बुभुक्षित भिकाऱ्यांची गजबज असते ना,अगदी त्या प्रमाणे.एखादं जनावर मरून किंवा गळपटून पडलं की  कोल्हे कुत्रे कसे त्याचे लचके तोडतात,जखमात अळ्या पडतात,कावळे,घारी,गिधाडं घिरट्या घालतात,तसा सगळा किळसवाणा प्रकार.आणि आम्ही टिळकांचा,जांभेकरांचा,आचार्य अत्र्यांचा,खाडिलकरांचा,प्रबोधनकारांचा,अनंत भालेरावांचा वगैरे वारसा सांगतो.मी अमक्याच्या तालमीत वाढलो आणि तमक्याच्या मांडीवर लहानाचा मोठा झालो.हे असले दळभद्री भिक्कार धंदे करण्यासाठी ?  

        जाहिराती तर कुठे कोणत्या उमेदवारांच्या फारशा दिसल्या नाहीत,मग उमेदवारांच्या घरात काय कंदुऱ्या -भंडारे होते ? की बातम्यांचे पैसे घेतले ? छापण्याच्या-न छापण्याच्या बोली-दलालीवर ? निवडणूक आयोग,जिल्हा माहिती अधिकारी डोळ्यात काय घालून बसतात या बाबतीत,एक तरी पेपर किंवा वाहिन्यांचा माणूस पैसे घेताना पकडला का ? मोठी गिधाडं जाऊद्यात ,किडे-मुंग्या तरी.सोडून बोला.म्हणजे सगळे आलबेल चालू आहे म्हणायचे.सगळे तांदूळ धुतलेले.मला सांगा सगळ्या वृत्त वाहिन्यांनी मोदी पासून राज ठाकरेंपर्यंतच्या जवळपास सर्व सभा लाईव्ह दाखवल्या.हे काय समाजकल्याणार्थ-जनहितार्थ काम होते ? प्रदीर्घ मुलाखती काय,शाळेची घंटा काय,एबीपी माझा 'मठा'चे साक्षात्कारी गुरु राजीव खांडेकर,आणि आता झी त की काय गेलेले आशिष जाधव असोत,टीव्ही नाईनचे उमेश (कम) कुमावत असोत,एबीपीच्या नम्रता वागळे असो,ज्ञानदा कदम असो,टीव्ही नाईनची निखिला म्हात्रे असो,आणि असे बरेच पायलीचे पन्नास.यांना हिरे म्हणायचे की गारगोट्या हे तुम्हीच ठरवा,पण काय त्यांची बातमीदारी,काय त्यांची अँकरिंग,काय त्यांची भाषा,मोदी-शहा-फडणवीसांनी दाखवली नाही इतकी मस्ती मग्रुरी माज हेकटपणा,आरोगन्सी या ताटाखालच्या मांजरांनी दाखवली.पत्रकार नाहीच,पक्ष प्रवक्तेच.कधी कधी चर्चेत सूत्रसंचालन कोण करतंय हेच कळत नव्हतं.इतके एकांगी विषय आणि सूत्रसंचालकाची भूमिका.म्हणून मी त्यांना समालोचक नाही तर समालोचट म्हणतो.अक्षरशः जत्रेतल्या बायोस्कोप प्रमाणे टीव्ही चॅनल चालवतात.' बंबईची xxx बघा..भारी मज्जा बघा..कुतुबमिनार बघा..गांधी बाबा बघा' यांची नावे फक्त वेगळी होती इतकेच. भारी मज्जा तीच 'अमित शहा बघा..मोदी बाबा बघा..पंकजाताई बघा'
 
कोणत्याही चॅनलने कोणत्याही पक्षाला विशेषतः भाजपाला जनहिताचे प्रश्न विचारले नाहीत,किंवा त्यावर चर्चा केली नाही.मोदींनी सांगितले सत्तर वर्षात जे झाले नाही ते पाच वर्षात केले,एकही वाहिनीने त्याचे सत्यान्वेषण केले नाही.अमित शहा म्हणाले पवारांनी पन्नास वर्षात काय केले ? एकही वाहिनीने त्याचे सविस्तर उत्तर दिले नाही.पवारांचे 'भिज भाषण' आणि 'ईडी' वस्रहरण तेवढे दाखवले.त्यातही अजित दादांचा अज्ञातवास,अश्रुपात,मुंडे बंधू भगिनींचे 'उटणे' ! याला पत्रकारिता म्हणायचे,ही आहे चौथ्या स्तंभाची सामाजिक बांधिलकी ? 
 
-रवींद्र तहकिक 

( भाग दुसरा : लवकरच )

मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१९

निवडणूक आणि मीडिया

आजचा विषय अर्थातच निवडणूक आणि तंत्रज्ञान ! या निवडणुकीची मला आढळून आलेली वैशिष्ट्ये आणि खरं तर, एकंदरीत बदलेलेली निवडणूक आणि प्रसारमाध्यमांबाबतची माझी काही निरिक्षणे आपल्याला सादर करत आहोत.


१) या निवडणुकीत प्रसारमाध्यमांचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात ओसरल्याचे स्पष्ट झाले. केवळ मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमच नव्हे तर बाळबोध स्वरूपातील डिजीटल मीडियालाही याचा जोरदार फटका बसला. मीडियावर फार जास्त पैसा खर्च करण्याऐवजी स्वप्रसिध्दीचे खूप व्यापक, सुलभ आणि अर्थातच मोफत माध्यम जवळपास प्रत्येक उमेदवाराने वापरले. यामुळे प्रिंट मीडियाच्या उत्पन्नावर प्रचंड विपरीत परिणाम झाल्याची बाब उघड आहे.

२) डिजीटल मीडियात गुणवत्ता असणार्‍यांनाच पुढे जाता आले. विशेष करून दोन ओळींच्या बातम्या टाकून भरमसाट शेअरींग करणार्‍यांचा फोलपणा उमेदवारांकडे असणार्‍या थिंकटँकने स्पष्टपणे उघडकीस आणला. ज्यांच्याकडे दर्जेदार कंटेंट आणि विपुल युजर्स आहेत अशा डिजीटल मीडिया हाऊसेसला मात्र यातून अनपेक्षित यशाची संधी लाभली.

३) आपले पोर्टल वा अ‍ॅप कितीही आकर्षक असो, जर आपल्या कंटेंटमध्ये दम नसेल तर युजर्स आपल्याला भाव देत नाहीत. अन् युजर्स नसले तर उत्पन्न मिळणार नाही. कुणाचे युजर्स किती आणि यातून आपल्याला लाभ किती मिळणार याचे गणीत बहुतांश उमेदवारांकडे असल्याचे या निवडणुकीने सिध्द केले.

४) 'व्हिज्युअल स्टोरी टेलींग' या प्रकारात अमर्याद संधी असली तरी अद्याप आपल्याकडे हा प्रकार प्राथमिक अवस्थेत असल्याचे या निवडणुकीने सिध्द केले. भडक चित्रीकरणाला लोकप्रिय गाणी अथवा याच्या विडंबनाची जोड देण्याच्या पलीकडे बहुतांश उमेदवारांचे व्हिडीओ पोहचू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. हृदयाचा ठाव घेणार्‍या कॅचलाईन्स, जिंगल्सचा अभावदेखील यावेळी दिसून आला. व्हाटसअ‍ॅपचे स्टेटस्, इन्स्टाग्राम/फेसबुक स्टोरीज अथवा टिकटॉक व्हिडीओजमध्येही कल्पनेचे दारिद्ˆय दिसून आले.

५) या निवडणुकीत जवळपास प्रत्येक पक्षाच्या नेत्यांसोबत स्वत:चा लाईव्ह प्रक्षेपणाचा सेटअप असल्याचे स्पष्ट झाले. तथापि, अगदी प्रो लेव्हलवरील प्रसारण हे भाजपच्याच मुख्य नेत्यांना शक्य झाल्याची बाब उघड आहे. मात्र प्रक्षेपणाचा दर्जा कसाही असला तरी, राज्याच्या अगदी कान्याकोपर्‍यात लाईव्ह व्हिडीओजनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले हे निश्‍चित.  

६) निवडणुकीच्या काळात बरेचसे उमेदवार एकच बातमी दहा वर्तमानपत्रांना देत असून याचा फारसा प्रभाव पडत नाही. आता डिजीटल मीडियातही हाच प्रकार थोडा वेगळ्या स्वरूपात पहायला मिळाला. एकच व्हिज्युअल स्वत:च्या सोशल प्रोफाईल्सवर शेअर करण्यासह डिजीटल मीडियात देण्यात आल्याचा प्रकार दिसून आला. अर्थात, कॉपी-पेस्ट पत्रकारितेची पुढील आवृत्ती डिजीटल मीडियात सुरू झाल्याचेही सिध्द झाले.

७) फेसबुक आणि युट्युबचे स्वत:चे प्लस वा मायनस पॉइंट आहेत. तथापि, युजर्स एंगेजमेंटचा विचार केला असता फेसबुक लाईव्ह सरस असल्याचे या निवडणुकीने सिध्द केले. व्हाटसअ‍ॅपची लोकप्रियता अबाधित असली तरी या मॅसेंजरवरून शेअर करण्यात येणारे ग्राफीक्स वा व्हिडीओ अन्य युजर्स क्लिक करतीलच याची शाश्‍वती नसल्याने याचा फारसा प्रभाव पडला नाही.

८) या निवडणुकीत वास्तवातला प्रचार हा बर्‍याच प्रमाणात आभासी जगात परिवर्तीत झाल्याचे दिसून आले. पुढील कालखंडात याला अजून गती येण्याची शक्यता आहे. तर वास्तवात असणार्‍या मीडियालाही आभासी विश्‍वातील आपले अस्तित्व मजबूत करण्याशिवाय कोणताच पर्याय नसल्याची बाब आता उघड झाली आहे.

९) निवडणुकीच्या कालखंडात 'कंटेंट इज किंग' हे पुन्हा एकदा सिध्द झाले. अर्थात, डिजीटल विश्‍वात कंटेंट हे सम्राट असेल तर याला डिस्ट्रीब्युशन आणि कन्व्हर्जन या दोन राण्या असतात हे विसरता येणार नाही. यातील चांगले कंटेंट आणि विस्तृत युजर्सबेस म्हणजेच ''कंटेंट+डिस्ट्रीब्युशन'' ही जोडी पुन्हा एकदा यशस्वी ठरली असून ''कंटेंट+कन्व्हर्जन'' या सूत्राचा उमेदवारांसह राजकीय पक्षांना नेमका काय लाभ होणार हे २४ तारखेला समजणार आहे.

- शेखर पाटील

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१९

झी मराठी दिशा दिशाहीन ...

मुंबई- दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून सुरु करण्यात आलेलं झी मराठी दिशा अखेर दिशाहीन झालं आहे. हे साप्ताहिक बंद करण्यात आले असून, जवळपास २५ कर्मचाऱ्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

सध्याच्या डिजिटल युगात प्रिंट मध्ये साप्ताहिक सुरु करण्याचा धाडसी निर्णय झी मीडियाने घेतला होता. सकाळ माध्यम समूहात मुख्य संपादक राहिलेल्या विजय कुवळेकर यांची यासाठी निवड करण्यात आली होती. त्यामुळे हे  साप्ताहिक चांगले चालेल अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र एकंदरीत अंकावर नजर टाकली तर हा अंक बेचव वाटत होता. वाचकांचा म्हणावा तसा प्रतिसाद याला लाभला नाही.

झी मीडिया सध्या प्रचंड  कर्जबाजारी आहे, त्यात झी  मराठी दिशा हे साप्ताहिक तोट्यात सुरु असल्याने ते  बंद  करण्याचा निर्णय घेण्यात आला . तशी सूचना देखील चालू अंकात आली आहे.

विजय कुवळेकर यांच्याकडे झी मराठी दिशा बरोबर झी २४ तासची धुरा होती. आता झी २४ तासचे सर्व अधिकार नवे कार्यकारी संपादक आशिष जाधव  यांच्याकडे देण्यात आले असून कुवळेकर फक्त  मार्गदर्शक आहेत. त्यात झी मराठी दिशा बंद पडल्याने कुवळेकर यांना झी मधून लवकरच नारळ दिला जाईल, अशी शक्यता आहे. 
 
 

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

संदीप साखरेचे झी २४ तास मधून पाऊल बाहेर ...

मुंबई - 'राहा एक पाऊल पुढे' म्हणणाऱ्या झी २४ तास मधून संदीप साखरे यांनी बारा वर्षानंतर आपले पाऊल कायमचे बाहेर टाकले आहे. इनपूट  हेड पदावरून हटवण्यात आल्यानंतर डिमोशन झाले म्हणून  इमोशन  होत साखरेनी  राजीनामा दिला आहे.

संदीप साखरे हे झी २४ तास सुरु झाल्यापासून कार्यरत होते. काही वर्षांपासून ते इनपूट हेड पदावर होते.  इनपूटला संदीप साखरे आणि आऊटपूटला विठोबा सावंत ही जोडी फेमस होती. विरोधात जाणाऱ्याचा हे  दोघे मिळून गेम करीत असल्याचा आरोप सातत्याने होत होता. प्रसाद काथे यांची  याच  जोडगोळीने विकेट पाडल्याची चर्चा आहे.

काही दिवसापूर्वी  आशिष जाधव कार्यकारी संपादक म्हणून जॉईन झाले आणि झी २४ तास मध्ये जाधवशाही सुरु झाली. आल्या -आल्या त्यांनी पहिला प्रहार संदीप साखरेवर केला. साखरेला इनपूट हेड पदावर काढून  आऊटपूटला मॉर्निग शिफ्टला पाठवले आणि  इनपूट हेड म्हणून दिल्लीतून नरेंद्र बंडबेना आयात केले. त्यामुळे संदीप साखरेला मिर्ची लागली. बारा वर्ष काम करून माझं डिमोशन केलं म्हणून इमोशन होत त्यांनी राजीनामा दिला आणि झी २४ तास मधून आपले पाऊल कायमचे बाहेर टाकले.

इकडे जोडीदार गेला  म्हणून विठोबा सावंत अस्वस्थ  झाले आहेत. आपलीही कधीही विकेट पडू शकते म्हणून ते हवालदिल झाले आहेत.  शुगरेनंतर आता काळू मामा,  जोक पाटील, कोल्हापूरी पाटील, ढंकाईकर आपा, चिपाली वर्ल्डताप यांचा नंबर लागणार असल्याची चर्चा झी २४ तास मध्ये सुरु झाली आहे.

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१९

डॉ. सुधीर रसाळ यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार जाहीर

औरंगाबाद : स्वातंत्र्यसैनिक व निर्भीड पत्रकार अनंत भालेराव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार यंदा ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना जाहीर झाला आहे. येत्या 17 नोव्हेंबर रोजी समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या कार्याह डॉ. सविता पानट यांनी दिली.

दैनीक मराठवाडाचे संपादक अनंत भालेराव यांच्या पहिल्या स्मृतिदिनापासून अनंत भालेराव स्मृति पुरस्कार देण्याची सुरवात त्यांच्या नावाने स्थापन झालेल्या प्रतिष्ठानने केली. पत्रकारिता, साहित्य, कला, समाजसेवा अशा विविध क्षेत्रातील एका नामवंत व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. पहिला पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांना देण्यात आला. कुमार केतकर, अरूण टिकेकर, पी. साईनाथ हे ज्येष्ठ पत्रकार; विजय तेंडूलकर, महेश एलकुंचवार यांच्यासारखे नाटककार; मंगेश पाडगांवकर, ना.धो. महानोर यांसारखे प्रतिभावंत कवी, ग.प्र.प्रधान, मृणाल गोरे, मेधा पाटकर, अभय बंग, पुष्पा भावे, थोर गांधीवादी गंगाप्रसादजी अग्रवाल, नरेंद्र दाभोळकर ही सामाजिक राजकीय क्षेत्रातील मोठी माणसे, अनिल अवचट, हार्मोनिअम वादक अप्पा जळगांवकर, जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह, शिक्षणतज्ज्ञ द.ना.धनागरे, चित्रपट नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

2019 च्या पुरस्कारासाठी मराठी साहित्य, समीक्षा आणि भाषा या क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल डॉ. सुधीर रसाळ यांची निवड करण्यात आली आहे. 50 हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. रसाळ हे मराठी भाषा व वाड:मयाचे नामवंत शिक्षक, पत्रकारितेचे जाणकार म्हणून ओळखले जातात. अनंत भालेराव आणि मराठवाडा यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. डॉ. सुधीर रसाळ यांनी साक्षेपी समीक्षक, मर्मग्राही विश्‍लेषक संवेदनशील सौंदर्यासक्त रसिक आणि शिस्तप्रिय अभ्यासक अशी स्वत:ची प्रतिमा साहित्य क्षेत्रात निर्माण केली आहे. समीक्षेच्या क्षेत्रातील रसाळ हे एक महत्त्वाचे नाव समजले जाते. त्यांची समीक्षेकवरची 10 पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. त्यांचा " कविता आणि प्रतिमा ' हा ग्रंथ या क्षेत्रात महत्त्वाचा मानला जातो. रसाळ यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे वाड:मय निर्मितीचे पुरस्कार मिळालेले आहेत. आजही त्यांचे समीक्षा, संशोधनपर लेखन सुरू असून विंदा करंदीकर यांच्या कवितेची समिक्षा करणारा ग्रंथ लवकरच प्रकाशीत होणार आहे.

डिएनए वृत्तपत्र घेणार एक्झिट; केली नवी घोषणा

नवी दिल्ली : देशातील नामांकित वृत्तपत्राने 'डिएनए' अर्थात डेली न्यूज अॅण्ड अॅनालिसीसने आजपासून (बधवार) त्यांचे छापील वृत्तपत्र बंद केले आहे. 'डिएनए आता त्यांच्या ऑनलाईन व सोशल माध्यमांवर भर देणार आहे,' असे वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीत म्हणले आहे.

जाहिरातीत म्हटले आहे की, 'वाचक, विशेषतः तरूण वाचक हे मोबाईलवर वृत्तपत्र वाचण्यास प्राधान्य देतात. यामुळे आम्ही आता डिजिटल माध्यमांवर भर देणार आहोत. आमचे बातम्या देण्याचे माध्यम बदलत आहे, आम्ही नाही...' असे या जाहिरातीत म्हणले आहे. मुंबई व अहमदाबाद येथे प्रकाशित होणारे वृत्तपत्र उद्या म्हणजेच 10 ऑक्टोबरपासून बंद होईल. 2019 मधील फेब्रुवारी महिन्यात डिएनएने त्यांची दिल्ली आवृत्ती बंद केली होती.


2005 मध्ये सुरू झालेले डिएनए ब्रॉडशीट मुंबई, अहमदाबाद, पुणे, जयपूर, बंगळूर व इंदोर येथे प्रकाशित होत होते. डिलीगंट मीडिया कॉर्पोरेशन या कंपनीचा असलेला डिएनए आजपासून छापील रूपात दिसणार नाही. इंग्रजी असलेले हे वृत्तपत्र कायमच तरूणाईला आवडेल असा आशय देण्याला प्राधान्य देतात. आणि आता 80% तरूणाई ही सोशल मीडियावर असल्याने डिएनए ही डिजिटल रूपात नव्याने समोर येईल.

डीएनए बरोबर मराठीत सुरु झालेले साप्ताहिक झी मराठी दिशाही बंद  करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

झी 24 तास मध्ये शुगरेचं एक पाऊल मागे

बेरक्याचं भाकीत तंतोतंत खरं ठरलंय. इनपुट मधून आता शुगरे ला हटवण्यात आलं असून झी 24 तासच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी सत्ताबदल झाल्यावर सर्जिकल स्ट्राईक झाली आहे.

दिल्ली मध्ये IMN मध्ये असलेल्या आणि मीडियाचा चांगला पूर्वानुभव असलेल्या नरेंद्र बंडबेंना आता इनपुट हेड करण्यात आलंय. फंदीप शुगरे आता मॉर्निंग शिफ्टला आऊटपुट ला काम करणार आहे.

पण युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ...विठोबाचे काय होणार माहीत नाही.

तात्पर्य - वक्त बडी चीज है भाई ।

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१९

टीव्ही 9 मध्ये त्रिकूटाचा हैदोस तर झी २४ तास मध्ये भीतीचं वातावरण

टीव्ही 9 मध्ये त्रिकूटाचा हैदोस

रोहित विश्वकर्मा गेल्यानंतर उमेश कुमावत नवे संपादक झाले. पण बजानन बेदम, टकलू टुंडे आणि तुळशीपत्र चोईटे हे त्रिकूट संपादक कुमावत यांना जुमानत नाही. त्रिकुटाच्या त्रासामुळे सर्व प्रोड्यूसर, प्रॉडक्शन एक्झीक्युटिव्ह वैतागून गेले. टकलू टुंडे सात-सात दिवस सायकल घेऊन सुट्टीवर जातो. मात्र इतरांना तीन दिवसही सुट्टी द्यायला त्रास देतो. कुमावत यांनी या त्रिकूटाला रोखलं नाही तर चॅनेलचा टीआरपी घसरण्याची शक्यता आहे. अँकरसाठी 5 डेज वीक आहे. मात्र हाच न्याय कुमावत यांनी इतरांनाही द्यायला हवा, अशी मागणी आहे.


झी २४ तास मध्ये भीतीचं वातावरण

झीचे मालक सुभाष चंद्र गोयल आर्थिक संकटात सापडल्यानं झी 24 तासमध्ये भीतीचं वातावरण आहे. दोन अँकरनी जॉब सोडला, इतरही बाहेर शोध घेत आहेत. त्यातच आशीष जाधव संपादक झाल्यानं शुगरे, काळू मामा धास्तावले आहेत. शुगरे काळू मामा यांच्या टोळीतल्या कोणाला तरी लाथ बसू शकते. शुगरे काळू मामानं प्रसाद काथेचा आवाज बंद केला होता. आजोबाला गुंडाळलं होतं. शुगरे काळू मामा आता आशीष जाधवचा काथे करणार का ? याकडे मीडियाचं लक्ष लागलं आहे. 

फेसबुक वर शेअर करा

Facebook