> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

रविवार, २९ जानेवारी, २०१२

नकलसे सावधान

'बेरक्या ब्लॉग' हा पत्रकारांनी पत्रकारांसाठी चालविलेला ब्लॉग आहे.तो कोणच्याही एकाचा नाही. हे टीमवर्क आहे. बेरक्याने वृत्तपत्र मालकांच्या विरूध्द नेहमीच संघर्ष करून, त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.म्हणूनच बेरक्या हा दबलेल्या व पिचलेल्या पत्रकारांचा बुलंद आवाज बनलेला आहे.तसेच चांगल्या पत्रकारांच्या पाठीशी नेहमीच उभा राहिलेला आहे.
हे करीत असताना चांगल्या बातम्या, लेख दिलेला आहे. बेरक्या पत्रकारांचा पाठीराखा बनलेला असताना त्याला अडचणीत आणण्याचे कटकारस्थान मालकांच्या ताटाखाली मांजर बनलेले काही लपूट पत्रकार करीत आहेत.त्यांनी बेरक्याचा बाप, बेरक्याचा भाऊ, बेरक्याचा अमका, तमका म्हणून फेसबुकवर आय.डी.काढून आम्हाला शह देण्याचा प्रयत्न करीत आहेत.आमचा कोणी बाप नाही, आम्हीच अशा बदमाश पत्रकारांचे बाप आहोत...
आमच्या पत्रकार मित्रांना विनंती आहे, अशा बदमाश्यांवर विश्वास ठेवू नये....

म.टा.वरील हल्ल्याच्या निमितानं....

शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांच्या समर्थक शिवसैनिकांनी शनिवारी "महाराष्ट्र टाइम्स'च्या कार्यालयावर हल्ला चढविला."आनंदराव अडसूळ राष्ट्रवादीत जाणार 'अशा अर्थाचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सनं प्रसिध्द केलं होतं. "ही बातमी चुकीची आणि खोडसाळ आहे".असा आक्षेप घेत शिवसैनिकांनी मटावर हल्लाबोल केला.बातमी चुकीची असेल तर लोकशाही मार्गानं त्याचा प्रतिवाद करता येतो.अडसूळ यांनी त्या बातमीच्या अनुषंगानं आपलं म्हणणं किंवा बातमीचा खुलासा संपादकाकडं  द्यायला हवा होता,हवं तर बदनामीचा खटला दाखल करायला हवा होता,किंवा नंतर खा.अडसूळ यांनी  सांगितल्या प्रमाणं मटाची प्रेस कौन्सिलकडं तक्रार करायला हवी होती.असं काही न करता आपल्याबद्दल काही छापून आलं म्हणून थेट दैनिकाच्या कार्यालयावर हल्ला करणं हे कृत्य तालिबानी पध्दतीचं असल्यानं त्याचा प्रत्येक लोकशाहीप्रेमी आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी आग्रही असणाऱ्यांनी निषेधच केला पाहिजे.सुदैवानं महाराष्ट्रात या हल्ल्याचा सर्वत्र निषेध होत आहे ही गोष्ट आश्वासक आणि पत्रकारांची उमेद वाढविणारी आहे यात शंकाच नाही.
     प्रश्न आहे हे सारं रामायण का घडलं याचा! जे घडलं त्याला पत्रकारांपेक्षा राजकारणीच जास्त जबाबदार आहेत.सांगली येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी "एका मोठ्या पक्षाचा खासदार आणि अध्यक्ष राष्ट्रवादीत येणार' अशी पुडी सोडली. पिचड यांच्या वक्तव्यानंतर कोणता मासा राष्ट्रवादीच्या गळाला लागला याची चर्चा राजकीय गोटात,पत्रकारांमध्ये आणि सामांन्य जनतेतही सुरू झाली.हा मासा कोणता याचा शोध राजकीय पक्ष जसा घेऊ लागले तव्दतच पत्रकारही  घेऊ लागले.त्या अऩुषंगानं वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू झाली.प्रत्येकानं आपल्या पध्दतीनं अंदाज वर्तवायला आरंभ केला.कोणी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्य़क्ष खा. राजू शेट्टी यांच्या दिशेनं बोट उठविलं ,कोणी बहुजन विकास आघाडीचे खा.बळीराम जाघव याच्या नावाची चर्चा सुरू केली,कोणी आनंदराव अडसूळ, शिवाजीराव आढऴराव पाटील,भावना गवळी ,अनंत गीते,ग़णेशराव दुधगावकर यांची नावंही घ्यायला सुरूवात केली.सामनानं तर मुंबईचे खा. गुरूदास कामत  यांचंही नाव प्रसिध्द केलं.साऱ्यांचे अंदाज होते.अनेकदा बातमी देताना अंदाज वर्तवावे लागतात.साऱ्यांनीच तसे वर्तविले.याचा अर्थ राजू शेट्टीचं नाव कोणी घेतल्यानं त्यांच्या लोकांनी वृत्तपत्रावर हल्ला करायचा किंवा सामनानं  गुरूदास कामत यांचं्‌ नाव छापलं म्हणून कॉग्रेसवाल्यांनी सामनावर हल्ला करायचा असा होत नाही.आपल्या निष्ठाच एवढ्या पक्क्या हव्यात आणि पक्षनेतृत्वाला आपल्याबद्दल एवढा विश्वास हवा की,काही छापून आलं तरी नेतृत्वाचा त्यावर विश्वास बसता कामा नये. दुर्दैवानं साऱ्याच राजकीय नेत्यांनी आपली विश्वासार्हता लिलावात काढलेली आहे.गेल्या काही वर्षात ज्या व्यक्तींनी आयाराम-गयारामची भूमिका पार पाडली आहे ते बघता कोणीही,केव्हाही  आणि कोणत्याही पक्षात जावू शकते किंवा येऊ शकते याबद्दल लोकांच्या मनात शंका राहिलेली नाही.आनंदराव अडसूऴ बातमी आल्यावर सातत्यानं सांगत होते,बातमीमुळं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला,माझी ३५ वर्षांच्या निष्ठा धुळीस मिळाल्या वगैरे.निवडणुकीच्या वातावरणात एखादी बातमी आल्यानं आपल्याबद्दल आपल्या कार्यकर्त्याच्या मनात संभ्रम निर्माण होत असेल  तर मला वाटतं संबंधित नेत्यालाच आत्मचिंतन करायची गरज आहे.राजू शेट्टीचं नाव आल्यानं त्यांना त्याचा खुलासा करण्याची गरज भासली नाही किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना कोणावर हल्ला करावा असंही वाटलं नाही.तीच गोष्ट गुरूदास कामत आणि इतरांची. हे सारं असताना आनंदराव अडसुळांनाच मटावर हल्ला करून आपल्या निष्ठा पक्षावर असल्याचं का दाखवावं लागलं हा यातला मुख्य सवाल आहे.गंमत अशी की, शिवसेनेची खोड काढली पिचड यांनी.ते खोटं बोलले.शिवाजीराव माने माजी खासदार असताना आणि ते पक्षाचे अध्यक्ष नसून केवळ हिंगोली जिल्हा का्रग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी खोटी पुडी सोडल्यांनं सारा गोंधळ झाला.पिचड यांनी हा सारा उपदंव्याप न करता थेट नाव जाहीर केलं असतं तर रातोरात कोणी शिवाजीरान माने यांना पळवून नेणार नव्हते.पण पिचड यांनी साऱ्यानाच गोंधळात टाकले आणि प्रत्येकजण परस्परांकडं संशयांनं पाहू लागला.असं संशयाचं वातावरण करणाऱ्या पिचड यांच्यावर  शिवसेनेचा राग नाही.आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीत जावून सेनेला थप्पड लगावली,ते थेट शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत हजर झाले.त्याबद्दल किंवा शिवसेनेशी गद्दारी करणारांबद्दल शिवसेनेचे काहीच म्हणणे नाही.बातम्या प्रसिध्द करणारांना मात्र ते दंडुक्यानं झोडपण्याची भाषा करणार.कारण आऩंद परांजपे असतील किंवा त्यांना आपल्या पक्षात घेणारा पक्ष असेल त्यांना हात लावण्याची सेनेची हिंमत नाही.पत्रकारांना मारणं सोपं आहे.पत्रकार किंवा वृत्तपत्र कार्यालयावर हल्ले केल्यानं होत काहीच नाही.तात्पुर्ती अटक होते.नंतर लगेच जामिन होतो.हे शिवसेनेला माहित आहे.शिवसेनेत फोडाफोडी करणारांना जाब विचारला तर त्यांना त्याच पध्दतीनं उत्तर मिळू शकतं.पत्रकार असं उत्तर देऊ शकत नाहीत म्हणून सारा राग पत्रकारावर काढायचा हे धोरण सेनेनच नव्हे तर साऱ्याच पक्षांनी अवलंबिलं असल्यानं पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत. महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षात वाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या ३६ कार्यालयांवर हल्ले झाले आहेत.गेल्या अडीच वर्षात २१२ पत्रकांवर हल्ले झाले आहेत.त्य़ा अगोदरच्या हल्ल्यांची संख्या मोठी आहे.ती आकडेवारी देखील माझ्याकडं आहे.मात्र हे इथं नमूद करताना मला दुःख होतंय की,एकाही हल्ल्यातील मारेकऱ्यांना शिक्षा झालेली नाही."पत्रकारावर हल्ले करा आणि मोकाट सुटा' अशीच स्थिती आहे.पत्रकारांना आणि वृत्तपत्र कार्यालयांना कायद्यांनं संरक्षण दिलं गेलं तर किमान त्यांना शिक्षा तरी होतील.त्यासाठी कोणत्याच पक्षाची तयारी नाही.शिवसेनेचाही कायद्याला विरोध आहे.ही सारी स्थिती असल्यानं महाराष्ट्रात वृत्तपत्रे आणि पत्रकार कधी नव्हे एवढे असुरक्षित झाले आहेत.पत्रकार हे "सॉफ्ट टार्गेट' ठरत आहेत.मटावरील हल्ल्याच्या निमित्तानं हे वास्तव परत एकदा समोर आलं आहे.खरोखरच प्रत्येक प्रश्नाचं  मुळ पत्रकार आहेत काय? तसं नाही.राजकारण्यांच्या निष्ठाच एवढ्या ढिसूळ झालेल्या आहेत आणि ते एवढे आत्मकेंद्री आणि स्वार्थी झाले आहेत की,ते स्वार्थासाठी काहीही करू शकतात.काहीही बोलू शकतात."आनंद परांजपेंना राष्ट्रवादीत जा" असं कोण्या पत्रकारांन सांगितलेलं नव्हतं. ते गेल्यानंतर पत्रकारानी त्यावर भाष्य केलं.परांजपे राष्ट्रवादीत गेले त्यापेक्षा त्यांच्या निर्णयावरचं भाष्यच कोणाला झोंबणार असेल तर पत्रकारांनी मग काही लिहायलाच नको.एखादा नेता पक्ष सोडून जातोय अशी कोणी आवई उठविली तरी शिवसेनेच्या नेत्यांकडं संशयानं पाहिलं जातं.कारण शिवसेना प्रमुखांच्या जवळ असलेले अनेक नेते शिवसेनेला सोडून गेले आहेत.अशा स्थितीत शिवसेनेनं संशय व्यक्त करणाऱ्या पत्रकारांकडं "पाहण्यापेक्षा' पक्ष सोडून कोणी जाणार नाही याची काळजी घेतली तर ती पक्षासाठी अधिक लाभदायक ठऱेल असं वाटतं.म्हणजे पत्रकारांना आत्मपरिक्षण करण्याचे सल्ले देणाऱ्या राजकारण्यानीच खरं आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.प्रश्न केवळ शिवसेनेचा नाहीच.साऱ्याच राजकीय पक्षांची पत्रकारांबद्दलची भूमिका समान आहे.आज शिनसेनेनं मटावर हल्ला केल्यानं त्याचा निषेध करण्यासाठी कॉग्रस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अहमहमिका लागली आहे.वृत्तपत्रांचे लोकशाहीतील स्थान  आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याची कवणंही ते गात आहेत महाराष्ट्राच्या संस्कृतीचीही ते आठवण करून देत आहेत.पण त्यांनी इतरांकडं बोट दाखविण्याचं कारण नाही.महाराष्ट्रात पत्रकारावर जे हल्ले झाले आहेत त्या पापाचे धनी अन्य पक्षही आहेत.कॉग्रेस.राष्ट्रवादीकडूनही असे हल्ले झाले आहेत.त्याचा तारीखवार आणि नावानिशी तपशिल माझ्याकडं आहे.पण" सत्ताधाऱ्यांनी पत्रकारावर हल्ला केला की,त्याचा विरोधकांनी निषेध करायचा आणि विरोधकांनी हल्ला केला की,सत्ताधाऱ्यांनी त्याबद्दल नक्राश्रू गाळायचे' ही महाराष्ट्रात पघ्दत झाली आहे.हा निषेध किंवा समर्थन वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या प्रेमातून नव्हे तर आपल्या  राजकीय लाभ-तोट्‌य़ाचा विचार करून केलं जातंय हे ही लपून राहिलेलं नाही.आपल्या राजकारणासाठी राजकारणी पत्रकारांना वापरतात आणि त्यांच्यावरील हल्ल्याचा वापरही आपल्या राजकारणासाठीच करतात हे वारंवार दिसून येत आहे.मटावरील हल्ल्याचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,उपमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी निषेध केला आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनं कालच त्यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे.मात्र या मागं केवऴ वृत्तपत्र स्वातंत्र्याविषयीचं प्रेम हेच कारण असेल तर यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही.दुर्दैवानं ते तसं नाही.कॉग्रेस-राष्ट्रवादीकडून हल्ले झाले तेव्हा त्याच्या पक्षांच्या पुढाऱ्यांनी मौन पाळलेलं होतं. आता ते निषेध करतात.तरीही हरकत नाही पण केवळ एखाद्या घटनेचा निषेध करून माध्यमांवरचे हल्ले थाबतील काय? याचं उत्तर नाही असंच आहे.लोकशाहीच्या चौथ्यास्तंभावर असे वारंवार आघात होणार नाहीत यासाठी कठोर भूमिका घेण्याची गरज असताना सरकार ती घेत नाही.पत्रकार आणि वृत्तपत्र कचेऱ्यांना संरक्षण देणारा कायदा करावा अशी आमची मागणी आहे.ती गेली आठ वर्षे आम्ही सातत्यानं करतो आहोत.हा कायदा झाल्यानं पत्रकारांवरील हल्ले पूर्णतः बंद होतील या भ्रमातही आम्ही नाही आहोत.पण हल्लेखोरांवर किमान  वचक बसेल हे नक्की.मटावरील हल्लयाचा तातडीनं कठोर शब्दात निषेध करणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तेवढ्याच तडफेने कायदा केला तर" वाईटातूनही कसं चांगलं घडू शकतं" याची प्रचिती आम्हाला येईल.पण ते होणार नाही .कारण "विरोधकांनी वृत्तपत्र कार्यालयावर  केलेल्या हल्ल्याचा निषेध करणं वेगळं आणि कायदा करणं वेगळं' हे सत्ताधाऱ्यांना चांगलं माहित आहे.
    अशा सर्व परिस्थितीत पत्रकारांनी काय करायला हवं? मला वाटतं भक्कम एकजूट हेच अशा हल्ल्यांवरचं प्रभावी अस्त्र आहे.दुदैवानं ती तशी दिसत नाही.मटावर हल्ला झाला.लोकसत्ताच्या संपादकांवर हल्ला झाला.झी-24 तासवर हल्ला झाला.टी.व्ही.9 वर हल्ला झाला. आयबीएनवर हल्ला झाला  किंवा अन्य कोणत्याही वृत्तपत्रावर हल्ला झाला तर ती लढाई संबंधित वृत्तपत्रास किंवा वाहिनीस एकट्यालाच लढावी लागते.किंबहुना ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांना दोष देण्यातच इतर वृत्तपत्रे,वाहिन्या,किंवा पत्रकार धन्यता मानतात.मटावर जेव्हा हल्ला होतो तेव्हा तो त्यांच्या संपादकांना " वृत्तपत्र स्वातंत्र्यावरचा हल्ला वाटतो पण जेव्हा हा हल्ला लोकमत किंवा अन्य दैनिकांवर होतो तेव्हा तो मटाला वृत्तपत्र स्वातंत्र्यावरचा हल्ला वाटत नसावा कारण ते अशा हल्लयाची बातमी देण्याचं सौजन्यही दाखवत नाहीत.इतर वृत्तपत्रेही किंवा वाहिन्याही अशाच वागतात.काल मटावर हल्ला झाल्यानंतर संपादकांना यापूर्वी देखील माध्यमांवर हल्ले झाल्याची आठवण झाली.त्याचा त्यांनी निषेध केला.आपल्यावर वेळ आल्यावर का होईना त्यांना इतरांवरील हल्ल्याचा निषेध करावा वाटला हे काही कमी नाही.मागचं सोडा पण यापुढं जेव्हा जेव्हा कोणी वृत्तपत्रांचा आवाज बंद करायचा प्रयत्न करील तेव्हा आम्ही खंबीरपणे संबंधित वृत्तपत्राच्या बाजुनं उभं राहू अशी भूमिका केवळ मटानेच नव्हे तर सर्वच वृत्तपत्रे आणि वाहिन्यानी घेतली पाहिजे.तरच राजकीय हल्लेखोरांना वचक बसेल अन्यथा आज मटा,उद्या लोकसत्ता,परवा लोकमत असा सिलसिला सुरू राहिल. यातून कोणीच सुटणार नाही.पत्रकारांच्या सोळा संघटनांनी माध्यमांवरील हल्ल्याच्या विरोधात आवाज बुलंद केला आहे.दोन वर्षांपूर्वी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन करून या संघटनेच्या माध्यमातून विविध पातळ्यावर संघर्ष सुरू आहे.या चळवळीला सर्वांनी समर्थन देणे आवश्यक आहे. त्याशिवाय आता मार्ग नाही.मला याची कल्पना आहे की,असे हल्ले आणि दमदाट्या आपला आवाज बंद करू शकत नाहीत पण व्यक्तिशाः एखाद्या पत्रकारावरील हल्ला त्यांचं मानसिक खच्चीकरण नक्कीच करू शकतो, ज्या पत्रकारांवर हल्ले झाले आहेत त्यातील अनेक जण आयुष्यातून उठले आहेत.ती वेळ कोणावर येणार नाही याची काळजी सर्वच पत्रकार,वृत्तपत्रे आणि वाहिन्याना घ्यावी लागेल.सुदैवानं महाराष्ट्रातील पत्रकार आणि मिडीया हाऊसेसवर सातत्यानं होत असलेल्या हल्ल्याची गंभीर दखल  प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन  न्या.मार्कन्डेय काटजू यांनी घेतली आहे.त्यांनी त्याबाबतचं पत्र यापूर्वीच महाराष्ट्र सरकारला लिहिलं आहे.मटावरील हल्ल्यानंतर देखील त्यांनी महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून सरकारची तीव्र शब्दात कानउघाडणी केली आहे.म्हणजे प्रेस कौन्सिललाही आपली भूमिका पटली आहे.आता आपली भक्कम एकजूट दाखविण्याची गरज आहे.


एस.एम.देशमुख
निमंत्रक,पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,मुंबई

शनिवार, २८ जानेवारी, २०१२

महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयाची तोडफोड


मुंबई: मुंबईतील टाइम्स इमारतीवर शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ समर्थकांनी हल्ला केला. कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयाची तोडफोड केली.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी आणखी एक खासदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यावर शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ राष्ट्रवादीत प्रवेश करु शकतात अशी बातमी महाराष्ट्र टाइम्सने आपल्या आजच्या अंकात छापली आहे. त्याचा राग आल्याने अडसूळ समर्थकांनी कार्यालयची तोडफोड केल्याची प्रतिक्रिया अडसूळ यांनी दिली.

दरम्यान बँक एम्पॉईज असोसिएशनचा बोर्ड हातात घेऊन आलेल्या १६ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर दंगल, घुसखोरी आणि मालमत्तेचं नुकसान यांसारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
व्हिडीओ: टाईम्स'मध्ये सेनेचा राडा
'ही बातमी म्हणजे माझ्या ४० वर्षांच्या कारकीर्दीला कलंक लावणारी आहे, अशी प्रतिक्रिया खासदार आनंदराव अडसूळ यांनी हल्ल्यानंतर दिली. या बातमीमुळे माझ्याबद्दल अनेक गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र टाइम्सने बातमी छापण्यापूर्वी माझ्याशी शहानिशा करायला हवी होती,' असं आनंदराव अडसूळ यांनी म्हटलं आहे.

'खात्री नसताना महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त छापायला नको हवं होता. हा प्रक्षोभ जनसामान्यांचा आहे,' अशी प्रतिक्रिया सेनेचे आमदार अभिजीत अडसूळ यांनी म्हटलं आहे.

तर 'आंनंदराव अडसूळ यांच्याबद्दलचं वृत्त छापण्यापूर्वी वृत्तपत्राचा विचार करायला हवा होता, असं शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले. संतापाचा उद्रेक झाल्यानंतर अशी प्रतिक्रिया होते,' असं राऊत म्हणाले. त्यामुळे मीडियाने नेत्यांनी बदनामी करु नये.

टाइम्स कार्यालयाच्या तोडफोडीचा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी निषेध केला आहे. संबंधित कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. ज्यांनी कार्यकर्त्यांना हा हल्ला करण्यास प्रवृत्त केलं असेल वा प्रोत्साहन दिलं असेल त्यांच्यासह सर्वांवर अजामीनपत्राचा गुन्हा दाखल करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. कोणत्याही परिस्थितीत हा हल्ला सहन करणार नाही, हे प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात नेऊन आरोपींनी लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, अशा पद्धतीची पावलं सरकारतर्फे उचलली जातील असं आश्वासन गृहमंत्र्यांनी दिलं.

दुसरीकडे महाराष्ट्र टाइम्सने हा हल्ल्याचा निषेध केला आहे. 'कोणलाही कायदा हातात घेण्याची आवश्यकता नव्हती. आजच्या अंकातील बातमी ही कोणत्याही नेत्याची बदनामी करण्यासाठी नव्हती. पण आनंदराव अडसूळ यांनी निवेदन देणं गरजेचं होतं,' अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र टाइम्सचे संपादक अशोक पानवलकर यांनी दिली. तसंच अडसूळांचं निवेदन उद्याच्या अंकात प्रसिद्ध करु, असं आश्वासन अशोक पानवलकर यांनी दिलं.

त्याचबरोबर प्रसारमाध्यम आणि वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर हा हल्ला असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र टाइम्सचे सहसंपादक सारंग दर्शने यांनी दिली.

मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

चौथा स्तंभ पत्रकारिता पुरस्कार- २०१२ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

औरंगाबाद - ओम ह्युमन रिसोर्स अकॅडेमी, एम जी एम वृत्तपत्र विद्या विभाग आणि अप्रतिम मीडिया न्यूज नेटवर्क यांच्या वतीने दैनिके व वृत्त वाहिन्यामधील पत्रकारांना विशेष पत्रकारितेबद्दल चौथास्तंभ पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. बीट जर्नालिझमसाठी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी येत्या १०  फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ओम ह्युमन रिसोर्स अकॅडेमीने बीट जर्नालिझमसाठी चौथास्तंभ हा राज्यस्तरीय  पुरस्कार देण्याची परंपरा सुरु केली आहे. दैनिक, साप्ताहिक, मासिकच्या  वार्ताहरापासून ते संपादकापर्यंत कुणीही आपला प्रस्ताव पाठवू शकतो.
वृत्तवाहिनीच्या stringer पासून सर्व जण आपले विशेष coverage पाठवू शकतात.
राजकारण, गुन्हेगारी, कोर्ट, प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका, सहकार, आरोग्य, शिक्षण, कृषी, क्रीडा, उद्योग, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन, पर्यावरण इत्यादी बीट मध्ये पत्रकार काम करतात. जानेवारी २०११ ते डिसेंबर २०११ या वर्षी केलेले वृत्त संकलन,कव्हरेज वैयक्तिक माहिती, फोटो प्रवेशिका म्हणून वरिष्ठांच्या सहीने पाठवावे. निवड समितीच्या निर्णयानुसार सन्मान केला जाईल.
इ मेल आय डी.
ann@apratimmedia.net,
chauthastambh@gmail.com
अधिक माहितीसाठी
९८२२३३७५८२
प्रवेशिका पाठविण्याचा पत्ता -
संयोजक, चौथास्तंभ पुरस्कार,
अप्रतिम मीडिया न्यूज नेटवर्क,
द्वारा- एम जी एम वृत्त पत्र विद्या विभाग,
जे एन ए सी परिसर, सिडको,औरंगाबाद

सोमवार, २३ जानेवारी, २०१२

महोत्सवाच्या हजार पासेससाठी मिडिया बेचैन...

औरंगाबादेत २६ तारखेपासून सुरु होत असलेल्या वेरूळ महोत्सवासाठी समितीने पत्रकारांसाठी १००० पासेस राखीव ठेवल्याची गुप्त बातमी उघड झाल्याने काही अधिकारी संतप्त झाले आहेत. आपल्या 'मर्जी'तील पत्रकारांना झुकते माप देण्याचा त्यांचा उद्देश सफल होणार नाही असे दिसताच त्यांनी ताणतण करण्यास सुरवात केली. रेल्वे स्टेशन रोड वरील आपल्या कार्यालयात बसून मर्जीतील सर्व पत्रकारांना पासेस देऊन उरलेले पासेस इतरांना माहिती कार्यालयामार्फत वाटप करायचे त्यांचे मनसुबे बेरक्यामुळे उधळले गेले आहेत.

दैनिकांच्या वितरणामाणे पासेसची संख्या ठरविन्यात येत असून लोकमतला सर्वाधिक पासेस मिळणार आहेत. विशेष म्हणजे, या वर्षी मराठवाड्यातील सर्व जिल्हा ठिकाणी असणाऱ्या दैनिकांच्या संपादकांनासुद्धा विशेष व्यवस्था करून बोलावण्यात येणार आहे! विभागातील आणि शहरातील मिडीयाला अशा प्रकारे खुश करताना राज्य पातळीवर प्रसिद्धीसाठी समिती साडेपाच लाख रुपये खर्चणार असल्याचे कळते. यामध्ये बाहेरील पत्रकारांचे पंच तारांकित वास्त्यव्य समाविष्ट आहे.

मात्र, महोत्सव दोन दिवसांवर आला असून सुद्धा अजून पासेस आले नसल्याने पत्रकार बेचैन आहेत. हे असेच चालू राहिले तर आपण सह कुटुंब येण्याचे नियोजन कसे करू शकू, असा त्यांचा सवाल आहे. समितीने या साठी खूप उशीर केल्यास वर्तन्कानावर बहिष्कार टाकण्याचा विचार काही जन बोलून दाखवीत आहेत.

दिव्य मराठीचे धुळ्यात लोटांगण ...

निप:क्ष आणि निर्भीड पत्रकारितेच्या गमजा मारत असलेल्या 'दिव्य मराठी'ने धुळ्यात एका 'किरकोळ' माजी महापौरासमोर सपशेल लोटांगण घातले आहे. पहिल्या पानावर जाहीर माफीनामा लिहून दिला आहे. संपादकाचे लक्ष नसले आणि संपादक दुबळा असला की काय होते, याचेच हे द्योतक आहे. यापुढे 'दिव्य'वाल्यांनी नसत्या फुशारक्या मारू नयेत. खरे पाहता 'दिव्य'मध्ये संपादकाचा रोल अतिशय वेगळा मानला जातो. मात्र जळगावातील निवासी संपादकाला धुळ्यात फारच रस आहे. त्यामुळे धुळ्याची जबाबदारी असलेल्या ब्युरो चीफला टांग मारली जात आहे. धुळ्याची जबाबदारी असलेले सुरेश उज्जैनवाल अजूनपर्यंत एकदाही तिकडे फिरकलेले नाहीत. या उलट स्वत: संपादक ५ वेळा धुळ्यात फिरून आलेत. वार्ताहर नेमताना आपल्याला विश्वासात घेतले जात नाही, अशी उज्जैनवाल यांची तक्रार आहे. त्यामुळेच धुळ्यातील चुकीची जबाबदारी स्वीकारायला ते तयार नाहीत. धुळ्याचा संबंधित खुलासा छापताना माफी म्हणून नव्हे तर बातमी म्हणून छापा, असा उज्जैनवाल यांचा आग्रह डावलून संपादकांनी जाहीर लोटांगणं घातले. तिथले प्रमुख त्र्यंबक कापडे हे संपादकांचे खासमखास आणि जुन्या गुन्ह्यातील सहआरोपी आहेत. जळगावात 'दिव्य'चे काही खरे दिसत नाही, हे मात्र खरे!
ब्युरो चीफ यांना सकाळसारखा छुपा खुलासा हवा होता तर संपादकांना जाहीर लोटांगणं!

हाच तो दिव्य खुलासा

माजी महापौरांवर तो गुन्हा नाही
माजी नगरसेवक दिलीप चित्ते यांना झालेल्या मारहाणप्रकरणी सिध्दार्थ भगवान करनकाळ यांच्यासह नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी पान 1 वर प्रसिद्ध झालेल्या बातमीत मजकूर बरोबर असला तरी शिर्षकात नजरचुकीने ‘दिलीप चित्ते यांना मारहाण; माजी महापौरांवर गुन्हा’ असे प्रसिद्ध झाले आहे. तथापि, माजी महापौरांवर या घटनेत कोणताही गुन्हा दाखल नाही. भगवान करनकाळ यांना झालेल्या मनस्तापाबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
-निवासी संपादक

रविवार, २२ जानेवारी, २०१२

पत्रकारांनी लेखणीला विचारांची धार द्यावी : शिंदे

सोलापूर : पत्रकांरानी आत्मचिंतन करण्याची आणि लेखणीला विचारांची धार देऊन समाज बदल करण्याची गरज आहे.  समाज उन्नतीचा ध्यास घेऊन नव्या पत्रकारांनी पत्रकारिता करायला हवी, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने यंदाच्या वर्षीपासून पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य राज्यस्तरीय पुरस्कार आणि बाबुराव जक्कल जिल्हास्तरीय पुरत्तकार वितरणाचे आयोजित करण्यात आले होते.  यंदाच्या वर्षी ज्येष्ठ पुरस्कार प्रताप आसबे (मुंबई) यांना रंगाअण्णा वैद्य राज्यस्तरीय पुरस्कार तर श्रीनिवास दासरी यांना बाबुराव जक्कल जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.  अनुक्रमे रु. २५ हजार व रु. १५ हजार आणि स्मृतीचिन्ह, शाल अशा स्वरूपाचे हे पुरस्कार अ‍ॅम्फी थिएटर येथील समारंभात ना. शिंदे व पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना ना. शिंदे म्हणाले की, श्रमीक पत्रकारसंघाने हा पुरस्कार सुरू करून रंगाअण्णा वैद्य आणि बाबुराव जक्कल यांच्या बाबतची कृतज्ञताच व्यक्त केली आहे.  दूरदृष्टी असणा-या या दोन पत्रमहर्षिंनी पत्रकारीतेच्या माध्यमातून सोलापूरसाठी प्रचंड योगदान दिलेले आहे.  पत्रकार हा अभ्यासक, विश्लेषणात्मक आणि आत्मचिंन करणारा असला पाहिजे हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलेले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री ढोबळे म्हणाले की, रंगाअण्णा व जक्कल यांनी पत्रकारांना खूप मार्गदर्शन केले आहे.  समाजमनाचे बारकावे त्यांनी आपल्या लेखणीतून मांडले.  सतीचं वाण समजून त्यांनी पत्रकारिता केली.
प्रताप आसबे व श्रीनिवास दासरी या दोन्ही सत्कार मुर्तीनंी आपल्या मनोगतातून पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.  याप्रसंगी उल्लेखनीय काम करणा-या विविध माध्यमांच्या प्रतिनीधींचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला.  पुरस्कार निवड समिती सदस्यांनाही गौरवविण्यात आले. या कार्यक्रमास दै.‘सुराज्य’ चे व्यवस्थापकीय संचालक राकेश टोळ्ये, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश गादेकर, अ‍ॅड. मिलींद थोबडे, माजी आ. निर्मला ठोकळ, नगरसेवक उमेश मामड्याल, जयंतराव जक्कल, दिनेश शिंदे, दिपक राजगे, प्रा. कोंडी. प्रा. विलास बेत, दत्ता गायकवाड, शंकर पाटील, जयदीप माने आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

शनिवार, २१ जानेवारी, २०१२

दुःखद निधन

परभणी येथील इ-टीव्ही मराठीचे प्रतिनिधी आणि आमचे पत्रकार मित्र रवी पांगारकर यांचे शुक्रवारी रात्री 10.30 च्या सुमारास हार्ट ऍटॅकनं निधन झालं.ते केवळ 47 वर्षांचे होते.त्यांच्या मागं पत्नी,मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.त्यांच्यावर आज सायंकाळी चार वाजता वसमत येथे अत्यंसंस्कार करण्यात येत आहेत.मुळचे वसमत येथील असलेले पांगारकर यांनी तरूण भारत आणि अन्य काही दैनिकात पत्रकारिता केल्या नंतर ते इलेक्ट्रॉनिक माघ्यमांमध्ये गेले.त्याच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी भंडारा येथील कांचन देशपांडे यांचा ह्दयविकारानं मृत्यू झाला.त्यानंतर नगर येथील पराग चौकारही असेच ह्दयविकाराचे बळी ठरले.आता रवी पांगारकर यांचाही ह्दयविकारानं बळी घेतला आहे.कामाचा ताण,अवेळी जेवण,रात्रीची जाग्रणं,व्यायामाचा अभाव,सततची धावपळ यासाऱ्याचा पत्रकारांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यांचं दिसून येत आहे.पत्रकारितेची नशा असते.या धुंदीत काम करीत असताना बहुसंख्य पत्रकारांचे आपल्या आरोग्याकडं दुर्लक्ष होतं.त्याचे परिणाम त्याच्या कुटुंबाना भोगावे लागतात.तुटपुंजे उत्पन्न आणि अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणाऱ्या पत्रकारांवर अचानक असा काही प्रसंग आढावला तर त्याच्या माघारी सारे कुटुंब रस्त्यावर येण्याची भिती असते.अशी काही उदाहऱणं माझ्याकडं आहेत.
सरकारला या सर्वाची चिंता असण्याचं कारण नाही.पत्रकार पेन्शन योजना सुरू करावी अशी मागणी करून करून आम्हा हतबल झालोत सरकार ढम्म आहे.आमच्या सततच्या पाठपुराव्या नंतर सरकारनं शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निघी सुरू केली खरी पण या समितीच्या बैठकाच नियमित होत नाहीत आणि जी रक्कम गरजू पत्रकारांना दिली जाते ती अपुरी तर आहेच आणि त्यासाठी शंभर सोपस्कार पूर्ण करावे लागतात त्यामुळं ही योजना असून नसल्यासारखीच आहे.सरकार पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा करीत नाही आणि पत्रकारांच्या जीवन-मरणाबद्दलही सरकारला काही देणं घेणं नाही.समाजासाठी आय़ुष्यभर खास्ता खाणारे पत्रकार वेळ येते तेव्हा खरोखरच एकटे पडतात हे अनेकदा दिसून आलं आहे.आता पत्रकार संघंटनांनीच मोठा निधी जमा करून आपल्या सदस्यांच्या मदतीसाठी काही योजना आखण्याची गरज आहे.त्यासाठी साऱ्यांनी एकत्र येऊन याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे.अन्यथा देशपांडे,चौकार.पांगारकर यांच्यानंतर कोणाचा नंबर लागेल ते सांगता येणार नाही.
रवी पांगारकर यांच्या कुटुंबियांना सरकारनं आर्थिक मदत करावी अशी मराठी पत्रकार परिषद मागणी करीत आहे.
 
एस.एम.देशमुख 

शुक्रवार, २० जानेवारी, २०१२

म. टा. धमाल... जुळ्या फोटोंची कमाल...

औरंगाबाद - २१ रुपयात वाचकांना काय देऊ आणि काय नाही, असे म. टा. ला झाले आहे. १९ तारखेच्या अंकात जुळ्या फोटोंचा अफलातून प्रयोग त्यांनी वाचकांसाठी पेश केला आहे. पान क्र. १० आणि ११ या पानांवर ही गम्मत आपणास पहायास मिळेल. काही खोडसाळ याला रिपिटेशन म्हणतात. पण हुबेहूब सारखे फोटो काढणाऱ्या छायाचित्रकरांच्या कलेची त्यांना किंमत नाही!!!!! ती म. टा. ला आहे. त्यामुळे एक फोटो पुण्याच्या फोटोग्राफरने तर दुसरा औरंगाबादच्या फोटोग्राफरने काढला. आता योगायोग म्हणजे, दोघ्यांच्याही फोटोला सारखीच कॅप्शन्स आहेत. दोघांचे शीर्षक सुद्धा सारखे आहे...आम्ही याचा पुरावा सुद्धा सोबत जोडला आहे. वाचा आणि आनंद घ्या.

गुरुवार, १९ जानेवारी, २०१२

लोकमत कार्यालयावर झालेल्या हल्ल्याची क्षणचित्रे

जळगाव - लोकमतच्या जळगाव आवृत्तीत माता न तू वैरिणी ही वादग्रस्त बातमी दिल्यामुळे संतप्त जमावाने शहर कार्यालयावर हल्ला करून, कार्यालयाची मोडतोड केली, तसेच क्राईम रिपार्टरची बारी आल्यामुळे त्याला कार्यालयाच्या बाहेर खेचून मारहाण केली.
जळगाव शहरातील कोळी समाजातील एका मातेने आपल्या मुलीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले, अशी बातमी लोकमतच्या क्राईम रिपोर्टरने दिली होती.ही बातमी कपालेकल्पीत व चुकीच्या माहितीच्या आधारावर असल्याचे या समाजाचे म्हणणे आहे. त्यामुळे संपप्त तरूणांनी लोकमतच्या शहर कार्यालयावर हल्ला करून, आतील सामानाची मोडतोड केली.दैनिक लोकमतचा निषेध करणारा फलक महर्षी वाल्मीक तरूण सांस्कृतिक मंडळाने लावला होता.
वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला करणे, ही गोष्ट निषेधार्थ आहे, त्याचे आम्ही कधीही समर्थन करणार नाही.परंतु हल्ला का झाला, याचे आत्मपरिक्षणही करण्याची गरज आहे. लोकमतवाले यातून बोध घेतील, अशी अपेक्षा आहे. चुकीचे वृत्त देणाऱ्या बारीवर आता लोकमत काय कारवाई करणार, याकडे लक्ष वेधले आहे.

अधिक छायाचित्रे आमच्या फेसबुकवर पहा....

म.टा.ने कापला दिव्य मराठीचा दोर,पक्षी गेले उडत...

औरंगाबाद -  नव्यानेच दाखल झालेल्या महाराष्ट्र टाइम्सने मार्केटींगसाठी  मकर  संक्रांततीच्या मुहूर्तावर औरंगाबादेत पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते. तर दिव्य मराठीने चला करूया पक्षांना मदत हे अभियान ठेवले होते.

पतंग उडवताना दोर अडकल्यामुळे जर पक्षी जखमी झाले तर पक्षीप्रेमींना कळवा, असे आवाहन दिव्य मराठीने केले होते.त्यासाठी त्यांनी काही पक्षी मित्रांचे मोबाईल नंबरही दिले होते.या संदर्भातील जाहिरात त्यांनी दिव्य सिटीच्या पानावर दि.14 जानेवारीपर्यंत दिली होती.परंतु दिव्य मराठीने ऐन मकर संक्रांत दिवशी पलटी मारली.त्यांनी चक्क चला करूया पक्षांना मदतऐवजी पतंग महोत्सवाचे आयोजन केले.त्याची भली मोठी बातमी दिव्य सिटीमध्ये दि.16 जानेवारी रोजी प्रसिध्द झाली आहे.ऐकीकडे पतंगामुळे पक्षी जखमी होतात म्हणायचे आणि दुसरीकडे म.टा.ला शह देण्यासाठी पतंग महोत्सव आयोजित करायचे, ही दिव्य मराठीचे डुप्लीकेट पॉलीशीच म्हणावी लागेल.विशेष म्हणजे दिव्य मराठीच्या आजपर्यंतच्या अंकात एकही पक्षी जखमी झाला किंवा त्यांना मदत केल्याची सिंगल कॉलमही बातमी नाही.
दर्डाचा लोकमत पेपर दिव्य मराठीची कॉपी करतो म्हणून बोंब ठोकणाऱ्या दिव्य मराठीने म.टा.ची पतंग महोत्सवाची कॉपी करून, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे दाखवून दिले होते. म.टा.च्या पतंग महोत्सवाला जेवढा प्रतिसाद मिळाला, त्याच्या एक टक्काही प्रतिसाद दिव्य मराठीच्या पतंग महोत्सवाला मिळाला नाही, हा भाग वेगळा असला तरी म.टा.ने पतंग महोत्सवात दिव्य मराठीने दोर कापल्यामुळे पक्षी उडून गेले... ऐवढे मात्र नक्की !

जळगाव लोकमतचे शहर कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले

जळगाव - चुकीची बातमी देउन एका निष्पाप मातेला मानसिक त्रास दिला. कॉलनीतील लोक कोणत्याही नेत्याशिवाय एकत्र आले. उतावीळपणे बातमी देणारा वार्ताहर क्राईम रिपोर्टर विलास बारी याला कार्यालयातून खेचून त्या मातेच्या घरी नेले. सोबत ही खोटी बातमी पुरविणारा शनिपेठ पोलीस स्टेशन चा निरीक्षक नागेश जाधव होता. लोकमत जळगावचे आता काही खरे नाही.  संपादक सुधीर महाजन अजून सोलापूर विसरायला तयार नाहीत. ते जळगावात रमलेलेच नाहीत. त्यातच त्यांची नागपूरला बदली करायचे व्यवस्थापनाने ठरविल्याने ते पुन्हा ह्र्द्याविकाराचे कारण सांगून २-३/३-३ दिवस कार्यालयात येत नाहीत. कुणीही लक्ष देणारा माणूस नाही. आता विजय बाविस्कर पुण्याहून पुन्हा जळगावात येण्याची शक्यता आहे.

हीच ती वादग्रस्त बातमी
माता न तू वैरीणी! 

मंगळवार, १७ जानेवारी, २०१२

'लोकमत'चे अखेर वृत्तपत्र विक्रेत्यासमोर गुडघे टेकले

सोलापूर - वाचकांना 270 रूपयात 6 महिने अंक ही स्कीम लोकमतने सुरू केली खरी परंतु विक्रेत्यांच्या कमिशनमुळे लोकमतची मंगळवारी कोंडी झाली झाली होती. अखेर विक्रेत्यांना प्रती महिना एका अंकामागे 37 रूपये कमिशन सुरू देण्याचे कबूल केल्यानंतर विक्रेत्यांनी लोकमतचा अंक उचलला .विक्रेत्यापुढे लोकमतला अक्षरश: गुडघे टेकवावे लागले...
दिव्य मराठीच्या लॉंचिंगच्या पार्श्वभूमीवर लोकमतने  कँपिंयन सुरू केली आहे.270 रूपयात सहा महिने अंक ही स्कीम सुरू केली आहे.परंतु त्यांनी विक्रेत्यांना कमिशन कमी ठेवले होते.विके्रत्यांनी प्रती महिना एका अंकास 37 रूपये कमिशन मागितल्यानंतर लोकमत प्रशासनाने कमिशन वाढवून देण्यास नकार दिला.त्यामुळे लोकमतचा अंक न उचलण्याचा निर्णय विक्रेत्यांनी घेतला होता.त्यानुसार विक्रेत्यांनी मंगळवारी पहाटे लोकमतचा अंकच उचलला नाही व त्याजागी सकाळ, संचार, सुराज्य टाकले. विक्रेत्यांनी लोकमतवर बहिष्कार घातल्यामुळे सकाळ, संचार व सुराज्यने जादा अंक छापले होते. अंक वाढीची आयती संधी त्यांना मिळाली. तिकडे कधीच कॅबिनच्या बाहेर न पडणारे सरव्यवस्थापक निनाद देसाई आपली टीम घेवून रस्त्यावर उतरले.त्यांनी ठिकठिकाणी लोकमतचे स्टॉल लावून चक्क 1 रूपयात अंक विकला.परंतु हे किती दिवस चालणार म्हणून लोकमतने अखेर प्रती अंक प्रती महिना 37 रूपये कमिशन देण्याचा निर्णय घेतला व त्यानंतर विक्रेत्यांनी लोकमतवरील आपला बहिष्कार मागे घेतला.
लोकमत व व्‌त्तपञ विकेत्यांची स. १० वा. भर दत्त चौकात चर्चा झाली आणि लोकमतने विकेत्यांना अंकामागे ३७ रु कमिशन देण्याचे मान्य केले. या चर्चेत लोकमतचे निनाद देसाई, आवारे, खोत व इतर कर्मचारी वर्ग तर जवळपास २०० विकेते उपस्थित होते. मागण्या मान्य झाल्यावर विकेत्याकङून देसाई, आवारे. खोत यांचा सत्कार करुन फटाक्याच्या आतिषबाजीने जल्लोष करण्यात आला.

जाता - जाता : सोलापुरात विक्रेत्यांत लाड व शिंदे असे दोन गट आहेत.लोकमतने शिंदे गटाच्या काही विक्रेत्यांना फोडण्याचा प्रयत्न केला,परंतु लाड गटाने लोकमतचे लाड न पुरविल्यामुळे लोकमतला अखेर विक्रेत्यापुढे गुडघे टेकवावे लागले...

रविवार, १५ जानेवारी, २०१२

सोलापुरात दिव्य मराठीचे बॅनर फाडणारा कोण ?

सोलापूर - सोलापूर शहरात चौका - चौकात लागलेले दिव्य मराठीचे डिजीटल बॅनर रात्रीच्या वेळी फाडले जात असून, बॅनर फाडणाऱ्यांचा बोलविता धनी कोण आहे, याची चर्चा सध्या चालू आहे.
सोलापूरात लवकरच दिव्य मराठीचे आगमन होत आहे. या आगमनाच्या पार्श्वभूमीवर दिव्य मराठीने जाहिरात बाजी सुरू केली आहे.तुमची मर्जी जाणून घ्यायला येतोय, दिव्य मराठी असे डिजीटल बोर्ड शहरातील चौका - चौकात झळकू लागले आहेत.त्यामुळे सोलापुरातील काही प्रस्थापित दैनिके हादरली आहेत. त्यातून हीन प्रकारचे राजकारण सुरू झाले आहे.
सोलापुरात लागलेले दिव्य मराठीचे डिजीटल बॅनर रात्रीच्या वेळी फाडले जात आहेत.गेल्या दोन दिवसांत पाच ठिकाणचे बॅनर फाडल्याची माहिती आमच्याकडे आली आहे. त्याचा भक्कम पुरावा असणारे हे फाडलेले बॅनर रंगभुवन परिसरातील आहे.असे थर्ड क्लासचे राजकारण कोणते वृत्तपत्र करू शकते,याची उघड चर्चा चालू आहे. दिव्य मराठीने यासंदर्भात पोलीसांत तक्रार नोंदविल्याचेही वृत्त आहे.

गुरुवार, १२ जानेवारी, २०१२

सोलापुरात डिजीटल बॅनर युध्द पेटले


सोलापूर - जिथे दिव्य मराठी तिथे दिव्य मराठी व लोकमतमध्ये डिजीटल बॅनर युध्द पेटत असते. सोलापुरात मात्र उलटे घडले आहे. या युध्दात लोकमतऐवजी सोलापूर सुराज्यने मोठी उडी घेतली आहे.
दिव्य मराठीने सोलापूरात पाऊल ठेवताना नेहमीचाच सप्पक मॅटर वापरला आहे.तुमची मर्जी जाणून घ्यायला येतोय...हे नेहमीचेच वाक्य दिव्य मराठीने वापरले असले तरी औरंगाबाद, नाशिक आणि जळगावात सध्या कोणाची मर्जी चालते,हे वाचकांनी अनुभवले आहे.उलट सुराज्यने झणझणीत मॅटर वापरून अस्सल सोलापुरी ओळख करून दिली आहे.
सोलापूरचे ग्रामदैवत सिध्दरामेश्वराची गड्डा यात्रा लवकरच सुरू होत आहे. सोलापूरची गड्डा यात्रा, सोलापुरी चादर व सोलापूरची शेंगा चटणी महाराष्ट्रात  प्रसिध्द आहे.त्याचा जाहीरातीत वापर करून करून सोलापूर सुराज्यने अस्सल सोलापुरी दैनिक अशी जाहीरातबाजी सुरू केली आहे..शहरातील चौकाचौकात दिव्य मराठीच्या तोडीस तोड सुराज्यचे डिटीटल बॅनर झळकू लागले आहेत.
लोकमतला मात्र जागाच शिल्लक नाही. सकाळ नेहमीप्रमाणे थंड आहे. सोलापूरचे जुने दैनिक संचारने बॅनर युध्दात भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ताजा कलम : दिव्य मराठीच्या आगमनामुळे सोलापूरच्या वृत्तपत्र कर्मचा-यांना चांगले दिवस येत आहेत.

दिव्य मराठीचा निवासी संपादक कोण ?

सोलापूर - दिव्य मराठीच्या निवासी संपादकपदी कोणाची नेमणूक होणार, याकडे सोलापूर जिल्ह्यातील वृत्तपत्र सृष्टीतील लोकांचे लक्ष वेधले आहे.
औरंगाबादला धनंजय लांबे, नाशिकला जयप्रकाश पवार, जळगावला दिपक पटवे यांची नेमणूक पाहता दिव्य मराठीचे नेमके काय धोरण काय आहे, त्यांना कशा प्रकराचा निवासी संपादक लागतो,याचे उत्तर देणे अवघड आहे.
सोलापूरच्या निवासी संपादक पदासाठी अरूण खोरे, संजय आवटे, हरिश केंची यांची नावे चर्चेत होती. आता तिन्ही नावे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मागे पडली आहेत. आता लोकमतने डच्चू दिलेले व पुढारीने स्वीकारलेले शांतकुमार मोरे यांचे नाव आघाडीवर आहे. लोकमतचे प्रेमदास राठोड यांना फोडण्याचाही प्रयत्न चालू आहे. सकाळचे दयानंद माने यांनाही चाचपण्याचा प्रयत्न झाला, मानेंवर सकाळमध्ये उत्तम आशिर्वाद लाभल्यामुळे त्यांनी नकार दिल्याचे समजते.आता नाईलाज म्हणून मोरेंचे एकमेव नाव शिल्लक आहे. नाहीतर सकाळ सोडून दिव्य मराठीत जॉईन झालेले संजीव पिंपरकर यांनाही ऐनवेळी लॉटरी लागू शकते.

जाता - जाता  : दिव्य मराठीच्या निवासी संपादकपदी शांत माणसाची नेमणूक झाल्यास दिव्याची वाट लागू शकते.कारण सोलापूरला झणझणीत ठेचा लागतो.ती क्षमता शांत माणसात असू शकत नाही...

बुधवार, ११ जानेवारी, २०१२

म. टा. चे पितळ उघडे

महाराष्ट्र टाईम्सने मोठा गाजावाजा करत औरंगाबाद आवृत्ती सुरु केली. लोकांना वाटले काहीतरी दर्जेदार वाचायला मिळेल. पण दर्जेदार सोडाच आहे तेही व्यवस्थित देण्यात म.टा.ला अपयश आले आहे. 'आकर्षक' पगार देऊन धुरंधर वार्ताहर भरले म्हणे, पण त्यातील अनेकांना पत्रकारिता कशाशी खातात तेही माहित नाहीये. असो हा प्रदीर्घ चर्चेचा विषय आहे.

आज पुन्हा एकदा म.टा.चे पितळ उघडे पडले. कडा येथे मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन काल झाले. म.टा.ने बातमीत कौतिकराव ठाले पाटलांचे नाव ढाले पाटील, दादा गोरे यांचे नाव दादा गिरी आणि अतकरे यांचे नाव आतकरे असे छापले आहे. ठाले, गोरे, अतकरे यांचे नाव माहीत असलेले म.टा.तील धुरीन्नानी हे पहिले नाही आणि म.टा.ची नाचक्की झाली.

वाचकांनी त्यांच्याकडून जास्त अपेक्षा करू नयेत. २१ रुपयात ४ महिने केवळ रद्दीच मिळू शकते, पेपर नाही

म. टा. ने केली चोरी
म.टा.च्या रविवारच्या अंकात सचिन तेंडुलकरवर कुणा गिरीधर नामे इसमाने लेख लिवलाय म्हणे. पण हे महाशय शैली कॉपी करत आहेत, हे आम्हाला आवर्जून सांगायचे आहे. उभ्या (अन आडव्याही) महाराष्ट्राला बब्रुवान रुद्रकंठावार या नावाने परिचित असलेले लेखक धनंजय चिंचोलीकर यांनी आपल्या 'पुन्यांदा चबढब ' या स्तंभातून बब्र्या आणि दोस्त ही पात्रे फेमस केली. 'बर्ट्रांड रसेल विथ देसी फिलोसोफी', 'न घेतलेल्या मुलाखती'  ही त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. तथापि, चिंचोलीकर यांची शैली पांडेने जशीच्या तशी उचलली आहे. नुसती शैलीच नव्हे तर दोस्त हे पात्रही पांडेने चोरले आहे. या पांडेने औरंगाबादला असताना प्रश्नपत्रिकेची मुलाखत ही नाटुकली लिहिली होती, त्यातही त्याने हीच शैली वापरली होती. 

जाता - जाता : पुणे महाराष्ट्र टाइम्स मधील कर्मचारी आशीष पेंडसे यांच्या वर नाराज. आशीष पेंडसे त्यांचेच चालवतात. ते कोणाचेच ऐकुन घेत नाहीत. संपादक पराग करंदीकर, सह संपादक श्रीधर लोणी हे आशीष पेंडसे यांचे सहकारी असल्याने दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न कर्मचार्यांना पडला आहे. श्रीपाद ब्रम्हे ह्याना आपल्या शंका निरसन करण्यासाठी प्राधान्य दिले  जात आहे. धनंजय जाधव यानाकार्यालयीन कम क़ज़ा पासून वेगले ठेवले जात आहे. 

शनिवार, ७ जानेवारी, २०१२

समाजातील नैराश्‍य पत्रकारांनी दूर करावे - भय्यूजी

एस. एम. जोशी सभागृह - "सकाळ माध्यम समूहा'चे कार्यकारी संपादक (राजकीय) गोविंद घोळवे यांना भय्यूजी महाराजांच्या हस्ते शुक्रवारी "राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारा'ने गौरविण्यात आले.
पुणे - 'जातीयवाद, हिंसाचार, बेरोजगारी यामुळे आपल्या समाजामध्ये नैराश्‍याची भावना निर्माण होत आहे. माणसांच्या मनामधील ही नकारात्मक भावना दूर करण्यासाठी पत्रकारांनी चातुर्य आणि विनम्रतेने आपल्या लेखणीच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी समाजासमोर आणणे गरजेचे आहे,'' असे मत आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी व्यक्त केले.

राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणारा पहिला "राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार' भय्यूजी महाराज यांच्या हस्ते "सकाळ माध्यम समूहा'चे कार्यकारी संपादक (राजकीय) गोविंद घोळवे यांना शुक्रवारी प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे, निर्माते मेघराजराजे भोसले, इम्पाचे संचालक विकास पाटील, संघाचे राज्याचे अध्यक्ष गणेश जोशी, संघटक संजय भोकरे, उपाध्यक्ष अरुण लोणकर व शहराध्यक्ष संजय दिनकर या वेळी उपस्थित होते.

भय्यूजी महाराज म्हणाले, 'माणुसकीची वेगवेगळी रूपे दाखविण्याचे काम पूर्वी ग्रंथांद्वारे होत असे. बदलत्या काळानुसार आता हेच कार्य वृत्तपत्रसृष्टी करत आहे. पत्रकार म्हणजे संवेदना असून तिची अभिव्यक्ती म्हणून पत्रकारिता ओळखली जाते. बाजारवादाच्या प्रभावाखाली आल्याने आता तिचे सकारात्मक व नकारात्मक असे विभाग निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आत्म्याचे बळ लाभलेल्या पत्रकारितेकडून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची वेळ आली आहे.''

घोळवे म्हणाले, 'पत्रकारांनी स्वतःमधील नकारात्मक दृष्टिकोन दूर ठेवावा. एकत्रित आल्याशिवाय त्यांच्या प्रश्‍नांना न्याय मिळणार नाही. नकारात्मक गोष्टींनाच प्राधान्य मिळत असल्याने पत्रकारितेची विश्‍वासार्हता कमी होत आहे. हा प्रश्‍न गंभीर असून सर्वांनी आत्मचिंतन करणे आवश्‍यक आहे. एकमेकांचे पाय ओढण्याची मनोवृत्ती बाजूला ठेवून आता जांभेकर, टिळक, अत्रे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवेचा दिलेला वसा पुढे चालविण्याची वेळ आली आहे. माणूस मोठा झाल्यावर निंदा होते; मात्र "निंदकाचे घर असावे शेजारी' हे संतवचन लक्षात घेऊन कार्य करत राहावे.''

पत्रकारितेसाठी सतीश डोंगरे, सूर्यकांत भिसे, नितीन शहा, धारणा राठी व सुदेश गिरमे यांना; तर प्रशासकीय सेवेसाठी भूमी अभिलेखचे संचालक चंद्रकांत दळवी, बारामतीचे कार्यकारी अभियंता उद्धव मोरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अभिनेता व दिग्दर्शक मकरंद अनासपुरे, मनोज जोशी, विद्याधर जोशी, अतुल कांबळे, संतोष जुवेकर व संजय ठुबे यांना; तर उल्लेखनीय जाहिरात सेवेसाठी दिनकर शिलेदार यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मकरंद अनासपुरे, मनोज जोशी यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भोकरे यांनी प्रास्ताविक केले. संगीतकार हर्षित अभिराज व निखिल महामुनी यांनी विविध गीते सादर केली. संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. शरद लोणकर यांनी आभार मानले.

शुक्रवार, ६ जानेवारी, २०१२

मराठी पत्रकार दिन दिल्लीत रंगला हिंदीत!

नवी दिल्ली - मराठी पत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना राजधानीत चक्क आज हिंदीतून आदरांजली वाहण्यात आली! निमित्त होते मराठी पत्रकार दिनाचे. महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीतील परिचय केंद्राच्या स्थापनादिनी झालेल्या या कार्यक्रमात किमान नव्वद टक्के अस्सल मराठी लोक असूनही केवळ एका पाहुण्यासाठी संपूर्ण कार्यक्रम हिंदीतून रेटण्याचा अट्टहास करण्यात आला.

दिल्लीत महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे मराठी पत्रकार दिन साजरा झाला. मात्र, यासाठी तयार केलेल्या फलकावरील "निमित्य'सारख्या शब्दांपासूनच राजधानीतील मराठीच्या परिस्थितीचे दर्शन घडायला सुरवात झाली. या कार्यक्रमाला दिल्ली मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक वानखेडे व पत्रकार अनिल शर्मा प्रमुख पाहुणे होते. शर्मा यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजकांनी हिंदीतून रेटल्याचे वारंवार जाणवत होते. मूळच्या पंजाबी असलेल्या परिचय केंद्राच्या अधिकारी अमरज्योत अरोरा यांनीही आवर्जून मराठीतच बोलण्याचा निर्णय अमलात आणला. मात्र, महाराष्ट्राच्या उपसंचालकांसह सगळे जण उपस्थित मराठी भाषकांना मराठी पत्रकारितेचे महत्त्व चक्क हिंदीतून समजावून सांगत होते. विशेष म्हणजे मुख्य कार्यक्रमानंतरच्या अनौपचारिक चर्चेचा सूरही हिंदीच राहिला तेव्हा "मराठी पत्रकारदिनी तरी मराठीत बोला,' असे काही उपस्थितांना सांगावे लागले!

शर्मा यांनी माध्यमांच्या म्हणजेच लेखणीच्या क्रांतीची भारतात सर्वाधिक गरज असल्याचे सांगितले. वानखेडे यांनी आपल्या तिरकस शैलीत विकास पत्रकारितेला आज जागाच उरली नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. मोठी वृत्तपत्रे किंवा बड्या वाहिन्यांचे "इंटरेस्ट' वेगळे असतात हे मान्य केले तरी समाजात चांगल्या घटनांच्या बातम्या देण्यास कोणीही संपादक किंवा मालक नाही म्हणत नाही. मात्र, बाबा आमटेंच्या वंशजांच्या वृत्ताला जागा द्यायची की कतरिना कैफ पाय घसरून कोठे पडली याची बातमी करायची याचे तारतम्य पत्रकारांनी बाळगले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. उपसंचालक गणेश रामदासी यांनी प्रास्ताविक केले.

"पाकीट' संस्कृती नाही!
महाराष्ट्रातील मंत्री वा नेत्यांना दिल्लीतील पत्रकारांकडून अद्याप "पाकिटांसाठी' त्रास होत नाही असे उल्लेखनीय व अभिमानास्पद असल्याचे वानखेडे यांनी नमूद केले. त्याच वेळी किमान महाराष्ट्र सदनात मराठी खाद्यपदार्थ सातत्याने व वाजवी दरात मिळावेत तसेच मराठी पत्रकारांना राज्य शासनाची अधिस्वीकृती पत्रे लवकर मिळावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

गुरुवार, ५ जानेवारी, २०१२

चौथा स्तंभ पत्रकारिता पुरस्कार- २०१२ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

औरंगाबाद - ओम ह्युमन रिसोर्स अकॅडेमी, एम. जी. एम. वृत्तपत्र विद्या विभाग आणि अप्रतिम मीडिया न्यूज नेटवर्क यांच्या वतीने दैनिके व वृत्त वाहिन्यामधील पत्रकारांना विशेष पत्रकारितेबद्दल चौथास्तंभ पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
बीट जर्नालिझम साठी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी येत्या २५ जानेवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.ओम ह्युमन रिसोर्स अकॅडेमीने बीट जर्नालिझम साठी चौथास्तंभ हा राज्यस्तरीय  पुरस्कार देण्याची परंपरा सुरु केली आहे.
राजकारण, गुन्हेगारी, कोर्ट, प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका, सहकार, आरोग्य, शिक्षण, कृषी, क्रीडा, उद्योग, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन, पर्यावरण इत्यादी बीट मध्ये काम करतात. जानेवारी २०११ ते डिसेंबर २०११ या वर्षी केलेले वृत्त संकलन,कव्हरेज वैयक्तिक माहिती, फोटो प्रवेशिका म्हणून वरिष्ठांच्या सहीने पाठवावे. निवड समितीच्या निर्णयानुसार सन्मान केला जाईल.
संपर्क -
संयोजक, चौथास्तंभ पुरस्कार,
अप्रतिम मीडिया न्यूज नेटवर्क,
द्वारा- एम जी एम वृत्त पत्र विद्या विभाग,
जे एन ए सी परिसर, सिडको,औरंगाबाद

Email - ann@apratimmedia.net,chauthastambh@gmail.com
Mobile - ९८२२३३७५८२

पत्रकारितेचा आगामी काळ कठीणच - गर्ग

पुण्यातील केसरी मराठा विश्वस्त ट्रस्टतर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार दैनिक भास्करचे समूह संपादक र्शवण गर्ग यांना ट्रस्टचे विश्वस्त डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते बुधवारी एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. या वेळी (डावीकडून) मंजू गर्ग, र्शवण गर्ग, डॉ. टिळक, रोहित टिळक, एस. के. कुलकर्र्णी उपस्थित होते.
पुणे - इंग्रजांविरुद्ध स्वराज्य आणि स्वदेशीचा नारा देणार्‍या आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून जनमत जागृत करणार्‍या लोकमान्य टिळकांच्या नावाने दिला जाणारा राष्ट्रीय पत्रकारितेचा पुरस्कार मिळणे हा माझ्या आयुष्यातील अत्युच्च क्षण आहे, असे भावोद्गार दैनिक ‘भास्कर’चे समूह संपादक र्शवण गर्ग यांनी बुधवारी सत्काराला उत्तर देताना काढले. राजकारण आणि माध्यमांचा आजचा जो चेहरा दिसतो तो खरा नाही. सध्या माध्यमांवर सगळ्या प्रकारे अंकुश आणण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. त्यामुळे पत्रकारितेसाठी आगामी काळ कठीण आहे, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.

लोकमान्य टिळक संस्थेतर्फे गेल्या तीन वर्षांपासून दैनिक ‘केसरी’च्या वर्धापन दिनानिमित्ताने देशातील प्रतिष्ठित पत्रकारांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्काराने गौरवण्यात येते. यंदा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार र्शवण गर्ग यांना जाहीर झाला होते. पुणे येथील टिळकवाड्यातील पटांगणात आयोजित भव्य समारंभात केसरीचे विश्वस्त दीपक टिळक यांच्या हस्ते गर्ग यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी गर्ग यांच्या पत्नी मंजू गर्ग, मोहन धारिया, रोहित टिळक, शां. ब. मुजुमदार, डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. नागनाथ धर्माधिकारी, दाजीकाका गाडगीळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रणती टिळक यांनी गौरवमूर्तींचा परिचय करून दिला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर र्शवण गर्ग म्हणाले, आजच्या सोहळय़ाच्या निमित्ताने मला असे वाटते की, मी एखाद्या तीर्थयात्रेवर आहे. केसरीच्या निमित्ताने मी देशाच्या स्वातंत्र्याची तीर्थयात्रा करीत आहे. नारायण पेठेत स्वातंत्र्याच्या अनेक गाथा आहेत. मोनालिसाच्या चित्रातील रहस्य ज्याप्रमाणे उकलण्याचा प्रयत्न होत आहे त्याचप्रमाणे नारायण पेठेतील कथांचेही रहस्य उलगडले पाहिजे. 

कामाचे खरे मूल्यांकन झाले

गर्ग पुढे म्हणाले की, मी गेल्या 40 वर्षांपासून पत्रकारितेत आहे. माझ्या कामाचे कधी इतक्या उत्कृष्ट पद्धतीने मूल्यांकन होईल असे मला वाटले नव्हते आणि मी कधी ते स्वप्नही पाहिले नव्हते. मात्र, आज माझ्या कामाचे खरे मूल्यांकन झाले, असे मला वाटते. या पुरस्कारामुळे माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे. लोकमान्य टिळकांच्या पत्रकारितेची आज खरी गरज असल्याचे मतही त्यांनी विशद केले.  

  
अक्षर वाड्मयचे प्रकाशन

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराबद्दल दीपक टिळक यांनी माहिती दिली. तसेच लोकमान्य टिळकांच्या पत्रकारितेचा आढावा घेत सध्या माध्यमापुढील आव्हाने त्यांनी याप्रसंगी विशद केली. लोकमान्य टिळकांच्या अग्रलेखावर आधारित व एस. के. कुलकर्णी द्वारा संपादित ‘अक्षर वाड्मय’ पुस्तकाचे प्रकाशनही र्शवण गर्ग यांच्या हस्ते या कार्यक्रमात करण्यात आले.
 

बुधवार, ४ जानेवारी, २०१२

सोलापूर महापालिकेबरोबर वृत्तपत्र सृष्टीतही रणधुमाळी

सोलापूर - दिव्य मराठीची सोलापूर आवृत्ती मार्चअखेर सुरू होत आहे.पण तत्पुर्वीच अंक देता येईल का, याचीही चाचपणी चालू आहे. कारण सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक येत्या १६ फेब्रुवारी रोजी होत आहे.महानगर पालिकेच्या रणधुमाळीत सोलापूरच्या वृत्तपत्र जगतातही आता रणधुमाळी सुरू होणार आहे.
आता आपली मर्जी जाणून घेण्यासाठी येत आहे...दिव्य मराठी असे डिजीटल फलक सोलापूरच्या चौका - चौकात झळकू लागले आहेत.टीमच्या शोधासाठी स्टेट इडिटर अभिलाष खांडेकर बुधवारपासून हॉटेल त्रिपुरसुंदरीत ठाण मांडून आहेत. सकाळमध्ये विवेकच्या छळाला कंटाळून गेल्या काही दिवसापासून रजेवर असलेले संजीव पिंपकरकर दिव्याच्या आश्रयाच्या प्रयत्नात आहेत.त्यांना सकाळप्रमाणेच वृत्तसंपादक म्हणून जबाबादारी मिळण्याची शक्यता आहे.पॅकेज मात्र सकाळपेक्षा मोठे आहे.
पुढारीत चौधरीच्या गेमला बळी ठरलेले अभय दिवाणजी काही दिवसांपुर्वीच सकाळमध्ये जॉईन झाले आहेत.मात्र दिव्य मराठी येताच त्यांचे मनही चलबिचल होवू लागले आहे.ते दिव्य मराठीच्या संपर्कात असले तरी पिंपरकरमुळे त्यांना आता वृत्तसंपादकपद मिळणार नाही.फार तर ब्युरो चिफपद मिळेल.पॅकेज मात्र सकाळपेक्षा मोठे असेल.
पिंपरकरप्रमाणे विवेकच्या अन्यायाला कंटाळलेले उपसंपादक यशवंत पोफळे यांनी बुधवारी (शिफारस : यमाजी मालकर ) खांडेकरांची भेट घेतली.सकाळमध्ये त्यांना १७ हजार पगार आहे.दिव्याने त्यांना २५ हजार देवू केले आहेत. तसेच वरिष्ठ उपसंपादक म्हणून पद देण्याची ग्वाही दिली आहे.मात्र पोंपळेंचे तळ्यात-मळ्यात चालू आहे.गेल्या अनेक दिवसांपासून सकाळमध्ये उपसंपादक म्हणून काम करणारे राजाराम कानतोडे हेही आता सकाळचा कान तोडून दिव्यात एन्ट्री करण्याच्या तयारीत आहेत.
जिथे दिव्य मराठी, तिथे सकाळला फटका हे गणित ठरलेले आहे.यमाजी मालकर सकाळवर बंदूक रोखून आहेत.आतापर्यंत त्यांच्या गळाला पिंपरकर लागले आहेत.पोपळे, कानतोडे हेही लागतील.तसेच सर्व असंतुष्ट गट दिव्य मराठीत जाण्याची शक्यता आहे.
सकाळ पाठोपाठ लोकमत, संचारचे कर्मचारी दिव्य मराठीच्या संपर्कात आहेत.मात्र सोलापुरात फार तर २५ जणांचा संपादकीय स्टॉप राहणार आहे.कारण सोलापूर शहरासाठी फार तर ४ किंवा ६ पाने राहणार आहेत.जिल्ह्यासाठी फार तर ४ पाने वेगळी राहणार आहेत.
मुळ अंक १२ पाने प्लस सोलापूर शहरासाठी ४ किंवा ६ पाने असे १६ ते १८ पानांचा अंक राहणार आहे.आठवड्यातून तीन कॉमन पुरवण्या राहणार आहेत.सोलापूर आवृत्ती लाँचिंग झाल्यानंतर उस्मानाबाद, लातूर  जिल्ह्यासाठी सोलापुरातूनच अंक प्रिंट होणार आहे.

सोमवार, २ जानेवारी, २०१२

'सनसनाटी बातम्यांपासून माध्यमांनी दूर रहावे'

नवी दिल्ली - पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी माध्यमांच्या स्वातंत्र्याचे समर्थन करीत माध्यमांवर बाहेरून कोणाचे नियंत्रण ठेवणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच माध्यमांनी सनसनाटी बातम्या देणे रोखले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले, माध्यमांतील प्रतिनिधींनी कोणत्याही व्यक्तीबाबत भेदभाव न करता निष्पक्षपणे सर्वांचे वृत्तांकन केले पाहिजे. सनसनाटी बातम्या देण्याच्या मोहापासून त्यांनी स्वतःला रोखणे आवश्यक आहे. पेड न्यूज सारख्या चुकीच्या गोष्टींपासून भारतीय माध्यमे दूर राहतील, असा मला विश्वास आहे. माध्यमांनी स्वतःहून याबाबत पाऊले उचलली पाहिजेत आणि त्यात ते यशस्वी होतील.

पंतप्रधान आज ओडिशाची राजधानी भुवनेश्वरच्या दौऱ्यावर असून, तेथील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. आज सायंकाळी ते भुवनेश्वला पोहचणार आहेत. मंगळवारी पंतप्रधान केआयआयटी विद्यापीठाच्या परिसरात ९९ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उदघाटन करणार आहेत.

फेसबुक वर शेअर करा

Facebook