> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

रविवार, २८ ऑक्टोबर, २०१८

मानबिंदूमध्ये नवे पद ...

मानबिंदूमध्ये  Asst. Sub-editor हे कुठले पद? 
म्हणजे उपसंपादकांचा उप...?? उप उपसंपादक का?
🤔

शनिवार, २० ऑक्टोबर, २०१८

‘सकाळ’चे दिवाळी अंक ‘ॲमेझॉन’वर!

पुणे -  क्‍लिकवर चालणाऱ्या आजच्या जगात दिवाळी अंकही एका क्‍लिकवर घरपोच मिळण्याची व्यवस्था ‘सकाळ माध्यम समूहा’ने यंदा केली आहे. मराठी अक्षरविश्‍वात समृद्ध साहित्य घेऊन येणारे ‘सकाळ’चे सर्व दिवाळी अंक ‘ॲमेझॉन डॉट इन’वर प्रसिद्धिपूर्व नोंदणीसाठी उपलब्ध  झाले आहेत.
जीवन समृद्ध करणाऱ्या लेखनापासून जीवनावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींचे, घटनांचे विश्‍लेषण आणि अनुभवसंपन्न विचार ‘शब्ददीप’, ‘ॲग्रोवन’, ‘सकाळ साप्ताहिक’, ‘तनिष्का’ आणि ‘प्रीमियर’ या दिवाळी अंकांमध्ये आहेत; शिवाय ‘सकाळ माध्यम समूहा’ने यंदा वाचकांसाठी आणखी एक खास भेट आणली आहे, ती म्हणजे ‘सरकारनामा’ या राजकीय विशेषांकाची!

महासर्वेक्षण - सरकारनामा 
सुजाण मराठी वाचकांसाठी ‘सरकारनामा’ ही यंदाची आगळी भेट आहे. राजकीय कोलाहलातून नेमके काय आणि कसे निवडायचे, याची मांडणी ‘सरकारनामा’च्या दिवाळी अंकामध्ये आहे. २०१९ मध्ये हुकूमाचा एक्का कोण ठरणार, याबद्दल जनतेच्या मनातील महासर्वेक्षणही अंकामध्ये प्रसिद्ध होईल.

आयडिया ऑफ इंडिया : शब्ददीप
सध्याची सामाजिक घुसळण बघता डावीकडून उजवीकडे नेमका काय आहे भारत? हे उलगडणारा परिसंवाद ‘आयडिया ऑफ इंडिया’ हे शब्ददीपचे विशेष आकर्षण असेल. त्याचबरोबर लेहपासून केरळपर्यंतच्या प्रवासामध्ये भेटलेली भन्नाट माणसं आणि त्यांच्या अफलातून कथा यांचे रिपोर्ताज या दिवाळी अंकात असतील.

प्रश्‍नांची उत्तरे - ॲग्रोवन
शेतीतील समस्यांवर सकारात्मक मार्ग काढणाऱ्यांच्या यशोगाथांनी ‘ॲग्रोवन’चा दिवाळी अंक सजलेला आहे. मजूर समस्येवर मात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कथा अंकात आहेत. शिवाय कृषी क्षेत्रातील नवनवे शोध, बदलणारी शेती यावरही मौलिक विचारधन या अंकात आहेत.

सकाळ साप्ताहिक, तनिष्का आणि प्रीमियर
याशिवाय, आयुष्य बदलून टाकणारे अनवट प्रवास आपल्या भेटीस येणार आहेत ‘सकाळ साप्ताहिक’मधून, तर खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रियांनी शोधलेल्या नव्या वाटांची कहाणी असेल ‘तनिष्का’मध्ये..! मनोरंजनाच्या दुनियेतील बित्तंबातमी घेऊन, त्याजोडीला स्टार्स आणि त्यांच्याबद्दलची रंजक माहिती घेऊन येत आहे ‘प्रीमियर’ हा दिवाळी अंक.. हे सर्व अंक ‘ॲमेझॉन’वर प्रसिद्धीपूर्व नोंदणीसाठी उपलब्ध झाल्याने यावर सवलतीच्या दरात घरपोच अंक मिळविण्याची सुवर्णसंधी वाचकांसाठी आहे.

सकाळचे दिवाळी अंक आता अमेझॉनवर !
वाचकांसाठी विशेष सोय.. आता आपला दिवाळी अंक घरपोच मिळवा.. 

शब्ददीप: https://goo.gl/XwXccB
सरकारनामा: https://goo.gl/JF5K9w
अॅग्रोवन: https://goo.gl/Jn7VTF
साप्ताहिक सकाळ: https://goo.gl/66fLKh
तनिष्का: https://goo.gl/793JRP
प्रिमीयर: https://goo.gl/wA31Nx

शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१८

न्यूज 18 लोकमतची अँकर म्हणते, बघत राहा एबीपी माझा ...

मुंबई -   पॅकेज वाढवून मिळाल्यामुळे  एबीपी माझातून  न्यूज 18 लोकमतला आलेली  अँकर रेशमा साळुंखे हिचा  एबीपी माझाचा फिवर अजून उतरला नसल्याचं आज पाहावयास मिळाले.  तिनं बुलेटिन संपवताना पाहात राहा न्यूज १८ लोकमत म्हणण्याऐवजी चक्क एबीपी माझा म्हणाली आणि ते प्रसारित झालं सुद्धा... ते ऐकून मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर चक्क डोक्याला हात लावून बसले.

रेश्मा साळुंखे दमदार  अँकर म्हणून ओळखली जाते. त्यामुळेच तिला पॅकेज वाढवून न्यूज 18 लोकमतला घेण्यात आले. तिच्याकडे संध्याकाळचं ६ ते साडेसहाचं महत्वाचं बुलेटिन 'महाराष्ट्राच्या बातम्या' देण्यात आलं  आहे.. तशी रेश्माने दमदार एन्ट्री सुद्धा केलीये मात्र आज दि. १२ ऑक्टोबर रोजीचं  बुलेटिन संपवत असताना पाहत राहा News18 लोकमतच्या ऐवजी रेश्माने पाहत राहा ABP माझा असा उल्लेख केला, त्यामुळे रेश्माचा ABP माझा फिवर अजून कमी झाला नसल्याचं पाहायला मिळालं.. तसं  ते खरंही आहे म्हणा.. इतके वर्ष एकाच संस्थेत काम केल्यानंतर त्याचा असर तर राहणारच...पण आता आपण चॅनल बदललं याचं भान राखायला हवं.

गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१८

तीन चॅनल , तीन अँकर , तीन बदल

मुंबई - मिलिंद भागवत, विलास बडे पाठोपाठ आता एबीपी माझातून रेश्मा साळुंखे ही अँकर न्यूज १८ लोकमतमध्ये जॉईन झाली आहे. जेव्हा भागवत आणि बडे यांनी एबीपी माझाला सोडचिठ्ठी देवून न्यूज १८ लोकमत जॉईन केले होते, तेव्हाच  नम्रता वागळे आणि  रेश्मा साळुंखे यांना ऑफर होती, पण नम्रताने 'नम्र' नकार दिला तर रेश्माने नको, होय करत आता एबीपी माझाला बाय बाय करत न्यूज १८ लोकमत मध्ये जाणे पसंद केले आहे.
न्यूज १८ लोकमत मध्ये जुन्या आणि नव्या अँकर मध्ये लॉबिंग सुरु झालं आहे. एबीपी माझातून आलेले विलास बडे हे संपाद्क डॉ. उदय निरगुडकर यांचे लाडके बनले आहेत. त्यांच्या शिफारशीनुसारच रेश्मा साळुंखे यांना एबीपी माझापेक्षा पॅकेज वाढवून घेण्यात आले.बडेनी आपले स्थान बळकट करण्यास सुरुवात केली आहे, मात्र जुने आणि नवे असा वाद पेटला आहे. जुन्याचे पगार वाढत नाहीत आणि नव्यानं पॅकेज वाढवून घेण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दुसरीकडे एबीपी माझा मध्ये अँकरची जागा खाली होताच रेश्मा साळुंखे जागी सामची अँकर वृषाली यादव हिचा नंबर लागला आहे. तिने  सामला राम राम म्हणत एबीपी माझा जॉईन केले  आहे. दरम्यान  वृषाली यादव साम सोडताच तिच्या जागी रचना बोऱ्हाडे ( जुने आडनाव विचारे ) हिने साममध्ये घरवापसी केली आहे.
एक अँकर सोडताच कसा बदल होतो, हे त्याचे उत्तम उदाहरण. परिवर्तन निसर्गाचा नियम आहे आणि तो झालाच पाहिजे, पण नव्या अँकरला संधी कधी मिळणार ? हा प्रश्नच आहे.


बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८

सुरेश पाटील याची दिव्यतून हकालपट्टी

औरंगाबाद - आपल्या फेसबुक वॉलवर ब्राम्हण महिलाबद्दल अश्लील, वादग्रस्त आणि आक्षेपार्ह कविता पोस्ट करणाऱ्या सुरेश पाटील याची दिव्य मराठीतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

दिव्य मराठीने आपल्या अंकात तसे निवेदन प्रसिद्ध केले आहे.सुरेश पाटील याने फेसबुकवर जे लिहिले ती वैयक्तिक टिपण्णी होती, त्याचा दिव्य मराठीशी संबंध नाही, मात्र त्याच्या या कृतीमुळे दिव्य मराठीची हानी झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान सुरेश पाटील यांच्यावर औरंगाबाद आणि सेलू मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच सुरेश पाटील फरार झाला आहे. 


महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

मुंबई - पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिला जाणारा २०१६ आणि २०१७ साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार हा अनुक्रमे दैनिक हितवादचे संपादक विजय फणशीकर आणि साप्ताहिक विवेकचे संपादक रमेश पतंगे यांना जाहीर करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

राज्य शासनाच्यावतीने विकास वार्तांकनासाठी पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. विकास वार्तांकनासाठी २०१६ साठीचा राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार हा दै. पुढारी, रत्नागिरीचे राजेश जोष्ठे यांना तर २०१७ साठीचा हा पुरस्कार लुमाकांत नलावडे, दै. सकाळ, कोल्हापूरचे बातमीदार यांना जाहीर करण्यात आला. मुंबईत लवकरच होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

१ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्काराचे स्वरुप आहे. तर ५१ हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे इतर सर्व पुरस्कारांचे स्वरुप आहे. 

राज्य शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या ज्या विविध पुरस्कारांची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली ते पुरस्कार खालीलप्रमाणे

वर्ष-२०१६

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) राजेश जोष्ठे, दै. पुढारी, रत्नागिरी.

अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) - कांचन श्रीवास्तव, विशेष प्रतिनिधी, डीएनए, मुंबई

बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) - विजयकुमार सिंह (कौशिक), मुख्य संवाददाता, दै. भास्कर, मुंबई

मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर) - महंमद अब्दुल मुख्तार (आबेद), प्रतिनिधी, दै. गोदावरी  ऑब्झर्वर, नांदेड

यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (मा.वज.) (राज्यस्तर) - वर्षा फडके-आंधळे, वरिष्ठ सहायक संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई

पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) - कपिल श्यामकुंवर, प्रतिनिधी, एबीपी माझा, यवतमाळ
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) शैलेश जाधव, छायाचित्रकार, दै. महाराष्ट्र टाइम्स, मुंबई

केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.) (राज्यस्तर) - प्रज्ञेश कांबळी, छायाचित्रकार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई

सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) - प्रफुल्ल सुतार, ई - सकाळ, कोल्हापूर

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) - विशाल कदम, शहर प्रतिनिधी, दै. तरूण भारत, सातारा.

दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग- सूर्यकांत नेटके, बातमीदार, दै. सकाळ, अहमदनगर 
(५१ हजार रुपये मानचिन्ह व प्रशस्तीपत्र व्यतिरिक्त रुपये १० हजार दै.गांवकरीने पुरस्कृत केले आहेत.)

अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह) -डॉ. सीतम सोनवणे, उपसंपादक, दै. लोकमत, लातूर

आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग -मारूती कंदले, प्रतिनिधी, ॲग्रोवन, मुंबई

नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग - ज्ञानेश्वर बिजले, प्रतिनिधी, दै. सकाळ, पुणे

शि. म. परांजपे पुरस्कार, कोकण विभाग - माधव डोळे, ब्युरोचीफ, दै. सामना, ठाणे

ग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग - संजय वालावलकर, प्रतिनिधी, दै. पुढारी, सिंधुदूर्ग

लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग - अनुप गाडगे, प्रतिनिधी, दै. दिव्य मराठी, अमरावती

ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग - मंगेश राऊत, वरिष्ठ वार्ताहर, दै. लोकसत्ता, नागपूर

वर्ष-२०१७
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) - लुमाकांत नलावडे, बातमीदार दै. सकाळ, कोल्हापूर

अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) - मनीष सोनी, विशेष प्रतिनिधी, दै. हितवाद, नागपूर

बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार(हिंदी) (राज्यस्तर) - राजकुमार सिंह, मुख्य प्रतिनिधी, दै. नवभारत टाइम्स, मुंबई

मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर) - खान कुतुबुद्दिन अब्दुल माजीद, दै. इन्कलाब, मुंबई

यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (मा. व ज.) (राज्यस्तर) - डॉ. किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी, नाशिक

पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) - कन्हैय्या खंडेलवाल, न्यूज 18 लोकमत, हिंगोली

तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) - दत्तात्रय खेडेकर, छायाचित्रकार, दै. लोकमत, मुंबई

केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.) (राज्यस्तर) - मनीष झिमटे, छायाचित्रकार, अमरावती

सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) - संतोष आंधळे, वरिष्ठ संपादक, माय मेडिकल मंत्रा, मुंबई

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) - मल्लिकार्जुन सोनवणे, दै. यशवंत, उस्मानाबाद

दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग - अमोल पाटील, वार्ताहर, दै. दिव्य मराठी , धुळे - ५१ हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, व्यतिरिक्त रुपये १० हजार दै.गांवकरीने पुरस्कृत केले आहेत.)

अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह) - जितेंद्र विसपुते, उपसंपादक, दै. पुढारी औरंगाबाद

आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग - जमीर काझी, वरिष्ठ प्रतिनिधी, दै. लोकमत, मुंबई

नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग - प्रमोद बोडके, बातमीदार, दै. सकाळ, सोलापूर

शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग - जान्हवी पाटील, वार्ताहर, दै. तरूण भारत, रत्नागिरी

ग.गो.जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग - अभिजीत डाके, जिल्हा प्रतिनिधी, दै. ॲग्रोवन, सांगली

लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग - अनिल माहोरे, जिल्हा प्रतिनिधी, दै. पुण्यनगरी, अकोला

ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग - खेमेंद्र कटरे, जिल्हा प्रतिनिधी, दै. महाराष्ट्र टाइम्स ,गोंदिया

२०१६ व २०१७ च्या पुरस्कारांसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीत २०१६ साठी पत्रकार राजीव कुलकर्णी, प्रवीण मुळ्ये, पांडुरंग मस्के, राजकुमार सिंग, निलेश खरे, रमाकांत दाणी, राहुल पांडे, बबन वाळके, नितीन तोटेवार यांचा तर  २०१७ च्या निवड समितीत पत्रकार विजय सिंह, क्लॅरा लुईस, सिद्धेश्वर डुकरे, उमेश कुमावत, भालचंद्र पिंपळवाडकर, शैलेंद्र तनपुरे, सत्यजित जोशी, विलास तोकले, कृष्णा शेवडीकर यांचा समावेश होता.

सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८

सुरेश पाटील याच्यावर गुन्हा दाखल

औरंगाबाद -दिव्य मराठीचा वृत्तसंपादक सुरेश पाटील याच्यावर क्रांती चौक पोलीस स्टेशन आणि सेलूमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.गुन्हा दाखल होताच पाटील फरार झाला आहे.
पाटील याने आपल्या फेसबुक वॉलवर ब्राम्हण समाजातील महिलांविषयी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त लिहीलं होतं. या पोस्टवर नेटिझन्सने धो धुतले आहे.विनाश काले विपरीत बुद्धि प्रमाणे पाटील यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे.

महिला पत्रकार नीता कोल्हाटकर यांचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करणारा तो ज्येष्ठ पत्रकार कोण ?

मुंबई - अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये एकप्रकारे #MeToo मोहिमेला सुरुवात झाली आहे.त्याचे लोन आता मीडियातही पसरले आहे. महिला पत्रकार नीता कोल्हाटकर यांनी, एका ज्येष्ठ पत्रकारावर गैरवर्तणुकीचा आरोप केला आहे.

काही वर्षांपूर्वी कॅबमधून जात असताना एका ज्येष्ठ संपादकाने आपणास जबरदस्तीने जवळ ओढून चुंबन घेण्याचा प्रयत्न केला पण मी त्याला दूर ढकलले , त्यांची मला आजही घृणा वाटते असे  ट्विट नीता कोल्हाटकर  यांनी केले आहे. या  ट्विट नंतर मीडियात एकच खळबळ उडाली आहे.

हा पत्रकार नेमका कोण आहे हे ट्विट मध्ये लिहिले नसले तरी प्रकाश अकोलकर यांना त्यांनी टॅग केलं आहे. त्यामुळे अकोलकर यांच्यावर संशयाची सुई व्यक्त केली जात आहे. या ट्विट नंतर प्रकाश अकोलकर यांनी प्रेस क्लबचा राजीनामा दिला आहे.

To

The President,

The Chairman and The Secretary,

The Mumbai Press Club,

Mumbai.

This is to submit my resignation of the Membership of the Managing Committee of the Club. This is also an opportunity for me to express my deep gratitude towards the office bearers and my colleagues in the committee for the last ten years.

I am also thankful to the staff for the cooperation they have given to me.

Thanks and regards, 

Prakash Akolkar

Mumbai. October 7th, 2018

शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१८

महिला पत्रकाराचा आरोप - कैलाश खेर चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता...

अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये एकप्रकारे #MeToo मोहिमेला सुरुवात झाली आहे. लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवत अनेकजण समोर येऊन बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘क्वीन’ चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहल याच्यावरील असभ्य वर्तनाचे आरोप ताजे असतानाच आता प्रसिद्ध गायक कैलाश खेरवर एका महिला पत्रकाराने आरोप केले आहेत.
टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, एका फोटो जर्नलिस्टने कैलाश खेरवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. संबंधित महिला कैलाशच्या घरी मुलाखतीसाठी गेली असता ही घटना घडली. यावेळी मुलाखतीसाठी तिच्यासोबत आणखी एक महिला साथीदार होती. ट्विटरच्या माध्यमातून या महिला फोटोग्राफरने हा धक्कादायक खुलासा केला आहे.
ट्विटमध्ये तिने लिहिले, ‘मुलाखत देताना कैलाश खेर सतत आमच्या मांडीवर हात ठेवत होता. मुलाखत पटापट संपवून आम्ही दोघी तिथून बाहेर पडलो. माझ्या साथीदार पत्रकाराला मी मुलाखतीत या घटनेविषयी लिहिण्यास सांगितलं होतं. पण वृत्तपत्र अशी बातमी छापणार नाही, असं तिचं म्हणणं होतं.’
कैलाश खेरसोबतच या महिलेने मॉडेल जुल्फी सय्यदवरही आरोप केले. ‘क्रूज लाइनरवर मी माझ्या काही पत्रकार मित्रांसोबत गेले होते. त्यावेळी माझा फोन चार्जिंगला लावण्यासाठी मी जुल्फीच्या रुममध्ये गेले असता, त्याने मला बळजबरीने किस करण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत तक्रार करण्याविषयी माझ्यासोबत असलेल्या पत्रकारांशी बोलले असता, तुझे हे आरोप कुणीच छापणार नाही असं मला सांगण्यात आलं. दुसऱ्या दिवशी जुल्फीने माझी माफी मागितली,’ असं तिने ट्विटरवर लिहिलं.


साभार - लोकसत्ता

मानबिंदूच्या गोवा आवृत्तीवर कुऱ्हाड !

महाराष्ट्राच्या मानबिंदूच्या  गोवा आवृत्तीवर  १ नोव्हेंबर पासून कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यानंतर दिल्ली आवृत्ती गुंडाळण्यात येणार असल्याची सूत्राची माहिती आहे.
मानबिंदूची गोवा आवृत्ती तोट्यात सुरु आहे. त्यामुळे १ नोव्हेंबर पासून कामगार कपात करून बोटावर मोजण्याइतके काही लोक ठेवून बाहेरून छपाई करण्यात येणार म्हणे. कालांतराने पूर्ण आवृत्ती बंद करण्याचा निर्णय होऊ शकतो. दिल्ली आवृत्तीचे पण तेच घडणार आहे. दिल्ली आवृत्ती मोठा गाजावाजा करून सुरु करण्यात आली होती.

गोवा आणि दिल्ली आवृत्ती प्रचंड तोट्यात सुरु आहे. त्यामुळे बाबूजींनी हा निर्णय घेतल्याचे कळते. त्याचबरोबर मानबिंदू मध्ये येत्या काही दिवसांत कामगार कपात होणार असून, त्यामुळे कर्मचारी अस्वस्थ झाले आहे.

शुक्रवार, ५ ऑक्टोबर, २०१८

ओफ्फ...समय समाप्ती की घोषणा !

डिजिटल मीडियात 'बाप माणूस' असलेल्या शेखर पाटील यांनी, दैनिक 'जनशक्ती'ला रामराम ठोकला आहे. यापुढे कोणत्याही पेपरचे काम न करता डिजिटल मीडियात काम करण्याचा निर्णय त्यांनी
घेतला आहे.
शेखर पाटील यांनी जनशक्तीचा राजीनामा का दिला हे स्पष्ट केलेले नाही. मात्र जनशक्ती पेपरला सध्या घरघर लागलेली आहे. पुणे आवृत्ती बंद करण्यात आली आहे, तर मुंबई आवृत्ती सलाईनवर आहे. जळगाव आवृत्ती त्यातल्या त्यात बरी होती तर मुख्य कणा मोडून पडला आहे.
गेले अनेक महिने झाले, जनशक्त्ती कर्मचाऱ्यांच्या पगारी नाहीत. त्यामुळे विक्रांत पाटील ( मुंबई ) , पुरुषोत्तम सांगळे ( पुणे, पिंपरी चिंचवड ) पाठोपाठ आता मुख्य संपादक शेखर पाटील ( जळगाव ) हे जनशक्तीतून  बाहेर पडले आहेत. आता जनशक्तीने गाशा गुंडाळल्यास आश्चर्य वाटू नये ...

शेखर पाटील यांनी जनशक्तीचा राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट ... 

ओफ्फ...समय समाप्ती की घोषणा !

नमस्कार मित्रांनो, दैनिक जनशक्तिसोबतचा प्रवास आता थांबलाय. शरीराने बाहेर गेलो तरी हृदयाने या परिवाराच्या सोबत राहणार असून यासाठी कोणताही दाखला देण्याची गरज नाहीच. गेल्या १० वर्षात मी अनेकदा सार्वजनीक व्यासपीठांवरून अथवा माझ्या लिखाणातून एक संकल्प वारंवार रिपीट करत होतो. तो म्हणजे, १ जानेवारी २०२० या रोजी मी पूर्णपणे डिजीटल माध्यमात काम करत असेल. मात्र १५ महिन्यांपूर्वीच याला प्रारंभ झाल्याची बाब मला विस्मयकारक वाटते. अत्याधुनीक तंत्रज्ञानाने प्रसारमाध्यमांना व खर तर आपल्या संपूर्ण जीवनालाच ज्या प्रचंड गतीने बदललेय त्यातून 'स्कील्ड' अर्थात टेक्नॉलॉजी+लिखाण/संवाद कौशल्य या क्षेत्रांमध्ये पारंगत असणार्‍यांसाठी अमर्याद संधीचे एक खुले आकाश अस्तित्वात आल्याचे आपण सर्वच जण अनुभवत आहोत. ग्लोबल अ‍ॅक्सेससाठी डिजीटल तर मॉनेटायझेशनसाठी फिजीटल (फिजीकल+डिजीटल) मॉड्युलचा अवलंब हा यशाचा मूलमंत्र असल्याची खुणगाठ मी कधीच बांधली होती. यातून स्वतंत्र मार्ग चोखाळण्याचे धाडस आले. अर्थात यातूनच हा निर्णय मी घेतला.

आपल्या सर्वांच्या मनात असणार्‍या प्रश्‍नाचे उत्तर मी आधीच देऊन टाकतो...ते म्हणजे मी कोणत्याही नवीन ठिकाणी संपादक वा तत्सम पदावर रूजू होत नाहीय. मला आयुष्यात मल्टी-टास्कींगचा खूप लाभ झालाय. यामुळे आता मी यापासूनच प्रेरणा घेऊन 'मल्टी-लेअर करियर'चा अंगिकार करत आहे. यामध्ये कार्पोरेट, पर्सनल, पॉलिटीकल आणि सोशल या चार घटकांचा समावेश आहे. एक टेक्नोक्रॅट म्हणून काम करण्याची संधी मला कार्पोरेट क्षेत्रातून मिळाली आहे. यात एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या मराठीशी संबंधीत प्रोजेक्टवर काम सुरू केले आहे. तर एका स्थानिक कंपनीला डिजीटल पीआरबाबत मार्गदर्शकाची भूमिकादेखील बजावणार आहे. पर्सनलचा विचार केला असता, टेकवार्ताच्या जोडीला अन्य काही पोर्टल्स तयार झालेली असून याबाबत येत्या काही दिवसांमध्ये अधिकृत घोषणा करणार आहे. तर जळगावातील काही मान्यवरांसोबत 'अतिशय हटके' असे डिजीटल प्रोजेक्टदेखील करत आहे. यात माझी भूमिका ही मार्गदर्शक (मेन्टॉर) म्हणजेच संबंधीत प्रोजेक्ट सक्सेसफुली रन करण्याच्या जबाबदारीची आहे. डिजीटल पॉलिटिकल कँपेनिंगची थेट तसेच सब कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातील कामेदेखील करत आहे. सर्वात शेवटी सोशल अर्थात सामाजिक कामे ! मला आवडणार्‍या आणि प्रेरणादायी ठरणार्‍या व्यक्ती आणि विचार यांना डिजीटल मंचावर आणण्याचे कामदेखील मी करणार आहे. हा समाजाच्या ऋणातुन उतराई होण्याचा मार्ग असून माझ्यापुरता मर्यादीत प्रमाणातील सीएसआर आहे. 

या सर्वांसाठी मी आधी बॅकएंड मजबूत केले. विविध क्षेत्रांमधील मित्रांशी सल्ला-मसलत केली. सर्वात महत्वाचे म्हणजे कुटुंबियांनी यासाठी तात्काळ होकार दिला. जनशक्तिचे मालक कुंदन ढाके हे कधीही मालक वाटले नाहीत. याबाबत मी खूप भाग्यवान ! देशदूतचे संपादक दिवंगत सुभाष सोनवणे साहेब व साईमतचे संपादक/मालक प्रमोद बर्‍हाटे यांच्याप्रमाणे कुंदन ढाके यांच्याकडूनही भरभरून स्नेह मिळाला. इतर सर्वच सहकार्‍यांची नावे येथे घेता येणार नाहीत. मात्र माझी त्यांच्यासोबतची वागणूक अशी होती की ना ते मला विसरतील ना मी त्यांना ! पण जीवनातील काही निर्णय आपण टाळू शकत नाही. एखादा पक्षी हवेतून विहार करतांना कोणतीही पदचिन्हे सोडत नाही; वा पाण्यावर कुणीही स्वाक्षरी करू शकत नाही. याप्रमाणे अगदी शांतपणे कोणत्याही संस्थेतून निघण्याचा शिरस्ता मी कायम पाळला आहे. मात्र मी काम केलेल्या ठिकाणचे ऋणानुबंध इतके मजबूत आहेत, की काळाचे अनेक आघातदेखील याचे काहीही बिघडवू शकत नाही. याचमुळे देशदूत व साईमतप्रमाणे जनशक्ति परिवारातील सर्व घटकांशी असणारे संबंध तहयात कायम राहतील याची मला खात्री आहे.

मित्रांनो...व विशेष करून पत्रकार मित्रांनो, आपल्या क्षेत्रातील बदल जाणीवपूर्वक अनुभवा. आज एखाद्या गावातील दुकानदाराचा स्पर्धक हा त्याच्या शेजारचा दुकानदार नव्हे तर त्यांच्यापेक्षा किफायतशीर दरात घरपोच माल पोहचवणार्‍या ई-कॉमर्स कंपन्या आहेत. याचप्रमाणे पत्रकाराचा स्पर्धक हा दुसर्‍या वर्तमानपत्र वा चॅनलमधील पत्रकार नसून टेक कंपन्या असल्याची बाब जाणून घ्या. तंत्रज्ञानाचा बाऊ न करता या लाटेवर स्वार झाल्यास यातून आपण यातूनही संधी साधू शकतो. मी स्वत: याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. आपल्या शुभेच्छा आणि माझी पॅशन यांच्यामुळे या लाटेवर मी नक्कीच स्वार होणार हा आत्मविश्‍वास आहेच. आपणा कुणालाही डिजीटल तंत्रज्ञान वा त्याच्याशी संबंधीत प्रोजेक्टबाबत कोणतीही माहिती आणि तीदेखील मोफत पाहिजे असल्यास मी माझ्या संपर्काचे डिटेल्स देत आहे. पुनश्‍च आपणा सर्वांचे आभार. येत्या काही दिवसांमध्ये माझ्या आगामी वाटचालीची माहिती आपल्यासमोर येईलच. तोवर थोडा इंतजार का मजा लिजीये !

आपला नम्र
शेखर पाटील
जळगाव
सेलफोन-९२२६२१७७७०
ई-मेल :- shekhar@shekharpatil.com

गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८

डॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण !

मुंबई - टीआरपीमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेल्या न्यूज 18 लोकमत चॅनलने टीआरपी वाढावा, यासाठी खटाटोप सुरू केला असला तरी ते नेहमीच तोंडावर आपटत आहेत, शरद पवार यांच्या मुलाखती
बाबतीत तेच घडले, राफेल प्रकरणात पवारांचा पॉवर गेम करण्याच्या नादात मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांचाच  पवार गेम झाला ! अखेर डॉ.निरगुडकर यांनी पवारांपुढे लोटांगण घालत लेखी माफीनामा लिहून दिला आहे.

घडले असे की, गेल्या आठवड्यात शरद पवार यांची मुलाखत मुख्य संपादक डॉ उदय निरगुडकर यांनी घेतली होती, त्यात पवारांचा पॉवर गेम करण्यासाठी डॉ. निरगुडकर यांनी, राफेलचा मुद्दा  काढला असता, पवार यांनी आम्ही कुठे आरोप केलाय पण मोदीनी स्पष्टीकरण द्यावे असे स्पष्ट म्हटले होते, पण काही तरी खळबळजनक करण्यासाठी डॉ निरगुडकर यांनी ही बातमी फिरवत, राफेल प्रकरणात पवार यांची मोदीना क्लीनचिट असा शब्दप्रयोग केला, त्यामुळे राज्यात खळबळ उडाली.राष्ट्रवादीच्या एका नेत्याने राजीनामा सुद्धा दिला, पवारांच्या राजकीय भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जावू लागला, त्यामुळे शरद  पवार चांगलेच चिडले,
एकीकडे शरद पवार चिडले असता, असाइनमेंटकडून खासदार सुप्रिया सुळे यांना, फोन गेला आणि त्यांना  शरद पवार यांच्या राफेल भूमिकेबद्दल प्रतिक्रिया मागण्यात आली, त्यावर सुप्रियाताई जाम भडकल्या ! ही कसली पत्रकारिता म्हणून संबंधीत असाइनमेंट महिला कर्मचाऱ्यांस खडे बोल सुनावले, त्यामुळे न्यूज 18 लोकमतमध्ये वातावरण अधिक चिघळले, त्यावर  महिला असाइनमेंट हेडने ग्रुपवर मेसेज टाकला की, शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांचा कोणताही कार्यक्रम कव्हर करू नये. कोणी स्ट्रींजरने विचारले तर अजिबात नाही ! असे डेक्सवरील लोकांनी सांगावे. 

ते सुप्रिया सुळे यांना समजताच न्यूज 18 लोकमत न बघण्याचा आणि चॅनलवर अघोषित बहिष्कार  टाकण्याचा आदेश त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला, त्यामुळे वातावरण अधिक तापले, पवार यांनी पॉवर गेम करत प्रकरण वरपर्यंत नेले , वरून दबाब आला. अगोदरच सलाईनवर असलेल्या डॉ. निरगुडकर यांची विकेट पडते की काय, असे वातावरण निर्माण झाले ! 
महाराष्ट्रात राजकारण फक्त शरद पवार यांच्या भोवती फिरते आणि पवारांशिवाय पत्रकारिता होऊ शकत नाही, याची उपरती डॉ निरगुडकर यांना झाली, त्यांनी पवारांपुढे चक्क लोटांगण घेत त्यांना लेखी माफीनामा पाठवला
!
डॉ निरगुडकर यांनी पवारांची लेखी माफी मागितली असली तरी हे प्रकरण लवकर शमेल असे वाटत नाही, एकंदरीत राफेल प्रकरण पवारांच्या अंगलट येण्याऐवजी डॉ निरगुडकर यांच्या अंगलट आले आहे.डॉ निरगुडकर यांची येत्या काही दिवसात विकेट पडल्यास आश्चर्य वाटू नये !

जाता जाता  - शरद पवार यांच्या बाबतीत पहिल्यांदा ताठर भूमिका घेणारे डॉ उदय निरगुडकर यांनी शेवटी शेपूट घातल्याने न्यूज १८ लोकमतचे कर्मचारी मात्र अस्वस्थ झाले आहेत.

मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१८

'तुळशी'पत्र मुळे 'उघडा डोळे बघा नीटमध्ये ती जाणार

मुंबई - 'उघडा डोळे बघा नीट' चॅनलमध्ये 'तुळशी'पत्र आल्यामुळे दोन गट पडले आहेत,  आता 'तुळशी'पत्रने आपला गट मजबूत करण्यासाठी बाहेरून माणसे आयात करणे सुरु केलं आहे. जे चॅनल पूर्वी  स्वतःहून कोणाला ऑफर देत नव्हते, ते आता प्रतिस्पर्धी चॅनलमधील माणसे फोडण्यास सुरुवात केली आहे.
साम चॅनल गेले काही महिने नंबर एक ते तीन वर आपले स्थान टिकवून आहे. आता डिश डीटीएचवर आल्यानंतर ते कायम एक ते तीन वर राहील, असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे भेदरलेल्या 'उघडा डोळे बघा नीट' चॅनलने सामवर डोळा ठेवून माणसे फोडण्यास सुरुवात केली आहे. जिकडे  'तुळशी'पत्र तिकडे 'ती' असणारी एक महिला अँकर सामचा राजीनामा दिली असून, ती  'उघडा डोळे बघा नीट' मध्ये लवकरच जॉईन होणार आहे. मी मराठी, जय महाराष्ट्र मध्ये दोघांनी  एकत्र काम केले आहे. ती 'उघडा डोळे बघा नीट' गेल्यास या गटबाजीत अजून भर पडणार आहे. जे चॅनल गेले वर्षभर नंबर १ वर होते ते आता कधी दोन वर तर कधी तीनवर जात आहे. आणि त्याला कारण 'तुळशी'पत्र ! चॅनल खड्ड्यात घालून हे   'तुळशी'पत्र  चॅनलवर   'तुळशी'पत्र ठेवून एक दिवस निघून जाणार, हे मात्र नक्की !

सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८

विदर्भस्तरीय अधिवेशनात पत्रकार एकवटले

 
चंद्रपूर -
पञकार हा समाजाचा खरा समाजसेवक असून आजही जनतेचा पत्रकारावर विश्वास आहे. माध्यम बदलली असतील परंतु  जो पञकार खरे स्पंदन टीपतो त्याचा धाक आजही समाजात आहे. राजकारण्यांवर किंवा एकंदरित व्यवस्थेवर अंकुश ठेवण्याचं काम करतो, त्यांना समाजाकडून पाठबळ मिळण्याची गरज आहे, असे मत आमदार विजयभाऊ  वडेट्टीवार  यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या ब्रह्मपुरीत पार पडलेल्या पञकारांच्या  विदर्भस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी  संघाचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे होते. यावेळी  'महाराष्ट्र टाइम्स"चे  संपादक श्रीपाद अपराजित , प्राचार्य भाऊसाहेब जगनाडे , पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. महेश पानसे आदीची  उपस्थिती होती .

यावेळी  दिवंगत पत्रकार डी.  एम.  जगताप यांच्या कुटुंबास ५१ हजार रुपयाची मदत जाहीर करण्यात आली.   अधिवेशनाच्या दुस-या सञात प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी कॅबिनेट मंञी शोभाताई फडणवीस, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे ,नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, ब्रह्मपुरीच्या नगराध्यक्षा योगीता बनपुरकर उपस्थित होत्या.

ग्रामीण भागातील पत्रकारांना शासनाच्या योजना मिळवुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा लढा शेवटच्या क्षणापर्यंत चालु राहील ,संघटना ही सर्वांची मातृसंस्था असून  गल्लीपासुन  दिल्ली पर्यंतच्या पत्रकारांना आधार देणारी संस्था आहे असे  विश्ववासराव आरोटे यांनी यावेळी सांगितले.
  

पद्मश्रीच्या पेपरमध्ये हमरीतुमरी

पुणे - पद्मश्रीच्या पेपरमध्ये परवा चीफ रिपोर्टर आणि एका रिपोर्टरची हमरीतुमरी  झाली. त्याने चक्क चार-चौघात सुनावले, कुठून काय धंदे करून आलात साऱ्या जगाला माहिती आहे, उगाच शहाणपणा शिकवू नका... तुम्ही आणि तुमच्या चोरट्या टोळीचा लुटारू मुखिया पेपरचे वाटटोळे करील, 'सबका बंधू' आणि गिऱ्हाईक धुंडू असे तो म्हणाला. रिपोर्टरने इतिहासाची पाने चाळताच 'चीप'ची चड्डी पिवळी झाली होती.

नवीन कार्यकारी संपादक दाखल झाल्यापासून गटबाजी वाढली आहे.  एक प्रकरण दाबल्याप्रकणी पद्मश्रीनी चार चौघात खरडपट्टी करूनही काही झालेच नाही असा आव आणून पुन्हा खाबुगिरी सुरु आहे. वृत्तपत्राची जागा ईपेपर घेणार - सुनील ढेपे

पुणे - येत्या काळात वृत्तपत्राची जागा ईपेपर घेतील तर अँप, युट्युबच्या माध्यमातून अनेक मराठी चॅनल सुरु होतील. त्याचा प्लॅटफॉर्म डिजिटल राहील, असे  मत ज्येष्ठ पत्रकार सुनील ढेपे यांनी येथे व्यक्त केले.

पुण्यात कॅलिड्स  मीडिया अकॅडमी येथे आयोजित करण्यात आलेल्या डिजिटल मीडिया कार्यशाळेत ते बोलत होते.

कागदाचे वाढलेले भाव, कर्मचाऱ्यांच्या वाढलेल्या  पगारी, होणारा प्रचंड खर्च पाहिला तर वृत्तपत्र चालवणे कठीण झाले आहे. अनेक मोठ्या वृत्तपत्रांना पेजेसची संख्या कमी करावी लागली. येत्या काळात अनेक वृत्तपत्रे बंद पडतील. त्याची जागा ईपेपर घेतील. ईपेपर सध्या फुकट वाचण्यास मिळत असले तरी  भविष्यात ईपेपर वाचण्यासाठी युझर आयडी आणि पासवर्ड दिला जाईल आणि लोकांना पैसे मोजावे लागतील. आजची बातमी आजच आणि आताच यामुळे वृत्तपत्र वाचण्याचा कल हळूहळू कमी होत आहे. त्यासाठी वेगळा कंटेंट द्यावा लागेल. असेही ढेपे  म्हणाले.

न्यूज चॅनलचे भविष्य कठीण आहे. येत्या काळात जियो अँपवर अनेक चॅनल प्रक्षेपित होतील. जियो गीगा फाइबरमुळे हे चॅनल घरोघरी टीव्हीवर दिसतील. युट्युब टीव्हीवर दिसेल. त्यामुळे कमी खर्चात अनेक चॅनल सुरु होतील. त्यामुळे काही तरी नवीन दिले तरच लोक न्यूज चॅनल पाहतील, असेही ते म्हणाले.

येणारा काळ केवळ डिजिटल मीडियाचा राहणार आहे. पत्रकारितेत नव्याने येणाऱ्या प्रत्येक तरुणांना डिजिटल मीडियाचे ज्ञान असायला हवे. तसेच जुन्या पत्रकारांनी स्वतःला अपडेट करायला हवे अन्यथा जुन्या पत्रकारांना प्रवाहाच्या बाहेर राहावे लागेल.असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.

पत्रकारितेत येणाऱ्या तरुण पिढीला प्रशिक्षित करण्यासाठी येत्या काळात राज्यभरातील प्रमुख शहरात डिजिटल मीडिया कार्यशाळा आयोजित करण्यात  येणार असल्याचेही ढेपे यांनी शेवटी सांगितले.
अधिक बातमी वाचा


फेसबुक वर शेअर करा

Facebook