> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

गुरुवार, २९ जून, २०१७

पत्रकार संरक्षण कायद्याचा उपयोग कुणाला ?

फडणवीस सरकारने पत्रकार संरक्षण कायदा मंजूर केला खरा, पण राज्यात पत्रकारावर हल्ला झाल्यानंतर या कायद्यानुसार कुठेही  गुन्हा दाखल झाला नाही. उलट  पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र सुरू आहे. फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे, मात्र पोलिसच पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करत आहेत.
उस्मानाबादचे पत्रकार सुनील ढेपे यांच्यावर पोलिसांनी षडयंत्र रचून खोटा गुन्हा दाखल केला तसाच गुन्हा आता अमरावतीचे  पत्रकार प्रशांत कांबळे  आणि ३ पत्रकारावर दाखल झाला आहे. गेल्या वर्षभरात किमान १५ ते २० पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत . पत्रकार संरक्षण कायदा आमच्यामुळे झाला याचे श्रेय घेणाऱ्या पत्रकार संघटनेनी फडणवीस यांचा सत्कार  करून चमकोगिरी केली असली तरी या संघटना अधिकृत आहेत का हे शोधावे लागेल. कारण काही संघटनेवर प्रशासक असताना नियमबाह्य पद्धतीने कामकाज सुरु आहे. देणग्या उकळल्या जात आहेत . जिल्ह्यात असलेल्या अनेक संघटना नोंदणीकृत नाहीत. ज्या संघटना नोंदणीकृत नाहीत, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याची मालमत्ता सरकराने ताब्यात घेतली पाहिजे. संघटेनच्या नावाखाली देणग्या उकळण्याऱ्या खिसेभरू पत्रकारांना आता आवरण्याची गरज आहे.
- चंद्रशेखर भांगे
 हडपसर,पुणे
मो- 7798517517

बुधवार, २८ जून, २०१७

मटाले, कदम यांच्या पॅनेलचा धुव्वा !

● पत्रकार संघ निवडणुकीत कार्यवाह, कोषाध्यक्ष, उपाध्यक्षांसह कार्यकारिणीत ९ पैकी ७ सदस्य 'विकास' पॅनेलचे 

मुंबई । मुंबई मराठी पत्रकार संघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष देवदास मटाले आणि विश्वस्त कुमार कदम यांच्या पॅनेलचा साफ धुव्वा उडाला. एककल्ली, भ्रष्ट व अनागोंदी कारभाराच्या आरोपांनी सत्ताधारी पक्षाची प्रचारात अखेरपर्यंत दमछाक झाली. मटाले-कदम विरोधकांनी एकत्र मोट बांधून बनविलेल्या विकास पॅनेलने या द्वयीच्या सहा वर्षांच्या बेबंद कारभाराला सुरुंग लावत कार्यकारिणीत ९ पैकी ७ जागा मिळविल्या. 

विजयी झालेले कार्यकारिणी सदस्य असे - विष्णू सोनवणे (सकाळ) २०५, जगदीश भोवड (पुण्यनगरी) १९०, महेश विचारे (महाराष्ट्र टाईम्स) १७५, स्वाती घोसाळकर (महाराष्ट्र १) १७१, भीमराव गवळी (मटा ऑनलाईन) १६४, गजानन सावंत (मटा ऑनलाईन) १४४, प्रशांत नाडकर (लोकसत्ता) १४२, शैलेंद्र शिर्के (महाराष्ट्र दिनमान) १४१, नंदकुमार पाटील (नवाकाळ) १३३ 

'विकास'चेच सुधाकर काश्यप (आयबीएन -लोकमत) आणि सर्वाधिक १६७ मतांसह संजय परब (दिव्य मराठी) हे उपाध्यक्षपदी, मंगेश वरवडेकर (महाराष्ट्र १) १६५ मतांसह कोषाध्यक्षपदी तर संदीप चव्हाण (महाराष्ट्र१) २२० मतांसह कार्यवाहपदी निवडून आले.

अध्यक्षपदी नरेंद्र वाबळे निवडून आले आहेत.

प्रशांत कांबळे याचा जामीन मंजूर

अमरावती जिल्ह्यातील पत्रकार प्रशांत कांबळे आणि अभिजित तिवारी या दोन्ही पत्रकाराचा जामीन  अर्ज जिल्हा न्यायालयाने बुधवारी मंजूर केला आहे गुरुवारी या दोघांची सुटका होईल.
चांदुर रेल्वे या ठिकाणी एका मुलीच्या आत्महत्या प्रकरणी आरोपीस अटक करावी म्हणून एक जमाव पोलीस स्टेशनवर चालून गेला असता पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला होता. नंतर या घटनेचे वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार प्रशांत कांबळे आणि अभिजित तिवारी यांच्यावर धार्मिक भावना भडकवणे, जातीय तेढ निर्माण करणे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर त्यास पोलीस कस्टडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी झाली होती.
निरपराध पत्रकार प्रशांत कांबळे आणि अभिजित तिवारी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल होताच, बेरक्याने आवाज उठवला. पत्रकार जागृत झाले, ठिकठिकाणी निवेदने देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. अखेर या दोघांचा जमीन झाला. हा पत्रकार एकजुटीचा विजय आहे. आता खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. यासाठी पत्रकारांनी पुढील लढा चालू ठेवणे गरजेचे आहे.
राज्यात काही पत्रकार संघटना दुकान मांडून बसल्या आहेत. या संघटना शेपूट घालून बसल्या. अश्या संघटनेत पत्रकारांनी सहभागी होवू नये. दुकान मांडून वसुली करणाऱ्या संघटनेची माहिती बेरक्याला कळवा, त्याची दखल घेतली जाईल.

मानबिंदूत कर्मचाऱ्यांची सत्वपरीक्षा !

औरंगाबाद - दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल जाहीर होऊन  एकीकडे शाळा - महाविद्यालयात प्रवेशाची लगबग सुरु असताना, दोन मुलाचे बाप झालेल्या मानबिंदूतील उपसंपादक, सहाय्यक उपसंपादक, वार्ता संकलक याना आज मानबिंदूने घेतलेली परीक्षा द्यावी लागली.
महाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये गेली ५ ते १० वर्ष इमाने - इतबारे काम करूनही उपसंपादक, सहाय्यक उपसंपादक, वार्ता संकलक यांची बुधवारी सकाळी १० ते १ या वेळेत शंभर मार्कांचा पेपर घेण्यात आला. कारण काय तर तुम्हाला पगार वाढ, पदोन्नती हवी असेल तर हा पेपर द्यावा लागेल आणि चांगले मार्क पडले ते पगारवाढ आणि पदोन्नती मिळेल अन्यथा नारळ भेटेल. नोकरी टिकवण्यासाठी बिचाऱ्यानी गेले काही दिवस अभ्यास करून पेपर लिहिला. ही परीक्षा नसून त्यांची घेतलेली सत्वपरीक्षा ठरली.

या परीक्षेमुळे अनेकांचा काळाजाचा ठोका चुकला. ज्यांनी पाच ते दहा वर्षे उपसंपादक, सहाय्यक उपसंपादक, वार्ता संकलक म्हणून तुटपुंज्या पगारात शेटजीची चाकरी केली, त्यांची परीक्षा घेण्याचा घाट मानबिंदुत घातला  गेला. बुधवारी राज्यभरातील १४ सेंटरवर ही परीक्षा पार पडली. जवळपास २०० कर्मचाऱ्यांची ही  परीक्षा घेण्यात आली. परीक्षेचा वेळ होता तीन तास आणि परीक्षा हॉलमध्ये जाताना या सगळ्याचे मोबाईलही जप्त करण्यात आले. इमाने-इतबारे नोकरी करणाऱ्या  संपादकीय विभागातील लोकांवर आता मानबिंदुच्या व्यवस्थापनाचा विश्वास बसलेला नाही, हेच या परीक्षेवरून दिसते. ज्यांनी या लोकांना नोकरीला घेतले, त्या संपादकांवरही शेटजीचा विश्वास राहिलेला नाही.कोणाचे कधी दांडके उडेल, हे आता कोणीच  सांगू शकत नाहीत,
मजिठिया आयोगाप्रमाणे वेतन श्रेणी देणे दूरच, यंदा पगार वाढ नाही आणि वरून परीक्षा घेऊन टांगती तलवार ठेवण्यात आल्यामुळे उपसंपादक, सहाय्यक उपसंपादक, वार्ता संकलक हवालदिल झाले आहेत. नापास झालो तर नारळ भेटेल या धास्तीने बिचाऱ्यानी कालची रात्र जागून काढावी लागली . आता परीक्षेचा निकाल काहीही लागला तरी मानबिंदूत यानिमित्त अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

"मानबिंदूंच्या बाबूजींची उचलेगिरी"

महाराष्ट्राचा मानबिंदूचे बिरुद मिरवणा-या बाबूजींनी बुधवारी सगळ्या आवृत्यांमध्ये एकाच वेळी घेतलेल्या परीक्षेत खुद्द बाबूजींनीच उचलेगिरी करण्याचा विक्रम केलाय. तीन तासांसाठी घेतलेल्या या परीक्षेसाठी एकूण पाच प्रश्न विचारण्यात आले होते आणि या प्रश्नपत्रिकेतील विचारलेला शेवटचा प्रश्न इंग्रजी भाषांतरावर आधारित होता आणि बाबूजींनी थेट गुगल सर्च मारून इंग्रजीतला परिच्छेद जशाचा तसा उचलल्याने बाबूजींच्या बौद्धिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. अशीच कॉपी पेस्ट करायची होती तर परीक्षेचा घाट का घातला असा सवाल परिक्षार्थींनी उपस्थित केला आहे.
अधिक माहितीसाठी प्रश्नांची लिंक

https://goo.gl/d8J6rs

पुढारीचे दोघे आदर्श गावकरी मध्ये

औरंगाबाद - पुढारीचे चीफ रिपोर्टर अभय निकाळजे आदर्श गावकरी मध्ये कार्यकारी संपादक म्हणून जॉईन होताच, पुढारीत भेग पडली आहे. मुख्य उपसंपादक अनिल भाले आणि सिनियर रिपोर्टर राहुल नवघरे यांनी  पुढारीला राम राम करून आदर्श गावकरी जॉईन केला आहे. आणखी तिघेजण आदर्श गावकरीच्या संपर्कात आहेत. अशी माहिती आहे.
गावकरीमध्ये फूट पडून आदर्श गावकरी सुरु होताच टीम मध्ये बदल झाले आहेत. अनेक जिल्हा प्रतिनिधींना नारळ देण्यात आला आहे. डॉ अनिल फळे यांनी गावकरी पुन्हा सुरु करताच रस्सीखेच होणार आहे. पुढारीचे आदर्श गावकरीमध्ये तर जुने कर्मचारी डॉ फळे यांच्या संपर्कात आहेत.

सोमवार, २६ जून, २०१७

दुकानदारी करणाऱ्या पत्रकार संघटनेपासून सावधान

महाराष्ट्रातील काही पत्रकार संघटनांनी संघटनेच्या नावाखाली दुकानदारी सुरु केली आहे. यांच्याकडे कोणताही पेपर नसताना फिरण्यासाठी आणि कार्यक्रम घेण्यासाठी पैसा येतो कुठून ? हे खिशातून पैसे घालतात का ? फक्त झोलूगिरी करणाऱ्यास यांच्या पत्रकार संघात स्थान असते . प्रामाणिक आणि निष्ठावंत पत्रकार यांना नको आहे .. यांच्यावर कधी हल्ला झाल्याचे ऐकले आहे का ?
काही संघटना तर जातीवर आधारित झाल्या आहेत... पत्रकारांना जात असते का हो ?
काही संघटनेत पेशवाई सुरु आहे.. प्रशांत कांबळे प्रकरणात किती संघटना धावून आल्या ?
दुकानदारी करणाऱ्या पत्रकार संघटनेपासून सावधान राहा ...

चंद्रशेखर भांगे
पत्रकार , पुणे
7798517517

रविवार, २५ जून, २०१७

चंद्रपूरचं डोरलं

चंद्रपूर - नागपूरहुन प्रसिद्ध होणाऱ्या एका हिंदी दैनिकाचं डोरलं पत्रकार संघटनेच्या नावाखाली अधिकाऱ्याकडून खंडणी उकळत असल्याच्या तक्रारी बेरक्याकडे आल्या आहेत . हे डोरलं पूर्वी गडचिरोलीस होतं, तेथे एका वाळू उपसा करणाऱ्या कंत्राटदारास खंडणी मागितली म्हणून पोलिसांनी अटक केली होती. १५ दिवस जेल भोगून बाहेर आल्यानंतर याने गडचिरोलीतुन पळ काढला. चंद्रपुरात या डोरल्याने ब्लॅकमेल सुरु केले आहे.
परवा याने नागपूरला पत्रकार संघाचा कार्यक्रम आहे असे सांगून अनेक अधिकाऱ्याकडून खंडणी उकळली आहे.
अधिकाऱ्यास विनंती आहे की, याने पैसे मागितल्यास बेरक्याकडे तक्रारी पाठवाव्यात ...
berkya2011@gmail.com

गुरुवार, २२ जून, २०१७

प्रिंट मीडियाचे दिवस भरले - राजेंद्र दर्डा

सोलापूर - काही दिवसच प्रिंट मीडिया राहणार असून त्याची जागा डिजिटल मीडिया घेणार आहे, असे सुतोवाच लोकमतचे एडीटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी येथे केले.सन २०२० पर्यंतच प्रिंट मीडिया राहील आणि आपल्या देशात अमेरिकेसारखी स्थिती निर्माण होईल, असे भाकीतहि दर्डा यांनी केले.
लोकमत आयकॉन ऑफ सोलापूर पुस्तकाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आणि राजेंद्र दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली झाले, यावेळी दर्डा बोलत होते.
वृत्तपत्रात नेहमीच नकारात्मक बातम्या आल्या तर समाजातील पुरुषार्थ कमी होईल, असेही दर्डा म्हणाले.
सविस्तर बातमी लोकमत ऑनलाईनवर वाचा... 
Lokmat Online

प्रशांत कांबळेच्या पत्रकारितेवर पोलिसांचा वरवंटा...

प्रशांत कांबळे आणि अभिजित तिवारी या दोन पत्रकारांना अमरावती पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात फसवलं. पोलीस ठाण्यात त्यांचा छळ केला, दरोडेखोरासारखी, सराईत गुन्हेगारासारखी वागणूक देत, त्यांना बेड्या घालून फिरवलं. प्रशांत कांबळे काही मामुली पत्रकार नव्हता, मुंबईसारख्या शहरात त्याने पत्रकारिता केली, उतृष्ट पत्रकारितेसाठी राज्य शासनाचा 1 लाख रुपयाचा पुरस्कार प्रशांतला मुख्यमंत्र्याच्या हातून मिळाला. नागपूर विधिमंडळ अधिवेशनाच्या वार्तांकन त्याने दोनदा केलंय. एवढं सगळं सोडून प्रशांत आपल्या गृहजिल्ह्यात पत्रकारिता करायला गेला. त्याचा हाच मोठा गुन्हा झाला, कारण मुंबईत एखाद्या पत्रकारांना मारहाण झाली, शिवीगाळ जरी झाली तरी त्याची दखल घेतली जाते. सर्व पत्रकार एकत्र जमतात. शहरातील न्युज ग्लॅमर बघता सर्व पुढारी एकत्र येऊन निषेध करतात, कारवाईची मागणी करतात, सरकारदेखील तातडीने दखल घेत.
मात्र प्रशांत मुंबईत नव्हे तर चांदुर बाजार सारख्या ग्रामीण भागात पत्रकारिता करत होता. (पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक बाहेरच्या बातम्यांना तशीही TRP च्या दृष्टीने किंमत नाही. कधी काळी नागपूरलाही नव्हती मात्र मुख्यमंत्री आणि महत्वाचे मंत्री विदर्भातील असल्यामुळे आता मीडियाच्या दृष्टीने नागपूरची किमंत वाढली आहे) प्रशांतला अटक झाली, तेव्हा अमरावतीत एक दोघांना सोडलं तर कुणालाच या घटनेचा पत्ता नव्हता. सोशल माध्यमावरून जेव्हा प्रशांत संदर्भातील बातम्या, लेख वायरल झाले, त्यावेळी राज्यात इतर पत्रकारांना प्रशांतच्या अटकेबद्दल कळलं, त्यानंतर सर्वत्र पत्रकारांनी आपल्या आपल्या परीने या घटनेचा निषेध केला. अगदी बुलढाण्यापासून ते बेळगाव पर्यंत निषेध नोंदवण्यात आला.. रुग्णालयात हातकड्या घालून उपचार घेत असलेल्या प्रशांतचे फोटो सर्वत्र वायरल झाले. मुख्यमंत्र्याकडून पुरस्कार घेतांनाचा प्रशांतचा फोटो , बेड्यामध्ये जकडलेला प्रशांत...या छायाचित्रानी अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं. स्थानिक वृत्तपत्रांनी प्रशांतची बाजू लावून धरली, निवेदनं दिली मात्र निष्ठूर पोलीस प्रशासन काही बधलं नाही.
अमरावती ग्रामिणचे पोलीस अधीक्षक आणि पत्रकारांनीच दिलेल्या तथाकथित सिंघमच बिरुद लाऊन फिरणारे अविनाश कुमार यांना अनेक जेष्ठ पत्रकार भेटले. त्यांना समजावून सांगाण्याचा प्रयत्न केला.मात्र अविनाश कुमार यांच्या डोक्यात एकचं विचार " म्हणे प्रशांत पत्रकारच नाही, तो कुठे काम करतो " अहो अविनाश कुमार मग प्रशांतला मिळालेला पुरस्कार, त्याने केलेलं जय महाराष्ट्र चॅनेलसाठीच काम हे सर्व खोट आहे? प्रशांतने काही महिन्यांपूर्वी जय महाराष्ट्र हे चॅनेल सोडलं, मात्र तो आता काही दिल्ली आणि मुंबईतल्या पब्लिकेशनसाठी काम करतो, फ्रिलांन्स पत्रकार म्हणून काही वृत्तवाहिन्यांसाठी बातम्या करतो. एवढं समजावून सांगूनही अविनाश कुमार समजून घेत नाही.खर तर दोन महिने अविनाश कुमार जर रजेवर गेले तर त्या कालावधीत ते पोलीस अधिकारी असणार नाहीत का? एवढ साध सोप उत्तर त्याच्या प्रश्नाचं आहे. मात्र ते कधीच मान्य करणार नाही ...कारण एकदा का ते मान्य केलं तर पोलिसांनी केलेल्या पाशवी त्याचारावर ,दडपशाहीवर दंडुकेशहिवर पांघरून घालणार कस ? त्यामुळे प्रशांत पत्रकार आहे हे मान्य करायचं नाही एवढी साधी सोपी स्ट्रेटीजी पोलिसांची आहे. कदाचित उद्या पोलीस प्रशांतचा मुखमंत्र्याच्या हातून घेतलेला पुरस्काराचा फोटोही बनावट आहे असही म्हणतील.
प्रशांतवरच्या पोलिसी अत्याचाराची कहाणी इथंच संपत नाही. तीन दिवस बेड्या ठोकून रुग्णालयात ठेवल्यानंतर ठेवल्यानंतर बुधवारी पोलिसांनी प्रशांतला कोर्टात हजर केलं. कोर्टानं प्रशांत आणि अभिजीतला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली. पोलीस कोठडीत आम्ही प्रशांतला मारहाण करणार नाही असा शब्द पोलिसांनी उपस्थित पत्रकारांना दिला मात्र तो पाळला नाही. गुरुवारी मध्यरात्री दिड वाजताच्या सुमारास तिवसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बोरकर अचानक चांदुर बाजार पोलीस ठाण्यात आले आणि पोलीस कोठडीत शिरले..त्यांनी सीने स्टाईलने प्रशांतला मारहाण करण्यास सुरुवात केली. " मी बोरकर आहे, हा माझा बॅच बघ, तू पत्रकार आहेस ना , बघ तुझी गर्मीच उतरवतो, हिंमत असेल तर मला मारन दाखव" असं म्हणत या पोलीस अधिकाऱ्याने प्रशांत आणि अभिजितला लाथा भुक्यांनी अमानुष मारहाण केली. प्रशांत गयावया करत होता मात्र जवळपास 50 मिनिटे प्रशांतला हि मारहाण सुरूच होती. नियमानुसार ज्या पोलीस ठाण्यात पोलीस कोठडी दिली जाते, त्या ठाण्याचा पोलीस चौकशी अधिकारी या संशयित आरोपींची चौकशी करू शकतात (तो देखील मारहाण करू शकत नाही) मात्र इथं अमरावती पोलिसांनी पत्रकारांना त्यांची औकात दाखवण्याचा अफझलखानी विडा उचलला आहे. त्यामुळे तुम्ही कितीही दबाव टाका, मोर्चे काढा, निवेदन द्या. मात्र तुम्हाला जुमानत, मोजत नाही आम्ही कायदा वाटेल तसा वापरू..तुमचा मानवाधिकार गेला चुलीत असाच पवित्रा अमरावती पोलिसांनी घेतला आहे.
संबंध राज्याच लक्ष वेधून घेतलेल्या या सवेंदनशील प्रकरणात पोलीस एवढी मस्ती, दडपशाही करत असेल तर सामान्य माणसासोबत ते कशे वागत असतील याची कल्पना करवत नाही. मात्र एक प्रश्न पडतो " अमरावती पोलिसांमध्ये एवढी मस्ती आली कुठून ? आमदार, लोक प्रतिनिधी काय करताहेत? एरवी छोट्या मोठ्या गोष्टींना ट्विटर ने उत्तर देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत हि बाब पोहोचलीच नाही का ? राज्यात ठेवलेले दोन गृह राज्यमंत्री करतात काय? मुख्यमंत्री कार्यालयाला अनेकांनी ट्विटरद्वारे या प्रकाराची माहिती दिली तरी सर्व थंडच..मुख्यमंत्री साहेब" एका हातून पुरस्कार दुसऱ्या हातून असले अत्याचार..तुमचं गृह खात करत असतील तर तुमचा तो पत्रकार सरंक्षण कायदा चुलखंडात टाका "
तुम्ही कितीही आक्रोश करा, आरडाओरडा करा..आम्ही प्रशांतची पत्रकारिता उध्वस्त केलीच आहे. आता आम्ही प्रशांतलाही उध्वस्त करू असं थेट आव्हान अमरावती पोलिसांनी आम्हा पत्रकारांना दिलय.सध्यातरी प्रशांत खचलाय, निराश झालाय..मात्र पराभूत झालेला नाही. आणि कुठल्याही परिस्थिती प्रशांतला आणि त्याच्या पत्रकारितेला आम्ही संपवू देणार नाही , पराभूत होऊ देणार नाही. अमरावती पोलिसांचं आव्हान आम्ही सर्वानी स्विकारलय..कारण आज प्रशांत आहे..उद्या आपल्यापैकी अजून कुणी दुसरा प्रशांत असेल...
(पत्रकार प्रशांत कांबळेेला , अभिजित तिवारी ला साथ द्या..कुठल्याही परिस्थिती त्याला पराभूत होऊ देऊ नका)

जाता जाता -
सुनील ढेपे, प्रशांत कांबळे नंतर आपलाही नंबर लागू शकतो, तेंव्हा पत्रकारानो एक व्हा ...आपणच आपल्या बांधवाच्या पायात पाय घालू नका...

> प्रशांत कांबळे याच्यावर धार्मिक भावना भडकवणे, जातीय तेढ निर्माण करणे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
> प्रशांत कांबळेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा, ही वेळ आपल्यावरही येवू शकते...
#सपोर्ट_प्रशांत_कांबळे

बुधवार, २१ जून, २०१७

औरंगाबादेत आदर्श गावकरी सुरू

औरंगाबाद - बेरक्याची बातमी तंतोतंत खरी ठरली आहे.औरंगाबाद गावकरीमध्ये फूट पडली असून अंबादास मानकापे - पाटील यांनी स्वतःच्या मालकीचा आदर्श गावकरी बुधवारपासून सुरू केला आहे.आता मूळ गावकरी सुरू करण्यासाठी डॉ.अनिल फळे आणि त्यांची टीम कामाला लागली आहे.
 नाशिकच्या वंदन पोतनिस यांच्या मालकीचे गावकरी वृत्तपत्र आहे.गावकरीची औरंगाबाद आवृृत्ती दहा वर्षानंतर बंद पडली होती मात्र अंबादास मानकापे या सहकार क्षेत्रातील दिग्गज उद्योगपतीने गावकरी भागिदारीत सुरू केला होता.डॉ.अनिल फळे यांनी मध्यस्थी करून गावकरीला भरारी निर्माण करून दिली होती.टायटल पोतनिसाचे आणि पैसा मानकापे यांचा.मात्र वर्षभरात चार कोटी घालूनही त्यात मालकी हक्क नसल्यामुळे मानकापे यांनी भागिदारी तोडून स्वतःच्या मालकीचा आदर्श गावकरी हा नवा पेपर सुरू केला आहे.आदर्श बिल्डींगमध्येच संपादकीय विभाग असून प्रिंटींग सांजवार्ता या सांज दैनिकातून केली जात आहे.कार्यकारी संपादक म्हणून अभय निकाळजे काम पहात असून,टीममध्ये फाटाफूट झाली आहे.
दुसरीकडे मानकापे यांनी भागिदारी तोडल्यानंतर पोतनिसांनी मूळ गावकरी सुरू करण्याची जबाबदारी पुन्हा डॉ.अनिल फळे यांच्यावर सोपवली आहे.डॉ.अनिल फळे,दिनेश हारे,आप्पासाहेब गोरे या जुन्या टीमने खोकडपुर्‍यातील जागेत पुन्हा गावकरीचे बस्तान बसवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.नवा फायन्सर शोधण्यात येत आहे.गावकरी सुरू झाल्यास गावकरी विरूध्द आदर्श गावकरी यांच्यात सामना सुरू होणार आहे.

सोमवार, १९ जून, २०१७

महाराष्ट्र १ चे कर्मचारी कोर्टात जाण्याच्या तयारीत

महाराष्ट्र १ चे आजी - माजी कर्मचारी पगारासाठी कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्र १ मध्ये तीन महिन्यांपासून पगार नाही. त्यामुळे अनेकांनी चॅनलला सोडचिठ्ठी दिली आहे. जे सोडून गेले त्यांना नियमाने ४५ दिवसानंतर राहिलेला पूर्ण पगार देणे बंधनकारक आहे. असे असताना माजी कर्मचाऱ्यांचा पगार कंपनीने रोखला आहे. काहींनी कंपनीला लिगल नोटीस पाठवल्याचे कळतेय. त्यामुळे कंपनीतील आजी कर्मचारी देखील कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे कंपनीने भरमसाठ फी उकळून नवख्या उमेदवारांना टिव्ही शिकवण्याचे काम सुरु केले आहे. ट्रेनिंगनंतर चॅनलमध्ये काम करण्याची संधी देवू अशा घोषणांना भुलून अनेक हौशे मुले - मुली फी भरायला तयार आहेत. यातून चॅनेल आर्थिक आधार शोधतोयमात्र त्यातून अनेकांची फसगत होत आहे.

रविवार, १८ जून, २०१७

प्रशांत कांबळे....युवा पत्रकारितेचा बळी..

तो पत्रकारितेत आला, सत्य शोधण्यासाठी, सत्य समाजापुढे मांडण्यासाठी... अतिशय उत्साही, बातमी काढण्यासाठी कायम धडपडणारा पत्रकार म्हणून त्याने अल्पावधीत  ओळख निर्माण केली. ..मात्र  तोच पत्रकार आज पोलीस स्टेशनच्या चार भिंतीमध्ये बंद आहे, मुख्य आरोपीच्या भूमिकेत पोलिसांनी त्याचा आवाज बंद केलाय. मुंबईतल्या सफाई कामगारांच्या समस्या संवनेदशिलपणे मांडल्यामुळे याच युवा पत्रकाराला मुख्यमंत्र्यांच्या हातून राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता.. तोच प्रशांत कांबळे , त्याच्या गावातल्या  एका मुलीच्या आत्महत्येनंतर  यंत्रणेला प्रश्न विचारायला गेला, बातमी  करायला गेला आणि आता आरोपी ठरलाय..मुख्य आरोपी..त्याचा गुन्हा एवढाच की तो पत्रकारिता जगत होता. पत्रकारितेच्या पुढं जाऊन काम करत होता.

.प्रशांत कांबळे, तीन वर्षांपूर्वी डोळ्यात स्वप्न घेऊन मुंबईत आला,  सोबत पत्रकारितेतील पदवी..तो अमरावती जिल्ह्यातल्या चांदुर रेल्वे इथ राहणार.. मुंबईत जय महाराष्ट्र नावाच्या एक वृत्तवाहिनीमध्ये तो रुजू झाला. प्रशांतला आपल्या जिल्ह्याविषयी खूप उत्सुकता, तिथून येणाऱ्या बातमीवर तो लक्ष ठेवून असे आणि आल्याआल्या ती दाखवण्यासाठी तो धडपड करायचा..हळूहळू प्रशांतला रिपोर्टींगला बाहेर पाठवणं सुरु केलं.तो चांगले रिपोर्ट करायला लागला. मात्र त्याचं मन गुंतलं होत ते त्याच्या गृहजिल्ह्यात म्हणजे अमरावतीत..प्रशांतने मुंबईतल्या सफाई कामगारांच्या प्रश्नावर स्टोरी केल्यात, त्याचं त्या विषयामधलं सातत्य बघता त्याला सफाई कामगारांच्या जीवांवर रिपोर्ताज बनवायला सांगितलं..चार दिवस मेहनत करून, मेनहोल मध्ये स्वता उतरुन त्याने तो रिपोर्ताज पूर्ण केला..या रिपोर्टनंतर प्रशांत एक संवेदनशील पत्रकार म्हणून पुढे आला.. राज्य शासनाचा उतृष्ट पत्रकार हा पुरस्कार त्याला मिळाला..खर तर तो मुंबईत पत्रकार म्हणून चांगला स्थिरसावर होऊ शकला असता, मात्र त्याला त्याच्या गृहजिल्ह्यात पत्रकारिता करायची होती, पुढे जाऊन त्याला राजकारणातही प्रवेश करायच त्याचं स्वप्न होत. अखेर त्याने मुंबईतलं करिअर थांबवलं आणि तो अमरावतीत एक जिल्हा प्रतिनिधी म्हणून रूजू झाला.

पत्रकारिता करता करता गावातल्या कामासाठी तो यंत्रणेकडे आग्रही असायचा.लोंकाच्या समस्या पत्रकारितेच्या चाकोरीबाहेर जाऊन सोडवायचा..त्याने अनेक स्टिंग ओपरेशन केली ती गाजली.अनेक लोक उघडे पडले. त्याने मंध्यतरी जिल्ह्यातल्या बोगस डॉक्टरसंदर्भात एक मोहीम सुरू केली, त्यासाठी स्टिंग ऑपेशन केली, यंत्रणेच्या नाकात दम आणला, अखेरीस अनेक प्रशासन नमल आणि रुग्णाच्या जीवाशी खेळ करणारे कित्येक बोगस डॉक्टर जेलमध्ये गेले , त्याची प्रॅक्टिस बंद केली गेली. या प्रकरणामुळे अनेकांचे हित संबंध दुखावले गेले, त्यामुळे या सर्व यंत्रणा प्रशांतवर डूख धरून होत्याचं..या सर्वामुळे प्रशांतच्या  मित्रांनी त्याला सावध राहायला सांगितलं आणि जर   पत्रकारितेचा जुणून म्हणजे उत्साह कमी करण्याचा सल्ला दिला..मात्र पत्रकारिता जगणाऱ्या प्रशांतने त्याचं कधी ऐकलं नाही..

प्रशांताच्या गावातल्या एका मुलीनं आत्महत्या केली, उभ्या गावाला कुणामुळं त्या मुलीनं आत्महत्या केली हे माहिती होत, जबाबदार मुलाला अटक करण्याची मागणी गावकऱ्यांची होती, आणि या घटनेचं  वृत्तसंकलन प्रशांत करत होता.बातमी मांडण्याचा प्रयत्न केला. संवेदनशील घटना आहे, मात्र पोलीस काही करत नाही हे चित्र पुढे येताच गावकऱ्यांच्या संतापाचा  भडका उडाला, असल्यांने त्याचा भडक उडाला, पोलीस  लाठीचार्ज झाला, दगडफेक झाली..आणि त्यात बळी गेला तो रिपोर्टींग करत असलेल्या प्रशांतचा आणि त्याच्या धडपड्या  पत्रकारितेचा..पोलीस प्रशासनाला कायम प्रशांतचा बातमीदारीचा जाच होताचं, अखेरीस या सर्व प्रकरणाचं खापर या युवा पत्रकारावर फोडल गेलं...प्रशांतवर पोलिसांनी कठोर गुन्हे दाखल केलेत,सामान्य माणसांच्या प्रश्नावर न्याय मागणाऱ्या प्रशांतवर स्वतःला न्याय मागण्याची वेळ आलीये..सध्या प्रशांत  पोलीस कोठडीत आहे..

मात्र प्रशांतसारख्या पत्रकारांची अशी अवस्था बघून आता कुणी पत्रकारीतेच्या पुढं जाण्याचा प्रयत्न  करणार नाही..बातमी करा आणि घरी जा..फॉलोअप, किंवा जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यास तुमचा प्रशांत कांबळे करू हा धडा आता पोलिसांनी घालून दिलाय..सर्वांच्या अडचणीला धावून येणाऱ्या देवेंद्र भुयार सारख्या शेतकरी संघटनेच्या  एका चांगल्या   कार्यकर्त्याला झोपडपट्टी दादा ठरवून तडीपार करणाऱ्या अमरावती पोलिसांनी आता पत्रकारांना तोच इशारा दिलाय..आमच्याशी पंगा घेऊ नका..आम्ही सर्वशक्तिमान आहोत..तुमच्या पत्रकारितेपेक्षा...जिल्ह्यातल्या नव्हे राज्यभरातील सत्य पुढं आणणाऱ्या पत्रकारांना हा इशारा आहे.. 
.......................

(प्रशांतला न्याय मिळवून देण्यासाठी आपले सर्व ,मतभेद,मनभेद सोडून सर्व पत्रकारांनी एकत्र याव..कारण आज प्रशांत आहे उद्या आपल्यातला कुणी दुसरा असेल )

+917774899382
प्रशांत कांबळे

शनिवार, १७ जून, २०१७

पोलीस आयुक्त अखेर नरमले

औरंगाबाद - पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या विरुद्ध बातम्या दिल्यास तुमचा सुनील ढेपे करण्यात येईल, अशी धमकी क्राईम ब्रँचच्या पोलीस निरीक्षकाने क्राईम रिपोर्टरना काही दिवसांपूर्वी  दिली होती, त्यानंतर औरंगाबादच्या पत्रकारात मोठी चीड निर्माण झाली होती, त्यानंतर पत्रकारांनी पोलीस आयुक्ताच्या बातम्यांवर बहिष्कार  घातला होता, 
गेल्या आठ दिवसापासून हा बहिष्कार सुरू होता, अखेर पोलीस आयुक्त यशस्वी यादव चांगलेच नरमले आणि त्यांनी क्राईम रिपोर्टरला आज ऑफिस मध्ये बोलावले होते, एका पोलीस निरीक्षकानी सर्व रिपोर्टरना पर्सनल मेसेज टाकून बोलावले होते.
सर्व रिपोर्टर समोर यशस्वी यादव यांनी,  हा प्रकार माझ्या सांगण्यावरून झाला नसल्याचे स्पष्ट केले..माझी छबी बनवणे तुमच्या हातात असल्याचेही ते म्हणाले आणि घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली...

घाडगे मॅडमचे कारस्थान
विरोधात बातम्या दिल्यास तुमचा सुनील ढेपे करण्यात येईल, ही धमकी पोलीस उपायुक्त दीपाली घाडगे यांच्या सांगण्यावरून त्या पोलीस निरीक्षकानी दिल्याचे समोर आले आहे..
दीपाली घाडगे यापूर्वी उस्मानाबादला अतिरिक्त पोलीस अधीक्षक होत्या, त्यांच्या साक्षीने उस्मानाबादचे ज्येष्ठ पत्रकार सुनील ढेपे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला होता,
उस्मानाबादची ट्रिक औरंगाबादला वापरण्याचा प्रयत्न घाडगे मॅडमने केला, परंतु पत्रकाराच्या एकीमुळे घाडगे मॅडमचे पितळ उघडे पडले आहे...

लोकसत्ता - आरोग्य वार्ता कोणती खरी ?

लोकसत्तामध्ये आरोग्य वार्ता नावाचे सदर प्रसिध्द होते . त्यात चॉकलेट खाण्याचे परिणाम यावर वेगवेगळ्या दिवशी दोन लेख प्रकाशित झाले आहेत. एकात चॉकलेट खाण्याने हृदयाचे ठोके अनियमित होतात असे म्हटले आहे तर दुसऱ्यात नियमित राहतात असे म्हटले आहे. आता यातील कोणत्या लेखावर विश्वास ठेवावा असा प्रश्न वाचकांना पडला आहे.

शुक्रवार, १६ जून, २०१७

गावकरी बंद, आदर्श गावकरी सुरु !

औरंगाबाद - गावकरीची औरंगाबाद आवृत्ती पुन्हा एकदा बंद पडणार असून, आता गावकरी ऐवजी "आदर्श गावकरी" सुरु होणार आहे. आदर्श गावकरीचे कार्यालय आहे त्याच ठिकाणी राहणार असून, प्रिटिंग मात्र लोकपत्र किंवा सांजवार्ता मध्ये होणार आहे. आदर्श गावकरीच्या कार्यकारी संपादकपदी अभय निकाळजे यांची नियुक्ती करण्यात आली असून, जुनी सर्व टीम बदलण्यात येत आहे. नवीन भरती सुरु करण्यात आली आहे.
नाशिकचे वंदन पोतनीस यांच्या मालकीचे गावकरी वृत्तपत्र आहे. १० वर्ष औरंगाबाद आवृत्ती सुरु होती, मात्र आर्थिक अडचणीमुळे औरंगाबाद आवृत्ती बंद पडली होती. त्याला आदर्श ग्रुपचे अंबादास दादा मानकापे - पाटील यांनी उर्जित अवस्था प्राप्त करून दिली. मध्यस्थ होते, डॉ. अनिल फळे. ८ जून २०१६ रोजी गावकरी पुन्हा सुरु झाला. खोकडपुरा येथील जुन्या प्रिंटींग मशीनवर नवे पार्ट बसवून प्रिंटींग सुरु झाली. लातूर, उस्मानाबाद, नांदेड करीता लातूरच्या एकमत मधून अंक छापले जात होते. गावकरीने विविध अंक काढून तसेच विविध कार्यक्रम घेऊन चर्चा घडवून आणली.डॉ. अनिल फळे, दिनेश हारे, नितीन गायकवाड आदींनी गावकरी चर्चेत आणला.  
भागीदारी संपुष्टात
आदर्श  ग्रुपची गावकरी बरोबर असलेली भागीदारी एक वर्षानंतर संपुष्टात आली आहे. आदर्श  ग्रुपने स्वतःच्या मालकीचे आदर्श गावकरी हे टायटल आणले आहे. याच नावाने आता एक आठवड्यात आदर्श गावकरी सुरु होणार आहे. आदर्श गावकरी चे कार्यकारी संपादक म्हणून अभय निकाळजे जॉईन झाले आहेत. निकाळजे अनेक वर्ष सकाळमध्ये होते. नंतर ते पुढारीत गेले होते. पुढारीला सोडचिठ्ठी देवून त्यांनी आदर्श गावकरी जॉइन केला  आहे.
 आदर्श  ग्रुपचे सीईओ महावीर देवसाळे यांनी आदर्श गावकरीची संकल्पना मांडली आणि मालक अंबादास दादा मानकापे - पाटील यांनी  त्याला अनुमती दिली. आदर्श गावकरी मध्ये डॉ. अनिल फळे , दिनेश हारे, नितीन गायकवाड हे राहणार नाहीत, अशी माहिती आहे.गावकरी मध्ये उभी फूट पडल्यामुळे जुनी टीम अस्वस्थ आहे. अनेकांना नारळ देण्यात आला आहे.आदर्श गावकरी सुरु झाल्यानंतर मूळ गावकरी बंद पडणार आहे.
महावीर देवसाळे पूर्वी सकाळ मध्ये अनेक वर्ष युनिट हेड होते. सकाळची जुनी टीम त्यांनी आदर्श गावकरी मध्ये आणली आहे. अभय निकाळजे आणि महावीर देवसाळे काय चमत्कार करणार याकडे लक्ष वेधले आहे.

गुरुवार, १५ जून, २०१७

जय महाराष्ट्र मध्ये कर्मचारी अस्वस्थ

मुंबई - जय महाराष्ट्राची अवस्थाही महाराष्ट्र १ सारखी झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्याचा पगार अद्याप झाला नाही. एकीकडे कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यांपासून पगार वाढीचं गाजर दाखवण्यात येत आहे तर दुसरीकडे एप्रिल आणि मे महिन्याच्या पगारासाठी तारीख पे तारीख सुरु आहे. सीईओ राजेश क्षीरसागर यांनी आणखी  4 आठवडे पगार होणार नाही असे स्पष्ट केले आहे. एप्रिलच्या पगारासाठी १५ जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मात्र १५ जुलैलाही पगार होईल याची खात्रीमॅनजेमेंटने दिली नाही. त्यातल्या त्यात सगळ्यात लो Pay scale मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पगार न मिळाल्यानं कर्मचारी अस्वस्थ  झालेत.
हास्यास्पद म्हणजे एकीकडे 'लक्षवेधी'मध्ये जय महाराष्ट्रने 7 वा वेतन आयोगानुसार वेतनवाढीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा देणे योग्य आहे का? याबाबत चर्चा घडवून आणली. पण इथे जय महाराष्ट्र मध्ये कर्मचाऱ्याचं दुखणं सांगणार कोणाला? आपलेच दात आपलेच ओठ...

सोमवार, १२ जून, २०१७

भाऊंच्या कट कारस्थानाचा दुसरा बळी

औरंगाबाद - बाबूजींच्या  मानबिंदूत भाऊची मनमानी सुरूच आहे. त्यांच्या कटकारस्थामुळे प्रताप नळावडेनंतर दत्ता थोरेंचा दुसरा बळी गेला आहे. लातूरहून औरंगाबादला बदली केल्यानंतर दत्ता थोरेला न जमणाऱ्या बिटला काम करण्यास सांगण्यात आले.त्यामुळे अखेर थोरेंनी मानबिंदूस सोडचिठ्ठी दिली.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भाऊच्या प्लॅननुसार जिल्हा प्रतिनिधींच्या बदल्यांचा खेळ  सुरू झाला. दत्ता थोरे यांची लातूरहून औरंगाबादच्या मुख्य कार्यालयात बदली करण्यात आली. त्यानंतर बदलीमुळे अस्वस्थ झालेल्या थोरेनीं दहा-बारा दिवसांची रजा टाकून पर्याय शोधण्यास सुरूवात केली. यानंतर औरंगाबादला जॉईन झाल्यानंतरही पहिल्यांदा त्यांना आॅनलाईनचे काम दिले आणि त्यानंतर दोनच दिवसात कामाचे स्वरूप बदलून ट्रान्सलेशनचे काम देण्यात आले. त्यानंतर सोमवारी थोरे यांनी राजीनामा दिला. भाऊला हेच अपेक्षित होते.

प्रताप नलावडे, दत्ता थोरे नंतर आता भाऊंच्या निशाण्यावर जालन्याचे जिल्हा प्रतिनिधी राजेश भिसे असून कोणत्याही क्षणी त्यांचा बळी जाऊ शकतो. दुय्यम स्थानावर पाठवून खच्चीकरण करण्यात आलेल्या विशाल सोनटक्के यांच्यासंदर्भातही भाऊ आणि भाऊने ठेवलेला दिवाण या दोघांचे प्लॅनिंग सुरू आहे. दिवाणशी पंगा घेणाºया चौघांचाही काटा काढणाऱ्या  भाऊच्या खेळ्या बाबुजींना कळत कशा नाहीत, याचेच आश्चर्य वाटते.एका बाजुला  बॅगा उचलणाऱ्या  दिवाणला प्रमोशन देण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणाऱ्या  भाऊंनी मानबिंदुत इमेज असणाऱ्या  लोकांनाच बाहेर जाण्यासाठी भाग पाडले आहे.

औरंगाबादच्या पत्रकारांना पोलीसांची धमकी

औरंगाबाद - पोलीस आयुक्ताविरूध्द बातम्या दिल्यास तुमचा सुनील ढेपे करण्यात येईल,अशी धमकी एका पोलीस निरीक्षकानी दिल्यामुळे औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातील पत्रकारांत तिव्र संताप व्यक्त केला जातोय.धमकी देणार्‍या पोलीस निरीक्षकांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या कारभाराविरूध्द सर्वच वृत्तपत्रांत गेल्या काही दिवसांपासून बातम्या झळकत आहेत,त्याचा राग अनावर झालेल्या एका पोलीस निरीक्षकांने पत्रकारांना चांगलेच धमकावले.काही क्राईम रिपोर्टर पोलीस आयुक्त कार्यालयात बातम्यांच्या निमित्ताने गेले असता,क्राईम ब्रॅन्चच्या एका पोलीस निरीक्षक त्यांना उद्देशून,तुमची संपूर्ण कुंडली आमच्याकडे असते,उस्मानाबादचे पत्रकार सुनील ढेपे यांना पोलीसांनी कसे खोट्या गुन्ह्यात गोवले तसे तुुम्हाला गोवू, ढेपेंच्या प्रकरणात काय झाले ? तसे आमचे काही होवू शकत नाही.तेव्हा याद राखा आणि पोलीस आयुक्ताविरूध्दच्या बातम्या थांबवा,अशी धमकी दिली.
त्यांची ही धमकी ऐकताच,पत्रकारांत संतापाची लाट उसळली आणि अनेक पत्रकार पोलीस आयुक्तांच्या व्हाटस् अ‍ॅप गु्रपमधून लेफ्ट झाले.नंतर या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी,पत्रकार आणि पोलीस यांचे संबंध ताणले गेले आहेत.

काय आहे सुनील ढेपे प्रकरण ?

उस्मानाबादचे पत्रकार सुनील ढेपे यांनी पोलीसांविरूध्द बेधडक बातम्या दिल्या असता,पोलीसांनी षडयंत्र रचून सप्टेंबर 2016 मध्ये त्यांच्या कार्यालयावर गुंडाला हल्ला करण्यास सांगितले,त्यानंतर गुंडावर कारवाई करण्याऐवजी सुनील ढेपे यांना खोट्या गंभीर गुन्ह्यात अडकाविले,त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते.याप्रकरणी सुनील ढेपे यांनी याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात रिट पिटीशन दाखल केले असून,हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
गुंडाच्या मार्फत हल्ला करणे आणि उलट गुंडाच्या बाजू घेवून पत्रकारांना खोट्या गुन्ह्यात अडकावणे असा प्रकार पोलीसांनी सुरू केला असून,आता पत्रकारांनी एक होण्याची गरज आहे.

बुधवार, ७ जून, २०१७

दर्डांना जडलाय भस्म्या ...

`एमआयडीसी'चे नऊ भूखंड हडपूनही बाबूजी भुकेले!
मुंबई : "लोकमत वृत्तपत्र समूहा'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तथा माजी खासदार विजय दर्डा यांना भस्म्या रोग जडला आहे. कोळसा काय? भूखंड काय ? त्यांचा स्वाहाकार चालूच आहे. कितीही खाल्ले तरी भूक शमत नाही, अशा आजारास भस्म्या म्हणतात. या भस्म्या रोगावर जालीम आणि रामबाण उपाय मुख्यमंत्री नावाच्या डॉक्‍टरकडे असल्याचे समजते. मात्र, हे डॉक्‍टर दर्डांना पोलिस कारवाईचे इंजेक्‍शन देवून त्यांचा आजार बरा करायला तयार नाहीत. या भस्म्या रोगाला आळा बसावा यासाठी विदर्भातील सामाजिक कार्यकर्ते पंकज ठाकरे राज्यपाल विद्यासागर राव यांना भेटून दर्डांवर योग्य ते उपचार केले जावेत, यासाठी आग्रह धरणार आहेत. तसेच त्यासाठी आवश्‍यकता भासल्यास न्यायालयाची पायरी चढून याचिकाही दाखल करणार आहेत. 
दोन महिन्यांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते पंकज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासह दर्डा यांच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला होता. विजय दर्डा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी राजकीय पदाचा गैरवापर करीत नागपूर येथील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात तब्बल नऊ भूखंड अनधिकृतरित्या गिळंकृत केल्याचा आरोप केला होता. दर्डा यांच्यावर कारवाई झाली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी त्या वेळी दिला होता.
या गैरव्यवहारप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. पण तरीही दर्डा कुटुंबीयांवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे आता आम्ही राज्यपालांकडे तक्रार दाखल करण्याबरोबरच न्यायालयातही लवकरच याचिका दाखल करणार आहोत, असे ठाकरे यांनी सांगितले.
दर्डा यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारच्या कार्यकाळात हे बहुतांश भूखंड हडप केले आहेत. एक भूखंड हडपताना दुसऱ्या भूखंडाविषयीची माहिती लपवून ठेवायची आणि सतत भूखंड हडप करायचे, असे प्रकार दर्डा कुटुंबीयांनी केले आहेत. यासाठी त्यांनी एमआयडीसीचे अधिकारी, तत्कालीन उद्योगमंत्री यांच्याशी संधान साधून हे भूखंड हडपल्याचे कागदपत्रांतून दिसून येत आहे.
अपंग, मतिमंद मुलांसाठी राखीव असलेला भूखंडही दर्डा कुटुंबीयांनी हडपला आहे, असेही ठाकरे म्हणाले. दर्डा यांचे हे भूखंड प्रकरण अत्यंत गंभीर आहे. फडणवीस सरकारकडून या प्रकरणी कारवाई होईल, असे आम्हाला वाटले होते; पण कारवाई करण्यास सरकारकडून अक्षम्य दिरंगाई होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आपण सतत पाठपुरावा करणार असल्याचेही ठाकरे म्हणाले.
भूखंडांचे श्रीखंड (एकूण 40 एकरांचा गैरव्यवहार)
1) भूखंड क्र.बी -192 : 40,000 चौ.मी चे (10 एकर) मे. लोकमत मीडिया लि. ला वाटप
2) भूखंड क्र. बी-192/1 : 16000 .88 चौ.मी (4 एकर) रचना दर्डा यांच्या मे. मीडिया वर्ल्ड एंटरप्रयाझेसच्या नावे
3) भूखंड क्र.192 पार्ट : 16000 चौ.मी चे (4 एकर) लोकमत न्यूज पेपरच्या नावे
4) भूखंड क्र .बी 207 : 6790 चौ.मी.चे (1.69 एकर) वाटप लोकमत न्यूज पेपर लि.
5) भूखंड क्र. बी-208 : 1800 चौ.मी.चे (अर्धा एकर) वाटप वीणा इन्फोसिस या नावे
6) भूखंड क्र.आरएच -18 : 51750 चौ.मी. (सुमारे 13 एकर) वाटप लोकमत कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्था यांच्या नावे निवासी प्रयोजनासाठी
7) भूखंड क्र पी - 60 : 3997.30 चौ.मी.चे (एक एकर) वाटप जैन सहेली मंडळाला
8) भूखंड क्र. पीएल 7 : 16 हजार चौ.मी.चे (चार एकर) वाटप लोकमत समूहाच्या कामगारांसाठी
9) भूखंड आर.एक्‍स. 1 : 6 हजार चौ. मी. (दीड एकर) वर दर्डा परिवाराचे भव्य गेस्ट हाउस आहे.
 
सरकारनामा वरून


मंगळवार, ६ जून, २०१७

बेळगाव तरुण भारत चे डोके ठिकाणावर नाही !

तरुण भारत बेळगाव च्या दुबई रिटर्न चिफ की चीप रिपोर्टर ने पुन्हा एकदा गोंधळ घातला आहे. खाली जोडलेल्या आजच प्रसिद्ध झालेल्या बातमीत त्याने जो फोटो घातलाय तो अक्षरशः जिवंत माणसाचा आहे.
हा गोंधळ लक्षात येताच त्याने तो आपल्या वरिष्ठांकडून लपवून ठेवला असल्याची खबर आहे. तरुण भारत च्या मालकांचे सध्या दुसऱ्याच धंद्यात लक्ष आहे, किरण ठाकूर हे अर्थसंस्थेच्या माध्यमातून पैसे कमविण्यात व्यस्त आहेत, त्यांचे चिरंजीव प्रसाद ठाकूर हे बाहेरच असतात, यामुळे आशा कुचकामी मंडळी तरुण भारत ची असलेली पत घालवू लागली आहेत.
हा बाजीगर चीफ रिपोर्टर आपल्या अनेक उचपतींनी चर्चेत आहे.

सोबत- अपघातात जखमी चा फोटो मृतक म्हणून छापलेला आहे

फेसबुक वर शेअर करा

Facebook