> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

रविवार, ३० डिसेंबर, २०१८

अग्रलेखांचा बादशहा वाहतो पखाली...

'अग्रलेखांचे बादशहा' अशी वाचकांनी दिलेली पदवी अभिमानाने मिरवणाऱ्या 'नवा काळ'चे संपादक
निळूभाऊ अर्थात नीलकंठ यशवंत खाडिलकर.आता ८५ वर्षांचे आहेत.त्यांनी 'नवा काळ'चं संपादकपद केव्हाच सोडलंय.त्यांच्या कन्या जयश्री पांडे-खाडिलकर आणि जामात रमाकांत पांडे सध्या 'नवा काळ' चे 'काम' पहातात. त्यांच्या 'संध्याकाळ'या सायं दैनिकाचे काम रोहिणी आणि वासंती या त्यांच्याच कन्या पहातात.पत्नी मंदाकिनी व्यवस्थापन पहातात.हे सगळं सविस्तर या करीता सांगितलं की,निळूभाऊंचे आजोबा नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी १९२३ साली नवा काळ सुरु केल्यापासून हे वृत्तपत्र आजतागायत एकाच कुटुंबाच्या हातात म्हणजे 'एक हाती'चालू आहे.नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे नंतर त्यांचे पुत्र यशवंत खाडिलकर आणि यशवंतरावांच्या नंतर नीलकंठ खाडिलकर .वैचारिक वारसा म्हणाल तर तो नाट्याचार्यांपासून आहे ,परंतु निळूभाऊंनी 'नवा काळ'ला जी झळाळी दिली ती अद्वितीय आहे.मुंबई आणि उपनगरात 'नवा काळ' ने खप आणि लोकप्रियतेचा सुवर्णकाळ अनुभवला तो नीलकंठ खाडिलकरांच्या झणझणीत लेखणीच्या जोरावर. दमदार,कडक आणि जनसामान्यांच्या प्रश्नावर पोटतिडिकीने आणि तळमळीने लिहिणारे निळूभाऊ तितकेच निर्भीड आणि बाणेदार होते.म्हणूनच त्यांना लोकमानसाकडून अग्रलेखाचा बादशहा हा 'किताब मिळाला.
  • यांचं असं का होतं ? 

  • भाग -6 

नवा काळ हे वृत्तपत्र न राहता एक व्यक्तिमत्व बनले.पण आज घडीला हाच अग्रलेखांचा बादशहा म्हणजे निळूभाऊंचे .'नवा काळ'हे वृत्तपत्र अडगळीत फेकल्यासारखे झाले आहे.एकेकाळी भांडवलशाही वर्तमानपत्रांना लोकप्रियतेच्या बळावर चितपट करणाऱ्या नवा काळची अवस्था आज घडीला राज्य खालसा झालेल्या सम्राटासारखी झाली आहे.अग्रलेखाचा बादशहा आता अंधाराच्या पखाली वाहत आहे.त्याचे कारण निळूभाऊंच्या विचारांचा वारसा पुढील पिढीला पेलवला नाही,जपता आला नाही.हे आहे.जे लोकमान्य टिळकांच्या 'केसरी'चे झाले,आचार्य अत्र्यांच्या 'मराठा'चे झाले,अनंतराव भालेरावांच्या 'मराठवाडा'चे झाले तेच आता 'नवा काळ'चे होण्याच्या मार्गावर आहे.विचार संपले आहेत.लोकप्रियताही आटोपल्यात जमा आहे.'नवा काळ'चे वाचक आता शिगोट्यांचा 'मुंबई चौफेर'वाचतात आणि अग्रलेख वाचण्या ऐवजी शब्द कोडी सोडवतात.याचे कारण लोकांना वेड लागलंय-लोक उथळ आणि मूर्ख झालेत,असे नाही.'नवा काळ 'चा खळाळ आटलाय.निळूभाऊंनी लेखणी खाली ठेवली,आणि नवाकाळची कळाच गेली.नवा काळ अजून सुरु आहे,सुरु राहीलही,वाचक अजूनही आशेने नवाकाळ घेतात.पण ती मजा नजाकत राहिली नाही.बरे वारसांना विचारापेक्षा संप्पतीच्या वारसाहक्काच्या वाट्यात अधिक रस आहे असे गृहीत धरू ,मग धंदा व्यवसाय म्हणून तरी नीट करावा.तर तेही नाही.अशा स्थितीत 'नवा काळ'ला काय भवितव्य असणार ? महाराष्ट्रातल्या तीन चार हजार लहानमोठ्या वर्तमानपत्रांपैकी एक वर्तमानपत्र.बस.तशी तर मग तालुक्याच्या ठिकाणीही ' दैनिक गदारोळ ' ,'देता का छापू ' या छापाचे शेकड्याने लंगोटी पेपर चालतात.नवा काळ कडून या रांगेत उभे राहण्याच्या अपेक्षा नाहीत.परंतु असे घडत आहे.अग्रलेखाच्या बादशहाने अंधाराच्या पखाली वाहायला सुरुवात केली आहे.
मराठी वृत्तपत्रसृष्टीत 'नवा काळ' चं एतेहासिक महत्व आहे.लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर तीन वर्षांनी 'नवा काळ'सुरु झाला.नाट्याचार्य खाडिलकर सुधारणावादी होतेच पण पक्के टिळकपंथी देखील होते.१९९७ मध्ये ते टिळकांच्या आग्रहास्तव केसरीत उपसंपादक म्हणून रुजू झाले.टिळकांना राजद्रोहाच्या आरोपात शिक्षा झाली तेव्हा १९०८ ते १९१० असे तीन वर्ष ते केसरीचे संपादक होते.नंतर १९१८ साली टिळक इंग्लंडला गेले तेव्हाही
टिळकांनी संपादकपदाची जबाबदारी खाडिलकरावरच सोपवली होती.पुढे टिळकांच्या निधनापर्यंत( १९२० ) खाडिलकरच केसरीचे संपादक होते.टिळक गेले आणि खाडिलकरांनी केसरी सोडला,किंवा त्यांच्यासाठी केसरीचे दरवाजे बंद झाले.१९२० ते १९२३ त्यांनी मग एका ढोंगी टिळकभक्ताच्या 'लोकमान्य'नामक दैनिकात संपादकपद स्वीकारले.पण टिळकांच्या नंतर त्यांच्या राष्ट्रवादाला आणि स्वराज्य-स्वदेशी संकल्पनेला आलेले प्रच्छन्न आणि प्रचारकी स्वरूप खाडिलकरांना मान्य नव्हते.टिळकांचा देखील काही सुधारणांना विरोध होताच,परंतु त्यातून त्यांना सांगायचे हेच होते की सुधारणेच्या नादात स्वराज्य आणि स्वातंत्र्याच्या उद्दिष्टावरून जनतेचे लक्ष्य ढळलायला नको .परंतु टिळकांच्या नंतर टिळकभक्त नावाची एक जमात निर्माण झाली ती सरळसरळ कट्टरतावादी,पुरोहितशाही आणि ब्राह्मणशाहीचा पुरस्कार करणारी मंडळी होती.त्यांना स्वातंत्र्यलढाच हायजॅक करायचा होता.पण ते जमले नाही,स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व महात्मा गांधींकडे गेले.आणि टिळकपंथीयांनी मग हिंदू महासभा तसेच रा स्व संघाच्या माध्यमातून संस्कृती परंपरा आणि धर्मरक्षणाचा लढा सुरु केला .या सगळ्या स्थित्यंतराचे आणि संक्रमणाचे कृ.प्र.खाडिलकर सक्रिय साक्षीदार होते. कृ.प्र.खाडिलकर टिळकांचे अनुयायी असले तरी त्यांना हिंदू महासभा आणि रा स्व संघाचा उन्मादी,सनातनी ब्राह्मण्यवादी हिंदुत्वादी विचारसरणी अमान्य होती.त्यामुळे नकळत ते गांधीवादाकडे वळले.याच काळात मग १९२३ साली त्यांनी स्वतःचे 'नवा काळ'वर्तमानपत्र काढले.१९२९ साली वर्तमानपत्रातील एका वादग्रस्त लेखामुळे तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवून त्यांना एक वर्षाची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड देखील ठोठावला होता.तुरुंगात जातानाच त्यांनी आपले पुत्र म्हणजेच निळूभाऊंचे वडील यशवंतराव खाडिलकर यांचे हाती नवा काळची धुरा सोपवली होती.यशवंतराव खाडिलकरांचा संपादकीय मगदूर जेमतेमच होता,त्यामुळे 'नवा काळ'ला या काळात अक्षरशः अवकळा आली.सूर्याने काजळी धरावी अशीच परिस्थिती आली.पेपर आज उद्या बंद पडणार इतकी डबघाईची अवस्था.चार पाने ,ब्लॅक व्हाईट.तीही आठवड्यातून एकदा,खप नावालाच.बहुतेक रद्दीच,छपाई तरी किती ? दोनशे नाहीतर तीनशे ते चारशे.पाचशे कधीच नाही.वरतून कर्जाचा डोंगर,कर्मचाऱ्यांचे पगार,देणी थकलेली.अशा स्थितीत नीलकंठ खाडिलकरांच्या हाती वर्तमानपत्रांची सूत्र आली आणि बघता बघता नवा काळ 'अग्रलेखाचा बादशहा 'झाला.मुंबई आणि उपनगराचा 'राजा.! दैनिक म्हणून नियमित छपाई आणि पाहिल्या पानावर अग्रलेख लिहिण्याची अनोखी स्टाईल ! नवाकाळने इतिहास फक्त घडवला नाही तर बदलला.अक्षरशः नामदेवा सारखं देऊळच फिरवलं.घुमान ! एका वर्षात एक हजार वरून तब्बल सात लाख एवढा प्रचंड वेगाने खप वाढण्याचा विक्रम नवा काळच्या नावावर आहे,जो अद्याप तरी कोणाला गाठता किंवा मोडता आलेला नाही.पण आधीच सांगितले ना ; अग्रलेखाचा बादशहा म्हणून निळूभाऊंचे नाव अजरामर राहील परंतु अग्रलेखाचा बादशहा असलेला त्यांचा पेपर 'नवा काळ' मात्र आता अंधाराच्या पखाली वाहतोय.यांचं असं का होतं ?
निळूभाऊंचे मराठी वृत्तपत्र सृष्टीला योगदान काय ? हेही सांगायला हवंच.त्या शिवाय वरील लेखाचं प्रयोजन कळणार नाही.ठीक आहे भेटू पुन्हा,पुढच्या सोमवारी,याचवेळी,याच ठिकाणी.तो पर्यंत नमस्कार.
-------------------------------------
खुलासा : मागील लेखात जेष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर हे बाबा दळवींचे अनुयायी आहेत असा उल्लेख करण्यात आला होता.या संदर्भात स्वतः प्रवीण बर्दापूरकर यांनी फोन करून आपण 'बाबा दळवींच्या कंपूतले कधीच नव्हतो.माझी वृत्तपत्र सुष्टीतील सुरुवात चिपळूण येथील नाना ( यशवंत ) जोशी यांच्या 'सागर'या प्रादेशिक वृत्तपत्रापासून झाली,नंतर नागपूर पत्रिका,सकाळ,लोकसत्ता,लोकमत असाही प्रवास झाला,पण मी ना कधी 'बाबा' वादी होतो,ना कधी 'बुआ'वादी.असे बर्दापूरकांनी स्पष्ट केले आहे.अनावधानाने त्यांचा उल्लेख बाबा कंपूत झाल्याबद्दल क्षमस्व.
-------------------------------------
-रवींद्र तहकिक
कार्यकारी संपादक दैनिक लोकपत्र
7888030472
----------------------------------------शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१८

#Me_Too दूरदर्शन मधील १० महिलांनी केला लैंगिक छळाचा आरोप

नवी दिल्ली - दूरदर्शन मधील १० महिलांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त वाचा


दूरदर्शन मधील १० महिलांनी केला लैंगिक छळाचा आरोप

मंगळवार, २५ डिसेंबर, २०१८

डष्टर,पिंजर,खार,खबुतर,डोली...खंजर !

पत्रकार मित्रहो, तुम्ही म्हणाल 'काय पोरखेळ लावलाय काय ?' डष्टर,पिंजर,खार,खबुतर,डोली...खंजर ! काय आहे हे ? आहो, आपल्यात सध्या जे चाललय,तेच सांगतोय.खरंच पोरखेळ झालाय.सहा जानेवारी जवळ आलाय.दर्पण दिन हो ! खरं म्हणजे आपणही आता दर्पण दिनाला 'ड्राय डे'ची मागणी करायला हरकत नाही.नको म्हणता ? ठीक आहे.मग काय,त्या निमित्ताने 'मामाचं पत्र हरवलं' खेळताय ? ते तर रोजच खेळतो की आपण.सूर पारंब्या,लगोरी,पतंग-काटाकाटी,कुरघोडी,कांदाफोडी,खो-खो,हॉलीबॉल-फुटबॉल.माहीर आहोत आपण त्यात,सर्वच.कोणी नुसतेच कोच,कोणी पट्टीचे खिलाडी,कोणी रिटायर्ड कॉमेंट्रेटर.पण खिलाडू वृत्ती नाही.निव्वळ रॅटरेस.जीवघेणा खेळ.किलिंग-स्पॉइलिंग पॉलिटिक्स.पत्रकार क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वाना याचा अनुभव आहे,कामाची म्हणून जेवढी काही क्षेत्रे आहेत तिथे पुढे जाण्याची स्पर्धा आहेच.परंतु कोणतेही क्षेत्र घ्या,तिथे कलीग म्हणून स्पर्धेचेही काही नियम निकष औचित्ये पाळले जातात.स्पर्धा असतेच पण निकोप असते.तत्व-बित्व सोडा,पण किमान एकमेकांबद्दल सद्भावना,सहानुभूती,करुणा बाळगायला काय हरकत आहे ? मदत नाही किमान सहकार्य.आजूबाजूला जरा बघा,कंपन्यातले कामगार,बिगारी काम करणारे मजूर,रस्त्यावर नाही ते धंदे करणारे फेरीवाले,पोलीस,प्रशासकीय कर्मचारी,शिक्षक,वकील ,डॉक्टर,व्यापारी,इंजिनियर्स,खाटीक,न्हावी-धोबी,फार कशाला आपलीच ताजी-शिळी रद्दी विकणारे पेपरस्टोलवाले,हॉकर्स,देवळातले पुजारी,फकीर-भिकारी,सगळ्या पक्षांचे पुढारी,जाऊद्या आपल्या( म्हणजे आपण जेव्हा जेव्हा ज्या ज्या वर्तमानपत्रात 'पत्रकार'म्हणून काम करत असतो त्या ) वर्तमानपत्राचे मालक एकमेकांशी कसे वागतात,एकमेकाला सांभाळून घेतात,वेळ प्रसंगी सहकार्य करतात ते पहा,आणि मग आपण काय करतो,कसे वागतो हे जरा 'दर्पणा' समोर उभे राहून न्याहाळा.
मुंग्यांचं उदाहरण देत नाही,पण गाढवं सुदधा रांगेत,शिस्तीत आणि एकमेकांशी समन्वय ठेवून ओझी वाहतात,बाकी आपण गाढवाप्रमाणेच भर उन्हात स्वतःच्याच सावलीला 'सावली'समजून उभे राहतो वगैरे ठीक.गाढवाप्रमाणेच आपले निर्मिती सामर्थ्यही एकूण आवाक्याच्या मानाने 'मोठे' आणि भयंकर असते.आणि त्याच अवसानाच्या बळावर आपण कायम 'दुगाण्या'झाडत मुर्खांच्या नंदनवनात लोळत असतो.यात नवखी शिंगरे जरा आबदार आबलुक वाटतात आणि अर्थात जुनी खोंडं 'आब'घाली.इतकेच.पण 'गाढवपणा'सारखाच.पूर्वी कधीकाळी टिळक -आगरकर,अत्रे-ठाकरे,भोपटकर-खाडिलकर,असे म्हणे वाद असायचे.पण ते वैचारिक.सध्या काय चालतं ते तुम्हीच पहा आणि ठरवा.
  • यांचं असं का होतं ? 

  • भाग - 5 

खरे तर मी आज दैनिक मराठवाडाचा अंत कसा झाला,महाराष्ट्रातील वैचारिक तत्वनिष्ठ भूमीकावादी पत्रकारिकरिता कशी संपुष्टात आली,वर्तमानपत्र चालवणे हा प्रशस्त व्यवसाय न उरता निव्वळ 'धंदा'कसा झाला,नैतिकतेची मूल्यवादी वस्रे एक एक करून कशी उतरवली गेली.हे वस्रहरण केले कोणत्या दुर्योधनाने ?( की द्रौपदीनेच स्वतःला एक्स्पोज केले ?) समजा तिला 'पणाला' लावले असेल तर तो जुगार मांडला कोणी ? खेळले कोण ? हरले कोण आणि जिंकले कोण ? कोणाच्या वाट्याला राज्य ? कोणाला वनवास ? कोणत्या धनुर्धरांना करावे लागले बृहन्नडा होऊन शृंगार ? कोणत्या गदावीरांना करावा लागला बल्लव होऊन स्वयंपाक ? ज्याच्या सत्यशीलतेमुळे रथाचे चाक अधांतरी राहायचे अशा कोणत्या धर्मवीराला 'कंक' होऊन हाकावा लागले रथ ? हे सगळं नैतिक नष्टचर्य कोणी ओढवून घेतलं ? दुर्योधन-दुःशासन का मातले.या सगळ्या वाताहतीला..आपल्यातलेच काही उचापतखोर जबाबदार आहेत.किंबहुना या उचापतखोरानीच मराठी पत्रकारिता बदनाम झाली आहे, बरबटली आहे,एकेकाळी पत्रकारम्हणून सर्वच ठिकाणी जो आदर सन्मान प्रतिष्ठा होती ती आता उरली नाही,समोर लोक काय बोलतात ते सोडा,मागे काय बोलतात ते पहा,एका व्यक्ती बाबत नाही म्हणत,एकूणच पत्रकार विश्वाबद्दल, व्यवसाया बद्दल बोलतोय.समाजात पत्रकारितेला विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा उरलेली नाही हे सत्य आहे.त्याला कारणीभूत ९९ टक्के आपणच आहोत.मालक मंडळी फक्त एक टक्का दोषी.पाहिलं बटन ते काढतात,तो ही अंदाज पाहून,पण आपल्यातले अनेक पाहिलं बटन उघडच ठेवतात,आणि इशारत झाली की सरळ 'न्यूड 'होतात.म्हणजे अर्थात नागडे ! त्यामुळे मालक मंडळींवर खापर फोडून काय हशील ? काय आहे, कुरणात म्हशी चरत असतात,आणि बगळे तिच्या पाठीवर शिंगावर बसून किंवा भोवताली फिरून म्हशीने उडवलेले किडे टिपत असतात,म्हशीला बगळ्यांच्या या 'खानेसुमारीशी'काहीच देणेघेणे किंवा कर्तव्य नसते,बगळे मात्र उगाचच म्हशी बदलत राहतात आणि वरतून 'अगं अगं म्हशी मला कुठे नेशी'म्हणत आपला पांढरपेशी अहंभाव कुरवाळत असतात.म्हैस कशाला कोणाला कुठे नेते.बगळेच म्हशी बदलत राहातात.दुसरा एक प्रकार त्याहून वाईट आहे.मला सांगा ज्या म्हशीच्या स्तनातून दूध निघते तिथे गोचीड काय पितात ? तर रक्त.बरे गोचिडाच्या रक्त शोषणाने म्हशीला पडून पडून काय फरक पडतो ? म्हैस मरते का ? नाही ! गोचीडच एक दिवस फुगून मरतो.थोडक्यात हे असे आहे.मला सांगायचे बरेच काही .बऱ्याच बाबतीत,बऱ्याच संदर्भात आणि बऱ्याच जनाबद्दल आहे.अगदी चाळीशीत मुक्त पत्रकारिता या गोंडस नावाखाली मेन स्ट्रीम मधून बाहेर फेकले गेलेल्या कितीतरी पत्रकारांची उदाहरणे येथे सांगता येतील.वयाचा प्रश्न तसा येतोच कुठे ? पण कितीतरी जण अक्षरशः घरी बसलेले आहेत.त्या पैकी प्रत्येकजण नवीन संधीच्या प्रतीक्षेत आहे,पण संधी मिळत नाही.एकदा बाहेर फेकले गेले की त्यांना सहसा पुन्हा 'खेळात'घुसू दिले जात नाही.बरे हे सगळे अन्यायग्रस्त असतात का ? तर त्यांच्या बाजूने बोलायचे झाल्यास होय.पण दुसरी बाजू पहिली तर यांनीही उमेदीत आणि अधिकारात अनेकांची अक्षरशः 'वाट'लावलेली असते.मग कोणीतरी शेरास सव्वाशेर भेटतो आणि यांची वाट लावून टाकतो.हिसाब बराबर.महावीर जोंधळे काय,संतोष महाजन काय,अरविंद वैद्य काय,दिवंगत विद्याभाऊ सदावर्ते काय किंवा अगदी प्रवीण बर्दापूरकर ,संजीव उन्हाळे,धनंजय चिंचोलीकर,अनिल फळे,सुंदर लटपटे,यमाजी मालकर इत्यादी इत्यादी.. हे सगळे 'बाबा दळवी'ना 'गुरु' मानणारे पत्रकार अनुभव, ज्ञान कौशल्य-क्षमता,बाबतीत 'कुबेरा'ला ( लोकसत्तावाले नाही ) लाजवणारी मंडळी नव्हेत काय ? पण मग 'यांचं असं का होतं ?'हा खंतावणारा प्रश्न उरतोच.अख्खे आयुष्य लोकमत साठी आयुष्य झिजवलेल्या विद्याभाऊंच्या वाट्याला कायम उपेक्षाच का आली ? लोकमतसाठी मराठवाडा सोडणाऱ्या संतोष महाजनांना तरुण भारत,लोकपत्र,सांजवार्ता,गावकरी अशी उतरती भटकंती का करावी लागली ? बाबा दळवी सुध्दा लोकमत मधून लोकपत्र मध्ये दीड वर्षाचा वनवास भोगायला आले होते.महावीर भाईंना लोकमतमधून कुमार केतकरांनी हुसकावून लावले.कारण काय तर महावीर जोंधळेंना इंग्रजी बोलता,लिहिता,वाचता येत नाही.फारच सुमार दर्जाचे इंग्रजी आहे.लेखनही ललित म्हणजे साहित्यिक दर्जाचे आहे,त्यात 'पत्रकार'नाही.वगैरे.सांगणाऱ्याने सांगितले आणि ऐकणाऱ्याने ऐकले.महावीरभाई बाहेर.आता महावीर भाई आदर्श पत्रकारितेचे धडे देत फिरतात.पण त्यांनीही कमी जणांना छळले पळवले पिटाळले नव्हते.आज 'कासवं आसवं गाळताहेत' खरी परंतु यांच्या पाठी निबर कवचाच्या आहेत.लोकमत सारख्या मराठी वर्तमानपत्रातील आचारसंहिता संपवणाऱ्या आणि पत्रकारितेला भलत्याच गल्लीत नेवून 'बाजारबसवी' बटकी करणाऱ्या वर्तमानपत्राला महाराष्ट्राचा आवाज ठरवणाऱ्या अनेकांच्या नरडीला अखेर तिथेच नख लागले.महावीर जोंधळे त्या पैकीच एक.डष्टर,पिंजर,खार,खबुतर,डोली...खंजर !
खूप लिहिले,पण जे लिहिले ते पोटतिडीकेने.कुणाचा उपमर्द करण्याचा,अहवेलना करण्याचा आजिबात हेतू नाही.कुणाला तसे वाटल्यास त्यांनी मला आवश्य फोन करावा,मला क्षमा मागण्याची संधी द्यावी,चला तर मग भेटू पुन्हा,याच दिवशी.याच ठिकाणी.तो पर्यंत नमस्कार.
--रवींद्र तहकिक
कार्यकारी संपादक ,दैनिक लोकपत्र
फोन : 7888030472

सोमवार, १७ डिसेंबर, २०१८

'बाबा' गेले अन दशम्याही गेल्या

विषय तोच आहे,म्हणजे 'सुपातले जोंधळे जात्यात का भरडले ?' पण एकटे जोंधळेंच का म्हणून ? आदरणीय पत्रमहर्षी आणि प्रतिपाद्य समाजवादी ( प्रतिपदेच्या 'चंद्रा' प्रमाणे 'बाबां'चा समाजवाद देखील 'कला कला'ने 'कोरी'त वाढून कधी 'पुनवे'चा तर कधी 'आवशी'चा होऊन उगवत मावळत असे.म्हणून ते 'प्रतिपाद्य समाजवादी' ! ) असो तर श्रीमान 'बाबा' उपाख्य म.य .दळवींचे शेपूट धरून दैनिक मराठवाड्यातून जे जे 'मृच्छकटिक' लोकमत मध्ये आले त्या सर्वांनी पत्रकारितेत एक नवीच परंपरा निर्माण केली.या सर्वांनी मिळून सर्वप्रथम 'दैनिक मराठवाडा'चा 'अभिमन्यू' केला.घाव घालणाऱ्यात अनेक रथी-महारथी होते.त्यातले महावीर भाई म्हणजे एक छोटेसे प्यादे होते.
  • यांचं असं का होतं ? 

  • भाग - चार : सुपातले 'जोंधळे'जात्यात का भरडले ?
चक्रव्यूह 'बाबां'नी रचला होता,आयुधे 'दर्डा' नी पुरवली,आणि 'अभिमन्यू वध' संतोष महाजन,अरविंद वैद्य,राम अग्रवाल,महावीर जोंधळे,विद्याभाऊ सदावर्ते,बाबा गाडे या सगळ्यांनी मिळून केला.यात काही नावे राहूनही गेली असतील,कदाचित एखादे नाव अकारण'ही' आलेले असू शकते.काही तपशील 'ऐकीव' आहेत,त्याचे पुरावे देता येणार नाहीत.म्हणजे उपल्बध नाहीत.कोणत्याही घडामोडींचा ढोबळ इतिहास नेहमीच आपल्या समोर असतो.परंतु त्यामागची 'कट कारस्थाने' कधीच समोर येत नाहीत,कारण त्याचे पुरावे नसतात.त्यामुळे इथेही काही तपशीलवार आक्षेप निर्माण होऊ शकतात.परंतु हे तितकेच खरे की, बाबा दळवींनी वयक्तिक महत्वाकांक्षा आणि अनंतराव भालेराव यांच्या बद्दलच्या सुप्त असूया आणि सुडापोटी अनंतराव,समाजवाद आणि दैनिक मराठवाडाशी फारकत घेतली.' नामांतराचा मुद्दा' हे केवळ निमित्त होते.बाबा मध्ये वसलेल्या छुप्या संघोट्याची 'चाणक्य नीती'.मराठवाडा संपवायचाच ही या चाणक्याची 'शेंडीला गाठ'मारून प्रतिज्ञाच होती.,दलित चळवळीतील काही पट्टशिष्य, तसेच बाबा 'प्रेमी' समाजवादी पिलावळ आणि मराठवाडा,अजिंठा मधून फितवलेली 'रसद' एवढ्या भांडवलावर बाबा 'लोकमत'चे सेनापती बनले.आणि मग या हेमाडपंताने दैनिक मराठवाडाचा अभेद्य गड भेदला.साम,दाम,दंड,भेद : सगळी चाणक्य नीती.बाबांनी मराठवाडा दैनिकाचे समूळ उच्चाटन आणि दैनिक लोकमतच्या प्राण प्रतिष्ठेसाठी काय काय पणाला लावले आणि काय काय 'गहाण' ठेवले याची चर्चाच न केलेली बरी.कारण त्यांचे शिष्यगण,भक्तगण आणि 'प्रीती संगमांचे' अनेक लाभार्थी अजूनही जिवंत आहेत.अमुक एकाने अनेक माणसे जोडली असे आपण सहसा म्हणतो,बाबांच्या बाबतीत वेगळी गम्मत आहे,त्यांनी किती माणसे जोडली,किती तोडली, ( किती तुडवली ?) हे अलहिदा.पण त्यांनी अनेक जोडपी जुळवली हे त्यांचे समाजवादी चळवळीला,मराठी पत्रकारितेला,दलित आणि ग्रामीण साहित्य क्षेत्राला,दिलेले अभूतपूर्व योगदान आहे.त्यांच्या या योगदानाचा सांख्यकी सर्व्हे अजून कोणी केलेला नाही,परंतु ही संख्या कमीत कमी पाचशे सहाशे तरी असावी,कदाचित त्याहून अधिक.म्हणूनच वसंत कुंभोजकर बाबांना गमतीने 'जुळारी 'म्हणत.बाबांच्या गुहेत शिष्य म्हणून गेलेला कोणीही रिकाम्या हाती येत नसे.म्हणजे कोणाचा तरी हात हातात घेऊनच यायचा.त्यातही आंतरजातीय,आंतरधर्मीय विवाह जुळवण्यात बाबांना विशेष रस.बाबांची ही कला आणि लौकिक ऐकून अनेकजण बाबांचे शिष्यत्व पत्करायचे आणि बायको किंवा नवरा पदरात पडून घ्यायचे.पुन्हा त्या जोडप्यांना 'उभयता' नोकऱ्या मिळवून देण्यासाठीही 'बाबा' त्यांचं वलय,वजन आणि शब्द खर्ची घालायचे.त्यामुळे'लव्ह गुरूंच्या'भोवती 'भुंगे आणि मधमाशांचा' गुंजारव कायम असायचा.पत्रकारितेतल्याही अनेकांना बाबांनी बायका आणि बायकांना नोकऱ्या मिळवून दिल्या.त्यामुळे हे लाभार्थी कधीच बाबांच्या शब्दाबाहेर नसायचे,बाबा म्हणतील ती पूर्वदिशा. बाबा वाक्यं प्रमाणम.ही अवस्था.त्यामुळे दैनिक मराठवाडा संपवण्याचा 'बाबांचा प्रण' तडीस गेला.अनेक जण असेही म्हणतील की मराठवाड्याच्या नष्टचर्याचे खापर उगाच बाबा दळवी,दर्डा,लोकमत आणि तत्कालीन मराठवाडा सोडून लोकमत मध्ये आलेल्या महावीरभाई आणि कॅम्पवर फोडू नका.मराठवाडा संपला त्याला कारणीभूत स्वतः अनंतराव भालेराव,विश्वस्त मंडळ आणि अकारण पांघरलेला समाजवाद हे आहे. एका नामांतर प्रश्नाने दैनिक मराठवाडा आणि अनंतरावांचा समाजवादी बुरखा फाटला आणि त्यांचा ब्राह्मणी मनुवादी चेहरा उघडा पडला.म्हणून लोकांनीच त्यांना नाकारले.कालाय तस्मै नमः, त्या साठी आम्हाला नका जबाबदार ठरवू. काळ बदलला.लोकांची अभिरुची बदलली.वाचकांची वर्तमानपत्राकडून अपेक्षा आणि मागण्या बदलल्या.पेपर चालवणे व्यासायिक दृष्ट्या किफायतशीर झाले तरच ते टिकेल हा नवा सिद्धांत आला.चळवळ,विचारधारा,भूमिका या पेक्षा लोकांना वाचायला निरनिराळ्या चवीच्या बातम्या देणे आणि जाहिराती मिळवणे म्हणजेच पत्रकारिता ही नवी व्याख्या तयार झाली.हे परिवर्तन आपोआप झाले की लोकमत ने घडवून आणले हा संशोधनाचा विषय आहे.माझ्या मते पत्रकार आणि वृत्तपत्र व्यवसायाला 'निव्वळ धंदेवाईक स्वरूप आणण्यात आणि धंद्यासाठी कोणतीही पातळी गाठण्याची व्यवस्था निर्माण करण्यात लोकमतचा वाटा हनुमानाचा असेल तर बाबा दळवी त्यातले 'जांबुवंत. आहेत.बाकी मग संतोष महाजन,अरविंद वैद्य,राम अग्रवाल,बाबा गाडे,महावीर जोंधळे इत्यादी वगैरे म्हणजे सुग्रीव,नळ-नीळ-अंगद इत्यादी,विद्याभाऊ सदावर्तेचाही 'खारीचा वाटा' ! विषयाचेही शेपूट मारोती प्रमाणेच लांबले.पण मारोतीच्या बेंबीत बोट घातल्याशिवाय आत नेमकं काय 'ठणका' मारतंय आणि लोक का म्हणून 'गार'च लागतंय, म्हणतात,ते कळणार नाही,म्हणून जरा सविस्तर.चला तर मग,भेटू पुन्हा.याच वेळी,याच ठिकाणी,पुढच्या आठवड्यात.तो पर्यन्त नमस्कार'

 (भाग २)
--रवींद्र तहकिक
कार्यकारी संपादक ,दैनिक लोकपत्र 
Mobile - 7888030472

शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१८

दीपक पटवे यांचे सर्व अधिकार गोठविले

दिव्य मराठी : दीपक पटवे यांचे सर्व अधिकार गोठविले; सेंट्रल डेस्क-प्रशासकीय बाबी, KRA असिसमेंटची जबाबदारी काढली, यापुढे फक्त औरंगाबाद शहरपुरती (चीफ रिपोर्टर) मर्यादीत जॉब प्रोफाइल

● संजय आवटे औरंगाबाद संपादक म्हणून रुजू .... पटवे कंपनीने गड्ड्यात घातलेल्या 'दिव्य मराठी'ला गतवैभव प्राप्त करून देण्याचे आवटेंसमोर आव्हान, पटवेंनी जागोजागी पेरलेली स्वतःच्या मर्जीतली कुचकामी प्यादी रडारवर

'दिव्य'मधील चिरीमिरीचे धंदे बंद होण्याची शक्यता

● मोक्याच्या संपादकीय जागी प्रथमच बहुजन चेहरा, पटवे & कंपनीने बोकळावलेल्या जातीयवादी रचनेला सुरुंग लावण्याची आवटेंवर मुख्य जबाबदारी

दिव्य मराठी प्रशासन पटवे & कंपनीच्या जातीयवादामुळे दाखल दोन डझनहून अधिक न्यायालयीन, फौजदारी प्रकारणांमुळे हैराण

● पटवे आणि जातीयवादी चमूने 'दिव्य मराठी'च्या वाटचालीला सुरुंग लावल्याचा भोपाळच्या चौकशी समितीचा निष्कर्ष

चौकशी समितीच्या अहवालानुसार, बहुजन चेहरा नियुक्तीची शिफारस

●राज्य संपादक नवनीत गुर्जर यांनी केली आवटे यांच्या नियुक्तीची घोषणा; शुक्रवारी औरंगाबादेत गुर्जर यांच्या उपस्थितीत पटवे यांच्याकडून चार्ज काढून घेऊन आवटे यांना हस्तांतरित


बुधवार, १२ डिसेंबर, २०१८

मनोज सांगळे यांची आणखी एक झेप

औरंगाबाद -  दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक मनोज सांगळे यांना यंदाचा झेप पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. झेप प्रकाशन ( औरंगाबाद ) आणि आर्यनंदी पतसंस्था ( चिखली ) यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी महिन्यात चिखली येथे होणाऱ्या झेप साहित्य संमेलनात त्यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
सांगळे यांना यापूर्वी नवी दिल्लीच्या श्री शिवाजी महाराज मेमोरियल कमिटीने जोतिबा पत्रगौरव पुरस्कार मिळाला आहे. बुलडाणा येथून पत्रकारितेला सुरुवात करणारे श्री. सांगळे गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक प्रश्‍नांना लिखाणातून वाचा फोडल्याने त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याचे संयोजकांनी सांगितले.याबद्दल त्यांचे अनेक पत्रकारांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

सुपातले 'जोंधळे'जात्यात का भरडले ?

दर सोमवारी ठरलेल्या दिवशी लेख न टाकू शकल्या बद्दल सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि वाचकांची मनःपूर्वक माफी मागतो.आणि माझ्या या लेखमालेला उदंड प्रतिसाद आणि प्रतिक्रिया दिल्या बद्दल सर्वांचे धन्यवाद सुद्धा.अनेकांनी मला वैयक्तिक फोन करून लेखमालेतील लेखाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया दिल्या.काहींनी 'हे कशासाठी लिहिताय ?' असंही विचारलं.म्हणून या लेखमालेची भूमिका आणि उद्देश स्पष्ट करतो.सर्वप्रथम स्पष्ट सांगतो की या लेखमालेतून कोणा व्यक्तीची निंदा नालस्ती,टवाळी करण्याचा किंवा उगीचच लक्तरे वेशीवर टांगण्याचा,बदनामी करण्याचा माझा हेतू नाही.तसे वाटले तर आपण सांगाल त्या दिवसापासून मी ही लेखमाला बंद करून टाकीन.
यातून कुणाचे समुपदेशन किंवा प्रबोधन करण्याचा किंवा पत्रकार विश्वाला काही एक विधायक दिशा आणि दृष्टी देण्याचा वगैरे उदात्त हेतू आहे असेही नाही.माझी तेवढी पात्रता अनुभव व अधिकारही नाही.मुळात मी लौकिकार्थाने पत्रकारही नाही.म्हणजे पत्रकारितेची कोणतीही पदवी माझ्याकडे नाही.मी कधी कोणत्या बीटवर काम केलेले नाही.बातमीदारी केलेली नाही.टेबलला बसून बातम्या लिहिलेल्या किंवा एडिट केलेल्या नाहीत.किंवा पाच दहा वर्तमानपत्रात फिरलेलो देखील नाही.मुळात वयाच्या पंचेचाळिशीत मी पत्रकारितेत आलो आणि थेट कार्यकारी संपादक झालो.गेली पाच वर्ष कार्यकारी संपादक म्हणून काम करत आहे.नोकरीवर रुजू झाल्याच्या पहिल्या दिवशी पत्रकारितेतील काहीही अनुभव नसताना अग्रलेख लिहावा लागलेला आणि नंतर कायम तीच जबाबदारी सांभाळलेला मी अपवादात्मक पत्रकार आहे.हे अशा साठी सांगतोय की वयाचं जाऊद्या परंतु आपण सगळे मला सर्वार्थाने सिनिअर आहात.हे मला आपल्या ध्यानात आणून द्यायचं आहे.असो तर आपण मूळ विषयाकडे म्हणजे महावीर भाई कडे वळूया.
महावीरभाई म्हणजे महावीर जोंधळे.महावीर जोंधळेंना पुण्या-मुंबईकडचे,नगर जळगाव नाशिक सोलापूर कोल्हापूरकडचे पत्रकार कितपत ओळखतात माहिती नाही,मराठवाड्यातही आता ते विस्मृतीत गेलेत,परंतु १९९३ ते २००२ पर्यन्त जवळपास नऊ वर्ष औरंगाबादच्या दैनिक लोकमत आवृत्तीचे कार्यकारी संपादक असल्याने मराठवाड्यात त्यांना बरेच जण ओळखतात.पत्रकारितेतल्या न्यू जनरेशनला महावीर भाई म्हणजे काय चीज होती ते माहित नाही.तसेही भाई नावालाच पत्रकार आणि संपादक होते .एखाद्या आज्ञाधारक विद्यार्थ्याने मास्तराच्या धाकापोटी नियमित गृहपाठ करावा अशी महावीर भाईंची पत्रकारिता नियमित,संयमित,माफक,किफायतशीर,संतुलित,आणि सुमार दर्जाची होती.लेखक म्हणून त्यांच्या कथा,कविता,ललित लेखन,बालनाट्य,बाल कादंबऱ्या देखील सुमार दर्जाच्याच होत्या,तिथेही त्यांनी गृहपाठाच लिहिले,पण त्यावर समीक्षा करण्याचे हे स्थान नाही.आपणाला त्यांची पत्रकार म्हणून उलट तपासणी करायची आहे,पत्रकार विश्वाने महावीरभाईंना काय दिले ? आणि भाईंनी पत्रकारविश्वाला काय दिले ? या दोन्ही प्रश्नाचे उत्तर काहीही नाही असे आहे.त्याचे कारण त्यांनी जिथे पत्रकारितेच्या नावाखाली गृहपाठ लिहिले त्या लोकमत समूहाकडे त्यांना काही देण्याची दानत नव्हती आणि महावीरभाईंकडे पत्रकारविश्वाला काही देण्याची कुवत नव्हती.थोडक्यात नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे.
परवा 'विचार वेध' नावाच्या कुठल्याश्या यु ट्यूब चॅनलवर ( हा म्हणजे पत्रकारांचा वृद्धाश्रम ! किंवा रिमांड होम अथवा अनाथालय म्हणा हवे तर ) महावीर भाई बोलताना दिसले,पत्रकार विश्वातल्या अपप्रवुत्तीवर आणि वृत्तपत्र मालकांच्या धंदेवाईकपणा बद्दल अत्यंत पोटतिडीकेने बोलले भाई.हे म्हणजे अरुण गवळीने दगडीचाळ सोडल्यावर काशीला जाऊन पारणे फेडल्या सारखं वाटलं मला.अंडरवर्ड मानवता विरोधी आहे वगैरे. किंवा दात पडल्यानंतर एखाद्याने 'शाकाहार उत्तम आहार ' म्हणत मांसाहारावर टीका करण्यासारखं . अहो महावीर भाई,महाराष्ट्रातल्या मराठी पत्रकारितेत ज्या वृत्तपत्रसमूहाने धंदेवाईकतेला सुरुवात केली त्या वर्तमानपत्राची औरंगाबादेत मुहूर्तमेढ कोणी रोवली ? तुम्हीच ना ? ताजमहालाच्या हस्तिदंती मनोऱ्यात बिछायत असे पर्यंत शरबत पीत 'वाह ताज' म्हणायचं आणि तिथून गठडी आवळून बाहेर फेकलं की त्यालाच ' मोहब्बत की कबर' म्हणायचं म्हणजे 'अन्नछ्त्री जेऊन मिरपूड मागण्या सारखं नाही काय ?' 
  • यांचं असं का होतं ? 

  • भाग - चार : सुपातले 'जोंधळे'जात्यात का भरडले ?
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या मुद्द्यावर दैनिक मराठवाडाचे संपादक अनंतराव भालेराव यांनी नामांतर विरोधी भूमिका घेतली.त्या विरोधात अग्रलेख लिहिले,त्यामुळे मराठवाड्यात काही ठिकाणी दंगली झाल्या.दलित वस्त्यांवर हल्ले झाले,जाळपोळ झाली.तत्कालीन पुलोद सरकारला नामांतराचा निर्णय मागे घ्यावा लागला,मग नामांतर आंदोलन सुरु झाले.दलित विरुद्ध दलितेतर असा संघर्ष उभा राहिला.याला अनंतराव कारणीभूत ठरवण्यात आले.अगदी ब्राह्मणी मनुवादी धोत्राखाली चड्डी घालणारा संघोटा म्हटले गेले.नेमक्या या परिस्थीतीचा फायदा नागपूरहून औरंगाबादेत लोकमत घेऊन आलेल्या राजेंद्र दर्डा यांनी घेतला.लोकमतने नामांतराला अनुकूल भूमिका घेतली,दलित चळवळीतल्या बिनीच्या कार्यकर्त्यांना बगलेत घेतले.बाबा गाडेंना तर मांडीवरच.ते ठीक म्हणजे दलित चळवळ नामांतरासाठी आग्रही असणे साहजिक होते,परंतु दर्डा बाबूंनी या निमित्ताने दैनिक मराठवाडाला खिंडार पाडले,कारण उघड होते,मराठवाडा कोसळला,नेस्तनाबूत झाला तरच औरंगाबाद आणि मराठवाड्यात लोकमतचे बस्तान बसणार होते.दर्डांना आंबडकरी चळवळ,नामांतर या बाबत खूपच आस्था वगैरे होती असे नाही,परंतु अनंतराव भालेराव आणि दैनिक मराठवाडाला संपवण्यासाठी नामांतर चळवळ आणि इथल्या तथाकथित पुरोगामी समाजवाद्यांना हाताशी धरून या संधीचा हत्यार म्हणून वापर करण्याचा धंदेवाईक चाणाक्षपणा बाबुजींकडे होता,त्यांनी तो अत्यंत खुबीने वापरला.बाबूजींच्या सुदैवाने आणि अनंतराव भालेराव तसेच दैनिक मराठवाडाच्या दर्दैवाने दर्डांच्या जाळ्यात 'पंखावाला कोंबडा' गवसला.म.य.उपाख्य बाबा दळवी ! अनंतरावांची नामांतरविषयक भूमिका टोकाची आततायी आणि चुकीची होती असे मानून चालू,वास्तविक अनंतरावांचा नामांतर विरोध जातीय नव्हता.मराठवाडा मुक्तिलढ्याची आठवण म्हणून विद्यापीठाचे नाव मराठवाडा असावे असे अनंतरावांचे म्हणणे होते.फार तर त्यात नामविस्तार करा,बाबासाहेबांचे नाव द्या,पण मराठवाडा वगळू नका असे अनंतराव म्हणत होते,अखेर ते तसेच झाले.पण या मुद्द्यावर अनंतरावांवर तुटून पडणाऱ्यांनी ( त्यात महावीर भाई सुध्दा आले ) बाळासाहेब ठाकरे जेव्हा 'घरात नाही पीठ आणि मागताय विद्यापीठ' असे म्हटले तेव्हा का कडकडीत अग्रलेख लिहिले नाहीत ? तेव्हा त्यांचे पुरोगामीत्व कोणत्या घाटावर पाणी पीत होते ? मुळात बाबा दळवी आणि त्यांच्या मागोमाग मराठवाडा सोडून दैनिक लोकमत मध्ये 'बाबां'ची जी काही (तथाकथित समाजवादी पुरोगामी) अंडीपिल्ली पक पक पकाक करत आली ( त्यात भाई होते ) ती काही वैचारिक मतभेदातून झालेली क्रांती किंवा उठाव वगैरे नव्हता.सगळे आले ते नव्या खुराड्यात दाणे टिपण्यासाठीच.खुराडा चकचकीत,अंडी घालायला आणि उबवायला मऊशार मुलायम वातानुकूलित खोपे,टिपायला टपोरे दाणे,पण या खुराड्याला दरवाजाही आहे ,आणि 'पोल्ट्री फॉर्मचा मालक' रोज 'पाखाडी' उचलून 'अंडं' दिलं की नाही हे तपासतो .(प्रसंगी 'बोट घालून' सुध्दा ! ) खुडूक कोंबड्याना सरळ 'खाटकाचं खोड' दाखवलं जातं.याचा कुणालाच अंदाज नव्हता .तो पुढे येत गेला,एका एकाला.क्रमा क्रमाने,त्यात एका दिवस महावीर भाईंचाही नंबर लागला,कसा ? तो वाचा पुढील भागात,पुढील सोमवारी,याच वेळी ,याच ठिकाणी. तो पर्यंत धन्यवाद ! 

पूर्वार्ध
 

--रवींद्र तहकिक
कार्यकारी संपादक दैनिक लोकपत्र

गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

संजय आवटे दिव्य मराठीच्या वाटेवर

औरंगाबाद - सकाळ माध्यम समूहातून बाहेर पडल्यानंतर संजय आवटे दिव्य मराठीच्या वाटेवर आहेत. सध्या त्यांची भोपाळमध्ये ट्रेनिंग सुरु असून, १ जानेवारीपासून दिव्य मराठीच्या औरंगाबाद आवृत्तीच्या संपादक पदाची सूत्रे हाती घेतील. आवटे आल्यानंतर निवासी संपादक दीपक पटवे यांची विकेट पडण्याची शक्यता आहे.

 सन 1999  मध्ये सोलापूरच्या दैनिक संचारमध्ये वृत्तसंपादक म्हणून पत्रकारितेस सुरुवात करणाऱ्या संजय आवटे यांनी, नंतर लोकमत (अकोला), लोकसत्ता (पुणे ), पुढारी (पुणे),  कृषीवल ( अलिबाग ) , पुन्हा पुढारी ( पुणे ), सकाळ ( मुंबई ) , साम ( मुंबई ) असा प्रवास करून भोपाळशेठच्या दिव्य मराठीत जॉईन होत आहेत.

मागील महिन्यापासून आवटे यांची भोपाळमध्ये  ट्रेनिंग सुरु आहे.  ट्रेनिंग पूर्ण होताच आवटे १ जानेवारीपासून  औरंगाबाद आवृत्तीच्या संपादक पदाची सूत्रे हाती घेतील, मात्र त्यांच्याकडे स्टेट एडिटर चार्ज नसेल, असे सांगितले जात आहे. आवटे यांची कामगिरी बघून भोपाळशेठ पुढील निर्णय घेतील, असे सांगितले जात आहे. आवटे जॉईन झाल्यानंतर निवासी संपादक दीपक पटवे यांची विकेटपडणार, हे निश्चित आहे. 

अभिलाष खांडेकर गेल्यानंतर स्टेट एडिटरची सूत्रे प्रशांत दीक्षित यांच्याकडे आली होती. मात्र दीक्षित लोकमत ( पुणे ) मध्ये जॉईन झाल्यानंतर कोणाची वर्णी लागणार ? याकडे लक्ष वेधले होते. अखेर आवटे यांनी, ही खुर्ची पकडली आहे.

बुधवार, ५ डिसेंबर, २०१८

टाईम्स नाऊ वेब साईटला हवे आहेत...

 टाईम्स नाऊ या  वेब साईटला हवे आहेत.सोमवार, ३ डिसेंबर, २०१८

सुंदरतेचं कुरुप पर्व...

सुंदर लटपटेंनी मोठ्या हिकमतीने उभारलेल्या एकलव्याच्या साम्राज्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात पसरला होता.माझ्या अनुमानानुसार वार्षिक टर्न ओव्हर सात ते आठ कोटीचा असावा.इतक्या झटपट हे सगळं घडलं की या क्षेत्रातल्या भल्याभल्यांना भोवळ यावी.पैसा येत होता आणि जात होता.साचत नव्हता.त्याचं कारण सुंदरची नवीन युनीट सुरु करण्याची अतिघाई,आणि आहे त्या युनीटवर केला जाणारा आडमाप वारेमाप खर्च. अनावश्यक कर्मचारी भरती,आणि त्यांचे भरमसाठ पगार.सुंदरचा स्वतः चा खर्च देखील टाटा अंबानींना लाजवणारा होता.त्यात संपत्तीच्या उपभोगापेक्षाही व्यवस्थेविरुध्दच्या विद्रोहातून आलेली सुडाची भावना होती.हे सगळं असंच चाललही असतं.पण सुंदरचं एकलव्यच्या आर्थिक व्यवहाराकडे होत गेलेलं अक्षम्य दुर्लक्ष, निरनिराळ्या आस्पेक्टवर उचलेली बँकांची,खाजगी सावकारांची,( नव्या)मित्रांकडून घेतलेली भरमसाठ कर्ज या चक्रात सुंदर फसत अडकत गेला.देणी देण्याशिवाय पर्याय नव्हता. येणी मात्र वसूल होत नव्हती.पसारा ईतका वाढवून ठेवला होता की आता तो आवरणं सावरणं हाताबाहेर गेलं होतं.त्यातच सुंदर आणि व्रंदा सोडून अख्ख्या एकलव्यला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले.वितरक,एजन्सीधारक,
वसूलीविभाग,लेखाविभाग अशी सगळी साखळीच बनली.त्यांनी सगळा येणारा पैसा गडप केला.मग देणी भागवता भागवता आणि व्यवसाय वाचवण्यासाठी आणखी कर्ज,ती फेडण्यासाठी आणखी कर्जे. कर्जाचा डोंगर वाढत गेला.व्यवसाय घटत गेला.तो वाचवण्यासाठी सुंदर सोबत विश्वासाचं एकही माणूस नव्हतं.जे होते ते दाढ दुखीला गुळाचं औषध सांगणारे होते.त्यातूनच मग,वैशाली सावंतचं "ऐका दाजीबा "वगैरे.एकलव्याच्या शोकांतिकेचा तो क्लायमॅक्स होता.सगळं संपलं.सुंदर सर्वार्थाने उध्वस्त आणि बरबाद झाला.अक्षरशः रस्त्यावर आला.दिवाभीताचं आयुष्य जगण्याची वेळ आली.जे होतं ते बँकानी जप्त केलं.उरलं सुरलं ज्याच्या हाती जे सापडलं त्यांनी लुटून नेलं.सुंदर पहात राहीला.काहीही करु शकला नाही.
हे वर्ष होतं २००७.त्यानंतर सुंदर अज्ञातवासात होता.जवळपास सहा वर्षे. या काळात त्याला डायबीटीजने गाठलं.पँरालिसीसचा अँटेक आला,पिणं स्मोकींग अति झालं.घर दार काही राहिलच नव्हतं.अक्षरशः गरजेच्या वस्तू विकून,हात उसणी घेऊन,पोटाची भूक,औषधं आणि व्यसनं भागवण्याचा भणंग उद्योग सुरु झाला.हे सगळं लाजिरवाणं होतं.अशावेळी सुंदरचा स्वाभिमान, ईगो,आत्मप्रतीष्ठा कोणत्या बीळात जाऊन लपते माहीत नाही. तो अशा अवस्थेत कोणाही समोर हात पसरु शकतो. या काळात बहुतेक गोपीनाथ मुंडेंच्या शिफारशीने तो विश्वनाथ कराड यांच्या पुण्याजवळील एमआयटी मध्ये नोकरीला लागला.खरं तर आता सुंदरने खरच औकातीने राहायला हवं होतं.पण एखादा साप कसा हवा पिला की फणा काढतो आणि फुत्कारतो,तसं सुंदरचं आहे.थोडा आधार मिळाला की त्याचा कणा मोडलेला षंढ स्वाभिमान फणा काढून डोलायला लागतो.
एमआयटीत तेच घडलं.

  • यांचं असं का होतं ? 

  • भाग तीन :तो प्रवास 'सुंदर' होता... उत्तरार्ध
अकाऊंटला पैसे मागताना "मी विश्वनाथ कराडचा बाप आहे "म्हटल्यावर काय होणार?अर्धा तासात टेम्पो भरावा लागला.तसंही सामान होतच काय?एकलव्याच्या फायलींची आणि साप्ताहिक महाराष्ट्रच्या अंकांची रद्दी. खरी गोष्ट अशी की औरंगाबाद पर्यंत यायला बसभाड्याला पैसे नव्हते म्हणून टेम्पो भाड्याने केला.त्यात ही रद्दी आणि सुटकेस.कपडे वगैरे.औरंगाबादच्या नगर नाक्यावर आल्यावर जायचं कुठं हा प्रश्न होता.मेहुणा संजीव उन्हाळेने सोय करुन देतो असं सांगूनही ऐनवेळी तुमचं तुम्ही पाहून घ्या म्हणून अंगचोरपणा केला.अखेर मनपात मुख्य अभियंता असलेल्या सखाराम पानझडेंनी मित्र म्हणून मदत केली,आणि लटपटेंनी पुन्हा औरंगाबादेत पाय ठेवला.पण करायचं काय.राहायचं कुठे. खर्च कसा भागवायचा हा प्रश्न होताच.या बिकट प्रसंगात उन्हाळे कुटूबीयांनी सुंदरला आणि व्रंदाला मदतीचा हात,आधार,सावली द्यायला हवी होती.पण ते घडले नाही.वैभवात आकस मीटला नाही तो दुर्दैवात काय मिटणार ? अखेर काही दिवस सुंदरने त्रीमूर्ती चौकात चक्क आँमलेट भूर्जी पावचा ठेला चालवला.पण त्यात काय भागणार.ठेल्यावर कमाई किती ? सुंदरला महिन्याला कमीत कमी सात ते आठ हजार घरभाडे, तीस हजार औषधोपचार खर्च,४० हजार घर खर्च आणि २५ते ३०हजार व्यसन खर्च. असा एकुण किमान लाखभर रुपये खर्चाला लागतात.ते कुठ आणायचे ? लोक मित्र म्हणून, आदर म्हणून,दया म्हणून देऊन देऊन किती देणार आणि किती वेळा.
पण याही अवस्थेत सुंदरच्या नशीबाने तब्बल तीनवेळा ऊचल खाल्ली.सुंदरला सावरण्याची, पुन्हा उभे राहाण्याची संधी मिळाली.पहील्यांदा तिथे, जीथे त्याने त्याच्या पत्रकारितेच्या पहील्या ईनिंगची लेखणी मँनबंद केली होती.दैनिक लोकपत्र...
सुंदरला कार्यकारी संपादक पद मिळालं.राहायला चार खोल्यांचा प्रशस्त फ्लँट, फोरव्हीलर आणि भक्कम पगार.शिवाय मेडीकल उपचार मोफत.सुंदर इथं काहीही न करता फक्त शांत राहिला असता तरी त्याचा उत्तरार्ध सुखाचा राहिला असता.मी व्रत्तसंपादक म्हणून सगळं पहात होतोच.पण म्हणतात स्वभाव खोडीला औषध नसतं. लोकपत्र मध्ये सुंदरने अक्षरशः मठ उभा केला.त्याच्या भोवती झुलणारे जोगते जोगतिणी.त्यांनी सूंदरला हवेत नेले,किंवा सुंदर खुडलेल्या,खुंटलेल्या,खुरटलेल्या आणि कुरुप बनलेल्या त्याच्या बधीर अहंकाराचा कंडू त्या चिलीयाबाळांकडून शमवून घेत होता.त्यातच त्याला एक अवदसाही आठवली,बाकी व्यसने होतीच.त्याच्या गाडीला ब्रेक नसतंच.त्याला कोणीही ढकलून दिलं नाही, त्यानंच उडी फेकली.
लोकपत्र नंतर पुन्हा
अज्ञातवास.या काळात त्यानं मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरातील झोपडपट्टी भागात हाँटेल टाकून पाहिलं,चाललं अर्थात नाही. शैक्षणिक समुपदेशन, आर्थिक उद्योग व्यवसाय सल्ला वगैरे खटपट करून पाहीली.पण ही बुडणाऱ्या जहाजाला खिळेपट्टी होती.मुळात त्याने सोबत घेतलेली माणसे भंगार आणि मुर्ख होती.नुसतीच पोटभरु. सुंदरला माणसं कधीच ओळखता आली नाहीत.सदोदित लबाड भामट्या मवाल्यांवरच विश्वास. तोही डोळे झाकून.त्यातच सुंदर मध्ये आता काम करण्याची धमक धडाडी उरलेली नाही. तो कामच नाही करू शकत.एकतर आजार व्याधी,दोन आळस आणि तिसरं मानसिक द्रुष्ट्या झालेली पडझड परवड...त्यामुळेच लोकपत्र नंतर त्याला पुन्हा पुण्यनगरी सारख्या जबरदस्त खपाच्या दैनिकात नोकरी लागली तेव्हा तो ही नोकरी महिना दीड महिनाही टिकवू शकला नाही. ईथंही त्याचा भूछत्रासारखा परपोषी षंढ स्वाभिमान ऊफाळला.हे म्हणे पुरोगामी, फुल्यांचे २१व्या शतकातले अवतार.मग त्याला तेलि तांबोळी पाहिजेतच.यांनीही तांबोळ्यासाठी 'पुण्य नगरीत 'बंड केलं.परिणाम फुले पुन्हा निर्माल्य झाले.पण नशीब बलवत्तर. पुण्यनगरी ची फांदी मोडायला आणि औरंगाबादेत पुढारी यायला एकच गाठ पडली.हडळीला नवरा पाहिजे होता आणि झोटींगाला बायको.पण शेवटी भूतांचा संसार चालणार कसा..हे भूत तरी निदान पडक्या वाड्यातले आहे..ते डोंगरावरचे आहे.भल्या भल्यांना झपाटते आणि उरावर बसून घोळसून जीव घेते.त्याच्या पुढे सुंदर म्हणजे दाभणापुढे सुई.सुंदरला घाई नडली.पुढारी हा रवंथ करणारा प्राणी आहे.शेणाचं माप घेऊन चारा खाणारा.सुंदरला त्या कोल्हापुरी ऊसाचं कांडकं काही हाताळता सोलत आलं नाही, मुळ वाढं पेरं बारं सरी डोळा गवसला नाही. पुढारीला पुढारीच लागतो.सुंदर च्या 'बस'ची बात नव्हतीच ती.परीणाम,पुन्हा रस्त्यावर. संधी मिळालीतर सुंदर आजूनही एखाद्या मागच्या रांगेतल्या पेपरला चर्चेत सुस्थीतीत आणू शकतो.त्यासाठी त्याने काही नियम निर्बंध मात्र पाळले पाहिजेत.तो ते पाळणार नाही हे माहित असूनही तशी अपेक्षा मी करतोय.हे खरं,पण एवढी सकारात्मकता सिंपथी म्हणून का होईना दाखवली पाहीजे.
 ( समाप्त)
-रवींद्र तहकीक
कार्यकारी संपादक
दैनिक लोकपत्र
----------/-/
पुढील सोमवारी वाचा

सुपातले "जोंधळे"जात्यात का
भरडले....

रविवार, २ डिसेंबर, २०१८

रघुनाथ पांडे यांचा पुण्य नगरीस रामराम

नागपूर - पुण्य नगरीच्या नागपूर आवृत्तीचे संपादक  रघुनाथ पांडे यांनी पुण्य नगरीस राम राम ठोकला आहे. ते औरंगाबाद येथून सुरु होणाऱ्या एका चॅनलला संपादक म्हणून जॉईन झाले आहेत. पांडे यांच्या जागी कुणाची निवड होणार ?याकडे लक्ष वेधले आहे.

बाळ कुलकर्णी आणि अविनाश दुधे यांनी राजीनामा दिल्यानंतर रघुनाथ पांडे यांची संपादक म्हणून नियुक्ती झाली होती. पांडे यांनी पुण्यनगरीस राम राम ठोकून औरंगाबाद येथून नव्याने सुरु होणाऱ्या AM न्यूज चॅनलला संपादक म्हणून जॉईन झाल्याने  युनिट हेड रमेश कुलकर्णी आता संपादक म्हणून कुणाची शिफारस करणार याकडे लक्ष वेधले आहे.फेसबुक वर शेअर करा

Facebook