> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

रविवार, २४ नोव्हेंबर, २०१९

बादशाहत सलामत रहेगी !

अग्रलेखाचा बादशहा ही लोकांनी दिलेली बिरुदावली अभिमानाने आपल्या नवाकाळ या वर्तमानपत्राच्या पाहिल्यापानावर मानाने मिरवणारे निळूभाऊ उपाख्य नीलकंठ यशवंत खाडिलकर निवर्तले.वय वर्ष ८५.गेली काही वर्षे आजार आणि वृद्धत्वामुळे बादशहाने आपली लेखणी म्यान करून नवाकाळची सूत्रे कन्या जयश्री खाडिलकर यांच्याकडे सुपूर्द केली होती,पण नवाकाळच्या शीर्षभागावर कोरलेले 'अग्रलेखाचा बादशहा'हे बिरुद कायम होते.आजही कायम आहे आणि उद्याही राहील.

बादशहाचे आसन रिकामे राहू नये असा संकेत आहे.पण ज्याला खऱ्या अर्थाने अग्रलेखाचा बादशहा म्हणता येईल असा कोणीही पत्रकार सध्यातरी मराठी वृत्तपत्र सृष्टीत आढळत नाही,त्यामुळेच निळूभाऊंची बादशाहत कायम अढळ आणि सलामत राहील.लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर काहीकाळ केसरीचे संपादक बनलेल्या नाटककार आणि विचारवंत लेखक कृ.पा.खाडिलकरांनी १९२३ साली मुंबईतल्या गिरगावात नवाकाळ सुरु केला,त्याला आता ९६ वर्षे पूर्ण झाली.यातली महाराष्ट्राच्या इतिहासातली अत्यंत धामधुमीची आणि उलथापालथीची २७ वर्षे निळूभाऊ नवाकाळचे संपादक होते.

आजोबा कृ.पा.हिंदुत्वादी विचारांचे.वडील यशवंत काँग्रेसी तर निळूभाऊ चक्क डावे.कम्युनिष्ट.मुंबईतील गिरणी कामगार,गोदी कामगार,आणि लोकलमधून वाहणारा चाकरमानी, लालबाग-परळ-भायखळा-शिवडी-बोरिवली-कांदिवली-चेंबूर-गिरगावात राहणारा आगरी-कोळी समाज.मुंबईतले डबेवाले,वडापाववाले, सर्वसामान्य मुंबईकर हा नवाकाळचा खरा वाचक.नवाकाळ कधीच लब्धप्रतिष्ठितांच्या दिवाणखाण्यांची शोभा बनले नाही.हा बादशहा हस्तिदंती मनोऱ्यातला नव्हता.गिरणी कामगारांचे आंदोलन असो,गोदी कामगारांच्या समस्या असोत,मुंबईत वाढत गेलेले अंडरवर्ल्ड असो,आधी दाक्षिणात्य आणि मग बिहार-उत्तरप्रदेश-बांगलादेश मधून मुंबईत आलेले,लोंढे-तांडे असोत,मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन असो,शिवसेनेचा वाढता प्रभाव आणि सोबतची ठोकशाही असो,कॅन्सरच्या गाठींसारखा मुंबईचा झालेला अनियंत्रित विस्तार आणि बकालपणा असो.फुटपाथवरची बुभुक्षित उत्क्रांती असो,की अजागळ विविक्षित पंचतारांकित संस्कृती असो.मुंबई महानगरपालिकांचा गलथान गैरकारभार,भ्रष्टाचार,सामान्य जनतेची लूट,राजकर्त्यांनी अनास्था,हिंदू-मुस्लिम दंगली,मुंबईचे हरवत गेलेले मराठीपण,वेश्यावस्त्या,झोपडपट्ट्या,सिंधी,गुजराथी आणि जैनांनी देशाच्या आर्थिक राजधानीवर केलेला कब्जा,कोळ्यांची दुर्दशा अशा अनेक विषयावर निळूभाऊंनी आपल्या परखड सडेतोड पण सर्वसामान्यांना समजेल उमजेल कळेल अशा भाषेत प्रहार केले.

एखादा विषय निळूभाऊंनी हातात घेतला की त्याचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय तें थांबत नसत.जो जनतेला नडला त्याचा पार फ़डशाच.मग तो कोणी का अब्बूराव असेना.निळूभाऊ त्याची भीडभाड मुलाहिजा राखत नसत.त्यांचा अग्रलेख पहिल्या पानावर ठळक टाईपात असे.त्यांच्या काळात नवाकाळ कृष्णधवलच होता.पण खपात मुंबईत नंबर वन ! त्यांनी त्यांचा खास वाचकवर्ग निर्माण केला होता.मुळात लोक नवाकाळ घ्यायचे तें फक्त निळूभाऊंचा अग्रलेख वाचण्यासाठी.बाकी पानांवर काय छापलंय हे नवाकाळचे वाचक बहुदा पाहतही नसावेत.नवाकाळ फक्त लोकलमध्ये आणि लोकल लोकच वाचत असे मात्र नाही,'मटा'बगलेत ठेऊन आपले तथाकथित उचभ्रुत्व कुरवाळणारे देखील माना वाकड्या करून शेजाऱ्याच्या हातातील नवाकाळच्या अग्रलेखाचं हेडिंग आणि इंट्रो डोळ्यांनी ढापत असत.असा हा अग्रलेखाचा बेताज बादशहा आता अनंताच्या प्रवासाला निघाला आहे.त्याच्या निर्वावाद आणि अढळ बादशपदाला त्रिवार कुर्निसात.

 -रवींद्र तहकीक
औरंगाबाद

गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१९

इंग्रजी वृत्तपत्रात नोकरी देण्याचे आमिष दाखवून रोहन भेंडेने अमरावतीच्या तरुणाला दीड लाखाला गंडवले !


रोहन भेंडे
नागपूर - महाराष्ट्र माझा नावाचं साप्ताहिक सुरु करणार असल्याचे  सांगून ज्येष्ठ पत्रकार  प्रवीण बर्दापूरकर, शैलेंद्र शिर्के यांच्यासह राज्यातील अनेक पत्रकारांची फसवणूक करणारा  विदर्भातील भामटा  रोहन भेंडे  याने अमरावतीच्या
एका तरुणाला इंग्रजी वृत्तपत्रात नोकरी देण्याचे आमिष दाखवून दीड लाखाला गंडा घातला आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले आहे.

संपूर्ण विदर्भात लखोबा लोखंडे म्हणून ओळखला जाणारा भामटा  रोहन भेंडे याने  महाराष्ट्र माझा नावाचं साप्ताहिक सुरु करणार असल्याचे  सांगून अनेकांना फसवले होते. याबाबतचे वृत्त बेरक्याने यापूर्वी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर त्याचा नवीन कारनामा उघडकीस आला आहे.


रोहन भेंडे याने अमरावतीमधील एका तरुणाला एका इंग्रजी वृत्तपत्रात सहाय्यक व्यवस्थापक पदावर नोकरी लावतो म्हणून  १ लाख ५२ हजार रुपये उकळले होते. ही भामटेगिरी करताना एक ज्येष्ठ पत्रकार आपले ओळखीचे असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणाने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. पोलिसांनी रोहन भेंडे विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत .

रोहन भेंडे याने नागपुरातील अनेक तरुणांना यापूर्वी फसवले होते. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करून, आजपर्यंत कुणाकुणाला फसवले याचा शोध घ्यावा, अशी मागणी पुढे आली आहे.

दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी रोहन भेंडेशी आपला काही संबंध नाही, तेव्हा तरुणांनी फसू नये, असे आवाहन केले आहे.  


ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचं निधन

मुंबई - मराठी वृत्तपत्रसृष्टी मध्ये अग्रलेखांचे बादशहा अशी बिरुदावली असणारे दैनिक नवाकाळ चे ज्येष्ठ संपादक  तथा लेखक  नीलकंठ (भाऊ)खाडिलकर  यांचे आज पहाटे (22 नोव्हेंबर)  अल्पशा आजाराने निधन झाले. 

'अग्रलेखांचा बादशहा' अशी ओळख असणारे खाडिलकर हे दैनिक नवाकाळचे अनेक वर्षं संपादक होते. संपूर्ण अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. ऑनर्स झाले होते. ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’ चे माजी संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू होते. खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या.

नीलकंठ खाडिलकर यांनी आपल्या तर्कशुद्ध आणि संदर्भासहित लेखनातून इतिहासाची मांडणी करत वाचकांचे प्रबोधन केले आणि त्याचवेळी वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू व विवेकी विवेचनही वाचकांपर्यंत पोहचविले.  

आपल्या तेजतर्रार लेखणीने आणि सुस्पष्ट वाणीने गेली ६ दशके सातत्याने अन्यायाविरोधात अग्रलेखांच्या माध्यमातून वाचा फोडणारे खाडिलकर साहेब आज काळाच्या पडद्या आड गेले . सामान्य जनतेचा कैवार घेऊन बिनधास्त धडाडणारा तोफखाना अशी ओळख असणाऱ्या खाडिलकर साहेबांना मानाचा मुजरा !!

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१९

झी २४ तास पुन्हा तोंडावर पडले !

मुंबई -  राहा एक पाऊल पुढे म्हणणारे  झी २४ तास चॅनल पुन्हा एकदा तोंडावर पडले आहे. आज त्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार प्रकरणी  सफशेल माफी मागावी लागली. रोखठोक कार्यक्रमात कार्यकारी संपादक आशिष जाधव यांनी ऑन एयर माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्रात सध्या सत्ता संघर्ष सुरु आहे. त्यावरून सोशल मीडियावर विविध मीम्स प्रसिद्ध होत आहेत. मात्र खोट्या बातम्या दिल्यामुळे मराठी न्यूज चॅनल्सची  विश्वासर्हता पार धुळीला मिळाली.त्यात झी २४ तासने संशयकल्लोळ नाटकावरून राजकीय विडंबन शो करत असताना,  ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल नको तो शब्द वापरला. त्यावरून राज्यभरात शरद पवार प्रेमी आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यात संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावर नेटिझन्सनी झी २४ तासचा निषेध नोंदविला. माफी मागा नाही तर चॅनलच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल म्हणून इशारा देण्यात आला.

त्यानंतर झी २४ तास व्यवस्थापनाचे धाबे दणाणले. कार्यकारी संपादक आशिष जाधव यांनी काल रात्री ट्यूटरवर माफी मागितली, मात्र आज त्यांनी रोखठोक कार्यक्रमात ऑन एयर माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आशिष जाधव यांना कार्यकारी संपादक म्हणून जॉईन होवून केवळ एक महिना झाला. केवळ एक महिन्यातच त्यांना  ऑन एयर माफी मागावी लागली. 

विजय कुवळेकर यांना नारळ
आर्थिक अडचणीत सापडलेल्या झी २४ तास मधून अनेकांना नारळ देण्यात येत आहे. अँकर अमोल जोशी, भूषण करंदीकर, इनपुट हेड संदीप साखरे पाठोपाठ मुख्य संपादक विजय कुवळेकर यांना चॅनलने नारळ दिला आहे. सध्या सर्वाधिकार कार्यकारी संपादक आशिष जाधव यांच्याकडे आहेत. मात्र चॅनलमधील जुनी गॅंग त्यांचा गेम करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातून संशयकल्लोळ वाढला आहे.

......

जाता जाता : 
 
संजय राऊत हे संजय ठाकरे  कधी झाले ? 

ऑन एअर चूक झाल्यानंतर आशिष जाधव यांनी  चुकीवर  कसे पांघरून  घातले पाहा ! 

शेवटची दोन मिनिटे व्हिडिओ क्लिप पाहा -
 
 
 
गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९

निदान घाणीवर माती तरी टाका रे !

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात सत्ता संघर्ष सुरु आहे. त्याच्या बातम्या देताना मराठी न्यूज चॅनल्सनी 'आताच्या घडीची  सर्वात मोठी बातमी' म्हणून सर्रास खोट्या बातम्या दिल्या. शिवसेनेचे नेते राज्यपालांना भेटल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठींबा पत्र दिले, मुख्यमंत्री कोण होणार ? शपथविधी कधी होणार ? याची सुद्धा बातमी दिली. ते खोटे निघाले. यामुळे  चॅनल्सची विश्वासर्हता पार धुळीला मिळाली.याबाबत कुणीही माफी मागितली नाही. त्यानंतर आताही तेच सुरु आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला 'महाशिवआघाडी' हे नाव देवून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री कुणाचा आणि किती काळ राहणार ? हे पेरत आहे, चॅनल्स बातम्या देतात की सल्ला ?

यावरच आहे औरंगाबादचे पत्रकार रवींद्र तहकीक यांचा दणदणीत लेख... 
................

राष्ट्रसंत गाडगेबाबा कळवळून म्हणायचे 'बाबांनो घाण करायची तुम्ही सोडणार नाहीत,पण निदान घाणीवर माती तरी टाका रे ! ' आज आमच्या महाराष्ट्रातील सर्व वृत्तवाहिन्यांचे वार्तांकन पाहून आम्हाला गाडगेबाबांचे हेच वाक्य म्हणावेसे वाटत आहे.आमच्या मराठवाडी गावठी भाषेत असे म्हणतात की थोडं पाहणाऱ्यानेही लाजावं आणि थोडं हागणाऱ्याने.आता तुम्ही जे दाखवता आहात,विशेषतः गेल्या १५-२० दिवसात राज्यात सुरु असलेल्या राजकीय तमाशा बद्दल.ते पाहणाऱ्यांना लाज वाटू लागली आहे.प्रश्न आपल्या लाज वाटण्याचा आहे.खरंच आपण जे बोलता आहात,दाखवता आहात,सांगता आहात त्या बद्दल आपल्याला थोडीशी सुद्धा लाज वाटत नाही ? मी आज कोणत्याही चॅनलचे किंवा त्यातील पत्रकार-वार्ताहराचे नाव घेणार नाही.कारण कोणाला वेगळे निवडावे असे काही नाही.सगळे घोडे बारा टक्के अशी परिस्थिती आहे.एकतर चॅनलवाल्याना नेमकी कशाची घाई आहे हे कळायला मार्ग नाही.

भाजपची सत्तास्थापनेची संधी हुकली म्हणून सगळ्या वृत्तवाहिन्या आणि त्यांचे अँकर-वार्ताहर-पत्रकार-संपादक इतके अस्वस्थ का आहेत ? दुसरे म्हणजे जिथे राज्यपालांना सरकार बनवण्याची घाई नाही,शिवसेनेला नाही,काँग्रेस-राष्ट्रवादीला नाही तिथे चॅनलवाल्याना सरकार बनवण्याची एवढी घाई का म्हणून आहे.जवळपास सर्वच वृत्तवाहिन्यांच्या चर्चा आणि त्यांचे विषय पहा.जणू काही भाजपा आणि फडणवीसांची पाठराखण करण्याचा आणि शिवसेनेने फार मोठे घोर महापाप केल्याचा कांगावा केला जात आहे.राष्ट्रवादी आणि काँग्रेसला तर खलनायकाच ठरवायचे बाकी ठेवले आहे.याला पत्रकारिता म्हणतात का ?

ब्रेकिंग न्यूजला काही महत्व आहे की नाही.सुप्रिया सुळे आणि शरद पवार एकाच गाडीतून दक्षिण मुंबईच्या दिशेने निघालेत.आमची टीम त्यांच्या मागोमाग आहे,पण ते कुठे चाललेत माहित नाही.राष्ट्रवादीचा दुसरा कोणीही नेता त्यांच्या सोबत नाही.काही वेगळे समीकरण पुढे येत आहे काय ? पवार काही वेगळी बातमी देणार काय ? वगैरे वगैरे.काय आहे हे ? यात कोणती ब्रेकिंग न्यूज आहे.कोणतीही माहिती नसताना सूत्रांचा हवाला सोडून काहीही पुड्या सोडण्याचा उदयोग नेमकं करतंय कोण ?

काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या सरकार बनवण्याच्या चर्चेला आता कुठे प्राथमिक सुरुवात झाली आहे.अजून काहीच ठरलेलं नाही.तरच सगळ्या चॅनलनी या आघाडीचं फक्त नामकरणच नाही तर मंत्रिमंडळ देखील ठरवून टाकलं.महाशिव आघाडी ही काय भानगड आहे ? कोणी आणली ही महाशिव आघाडी ? एक्झिट पोलच्या वेळी इतकं थोबाड फुटूनही चॅनलवाल्याची खोट्यानाट्या बातम्या पेरण्याची आणि चालवण्याची खोड अजून जिरलेली नाही.शिवसेनेला काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने कोणतेच पत्र दिलेले नसताना,पत्र निघाले,पत्र पोहचले,पत्र चुकले,आणि नंतर पत्रच नाही आले,अशा बातम्या आल्या.

 परवाची अजित पवार चिडले बारामतीला चालले ही बातमीही अशीच.एकूणच सगळा प्रकार हास्यास्पद आहे.वृत्त वृत्तवाहिन्यांबद्दल सर्वसामान्य लोक,काय बोलतात ते एका जरा माणसात मिसळून.शहरातलेच नाही खेड्यापाड्यातले सुद्धा.जेष्ठ नागरिक-तरुणच नाही शाळकरी मुलं सुद्धा चॅनलवाल्याना हसताहेत.आपल्या वार्ता आणि वार्तालाप अक्षरशः विनोदी मनोरंजनाचे साधन वाटू लागलाय लोकांना.जादा ढोसलेल्या एखाद्या दारुड्याची बेताल असंबद्ध बडबड ऐकतात ना लोक 'जाने दो पीएला है ' म्हणून अगदी त्याच प्रमाणे न्यूज चॅनल पाहू लागलेत लोक.तुमचा तो उतावीळपणा,ती उबग आणणारी अखंड आणि कंठाळी बकबक,तो आक्रस्ताळेपणा,उथळपणा.लोचटपणा.झीट आणि वीट येतो हो हे सगळं गलथान-अजागळ पाहून.पत्रकारितेची थोडीतरी इभ्रत राखा.पाहणारे लाजताहेत.तुम्हीही जरा मनाची नाही निदान जनाची लाज बाळगा.घाण करायचे तुम्ही सोडणार नाहीत,निदान घाणीवर माती तरी टाका.

-रवींद्र तहकीक

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

वृत्त वाहिन्या 'कलवऱ्या' आहेत काय ?

मोदींना नाही,अमित शहांना नाही,उद्धव ठाकरेंना नाही,फडणवीसांना नाही,संजय राऊतांना नाही,काँग्रेस -राष्ट्रवादीवाल्याना नाही,अगदी राज्यपालांनाही महाराष्ट्रात नवीन सरकार बनवण्याची घाई पडलेली नाही .सगळे एकमेकांची मजा घेताहेत.एकमेकांना अजमावताहेत.पुराने हिसाब चुकते करताहेत.खरे सांगू काय ; एव्हाना उद्धव ठाकरे भाजपशी गुळणा-गुळणी खेळून सत्यनारायण घालायला मोकळेही झाले असते.पण संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे काढून त्यांचीही गोची करून ठेवली आहे.त्यांची म्हणजे अख्ख्या शिवसेनेची.शिवसेनेचे अनेक आमदार आणि मंत्री खाजगीत 'संज्या ने हे काय लचांड उभं केलं,मध्येच.सालं आतापर्यंत शपथविधी घेऊन मोकळे झालो असतो.सरकार आलं असतं.आता जर तेलही गेलं आणि तूपही गेलं तर हातात धुपाटणं घेऊन काय करायचं ? असं म्हणताहेत.मिलिंद नार्वेकरांची तर महाभयंकर फजिती झाली आहे.मोठ्या मेहनतीने त्यांनी मिळवलेला मातोश्री आणि शिवसेनेवरील रिमोटकंट्रोल राऊतांनी पळवलाय.राऊतांनी शिवसेनेची केलीय तशीच कोंडी भाजपाचीही केलीय आणि काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा केली आहे.वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरीही खातोच ! बरे घडत काहीच नाही.नुसत्याच पत्रकार परिषदा होत आहेत.

(भाग ३ रा )

 हे असो.म्हणजे खरे तर आम्ही प्रसरमाध्यमातल्या पत्रकार मंडळींनी राजकीय पक्षांच्या या झोंबी कडे कसे पाहायला हवे हा खरा प्रश्न आहे.या लोकांनी जनादेश आणि लोकशाहीची जी थट्टा चालवली आहे त्यावर कोणी पत्रकार चार ओळी खरडतोय का ? राजकारणाचा खेळखंडोबा करून त्याचा पोरखेळ करणाऱ्या नव्या जुण्या जाणत्या अशा सगळ्याच राजकारण्यांना त्यांच्या कर्तव्य जबाबदारी आणि किमान औचित्याची नैतिकतेची जाणीव आठवण करून देत आहोत का आपण ? तर नाही ! त्यांची ती चिखलफेक,आचरट बोलणे याच्या आपण बातम्या करतो.त्यात जनतेच्या हिताचं काय आहे,लोकशाहीच्या अनहिताचं काय आहे हे पाहत नाही.प्रसारमाध्यमे लोकशिक्षणाचं काम करतात ना ? लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ ना आपण ? पण झालय काय की अनेक वर्तमानपत्रांनी आर्थिक बाबतीत हाय खाल्लीय,अनेकांची कंबरडी मोडलीत.बड्यांचा बडा घर पोकळ वासा झालाय,छोट्यांची तर पार XXX वासलात लागलीय.त्यामुळे प्रिंट मीडियातल्या मंडळींवर जुन्या खानदानी घराण्यातल्या बायका प्रमाणे नाकापर्यंत पदर घेऊन रोजगार हमीवर जाण्याची वेळ आली आहे.त्यामुळे त्यांच्या जखमेवर आणखी मीठ चोळण्यात अर्थ नाही,पण आमची इलेट्रॉनिक माध्यमे.काय ते स्टुडिओ,चकचकीत फर्निचर,अत्याधुनिक तंत्रज्ञान,कॅमेरे,लाईट्स,फोकस.मॅन पावर,सिनेमातले हिरो हिरोईन वापरतात तसे कपडे,कोट,जाकिटं,टाय,टॉप,मेकअप,हेअर स्टाईल,विचारू नका.पायातल्या शूज सॅन्डल पासून डोक्यावरच्या पिनांपर्यंत सगळं इंपोर्टेड.म्हणजे दिसतंय ते सांगतोय.परफ्युम -बॉडी स्प्रे सुद्धा इम्पोर्टेडच असणार.( आपण काय अजून कुणाचा वास घेतला नाय बुआ ) थोडक्यात या लोकांना पगार नेमका किती मिळत असावा,म्हणजे हे सगळं करून ,पुन्हा गाड्या वापरून,मुंबईत स्वतःचा किंवा भाड्याचा फ्लॅट घेऊन राहायचं म्हणजे जरा अग्निदिव्यच की.बरं प्रफोशन असं की हे सगळं मेंटेन केल्याशिवाय गत्यंतर नाही.गबाळं राहता येत नाही.परफेक्शन पेक्षा प्रेझेंटेशनला,म्हणजे कंटेन पेक्षा दिसण्याला आणि चुरुचुरु बोलण्याला महत्व.

अलीकडेतर बहुतेक चॅनलवर पुरुषसत्ताक पद्धती बाद होऊ लागली आहे.चांगली गोष्ट आहे.माध्यमात महिलांचा सक्रिय सहभाग वाढला पाहिजे.पण सक्रिय सहभाग आणि लुडबुडीतला,अगोचरपणातला फरक आमच्या भगिनींनी डोक्यात घेतला पाहिजे.दुसरे असे की जरा जनहिताच्या मुद्यावरही कधी चर्चा,माहिती मार्गदर्शन केले पाहिजे.राजकीय पक्ष काय करायचे ते करतील.आपण काय कोणाला सत्तेवर आणण्याची सुपारी घेतलीय ? की अमुकच पक्ष सत्तेवर यावा.अमुकच माणूस मुख्यमंत्री व्हावा.एकतर आपण भाजपाला खुश करण्यासाठी खोटा एक्झिट पोल दिला.तो लुक्का हुकला.मग आता सगळेच भाजपाची सत्ता यावी,फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत या साठी बूम पाण्यात घालून बसलेत.( चॅनलचे पैसे अडकलेत का ?) काय ती धडपड,काय ती उलघाल,लग्न मंडपात नवरदेव नवरीपेक्षा कलवऱ्यांचीच जास्ती कलकल असते ना,तसलाच प्रकार सध्या चाललाय.हे सगळं झीट आणि उबग आणणारं आहे.उमेश कमकुमावत, निर्जीव खांडेकर या महाभागांनी तर राजकीय वधुवर सूचक मंडळ तर चालवायला घेतले नाही ना असाच सगळा प्रकार चाललाय.हे सर्व असो,मला सर्वात आश्चर्य वाटतं ते  भारतकुमार राऊत यांचं.किती हव्यास असावा माणसाला.महाराष्ट्र टाइम्स सारख्या वर्तमानपत्राचा संपादक राहिलेला माणूस,राज्यसभेत खासदार असलेला माणूस.बुभुक्षितसारखा या चॅनलवर त्या चॅनलवर येतो काय.आज याची तर उद्या त्याची तळी उचलतो काय.हेतू खरेच जन प्रबोधनाचा आहे की मानधनाचा ? हे असं झालय बघा आपल्या पत्रकारितेचं.बोलायला-लिहायला जावं तर फार भयानक आहे.आपण सगळ्यांची ठासतो..पण आपली कोणी ठासायची ? की ब्रम्ह निंदे प्रमाणे पत्रकार निंदाही घोर महापाप आहे ?

-रवींद्र तहकिक 

(क्रमशः)


फेसबुक वर शेअर करा

Facebook