> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०१७

गुडगुडकर नेमकं जाणार कुठं ?

मुंबई -  'स्मार्ट मित्र'मधून अशोकाचं पिकलं पान लवकरच गळणार आहे. त्याजागी नवं हिरवं पान आणण्याऐवजी टाइम्स ग्रुप "उघडा डोळे ,बघा नीट "चा "कर" लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे घडल्यास "राहा एक पाऊलं पुढे" मधून अस्त पावलेल्या गुडगुडकरांची 'उघडा डोळे , बघा नीट' मध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे.
काल गुडगुडकरांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर मराठी मीडियात मोठा भूकंप झाला,फडणवीस सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याची बातमी मागे पडली आणि गुडगुडकरांची चर्चा सुरू झाली. गुडगुडकरांना चॅनेलनं काढलं की त्यांनी स्वतःहून  राजीनामा दिला, यावर सध्या  कवित्व सुरू आहे, तसेच गुडगुडकर नेमकं  जाणार कुठे ? अशी चर्चाही रंगू लागली आहे. 
कोण म्हणतंय, गुडगुडकर चॅनलपेक्षा स्वतःला मोठे समजत होते आणि चॅनलपेक्षा स्वतःला जास्त प्रमोट करीत होते, त्यामुळे दिल्लीतील 'चंद्र' नाराज होते, तर चंद्रामुळे उदयचा दिवसेंदिवस अस्त होत होता आणि शेवटी  ग्रहण लागल्यामुळे त्यांनी स्वतःहून मुक्तता करून घेतली ! आता खरं - खोटं गुडगुडकरांनाच माहीत !
असो , आता गुडगुडकर नेमके जाणार कुठे ? यावर येवू या ...
पहिली शक्यता "चला जग जिंकू या"ची सुरू आहे, पण आताच कुठे "काथ्याकूट" करून सगळीकडे  "प्रसाद" वाटला असताना, आणि चॅनलचं नवं बारसं ठेवलं असताना, ही शक्यता कमी वाटत आहे. 
दुसरी शक्यता "उघडा डोळे, बघा नीट"ची सुरू आहे. येथील "करां"ना टाइम्सची ऑफर आहे. स्मार्ट मित्रच्या "अशोका"चं पिकलं पान लवकरच गळणार आहे, त्यासाठी करांना खास बोलावणं आलं म्हणे.पण प्रिंट मधून आलेल्या करांना टीव्हीवर चमकण्याची मोठी सवय जडल्याने ते पुन्हा प्रिंट मध्ये  जाणार का ? हे एक कोडचं आहे. जर ते  खरंच गेलं तर गुडगुडकर उघड्या डोळ्यामध्ये  ड्रॉप टाकू  शकतात.
पण हे सर्व हवेतील बाण असून, अजून कसलीही खात्री पटलेली नाही. तुम्हाला तर माहीत आहे, बेरक्या खात्री पटल्याशिवाय कुठली बातमी टाकत नाही,तोपर्यंत ही बातमी मनोरंजन म्हणून वाचा !
चला पुन्हा भेटू !

जाता जाता - 
"राहा एक पाऊल पुढे" मधून उदयचा अस्त झाल्यामुळे येथे  जाण्यासाठी 'चला जग जिंकू या ' सोडून गेलेला फणस, 'थेट, अचूक , बिनदास्त'चे तुळशीपत्र, गेल्या चार वर्षात चार चॅनेल बदलणारे नीलकंठेश्वर, मॅक्सचा चंद्र, सोलापुरी ओबामा आणि काही स्वतः ला ज्येष्ठ, विद्वान, शहाणे समजणारे डझनभर संपादक उतावीळ आहेत !

डॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त !

मुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास मध्ये मोठा धमाका झालाय.संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी आज सायंकाळी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे सर्व कर्मचारी अचंबित झाले . त्यानंतर तातडीने ज्येष्ठ  पत्रकार विजय कुवळेकर यांनी संपादकपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
पाच वर्षांपूर्वी डॉ. उदय निरगुडकर यांनी झी २४  तासच्या संपादक पदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर त्यांनी नंबर दोनवर असलेल्या झी २४ तासला  नंबर १ वर आणले होते. 'रोखठोक' हा  त्यांचा डिबेट शो बऱ्यापैकी चालत होता. चॅनलला चांगला बिझनेस देणारा संपादक म्हणून त्यांची ख्याती होती. कॉर्पोरेट क्षेत्रात त्यांचा चांगला परिचय होता.त्यामुळे झी २४ तास जाहिरातीमध्ये अव्वल होते.
टीव्ही मीडियाचा कसलाही अनुभव नसताना डॉ. उदय निरगुडकर यांनी झी २४ तासला अव्वल  केले होते. त्यापूर्वी ते IBN  लोकमतवर एक गेस्ट म्हणून हजेरी लावत होते. निखिल वागळे यांनी डॉ. उदय निरगुडकर यांना  टीव्ही मीडियात स्थान दिले होते.

विजय कुवळेकर नवे संपादक
 
सर्व काही सुरळीत चालू असताना  डॉ. उदय निरगुडकर यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला. राजीनाम्याचे नेमके कारण शोधण्याचा बेरक्याने प्रयत्न केला असता, एक तर त्यांना IBN लोकमतची ऑफर असावी किंवा दिल्लीत आलेल्या चंद्रामुळे हवालदिल झाल्यामुळे शेवटी कंटाळून त्यांनी राजीनामा दिला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये आज चर्चा झडत आहे आणि दुसरीकडे झी २४ तासमध्ये धमाका झाला. डॉ. उदय निरगुडकर यांनी आज सायंकाळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची शेवटही मुलाखत घेतली आणि त्यानंतर एडिटर डेस्कवर त्यांनी स्वतःचे ओळखपत्र ठेवून सर्व कर्मचाऱ्यांना आज माझा शेवटचा दिवस आहे आणि यापुढे आपली भेट होईल की  नाही असे म्हणताच सर्व कर्मचारी अचंबित झाले. डॉ. उदय निरगुडकर चेष्टा करीत आहेत असे अनेकांना वाटले पण त्यात सत्यता निघाली. त्यानंतर लगेच ज्येष्ठ  पत्रकार विजय कुवळेकर यांनी संपादकपदाची सूत्रे घेतली.
कुवळेकर अनेक वर्ष पुणे सकाळचे संपादक आणि मुख्य संपादक होते. त्यानंतर लोकमतला संपादक आणि मुख्य संपादक होते,दोन महिन्यापूर्वी ते झी मीडियामध्ये जॉईन  झाले होते. झी मीडिया लवकरच एक मराठी साप्ताहिक काढत असून त्याचे संपादक म्हणून कुवळेकर जॉईन  झाले होते. आता त्यांच्याकडे झी २४ तासचे संपादकपदही  आले आहे. कुवळेकर यांना टीव्ही मीडियाचा कसलाही अनुभव नाही. एक तर नवा संपादक येईल किंवा कुवळेकर तयार झाले तर त्यांच्याकडेही कायम सूत्रे राहतील, अशी चर्चा आहे.
कुठे जाणार डॉ. उदय निरगुडकर ?
झी २४ तासमधून अस्त झाल्यानंतर डॉ. उदय निरगुडकर नेमके कुठे जाणार, याकडे लक्ष वेधले आहे. लवकरच नामांतर  होणाऱ्या IBN लोकमतमध्ये ते जॉईन होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रसाद काथे यांच्या कामावर मॅनेजमेंट समाधानी नाही. त्यामुळे चॅनलमध्ये काथ्याकूट सुरु आहे.  वृत्तसंपादक असलेल्या राजेंद्र हुंजे यांचे अधिकार वाढवण्यात आले आहे. तो काथेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

संजय राऊत यांचे 'वंदे मातरम्' राष्ट्रगीताबाबत अज्ञान !


काल दि. २९ ऑक्टोबर चा  दैनिक सामना आपण वाचला का ? वाचला नसाल तर नक्की वाचा. त्यातील  उत्सव  पुरवणी पाहा ... या पुरवणीत कार्यकारी संपादक संजय राऊत  यांचे  'रोखठोक' सदर  नेहमीप्रमाणे प्रसिद्ध झाले आहे. राऊत यांनी कालच्या  'रोखठोक'मध्ये  रवींद्रनाथ टागोर यांच्यावर एक लेख  लिहिला आहे. 'टागोर आज हवे होते' असे या लेखाचे शीर्षक आहे.
या लेखात राऊत यांनी 'वंदे मातरम्'  या राष्ट्रगीताचा उल्लेख केला आहे. हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिल्याचे म्हटले आहे. तसेच या  राष्ट्रगीतावरून कसे राजकारण सुरु केले आहे, यावर भाष्य केले आहे.
मात्र वस्तुस्थिती अशी आहे की , 'वंदे मातरम्' हे राष्ट्रगीत   बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी इ.स. १८८२ मध्ये आनंदमठ या कादंबरीमध्ये लिहिले आहे. आणि  ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरणागीत बनले.
तर रवींद्रनाथ टागोर यांनी जन गण मन हे राष्ट्र्गीत लिहिले आहे.
(संदर्भ पाहा )
मात्र संजय राऊत यांनी 'वंदे मातरम्' हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर  यांनी लिहिल्याचा जावईशोध लावला आहे. स्वतःला विद्वान समजणाऱ्या संजय राऊत यांचे  अज्ञान पुन्हा उघडे पडले आहे.

काही  दिवसापूर्वी संजय राऊत यांनी  छत्रपती संभाजी राजे यांच्याबद्दल वादग्रस्त  लिखाण केले होते. तेंव्हा  मराठा  समाजाच्या कार्यकर्त्यानी राऊत यांचे प्रतीकात्मक पुतळा जाळून त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला होता.


शनिवार, २८ ऑक्टोबर, २०१७

चांगल्या समाजासाठी चॅनेलमध्ये स्ट्रींजर रिपोर्टरची प्रचंड हेळसांड

मुंबई - चांगल्या समाजासाठी चॅनेलमध्ये स्ट्रींजर रिपोर्टरची प्रचंड हेळसांड सुरु आहे. चॅनलचा टीआरपी वाढला असला तरी रिपोर्टरच्या पदरात मिळणारे मानधन ५ ते ७ हजाराच्या पुढे सरकत नाही. त्यात पेट्रोल भत्ता मिळत नसल्यामुळे फुकट हमाली करण्याची वेळ रिपोर्टरवर आली आहे.

पूर्वी ग्रामीण भागातील बातम्या बऱ्यापैकी लागत होत्या.त्यात  पॅकेज स्टोऱ्या लागत होत्या. अँकर / व्हिजव्हल - ३०० रुपये, अँकर / व्हिजव्हल/ बाईट - ५०० रुपये आणि पॅकेज स्टोरी ७०० रुपये असे मानधन दिले जाते. परंतु विनोद कापरी आल्यापासून मेट्रो सिटीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्याचबरोबर अनेक न्यूज फास्ट न्यूज मध्ये चालविल्या जात आहेत. विशेष म्हणजे पॅकेज स्टोरी करायला सांगून ती बातमी फास्ट न्यूज मध्ये चालवली जात असल्याने रिपोर्टरची मेहनत, वेळ आणि पैसा वाया जात आहे. पॅकेज स्टोरी करायला सांगून ती फास्ट न्यूज का केली अशी विचारणा केली तर बेदम आणि रंगीला परभणीकर दुरुत्तरे देत आहेत.

स्टोरीबाबत स्ट्रींजरची  रिपोर्टर प्रचंड हेळसांड सुरु असताना आता चॅनलने नवीनच काम दिले आहे. हे चॅनल एक नवीन शो आणत आहे. जे काम पोलीस स्टेशन किंवा न्यायालय करू शकले नाही ते काम चॅनल करणार आहे म्हणे.

काय आहे शो ?

लघु न्यायालय, कुटुंब न्यायालय, किंवा न्यायालयाखेरीज इतर स्थानिक यंत्रणेकडे अनेक वर्षापासून प्रलंबित खटले आहेत अशा प्रकरणांची माहिती घेऊन दोन्ही पक्षकारांना समोरसमोर आणून काही प्रकरणं चांगल्या समाजासाठी चॅनलच्या  माध्यमातून निकाली काढण्याचा कार्यक्रम केला जाणार आहे, यासाठी ब्युरोज आणि संबंधित रिपोर्टसने अशा खटल्यांची केसेसची माहिती घ्यावी, स्टिंजर्सने आपली माहिती आपापल्या ब्युरोजना पाठवावी. यातील काही खटले चॅनलच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जी प्रकरणं न्यायालयात नाहीत मात्र भांडणं सुरू आहेत, स्थानिक यंत्रणेकडे याबाबत नोंद आहे अशीही माहिती गोळा करावी, यासाठी खालील फॉरमॅटमध्ये माहिती गोळा करावी. 

उदा. – कौटुंबिक हिंसाचार, सासू-सुनेतला वाद, पती-पत्नी वाद, संपत्तीवरून दोन भावांमध्ये भांडणं आणि अन्य
नेमकं प्रकरण काय आहे ?-
दोन्ही बाजूचे संपर्क क्रमांक – 
खटला किती वर्ष प्रलंबित आहे
कोणत्या न्यायालयात खटला सुरू आहे -


या शो मुळे सगळे रिपोर्टर आणि स्ट्रींजर रिपोर्टर अक्षरश वैतगले आहेत ... या शो साठी चॅनल हेड कडून टॉर्चर केलं  जात आहे. या शोबाबत रिपोर्टर किंवा स्ट्रींजर रिपोर्टर लोकांकडे गेला की लोकही  शिव्या देऊन बाहेर काढत आहेत. कोणीही आपल्या  घरातलं प्रकरण चव्हाट्यावर आणायला  तयार नाही. .. पण ऑफिस मधून केवळ टॉर्चर करून सगळ्या केस घेतल्या जात आहेत. बातम्या कमी आणि नको ती लफडी जास्त करायला लावत आहेत.


त्यात फॉरवर्ड प्लॅनिंग प्रकरण नविन सुरु करण्यात आले आहे...

 काय  आहे प्रकरण ?

सर्व प्रतिनिधींसाठी महत्वाचं
(मुंबई रिपोर्टर्स,सर्व ब्युरो चीफ आणि प्रतिनिधी)
2 आठवड्यापुर्वी तुमच्या ब्युरो हेड्शी फॉरवर्ड प्लँनिंग संदर्भात माझं बोलणं झालं होतं. त्यांनी तो मेसेज तुमच्या पर्यत पोहचवला असेल अशी अपेक्षा बाळगतो. मात्र तरीही तुमच्या कोणाकडुन फॉरवर्ड प्लँनिंग*च्या बातम्या मिळत नाहीयेत. त्यामुळे पुन्हा एकादा *फॉरवर्ड प्लँनिंग साठी रिमाईंड करतोय.
आता फॉरवर्ड प्लँनिंग म्हणजे काय ?
रोज सकाळी ज्या वेळेस आपण पेपर वाचतो , किंवा एखाद्या गावात एखादी बातमी करायला जातो तेव्हा तिथे एक किंवा 2 पेक्षा जास्त बातम्या अगदी सहज आपल्याला मिळतात, याशिवाय गावात किंवा शहरात अनेक बातम्या अश्या असतात कि त्यांची शेल्फ लाईफ जास्त असते म्हणजे आज किंवा उद्याच्या ऐवजी ती बातमी दिली तरी चालु शकते अश्या बातम्याची यादी तुमच्याकडुन दुपारी 2 पर्य़त येणं अपेक्षीत आहे. मात्र त्या येताना दिसत नाहीत. पेपर वाचताना अनेक बातम्या आपल्या डोळ्याखालुन जातात, त्या वाचताना आपण निर्णय घेतो की आज ही बातमी करु, सुपरफास्टसाठी ही बातमी पाठवु, 36 जिल्हे 72बातम्यांसाठी या 2 बातम्या पाठवता येतील, अश्यातच पध्दतीने उद्या काय करता येईल चं प्लँनिंग आपल्या डोक्यात तयार हवं.उदा, माथेरान मध्ये ई रिक्षा सुरु करण्याची मागणी, शहरामध्ये बोगस रिक्षा फोपावल्या, महापालिका, नगर पालिका यांच्या स्थायी समिती आणि अन्य समित्यामधुन मिळणा-या बातम्या, रस्त्यांची दुरावस्था, अतिक्रमणं अश्या विविध बातम्या बसल्या बसल्या करता येवु शकतात. त्यामुळे आजपासुन तुमच्या कडुन फॉरवर्ड प्लँनिंग च्या बातम्या दुपारी 2 पर्यत येणं अपेक्षीत आहे.
लक्षात घ्या फॉरवर्ड प्लँनिंग म्हणजे डे प्लँन नाही, किंवा डे प्लँन 5 च्या ऐवजी 2 ला द्या असाही त्याचा अर्थ नाही.
फॉरवर्ड प्लँनिंग म्हणजे तुमच्या भागात एखादी बातमी असेल त्यांवर जर आपल्याला स्पेशल करता येत असेल तर निर्णय घेण्यासाठी सोपं जावं म्हणुन सुरु केलेली पध्दत आहे. तुम्ही एखादी बातमी फॉरवर्ड प्लँनिंगसाठी दिली आणि तुमच्या कडे डे प्लँन नसेल तर तिच बातमी तुम्ही डे प्लँनसाठी करु शकता, किंवा एखादी बातमी असेल तर फॉरवर्ड प्लँनिंगची बातमी तुमच्याकडे बँक स्टोरी म्हणुन राहू शकते.


आता इतकं सर्व करून स्ट्रींजर रिपोर्टरच्या पदरात महिन्याला पडतात किती ? तर ५ ते ७ हजार रुपये ... त्यात पेट्रोल भत्ता नाही...
कसे परवडत असेल हे सर्व ? हे एक कोडेच आहे ...

शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०१७

पत्रकार विनोद वर्मा यांना अटक

गाझियाबाद- ज्येष्ठ पत्रकार विनोद वर्मा यांना शुक्रवारी सकाळी छत्तीसगड पोलिसांनी
अटक केली. छत्तीसगडमधील भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री राजेश कुमार यांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपावरुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळी गाझियाबादमधील निवासस्थानातून विनोद वर्मा यांना अटक करण्यात आली. वर्मा यांना गाझियाबादमधील पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. छत्तीसगडमधील मंत्री राजेश कुमार यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ वर्मा यांच्या हाती लागले होते. या व्हिडिओच्या आधारे वर्मा यांनी मला ब्लॅकमेल केले आणि माझ्याकडून खंडणी मागितली, असा आरोप राजेश कुमार यांनी केला आहे. पोलिसांनी विनोद वर्मा यांच्या घरातून ५०० हून अधिक सीडी जप्त केल्या आहेत. विनोद वर्मा यांना पुढील चौकशीसाठी रायपूरच्या पोलीस ठाण्यात नेण्यात येईल, असे समजते.
विनोद वर्मा हे बीबीसीचे माजी पत्रकार असून अमर उजालाच्या डिजिटल विभागाचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. एडिटर्स गिल्डचे ते सदस्यदेखील आहे. विनोद वर्मा हे छत्तीसगड सरकारविरोधात स्टिंग ऑपरेशन करणार होते अशी चर्चादेखील रंगली आहे. माजी पत्रकार आणि आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष यांनी ट्विटरवरुन विनोद वर्मा यांच्या अटकेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. हा माधम्यांवरील हल्ला असल्याचा आरोप त्यांनी केला.
माझ्याकडे छत्तीसगढच्या मंत्र्याच्या अश्लील चित्रण असलेल्या सीडीज आहेत. म्हणूनच छत्तीसगढचे सरकार माझ्याविरोधात आहे. असे वर्मा यांनी म्हटले. याबाबत मंत्र्यांनी  ‘त्या सीडीज बनावट असल्याचे तसेच त्या सीडीजची चौकशी कोणत्याही तपास यंत्रणेमार्फत करावी असे सांगितले.
छत्तीसगढच्या भाजप आयटीचे सदस्य प्रकाश बजाज यांनी केलेल्या तक्रारीनंतर वर्मा यांना अटक केली गेली.

वृत्तपत्र कागदाची प्रचंड टंचाई .. पुढारीला झळ...

वृत्तपत्र कागदाची प्रचंड टंचाई
कागद टंचाईची झळ पुढारीला बसली..
सर्व आवृत्यांमध्ये पानांची संख्या कमी केली..
कोल्हापूर अंक १०+ ६ निघाला..
याच संदर्भात पुढारीने बॉटम न्यूज दिली..
कागदाचे दर वाढले.. लवकरच अंकाची किंमत वाढणार..
प्रिंट व्यवसाय पुन्हा धोक्यात
डिजिटल मीडिया हाच पर्याय .. 
 

बुधवार, २५ ऑक्टोबर, २०१७

'एनडीटीव्ही'ची मालकीही मुकेश अंबानी यांच्याकडे ...

नवी दिल्ली -  'तोट्यातील, फेमा कारवाईच्या फेऱ्यातील 'एनडीटीव्ही'ची मालकीची अखेर मुकेश अंबानी यांच्याकडे गेली  आहे. 'स्पाईसजेट'चे अनिल सिंग यांनी हे चॅनेल खरेदी करण्याची कायदेशीर प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात असताना त्यातून माघार घेतली. ते बाहेर पडल्यानंतर मुकेश अंबानी यांनी शेअर्स खरेदीचा सपाटा लावला. आता 'एनडीटीव्ही'त 51%हून अधिकची मालकी अंबानी समूहाकडे गेलीय.
 कंपनीच्या शेअर्सची किंमत 39 रुपयांवरून 62 वर पोहोचलीय. या सर्व घडामोडींनी मार्केट व माध्यमजगत अवाक झालेय. तोट्यातील एनडीटीव्ही खरेदी करण्यात अंबानींना एव्हढा रस का, याचे कोडे कुणालाही सुटत नाहीये. या कंपनीला आयकराचा 525 कोटी रुपये दंड भरायचाय; 2030 कोटींच्या व्यवहाराची ईडी मार्फत चौकशी सुरू आहे. अशी कंपनी अंबानींनी का घेतली असावी? 
आधीच त्यांच्याकडे सीएनएन-आयबीएन, नेटवर्क 18, इंडिया टीव्ही, न्यूज नेशन, न्यूज 24 हे व असे अनेक चॅनेल्स ताब्यात आहेत. सरकारविरोधात भूमिका घेणारे एकमेव चॅनेल 'एनडीटीव्ही'ही आता 'रिलायन्स'कडे गेल्याने चौथा स्तंभ गर्भगळीत होणार आहे....

मूळ इंग्रजी बातमीची लिंक

मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०१७

इनाडू डिजिटल मध्ये जोशी बुवांची मनमानी

हैदराबद - मराठीत खासगी वृत्तवाहिनी सर्वप्रथम सुरु करणाऱ्या रामोजी रावांनी  ईटीव्ही मराठी  बंद केल्यानंतर  आता डिजिटल मीडियात प्रवेश केला आहे. त्यांनी गतवर्षी eenaduindia.com हे न्यूज पोर्टल सुरु केले.  या यूज पोर्टलमध्ये महाराष्ट्रभरातून अनेक वृत्तपत्रं आणि टीव्ही चॅनेलचे पत्रकार बातम्या पाठवत असतात. यासाठी ते त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने वृत्तांकन करत आहेत. अनेक नवीन पत्रकारही अधिकृतपणे या वेबपोर्टलवर बातमी पाठवतात.

या वेब पोर्टलवर जोशी बुवा नावाचे  मराठी विभाग प्रमुख कार्यरत आहेत. बाहेर त्यांची प्रतिमा मुख्य संपादक म्हणून झळाळून घेत असले तरी वास्तविक संपादकांचे कोणतेही गुण ते पाळताना दिसत नाहीत. संपादक म्हणून त्यांची कोणतीही ठोस भूमिका नसते. याऊलट येथील एच आर आणि जोशी बुवा मिळून इनाडू इंडिया या आय टी कंपनीत कर्मचारी शोषणाचे काम पार पाडतात. जोशी बुवा यांच्या हाताखाली रोज दोन शिफ्टमध्ये डझनभर उपसंपादक काम करतात. मात्र जोशी त्यांना गुलामासारखी वागणूक देतात.

जोशी बुवाच्या मर्जीतील माणसांना प्रतिष्ठेची वागणूक दिली जाते. ट्रेनी कर्मचाऱ्यांकडून त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल ब्र जरी निघाला तर त्यांचे  तोंड दाबण्यात येते तसेच सुट्टी रद्द करून त्या दिवशी जबरदस्ती काम करून घेण्यात येते. जास्तीत जास्त बातम्या करण्यासाठी सातत्याने दबाव टाकला जातो प्रसंगी जेवणही अनेक उपसंपादक लोकांना टाळावे लागते. आजारी पडल्याने अचानक सुट्टी घेतली तर त्या दिवसाचा पगार कापले गेलेलाच असतो. कोणीही उपसंपादक जर त्यांना एखाद्या बातमी, विशेष स्टोरीबद्दल, कामातील चुकीबद्दल किंवा त्यांच्या मर्जीतील लोकांच्या हुकूमशाही वागण्याबद्दल जर कधी बोलायला गेला, तर त्याला नोकरीवरून काढण्यासाठी षडयंत्र रचण्यात येते. ज्याप्रमाणे तुरुंगातील कैद्यांना शिक्षा म्हणून खडी फोडावी लागते त्याप्रमाणे इनाडू डिजीटलमध्ये उपसंपादकांना गुलामासारखी वागणूक देण्यात येते. सुट्टीच्या दिवशी जर एखादा उपसंपादक हा रामोजी सिटी फिरायला आल्याचे निदर्शनास आल्यास हे जोशी बुवा त्याच्यावर डूख धरून बसतात.

इनाडू इंडियातील हिंदी पोर्टलच्याहीबाबत अशाच तक्रारी भडास4मीडिया येथे पोस्ट झाल्या आहेत.

आशिष जाधव यांची महाराष्ट्र १ ला सोडचिठ्ठी

मुंबई - प्रदीर्घ रजेनंतर आशिष जाधव यांनी महाराष्ट्र १ च्या  संपादक पदाचा अखेर राजीनामा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र १ चे पाय आणखी खोलात गेले आहेत.
निखिल वागळे यांनी राजीनामा दिल्यानंतर आशिष जाधव यांना कार्यकारी संपादक करण्यात आले होते. मात्र एक वर्षाच्या आतच जाधव यांनी राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र १ मधून सर्व शिलेदार बाहेर पडल्यानंतर आशिष जाधव यांनी एक हाती तंबू उभा केला होता. पण तीन पार्टनरच्या मनमानीला कंटाळून जाधव यांनीही   राजीनामा दिला आहे.
महाराष्ट्र १  ची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. गेल्या अनेक महिन्यापासुन कर्मचाऱ्यांच्या पगारी नाहीत, या चॅनलने फिअरलेस मीडिया कंपनी दिवाळखोरीत काढून जुन्या ११६ कर्मचाऱ्याचा जवळपास ६ महिन्याच्या पगार बुडविला आहे, त्यातील काही कर्मचाऱ्यांनी पोलिसात धाव घेतली आहे. हे चॅनल अनेक DTH आणि केबल वरून गायब झाले असून  शेवटची घटका मोजत आहे.

संबंधित बातमी 

प्रवीण बर्दापूरकर यांचे लोकमतमधील दिवस वाईटच !

लोकसत्तामध्ये जवळपास २९ वर्ष काम केल्यानंतर मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर हे विजय दर्डा यांच्या आग्रहास्तव लोकमतमध्ये जॉईन झाले खरे पण समूह संपादक दिनकर रायकर यांनी लोकमतमध्ये कशी कोंडी केली याचा लेखाजोखा बर्दापूरकर यांनी एका दिवाळी अंकात मांडला आहे. 

राजेंद्र दर्डा यांचे चिरंजीव ऋषी दर्डा यांच्याबद्दलही बर्दापूरकर यांनी बरेच काही लिहिले आहे. हा लेख वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा...

 लोकमतमधील दिवस !


चौथा स्तंभ कि चोथा स्तंभ ?

आजकाल पत्रकारीतेने इतके विकृत स्वरूप धारण केले आहे की,पत्रकारीता हा खरोखरच लोकशाहीचा चौथा स्तंभ राहिला आहे का ? हा प्रश्न माझ्यासारख्या  पत्रकारीतेत आयुष्य व्यतित केलेल्या पत्रकारास पडू लागला आहे. काही सन्माननीय अपवाद वगळता, पत्रकारीता ही  आजच्या इतकी स्वस्त,बाजारू व विकाऊ कधीच झाली नव्हती. 

     "भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळांच्या माथी हाणू काठी"  किंवा " खिचो न किमान को न तलवार निकालो,जब तोप मुखाबिल है तो तलवार निकालो" अशी ब्रिद वाक्यं असलेली पत्रकारीता लोप पावत चालली आहे. पत्रकारीता,वृत्तपत्र वा न्यूज चॅनल हे आता एखाद्या राजकिय पक्षाचे,एखाद्या राजकिय नेत्याचे वा समाजाचे मुखपत्र होऊ पहात आहे. मार्केटिंगचे उत्तम साधन म्हणून पाहिले जात आहे.

    पत्रकार कक्ष हे पत्रकारांचे जिव्हाळ्याचे ठिकाणी.बातम्यांची देवा- घेवाण करण्याचे ठिकाण होते.जणू ते पत्रकारांचे मंदिरच.पण आज हेच ठिकाण सेटींगचे व गि-हाईक शोधण्याचे,काॅपीपेस्ट बातम्या पेरण्याचे केंद्र झाले आहे.पुर्वी  पत्रकारांना सन्मानाने आमंत्रण यायचे. आता एक एसएमएस आला की पत्रकार, पत्रकार परिषदेवर तुटून पडतात.नीर-क्षीर न्यायाने व परखडपणे बातमी देण्याची अपेक्षा करणे मुर्खपणा समजला जाऊ लागला आहे. पत्रकार परिषदेच्या आयोजकांचे प्रवक्ते असल्याप्रमाणे बातम्या काॅपीपेस्ट केल्या जातात.

   
वर्तमान पत्राच्या पहिल्या पानावर वाचकाचा पहिला हक्क असतो.कारण तो पैसे देऊन वृत्तपत्र विकत घेतो ते बातमी वाचण्यासाठीच. पुर्वी- आज कोणत्या वृत्तपत्रात काय हेडिंग/मथळा आहे, याला महत्व असायचे.परंतू आता तर मुखपृष्ठावरच जाहिरातींचे अतिक्रमण दिसते.पुर्वी जाहिराती पानपुरक असायच्या.आता मात्र जाहिराती छापून उरलेल्या जागेत बातमी बसवली जाते. त्यातही सामाजिक,विधायक बातम्यांपेक्षा विद्धंसक व गुन्हेगारी बातम्यांना जास्त महत्व दिले जाते. कारण त्यामुळे TRP व खप वाढतो म्हणे.पुर्वी बातमी सर्वप्रथम छापुन येण्यासाठी चढाओढ असायची. त्या बातमीवर त्या-त्या बातमीदाराची छाप असायची.नांव नसले तरी अमुक बातमी ही दिलीप मालवणकरांचीच हे वाचक ओळखत असत. आता तर सर्व बातम्या काॅपी पेस्ट असतात. आणि 4-4 पेपरचे विद्वान संपादक ती जशीच्या तशीच छापतात. पुर्वी संपर्क व दळण वळणाची साधनं नव्हती.बातमी लिहिणे,ती फोनवर सांगणे अथवा स्वतः घेऊन जाणे, छायाचित्र असल्यास कॅमेरामन शोधुन फोटो काढणे, त्याचे प्रिंट काढणे, इतके सायास करावे लागत.मग प्रेसमधे प्लेट बनत असे किंवा ब्लाॅक बनत असत.त्यामुळे बातमीदारी कष्टप्रद होती;  तरी ती आनंदाने केली जात होती. कारण ते एक व्रत मानले जाई.सुरूवातीला विना मानधन,नंतर दरमहा 40 रूपये करीत करीत 400 इतके मानधन माझे दैनिक  मला देत असे.तरी त्यात समाधान मानणारे बातमीदार होते. आता बातमीदारी सहज साध्य झाली आहे.संगणक,
मोबाईलवर बातमी टाईप केली व वाट्टेल तेवढे फोटो जोडले की इंटरनेट द्वारे बातमी काही क्षणांत प्रेसमधे पोहचते. कित्येक पत्रकारांचा एकच "राईटर" असतो.तोच बातमी टाईप करतो व वेग वेगळ्या वर्तमान पत्रात धाडून देतो. इतकी सहज साध्य पत्रकारीता झाल्याने पत्रकारीता स्वस्त झाली आहे. कोणीही झोळी घेतो आणि पत्रकार म्हणवतो. मी माझ्या 35 वर्षाच्या पत्रकारीतेत कधीही स्कुटरवर वा घरावर "पत्रकार" असे लिहिले नाही. त्याची गरजच भासली नाही. दिलीप मालवणकर म्हणजे "नवशक्ती" हे समिकरण झाले होते.तसे प्रत्येक बातमीदाराचे होते. त्यावेळी बातमीदार हाताच्या बोटावर मोजण्याइतके  असत.त्यामुळे ओळख पत्राची गरज नसे व सन्मानही मिळत असे. आता बातमीदारांचे पिक अमाप आले आहे. पुर्वी जसे टाईपिस्ट कम क्लार्क पद असायचे  तसेच आज पत्रकार कम जाहिरात एजन्ट झाले आहे. काही दैनिकं तर मानधन देत नाहीत.ते ज्यांना ओळखपत्र देतात, त्यांना महिन्याच्या जाहिरातींचे टार्गेट दिले जाते. जितक्या जास्त जाहिराती तितके जास्त कमिशन आणि तेच मानधन. अगदी ब्युरो चिफ म्हणजे जाहिरात कलेक्शन एजन्सी, अशी विदारक परिस्थिती अनेक दैनिकांत पहायला मिळते. मग बातमी देण्याचे पैसे, बातमी दडपण्याचे पैसे हा प्रकार जन्म घेतो. अनेक पत्रकार स्थायी समिती सभापती कडून दरमहा मिळणा-या पाकिटाकडे डोळे लावुन बसलेले असतात.तर अनेकांना विशिष्ट नेते त्यांच्या बातम्यांचा रतिब घालण्यासाठी पॅकेज देतात.अशा परिस्थितीत भ्रष्टाचारा विरोधात निरपेक्ष बातम्यांची अपेक्षा करणे हे स्वप्न रंजन ठरते. 

   
मी जेंव्हा पत्रकारीता करीत होतो,  तेंव्हा पक्षविरोधी कार्य करणा-या माझ्याच पक्षाच्या लोकांनी माझे अजब लोकशक्ती हे साप्ताहिक  जाळले होते. दिलीप मालवणकर मुर्दाबाद !! घोषणा देत मोर्चा काढला होता. याहून निष्पक्ष पत्रकारीता ती काय असू शकते ?? त्यावेळी  पत्रकाराची ताकद काय असते ते मी मोर्चेक-यांना दाखवुन दिले. मी थेट मातोश्री गाठले व बाळासाहेबांकडे दाद मागितली असता स्थानिक दोन पदाधिका-यांना पदमुक्त केल्याचे दुस-याच दिवशी दैनिक सामनात  बाळासाहेबांनी जाहिर केले होते.

    धर्मवीर अद्याप गप्प का ? हे मी ज्यांना गुरू व नेता मानत होतो त्या आनंद दिघे साहेबांच्या विरोधात लिहिण्याचे धाडस करणारी माझी पत्रकारीता होती. शिवसेना प्रमुख हिंदू ह्रदयसम्राट माननीय बाळासाहेबांना- "साहेब 100 पानी वही कितीला मिळते ?"  हा प्रश्न मातोश्रीवर विचारणारी माझी पत्रकारीता होती. माझ्याच साप्ताहिकाच्या मथळ्यावरून प्रकाशन प्रसंगी तत्कालीन  खासदारांनी  " याचे गंभीर परिणाम होतील,"अशी धमकी देण्यासारखे जळजळीत वास्तववादी लेखन करण्याची धमक माझ्या पत्रकारीतेत होती. "वाईन सम्राट नगराध्यक्ष होत असेल तर काॅन्ग्रेसने गांधीजींची जपमाळ जपणे बंद करावे," असा मथळा छापून तत्कालीन वाईन सम्राट व उल्हासनगरचे नगराध्यक्ष  असलेल्या अनभिषिक्त सम्राटास आव्हान देणारी निर्भीड पत्रकारीता मी केली आहे. या पत्रकारीतेसाठी मी वयाच्या 31व्या वर्षी  माझी क्लास 2 दर्जाची सरकारी नोकरी सोडून छपाईचा व्यवसाय सुरू करून उपजिविका केली व पत्रकारीता हा छंद म्हणून जोपासला .माझ्या पत्रकारीतेमुळेच मी दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलो. अनेक आंदोलनांचे यशस्वी नेतृत्व केले. भ्रष्टाचारी संस्थाचालक व  कुख्यात डाॅनला जेलमधे पाठवले. ही खरी पत्रकारीतेची ताकद होती. 

    आम्ही अभिमानाने सांगायचो,पत्रकारीता हा आमचा धर्म आहे. निष्पक्ष, सडेतोड व बिनधास्त बातम्यांना इतकी धार असायची की त्या काळचे डाॅन,सत्ताधिश, शासकिय व पोलीस यंत्रणा ही पत्रकारांना वचकूनच असायची. मला आठवते; कित्येक वर्षे ठाणे पोलीस आयुक्तालयातून प्रेस नोट घेऊन पोलीस आमच्या घरापर्यंत यायचा.पत्रकार परिषद म्हणजे पत्रकारांनी उलट सुलट प्रश्नांचा केलेला भडिमार असायचा. आज प्रेस नोट मिळवावी लागते, पत्रकार परिषदेत पत्रकार श्रोत्यांच्या भूमिकेत असतात,जुजबी प्रश्न विचारून आयोजकाला जे सांगायचे ते ऐकून बातमी तयार होते. बातमी लॅपटाॅपवर टाईप करून पाठवली की स्नेह भोजनास सुरूवात होते. कधी कधी काॅकटेल पार्टी व शेवटी पाकिट वाटप !!" मागिल निवडणुकीत मी एका पत्रकार परिषदेस गेलो होतो.पत्रकार परिषद संपली,भोजन झाले तरी पत्रकार रेंगाळत होते. मी एका ओळखीच्या पत्रकाराला विचारले हे का थांबले आहेत  ? तो म्हणाला- साहेबांचा पीए यादी नुसार पाकिट भरत आहे. ते मिळाल्या शिवाय पत्रकार परिषदेची सांगता होणार नाही. मला या प्रकाराचा किळस आला व मी काढता पाय घेतला.नेते  पाकिटातील  रक्कमेवरून पत्रकाराची किंमत व लायकी ठरवतात.

   
हाच प्रकार मोठमोठ्या दैनिकांचे संपादक वेगळ्या पद्धतीने हाताळतात. अमुक अमुक दैनिकात तमुक तमुक नेत्याची मुलाखत !! अशी जाहिरातबाजी करून दैनिकांत मुलाखत दणक्यात प्रसिद्ध केली जाते.ही मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंगच असते. मुलाखतकाराने कोणते प्रश्न विचारायचे,त्याचे काय उत्तर द्यायचे ?  हे सर्व पुर्व नियोजित असते. अर्थात त्याचा मोबदलाही लाखोत मोजावा लागतो. 
दुसरा प्रकार मॅरेथॉन मुलाखतीचा. प्रकार तोच पण मोठ्या आकारात. 3-4 दिवस मुलाखत रंगवली जाते. आजवर ज्यांच्या मॅरेथाॅन मुलाखती प्रसिद्ध झाल्या त्या आठवा. एका तरी सामाजिक कार्यकर्त्यांची,
सेवाभावी व्यक्तीची वा संस्थेची मॅरेथाॅन मुलाखत वाचल्याचे आठवते का ? सर्व मुलाखती अब्जाधिश नेत्यांच्याच आढळतील.कारण उघड आहे. मरेॅथाॅन  मुलाखतीचा आकार ( ? ) ज्यांना झेपतो त्यांनाच हा मान मिळतो. दूरदर्शन वाहिन्यांचे अॅन्कर अल्पावधीत करोडपती व अब्जाधिश का होतात ? याचे उत्तर  देखील मुलाखतीतच सापडेल.

      आरोग्यम धन संपदा, हेल्थ केअरच्या नावाखाली दूरर्शनवरील वाहिन्यांवर स्पेशालिस्ट डाॅक्टरांच्या मुलाखती तर त्या डाॅक्टरांची जाहिरात व पेशंटला आमंत्रण देण्यासाठीच असतात. अर्थात अर्धा-अर्धा तास एकाच डाॅक्टरला आपल्या वाहिनीवर चमकावण्यामागे उदात्त हेतू काय असतो ? हे न कळण्याएवढे प्रेक्षक अडाणी नसतात. मेडिकल काॅन्सिलच्या नियमानुसार डाॅक्टरला आपल्या प्रोफेशनची जाहिरात करता येत नाही,यातून काढलेली ही चोरवाट असते. निवडणूक काळात राजकिय मुलाखतींना उधाण येते.

     स्थानिक पातळीवरील पत्रकार किती खालच्या थराला जातात त्याचा हा किस्सा.  साधारण वर्षभरापुर्वी आम्ही मुंबईला उद्धव ठाकरेंच्या पी.ए.ला.भेटायला चाललो होतो. विषय अर्थात गोल मैदानाच्या मिड टाऊन हाॅलला बाळासाहेबांचे नांव देण्याचा.त्यावेळी एका सहप्रवाशी पत्रकाराने सांगितलेला हा किस्सा. दोन पत्रकार एका बांधकाम सुरू असलेल्या साईटवर गेले व पैश्यांची मागणी करू लागले. संबंधित व्यक्तीने पैसे देण्यास नकार देताच या कथित पत्रकारांनी तेथील घमेले-फावडे उचलून आणले ! आत्ता बोला !! कित्येक झोळीछाप पत्रकार एखाद्या बीट मुकादमा प्रमाणे शहरात फिरून 200 ते 500 रूपये गोळा करतात. महापालिकेचे कर्मचारी एकवेळ उशीरा पोहचतात पण काही पत्रकार मात्र आपली वेळ अचुक पाळतात.

       एखाद्यावर गुन्हा दाखल झाला तर बातमी न देण्यासाठी ही पैसे उकळणारे दलाल पत्रकार आहेत. सध्या माझे जे आंदोलन सुरू आहे त्या विरूद्ध आयुक्तांकडे गेलेल्या दोन पत्रकारांनी मालवणकर वर गुन्हा दाखल आहे ! अशी आयुक्तांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक मीच दोन वर्षापुर्वी चार खंडणीखोरां विरोधात गुन्हा दाखल केला होता.चार खंडणीखोरांना अटक करायला भाग पाडले होते.तसेच सदर खंडणीबाजांच्या वकिलासही अटक करायला लावुन पोलीस कस्टडीची हवा दाखवली होती व त्याची कारही जप्त करायला भाग पाडले होते. ही बातमी दडपणारेच आयुक्तांना मालवणकरवर खंडणीचा गुन्हा दाखल असल्याचे सांगत होते.इतकी भाटगिरी  काही पत्रकारांत भिनली आहे.

     जनतेच्या कष्टाचे, कररूपाने भरलेले 6 कोटी  रूपये डस्टबीन सारख्या तकलादू वस्तूवर  उधळू नयेत व तेही 2.5 पट जादा दराने घेऊ नयेत !! यासाठी मी आंदोलन केले. स्मशानात झालेले हे पहिलेच उपोषण असताना या आंदोलनास प्रसिद्धी न
 देण्याचा विडा उचललेले पत्रकार  ठेकेदाराची दलाली करीत होते. याबाबत मी मुंबईच्या एका मोठ्या दैनिकाच्या संपादकासही जाब विचारला व खडसावले. "अशा  जन आंदोलनात तुम्हाला न्यूज व्याल्यू दिसत नाही, तुम्ही कसले पत्रकार ? लोकांना उपदेशाचे डोस पाजण्याचे ढोंग बंद करा!" असे सुनावले, तर त्या इतक्या मोठ्या दैनिकाच्या संपादक महाशयाची बोलती बंद झाली.कारण याच दैनिकाने पूर्ण पान रंगीत जाहिरातीची विष्ठा काही दिवसापुर्वीच चघळली  होती. असे हे विकाऊ पत्रकार लोकशाहीचे काय रक्षण करणार ?? आणि काय पत्रकारीता धर्म पाळणार ? पैसे कमवायचे तर बरीच क्षेत्रं आहेत. नितीमत्ता व स्वाभिमान गहाण टाकून लोकांना संपादकीयातून बोधामृत पाजण्याचा यांना तिळमात्र अधिकार नाही !!

     अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मानवतावाद, अन्याया विरूद्ध बुलंद आवाज अशा पोकळ वल्गना करणारे वृत्तपत्राचे मालक व संपादक बातमीदारांना एखाद्या वेठबिगारासारखी वागणुक देतात. अत्यल्प मानधनावर त्यांची बोळवण करून वृत्तपत्र स्वातंत्र्य, पत्रकारांचे हक्क यावर लेखणी झिजवतात.पण ख-या अर्थाने जर पत्रकारांचे शोषण कोण करीत असेल तर ते वृत्तपत्राचे मालक व चालकच. आपले ग्लॅमर टिकविण्यासाठी व हितसंबंध टिकविण्यासाठी पत्रकार नाईलाजाने ही गुलामी स्विकारतात. एकदा सर्व दैनिकांनी ते आपापल्या बातमीदारास देत असलेले मानधन जाहिर करावे,म्हणजे दुध का दुध  व पानी का पानी उघड होईल. बातमीदार व प्रतिनिधींना गैरव्यवहार करायला भाग पाडणारे दुसरे तिसरे कोणी नसून वृत्तपत्र व्यवसायच जबाबदार आहे,या बद्दल कोणाचेही दुमत नसावे.

   मुंबईच्या अत्यंत जुन्या व नांवलौकिक असलेल्या दैनिकाच्या संपादका बद्दल सोशल मिडियावर जे जाहिर वक्तव्य वायरल झाले ते तर लज्जास्पद व शरमेने मान खाली घालावे लागेल असे आहे. त्यात बराच तथ्यांश आहे. पत्रकाराने आपल्या नांव लौकिकास काळीमा फासणारी व दलाल स्वरूपाची वेठबिगारी का करावी ?? संपादकही पैश्यासाठी किती हिन पातळी गाठतात ? याचे हे जळजळीत उदाहरण आहे. दिर्घ काळाची परंपरा व लौकिक असलेल्या दैनिकाची ही दुरावस्था पाहिल्यावर  रेड लाईट एरीया तरी बरा ! असे वाटू लागते.तेथे तर सरळ सरळ सौदा होतो. प्रतिष्ठेचा,नितिमत्तेचा व बुद्धीमत्तेचा बुरखा पांघरून सौदेबाजी करणा-यांपेक्षा  सरळ सरळ आपले दाम वसुल करणा-या परवडल्या. !! ही पत्रकारीतेची शोकांतिका आहे. 

    पुर्वी एखादे दैनिक त्यांच्या संपादकाच्या नावाने ओळखले जाई. पु.रा.बेहेरे म्हणजे नवशक्ती, गोविंदराव तळवळकर म्हणजे म.टा., विद्याधर गोखले म्हणजे लोकसत्ता, केसरी म्हणजे लोकमान्य टिळक ,मराठा म्हणजे आचार्य अत्रे असे समिकरण होते.आज स्वतःला बुद्धीजीवी म्हणवणारे शेटजींचे वेठबिगार बनले आहेत. शेटजीच्या इशा-यावर व धोरणरूपी घाण्या भोवती फिरणारे बैलच. स्वतःची बुद्धी गहाण ठेऊन शेटजी ठरवेल ते धोरण.त्यावर हे आपली बुद्धी पाजळणार. काही संपादक शेटजीची विशेष मर्जी संपादन करू शकले तर त्यांची वर्णी राज्यसभेवर. मग कालचा नोकरच नेता होतो,प्रवक्ता होतो. ज्यांना लोकाश्रय नाही,नेतृत्व गुण नाहीत, फक्त शेटजीची रि ओढू शकतात;  ते खासदार होतात ? मग अनायसे संपादक कमी आणि राजकारणी अधिक अशी स्थिती निर्माण होते. त्यातूनच मग संजय निरूपम तयार होतो व कालच्या मालकाला आव्हान देत सुटतो.

    पत्रकारीता हा धर्म राहिला नाही, हे क्षणभर मान्य केले, तरी तो धंदा होऊ नये; व्यवसाय झाला तरी समजू शकते. व्यवसायाचीही एक नितीमत्ता असते. एक गुडवील असते.ध्येय धोरण असते. त्यांचाही लवलेश ज्या पत्रकारात नसेल तर तो धंदेवाईकच समजला जावा.पत्रकारीतेस ज्या धंदेवाईक प्रवृतीने घेरले आहे, पेड न्यूज, पाकिट पत्रकारीता व  व्यभिचारी भ्रष्टाचाराची किड लागली आहे, त्यामुळे  लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आहे कि चोथा झालेला स्तंभ आहे ? असा प्रश्न  उपस्थित होतो. आज पत्रकारीतेची प्रतिष्ठा लयाला गेली आहे.पत्रकारीतेस पुर्वीची प्रतिष्ठा मिळवुन देणे हे प्रत्येक प्रामाणिक पत्रकाराचे कर्तव्य आहे. जशी गंगा नदी शुद्धीकरणाची मोहिम हाती घेतली आहे, तशीच पत्रकारीतेची मैली झालेली व प्रदुषित झालेली गंगा शुद्धीकरणाची मोहिम निष्ठावंत व प्रामाणिक पत्रकारांनी हाती घेतली पाहिजे. पत्रकारीतेस  प्रतिष्ठा व गतवैभव प्राप्त करून दिले पाहिजे. आजही 10 टक्के पत्रकार वरील अपप्रवृत्तींना अपवाद आहेत. त्या 10 टक्के पत्रकारांनी पत्रकारीता हे एक मिशनआहे, हे बिंबवण्याचा व प्रतिष्ठा टिकविण्याचा प्रयत्न केला तरी माझ्या या लेखनाचे सार्थक होईल.

दिलीप मालवणकर 
उल्हासनगर 
9822902470

सोमवार, २३ ऑक्टोबर, २०१७

सरकारवर माध्यमांचा अंकूश महत्वाचा - मुख्यमंत्री

अमरावती - लोकशाहीतील सरकार निरंकुश असणे योग्य ठरत नाही, म्हणूनच माध्यमांच्या अंकुशाचे महत्त्व मोठे आहे. सरकार माध्यमांना सर्वोतोपरी सहकार्य करत असले तरी त्यामागे निरपेक्ष कर्तव्याची भावना आहे. सरकार सरकारचे कर्तव्य करीत आहे. माध्यमांनी माध्यमांचे कर्तव्य बजावत राहावे. प्रत्येक कर्तव्यामागे स्वहिताची नव्हे तर समाजहिताची आणि देशहिताची भावना असली पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अमरावती येथे उभारण्यात आलेल्या पत्रकार भवनाचे उदघाटन आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित पत्रकार भवन लोकार्पण सोहळयाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार आनंदराव अडसुळ, आमदार सर्वश्री डॉ. सुनिल देशमुख, डॉ. अनिल बोंडे, यशोमती ठाकूर यांची उपस्थिती होती. महानगर पालिकेचे आयुक्त हेमंत पवार, मुंबई सकाळचे कार्यकारी संपादक राहुल गडपाले, उद्योजक नरेंद्र भाराणी, अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल आदी यावेळी व्यासपीठावर होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, पत्रकारितेत अनेक बदल झाले असून या बदलांच्या आव्हानांचा सामना करीत माध्यमे समाजहिताचे कार्य करीत आहेत. त्यांचे हे कार्य अविरतपणे सुरु राहण्यासाठी माध्यमांच्या स्वातंत्र्याला शासनाची नेहमीच पाठिंब्याची भूमिका राहिली आहे. शासनाचे विविध लोकोपयोगी निर्णय जनतेपर्यंत पोहचवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

अमरावती जिल्ह्याच्या पत्रकारितेच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख करुन मुख्यमंत्री म्हणाले की, या जिल्ह्याने राज्याला व देशाला अनेक चांगले पत्रकार दिले आहेत. स्वातंत्र्य चळवळीत येथील पत्रकारांचा वाटा मोठा आहे. एका अर्थाने अमरावती हे पत्रकारितेचे माहेरघरच म्हणावे लागेल. पत्रकार भवनाच्या नूतन वास्तूबद्दल बोलतांना ते म्हणाले की, या भवनात अद्यावत ग्रंथालय सुरु करावे, त्यासाठी निश्चितपणे सहकार्य केले जाईल.

पत्रकारांसाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत राज्यातील विविध 500 रुग्णालयांतून त्यांना आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. पत्रकारांच्या पेन्शन योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे.

शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल बोलताना ते म्हणाले की, अत्यंत जलदगतीने तथा पारदर्शकपणे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रीया पूर्ण केली जाईल. कापसाची खरेदी ही आधार कार्ड नोंदणी करुनच केली जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांना हमी भाव मिळेल, असेही त्यांनी सांगितले. अमरावती येथील पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. विविध सरकारी योजना राबवतांना माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे शक्य होत आहे. त्याचा उपयोग जनतेला होत आहे. माध्यमांनी याची नोंद घेतली आहे आणि अजूनही अशी नोंद घेतली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटीaल म्हणाले की, पत्रकारिता हा देशाचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. नवीन पत्रकार भवनाचा पत्रकारांना निश्चितपणे लाभ मिळेल व त्यांच्या कार्याला चालना मिळेल. शासनाचे निर्णय पत्रकारांनी जनतेपर्यंत पोहोचवावेत.

पत्रकारीता क्षेत्रात 40 वर्षांपासून अविरत सेवा देणारे जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार प्रदीप देशपांडे आणि दिलीप एडतकर यांना मुख्यमंत्री यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी दैनिक हिंदुस्थानचे प्रबंध संपादक विलास मराठे, मनपा आयुक्त हेमंत पवार, माहिती व जनसंपर्क, नागपूर विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, मुंबई सकाळचे कार्यकारी संपादक राहुल गडपाले, उद्योजक नरेंद्र भाराणी यांचाही सत्कार मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.

तत्पुर्वी मुख्यमंत्री यांनी शहरातील वालकट कंम्पाउंड येथे उभारण्यात आलेल्या पत्रकार भवनाचे फित कापून उदघाटन केले. यावेळी त्यांनी भवनाची पाहणी करुन पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

नाशिक पुढारीत गळती सुरूच ...

नाशिक - दैनिक पुढारीचे वितरण विभाग प्रमुख दिलीप पाटील यांनी नुकताच राजीनामा दिलाय. आता युनिट हेड प्रल्हाद इंदूलीकर रडारवर आहेत. यापूर्वी सह संपादक किरण लोखंडे यांनी राजीनामा देऊन पुण्यनगरीत एंट्री केली आहे. निवासी संपादकांच्या 'काव -काव ' ला कंटाळून अनेकजण बाहेर पडत आहेत. नाशिकमध्ये पुढारीची अवस्था अत्यंत दयनीय आहे. एक तर माणसे मिळत नाहीत आणि मिळाली तर टिकत नाहीत. त्यात निवासी संपादकांचा 'काव -काव' पणा वाढला आहे. पुढारीला नाशकात डॅशिंग इमेज तयार करून देणारे  सह संपादक किरण लोखंडे पुण्यनगरीत गेल्यानंतर दिलीप पाटील यांचा बळी गेला. आता युनिट हेड प्रल्हाद इंदूलीकर रडारवर आहेत. निवासी संपादकांना पुढारी वाढवायचा आहे की  संपवायचा आहे. याचे  कोडे पुढारीच्या कर्मचाऱ्यांना पडले आहे.

शनिवार, २१ ऑक्टोबर, २०१७

निखिल वागळेंचा राजीनामा आणि सुकून !

ऋतुरंगच्या दिवाळी अंकात "आमचं सहजीवन" या सदरात निखिल वागळेंचा सुकून हा लेख आहे.
अक्षरच्या दिवाळी अंकात त्यांनी "माझ्या खिशातला राजीनामा" हा लेख लिहिलेला आहे.
आय.बी.एन.लोकमत ही वाहीनी सुरू करण्यापासून ती नावारूपाला आणण्यात वागळेंचा मोठा वाटा. नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेवर आले आणि पाच दिवसात या वाहिनीची मालकी असलेला माध्यमसमुह मुकेश अंबानींनी विकत घेतला. त्यानंतर राजदीप सरदेसाई आणि निखिल वागळेंना आपली पदे सोडावी लागली. त्याबाबत पडद्यावर झळकणार्‍या या माणसांच्या बाबतीत पडद्यामागे नेमके काय घडले याचे वागळेव्हर्जन या लेखात वाचायला मिळते.
इलेक्ट्रॉनिक वाहीन्यांचं हे कॉर्पोरेट जग नेमकं कसं चालतं? तिथल्या पत्रकारांना खरंच काही स्वातंत्र्य असतं का? पैशांच्या जोरावर मालकलोक्स टेबलावरून नी टेबलाखालून कायकाय व्यवहार करतात? तिथल्या संपादकांना कोणत्या तडजोडी कराव्या लागतात? असे आणि इतर अनेक प्रश्न आपल्या मनात कायम असतात. त्यातल्या काहींची उत्तरं या लेखात मिळतील.
वागळे हे माध्यमांमधले अमिताभसारखे अ‍ॅंग्रीयंगमन. तशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांना मानणारा आणि त्यांचा तिरस्कार करणारा असा दोन्ही बाजूंना मोठाच जनसमुदाय आहे. पत्रकारांमध्ये त्यांना रोलमॉडेल मानणारे अनेक तरूण आहेत. ते यशस्वी व्यवस्थापक आहेत. मराठीतले नामवंत वक्ते आहेत. वागळेंकडे जबरदस्त जिगर आहे. कल्पकता नी प्रतिभा आहे. त्यांच्याकडे अशा जमेच्या बाजू खुपच आहेत. त्या अर्थानं वागळे दणकट पत्रकार आहेत.
बघा फक्त आयबीएन लोकमत ही त्यांची घोषणा, ही टॅगलाईन भारी वाटत असली तरी इतरांकडेही काही चांगलं असू शकतं हेच ते विसरून गेले होते काय? एका मोठ्या पत्रकाराचं सामर्थ्य हीच त्याची मर्यादा बनली होती काय?
वागळेंना आपण तिरसट असल्याचा अभिमान आहे असं ते या लेखात सुचित करतात.
वागळे अ‍ॅन्कर म्हणून आधी भारी होते, पण नंतर ते न्यायधिश बनू लागले. अनेकांशी ते खुनशीपणानं वागू लागले.
वागळेंना मी किमान 40 वर्षे जवळून ओळखतो. ते दिनांक साप्ताहिकात काम करीत होते तेव्हापासूनचा हा परिचय आहे. त्यांचा महानगरचा सुवर्णकाळ आणि कर्जबाजारी होण्याचा काळ असे दोन्ही मी पाहिलेत. आय.बी.एन. लोकमत वाहिनी सुरू झाल्यावर पहिल्याच आठवड्यात पुण्याच्या महात्मा फुले वाड्यातून मी त्यांच्यासोबत लाईव्ह कार्यक्रम केला होता. त्यानंतर शेकडो वेळा त्यांच्यासोबत चर्चेत मी सहभागी झालोय. आमचे मित्र असणारे वागळे आणि वाहिनीचे संपादक असलेले वागळे या दोन संपुर्ण वेगळ्या व्यक्ती असत. नंतरनंतर आजचा सवालमध्ये सतत प्रचंड आरडाओरडा करणे, प्रसंगी दादागिरी करणे, संतापल्याचा उत्तम अभिनय करणे, समोरच्याला अनेकदा बोलूच न देणे असले पत्रकारीतेत न बसणारे हातखंडे ते वापरू लागले. स्वत:ची एक दहशत निर्माण करण्यावर त्यांचा भर राहिला. टी.आर.पी.साठी आपण काहीही तडजोडी केल्या नाहीत, मालकांचे दबाव कायम झुगारले असं वागळे लेखात सांगत असले नी त्यांच्यावरचे सारे आरोप ते नाकारीत असले तरी अनेकदा ते श्रेष्ठ तडजोडी करीत असत हे गुपित जवळच्यांना माहित आहे. शिवसेना, ठाकरे, राणे, भु्जबळ ह्यांचे आणि वागळेंचे अतिव "सलोख्याचे" संबंध राहिलेत हे सारा महाराष्ट्र जाणतो. महाराष्ट्र स्वच्छ करण्याचं पेटंट एकहाती घेतलेल्या सनातनी छावणीतल्या एका बाईंना वागळे इतकं फुटेज देत की वागळे आता जरा दमानी घ्या असं म्हणायची पाळी आली होती.
इतरांना कायम झोडपणारे, कस्पटासमान तुच्छ मानणारे वागळे सत्ताधारी जात संघटनांशी मात्र कसं नमून वागायचे, त्यांच्याशी जुळवून घ्यायचे त्याचे पुरावे देता येतील.
वागळे धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांना सामाजिक दृष्टी आहे. ते टीमकडून अनेक चांगले उपक्रम नी प्रसंगी उद्योगही यशस्वीपणे करून घ्यायचे. त्यांचा सवाल आणि ग्रेट भेट हे कार्यक्रम जबरदस्त लोकप्रिय होते. सामाजिक चळवळीतील लोकांना वागळेंचा आधार वाटतो.
पण या वागळ्यांच्या आवडी-नावडी कमालीच्या टोकदार प्रसंगी अतिरेकी असतात.
आयबीएनचे बस्तान उत्तम बसल्यानंतर वागळेंची देहबोली कमालीची बदलली. उग्र झाली. भाषा भडक नी अरेरावीची झाली. त्यांच्या वागण्यात बेदरकारपणा येत गेला. हे यश डोक्यात जाणे नव्हते काय? वागळेंना न आवडणारी दुसरी बाजू म्हणून काही असू शकते हेच ते नाकारू लागले होते. आपली खुर्ची त्यांना चढली, आपण म्हणजेच मिडीया, आपण म्हणजेच देश या अर्णवी वळणाकडे ते झुकू लागले. वागळ्यांच्या डोक्यात हवा गेली होती काय?
अण्णा हजारे आणि वागळे ही उत्तुंग माणसं आहेत. पण त्यांना दोघांना ते एकटे सोडून बाकी सारे जग भ्रष्टच आहे याची खात्रीच वाटत असते.
वागळेंचे सल्लागार आणि प्रतिभावंत नाटककार विजय तेंडूलकर यांनी डॉ. य.दि.फडके, अरूण साधू व मी वसईला भाऊ पाध्ये यांना आम्ही भेटायला गेलेलो असताना वागळेंच्या स्वभावाचे नेमके आकलन मांडले होते. आज तेंडूलकर, फडके आणि साधू तिघेही आपल्यात नाहीत. अशावेळी ते त्यांचे खाजगीतले बोलणे इथे लिहिणे उचित होणार नाही.वागळेंच्या सवाल कार्यक्रमात प्रेक्षकांच्या एसेमेसची टक्केवारी सांगितली जात असे. टक्केवारीचा हा प्रकार म्हणजे एक निखळ विनोदी कार्यक्रम असे. वागळेंचे मत ज्या बाजूचे असेल त्याच मतांचे एसेमेस जास्त येत असत हा केवळ योगायोग असणार. नेमके किती एसेमेस आले ते मात्र कधीही सांगितले जात नसे. टक्केवारी फसवी असू शकते. अगम्य असू शकते. हेही प्रकरण ही बुवाबाजी होती की वस्तुस्थिती हे केवळ वागळेच जाणोत.
वागळ्यांच्या महानगर आणि आयबीएन लोकमतवर अनेक हिंसक हल्ले झाले, त्याचे पुढे काय झाले? त्याचा निकाल लागेपर्यंत वागळेंनी त्याचा पाठपुरावा केला काय? या हल्ल्यांचा खप वाढवण्यासाठी, टी.आर.पी.साठी, आपण किती लढाऊ पत्रकार आहोत ह्याची आक्रमकपणे जाहीरात करण्यासाठी उपयोग करून घेण्यात आला काय?
प्रश्न अनेक आहेत.
वागळेंचे हे दोन्ही लेख वाचनीय आहेत. विशेषत: त्यांच्या पत्नीवरचा मीना कर्णिक यांच्यावरचा सुकून हा लेख जास्त महत्वाचा आहे. काही प्रमाणात आत्मपरीक्षण करणाराही आहे. सर्वांनी हे दोन्ही लेख अवश्य वाचावेत.

-प्रा. हरी नरके

पाकिस्तानी महिला पत्रकाराची दोन वर्षांनी सुटका

लाहोर : डेली नयी खबर आणि मेट्रो न्यूज टीव्ही चॅनलसाठी काम करणाऱ्या पाकिस्तानी पत्रकार झीनत शहजादी (वय २६ ) हिची  पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमेवरुन गुरुवारी रात्री तिची सुटका करण्यात आली. ठावठिकाणा लागत नसलेल्या भारतीय इंजिनिअरच्या केसवर काम करताना झीनत शहजादी बेपत्ता झाली होती.

गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तानातील झीनत शहजादी ही महिला पत्रकार बेपत्ता होती. तिला पाकिस्तानात परत आणले गेल्याची माहिती समोर आली आहे. ती पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर दिसली. त्यानंतर झीनतला पाकिस्तानात आणले गेले. १९ ऑगस्ट २०१५ रोजी झीनतचे कथित अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती असे न्यायमूर्ती जावेद इकबाल यांनी ‘बीबीसी उर्दू’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. झीनत नेमकी कुठे होती ते अद्याप समजू शकलेले नाही. इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भातले वृत्त दिले आहे.हमीद अन्सारी हा भारतीय इंजिनिअर नोव्हेंबर 2012 मध्ये बेपत्ता झाला होता. त्याच्या केसवर झीनत काम करत होती. याच कारणामुळे तिचं अपहरण झाल्याचा संशय होता.
पाकिस्तानात निहाल हमीद अन्सारी हा भारतीय अभियंता काम करत होता. त्याच्याबाबत झीनत माहिती मिळवत होती. तसेच त्याच्या कुटुंबाला मदत करत होती. २०१५ मध्ये पाकिस्तानी सैन्याने निहालला रॉ या भारतीय गुप्तहेर संघटनेचा एजंट ठरवत तीन वर्षांची शिक्षा सुनावली. त्याच वर्षात ऑगस्ट महिन्यात झीनत गायब झाली जी थेट आत्ता सापडली आहे. झीनतने हमीद अन्सारीची आई फौजिया अन्सारीची भेट घेतली होती आणि त्यांच्यातर्फे हमीदच्या शिक्षेविरोधात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
नेमक्या याच घटनेनंतर झीनत अचानक गायब झाली होती. तिच्या बेपत्ता होण्याने तिचे कुटुंबही चिंतेत होते. झीनतच्या भावाने माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याकडेही झीनतला शोधण्यासाठी मदत  करण्याची विनंती केली होती. भारतीय अभियंत्याच्या कुटुंबाची मदत करणे माझ्या बहिणीला महागात पडले अशी प्रतिक्रिया झीनतचा भाऊ सलमान लतीफने दिली.माझी बहिण झीनत ही फक्त निहालची मदत करू इच्छित होती. तिने कोणताही अपराध किंवा गुन्हा केलेला नाही, असेही सलमान लतीफने म्हटले आहे.
झीनत गायब होणे किंवा कथित रूपाने तिचे अपहरण होणे लज्जास्पद आहे अशी प्रतिक्रिया मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या हिना जिलानी यांनी दिली आहे. २४ वर्षांची महिला बेपत्ता कशी काय होऊ शकते? महिलांना गायब करण्याचा ही कोणती पद्धत आहे ? तिला का गायब करण्यात आले याची माहिती समोर आलीच पाहिजे अशीही मागणी हिना यांनी केली. हमीदला हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. तर झीनत शहजादीचा १७ वर्षांचा भाऊ सद्दाम याने २०१६ मध्ये आत्महत्या केली होती. २०१५ मध्ये जेव्हा झीनत बेपत्ता झाली तेव्हा पाकिस्तानात या प्रकरणाची चर्चा खूपच रंगली होती.

मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०१७

IBN लोकमतच्या नामांतराचा मुहूर्त अखेर ठरला !

मुंबई - IBN लोकमतच्या नामांतराचा  मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या ६ नोव्हेंबर रोजी IBN लोकमतचे नामांतर न्यूज 18 लोकमत होईल. 18  हा शब्द मराठीत न वापरता इंग्रजीमध्ये ( Eighteen) वापरला जाईल. नामांतरानंतर मात्र  न्यूज अँकरची मोठी गोची  होणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून पाहात राहा - IBN लोकमत म्हणण्याची सवय लागलेल्या  न्यूज अँकरला - न्यूज 18 लोकमत म्हणताना काही दिवस जड जाणार आहे. चॅनलचे नाव बदल्यानंतर टीआरपी आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

न्यूज १८ नेटवर्कची मालकी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे गेल्यानंतर IBN 7 या हिंदी चॅनलचे नाव बदलण्यात आले, मात्र मराठीतील IBN लोकमतचे नाव बदलण्यास वेळ लागला. निखिल वागळे सोडून गेल्यामुळे नामांतराचा पाळणा लांबणीवर पडला होता. त्यानंतर  मंदार फणसे गेल्यानंतर पुन्हा घोडे अडले होते. मात्र प्रसाद काथे येताच चॅनल व्यवस्थापनाने नामांतराचा निर्णय पक्का केला. येत्या ६ नोव्हेंबर रोजी IBN लोकमतचे नामांतर न्यूज 18 लोकमत होईल.
चॅनेलचे नामांतर झाल्यानंतर टीआरपी घसरू नये म्हणून एबीपी माझाच्या मिलिंद भागवत आणि विलास बडे या दोन शिलेदारांना घेण्यात आले. हे  दोघेही ऑन स्क्रिन चॅनेलचे  नामांतर झाल्यावरच दिसणार आहेत. सध्या ते ऑफ स्क्रीन स्टोरीला व्हाईस ओव्हर देण्याचे काम करीत आहेत. 
जाता जाता
बेरक्याचे भाकीत पुन्हा एकदा खरे ठरले आहे. प्रसन्न जोशी यांनी बीबीसी मराठीचा राजीनामा देवून एबीपी माझा पुन्हा जॉईन केले आहे.


सोमवार, १६ ऑक्टोबर, २०१७

फास्टर फेणे कधी देता कर्मचाऱ्यांचे देणे?

औरंगाबाद - एकमतमधील सर्व कर्मचारी प्रचंड मेटाकुटीला आले आहेत. अनेकांची घरभाडे थकलेली आहेत, प्रत्येकाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वृत्तपत्र संस्था म्हणजे काही आडत्याचे दुकान किंवा ऊसतोड कामगारांमागचा मुकादम असे काम नसते हे एकमतचे संचालक मंडळ विसरत आहे. कारण ऐन दिवाळीच्या तोंडावर संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांचा फुटबॉल केला आहे. अखेर सर्व कर्मचाऱ्यांनी आ. अमित देशमुख यांना विनंतीपत्र पाठवले आहे. आता ते तरी काहीतरी माणुसकी दाखवून कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांचा पगार देतील अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे.

सुशील कुलकर्णी आणि आर.  टी.  कुलकर्णी यांनी एकमत सोडल्यानंतर सर्व सूत्रे  'मंगेशा'चे मावस भाऊ 'गुरु'नाळकरकडे देण्यात आली आहेत .मंगेशा'च्या डावानुसार औरंगाबादचे कर्मचारी वैतागून एक एक कमी होतील, मग हळूच सामान जुन्या एकमत कार्यालयात शिफ्ट करणे. काहींना कामावरून कमी करणे आणि त्याच्या नात्यातील 'चहाटळकर, विषपुते व भोंदू वैद्य' ह्या 'एक फुल दोन हाफ' त्रिकुटाकडे सोपवून आपले उखळ पांढरे करून घेणे असा असल्याची चर्चा आहे.

इंडो इंटरप्राईजचे संचालक मंडळ ज्यात मालक आमदार आहेत, तर दुसरे संचालक प्रख्यात चित्रपट अभिनेते रितेश देशमुख आहेत . रितेश सध्या 'फास्टर फेणे' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्यांनी त्यांच्या कामातून वेळ काढून सर्व कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून थकलेले पगार द्यावेत अशी आशा लावून सर्व कर्मचारी म्हणत आहेत 'फास्टर फेणे लवकरात लवकर कर्मचाऱ्यांचे पगार देणे'...

रविवार, १५ ऑक्टोबर, २०१७

सोशल मीडिया सर्वात प्रभावी माध्यम - महेश म्हात्रे

पुणे- लोकसभा,विधानसभा निवडणुकीपासून ग्रामपंचायत निवडणुकीपर्यत सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरत आहे.त्यामुळे सर्व राजकीय पक्ष आणि नेते सोशल मीडियाकडे वळले आहेत.यातून तरूणांना रोजगार आणि उत्पन्नाचे साधन मिळाले आहे,असे मत आयबीएन लोकमतचे व्यवस्थापकीय कार्यकारी संपादक आणि डीजिटल संपादक महेश म्हात्रे यांनी व्यक्त केले.
पुण्यात कॅलिडस मीडिया अ‍ॅन्ड आर्टस् अकॅडमीच्या वतीने  रविवारी डिजिटल मीडियावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन  करण्यात आले होते,यावेळी ते बोलत होते.महाराष्ट्र लाइव्हचे संपादक सुनील ढेेपे,झी 24 तासचे डिजिटल संपादक प्रशांत जाधव,अकॅडमीचे संचालक पंकज इंगोले आदी यावेळी उपस्थित होते.
प्रिंट आणि टीव्ही मीडियापेक्षा सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरत असल्याने सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला होता. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत डॉनल्ड ट्रम्प यांनीही सोशल मीडिया हायजॅक केला होता.त्यामुळेच सोशल मीडियापासून दूर असणारे पक्ष आणि नेते सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह झाले आहेत,असेही म्हात्रे म्हणाले.आजचा तरूण हा आठवड्याची आकडेवारी पाहिली तर दोन तास वृत्रपत्र,चार तास टीव्ही तर 28 तास सोशल मीडियावर घालवत आहे.मात्र या अभासी विश्‍वात किती तास सोशल मीडियावर घालावयाची याचा विचार व्हावा असेही ते म्हणाले.डिजिटल मीडिया व्यवसाय म्हणून करीत असताना आपल्याजवळ बिझनेस मॉडेल तयार पाहिजे,असेही ते म्हणाले.
सकाळच्या सत्रात सकाळ डिजिटलचे संपादक सम्राट फडणीस यांनी,डिजिटल मीडियात कश्याप्रकारे क्रांतीकारक बदल झाले तसेच डायलप इंटरनेट कनेक्शनपासून फोरजी इंटरनेटचा प्रवास तसेच भारतात किती लोक इंटरनेट वापरतात याबाबतची माहिती आकडेवारीसह स्पष्ट केली.त्यानंतर महाराष्ट्र लाइव्हचे संपादक सुुनील ढेपे यांनी बेबसाईट आणि ईपेपर कसा अपलोड करतात,सोशल मीडियाच्या लिंक्स बेबसाईटवर अपलोड कश्या कराव्यात याचे प्रात्यक्षिक दाखवले.त्यानंतर झी 24 तासचे डिजिटल संपादक प्रशांत जाधव यांनी,वेबसाईला जाहिराती मिळण्याचे  स्रोत आणि आर्थिक गणित याचे विवेचन केले.शेवटी मुंबई सकाळच्या रिर्पाटर हर्षदा परब यांंनी फेसबुक  लाइव्हचे  प्रात्यक्षिक दाखवले.शेवटी कार्यशाळेस उपस्थित प्रक्षिणार्थींना महेश म्हात्रे यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
या एकदिवसीय  कार्यशाळेस जवळपास दिडशे जणांनी नोंदणी केली होती मात्र कॅलिडसच्या वातानुकूलित हॉलची क्षमता  कमी असल्याने केवळ 50 जणांना प्रवेश देण्यात आला होता.कार्यशाळेस लाभलेला प्रतिसाद पाहता दिवाळीनंतर याच डिजिटल मीडिया विषयावर पुन्हा एकदा कार्यशाळा आयोजित करण्यात येईल,त्यात काही नव्या पाहुण्यांना निमंत्रित करण्यात येईल,असे कॅलिडस अकॅडमीचे पंकज इंगोले यांनी सांगितलेे.

संबंधित लेख वाचा

पत्रकारांनो, काळाबरोबर चला !

या कार्यशाळेस उपस्थित असलेल्या प्रक्षिणार्थींच्या काही निवडक प्रतिक्रिया फेसबुक लाइव्ह वर देण्यात आल्या होत्या.तो व्हिडीओ नक्की पाहा...

मंगळवार, १० ऑक्टोबर, २०१७

होय ! मी दारू पिऊन ऑफिस मध्ये काम करतो - माणिक मुंडे

परभणी - पत्रकारांनी दारू प्यावी  की  नाही,   मग पिली तर कोणाच्या पैश्याने प्यावी  यावर अनेक वेळा उपदेशाचे डोस पाजविले जातात. यावर एबीपी माझा, साम , IBN  लोकमत करून टीव्ही ९ मध्ये गेलेले माणिक मुंडे यांनी लोकांनी दारू प्यावी, मी सुद्धा दारू पितो, इतकेच काय तर दारू पिऊन मी ऑफिस मध्ये काम करतो, हे आमचे आणि ऑफिसचे कल्चर आहे , अशी मुक्ताफळे उधळली आहेत.

माणिक मुंडे हे परभणी जिल्ह्यातील पिंपळदरी  गावचे रहिवासी आहेत. काही दिवसापूर्वी ते गावाकडे गेले होते. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी बोलताना ही मुक्ताफळे उधळली आहेत. फेसबुकवर
ग्रामपंचायत पिंपळदरी हा आयडी आहे. त्या ऍडमिनने ५  ऑक्टॉबर रोजी एक हा व्हिडीओ पोस्ट केला आहे आहे, विशेष म्हणजे हा व्हिडीओ  माणिक मुंडे यांनी शेयर केला आहे.
माणिक मुंडे यांचे हे विचार ऐकून टीव्ही ९ चे कर्मचारी चाट पडले आहेत. इतकेच काय तर महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांच्या सुद्धा भुवया  उंचवल्या आहेत.

पाहा हा व्हिडीओ मिलिंद भागवत, विलास बडे IBN लोकमत मध्ये जॉईन

मुंबई - एबीपी माझातून  राजीनामा देवून बाहेर पडलेले स्टार अँकर मिलिंद भागवत आणि विलास बडे यांनी  अखेर IBN  लोकमत जॉईन केले आहे. बेरक्याने यापूर्वीच या संदर्भात वृत्त दिले होते.


मिलिंद भागवत, विलास बडे या दोघांनीही आज फेसबुकवर पोस्ट लिहून  IBN लोकमत जॉईन करीत असल्याबद्दल कळवले आहे. IBN लोकमत चे नामकरण न्यूज 18 लोकमत असे होत आहे. त्याचा प्रोमो लवकरच सुरु होईल. नव्या नामकरणाबरोबर हे नवे चेहरे समोर येतील.


एकीकडे मिलिंद भागवत आणि विलास बडे एबीपी माझातून बाहेर पडले असले तरी प्रसन्न जोशी हे घर वापसी करीत आहेत. जोशी १६ ला एबीपी माझा जॉईन करीत असल्याची माहिती आहे.

५१ लाख व्हिजिटरचा टप्पा पूर्ण

मराठी मीडियाची बित्तंबातमी देणाऱ्या बेरक्या ब्लॉगने ५१ लाख व्हिजिटरचा टप्पा पूर्ण केला आहे. हे केवळ आणि केवळ बेरक्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य वाचकांमुळे शक्य झाले आहे.  याबद्दल आम्ही आपले शतशः ऋणी आहोत.
२१ मार्च २०११ रोजी आम्ही बेरक्या ब्लॉग सुरु केला.त्यानंतर हा ब्लॉग गेल्या साडेसहा वर्षांपासून अखंडित सुरु आहे. सुरुवातीला विश्वास निर्माण करण्यास वेळ गेला, पण जेव्हा विश्वास निर्माण केला तेव्हा बेरक्यावरील बातमी म्हणजे १०१ टक्के खरी असते, हे सिद्ध  केले आहे. ५१ लाख व्हिजिटरची आकडेवारी ही  काही बोगस नाही.गुगल ब्लॉगरच्या Configure Stats Widget ने काढलेली आकडेवारी आहे..

बेरक्या ब्लॉग सर्व वृत्तपत्रातील कर्मचारी, चॅनलचे कर्मचारी, त्यांचे मालक, संपादक, पत्रकारितेतील विद्यार्थी, शासकीय अधिकारी आणि  कर्मचारी, पोलीस, आमदार, मंत्री वाचतात, हे एका सर्व्हेवरून सिद्ध झाले आहे.

मराठी मीडियातील प्रत्येक अपडेट देण्याबरोबर चांगल्या पत्रकाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे काम बेरक्याने केले आहे.त्याचबरोबर अनेक गरीब पत्रकारांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे कामही बेरक्याने केले आहे. मराठी मीडियातील घडामोडी, पडद्यामागच्या हालचाली, माहितीपूर्ण लेख देणायचे काम बेरक्याने प्रामाणिकपणे केले आहे.

जे चुकले त्यांच्या विरुद्ध बातमी देताना बेरक्याने कोणाचाही मुलाहिजा ठेवला नाही. नेहमीच निर्भीड आणि सडेतोड बातम्या दिल्या. बेरक्याचा कोणीही शत्रू नाही. जे चुकले  त्यांना त्यांची चुक दाखवण्याचा प्रयत्न केला. यातून अनेकांनी बोध घेतला.

बेरक्याविरुद्ध  अनेक वेळा पोलिसामध्ये खोट्या तक्रारी  करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र बेरक्या त्यांना पुरून उरला. खरी बातमी देणे हा काही गुन्हा नाही.आम्ही गुन्हेगार नाही , त्यामुळे  कोणाला घाबरत नाही. आम्ही कितीही अडचणीत आलो तरी  सोर्सचे नाव कधीही जाहीर करीत नाही. त्त्यामुळेच बेरक्या  आणखी नवे इतिहास घडवेल, असा आम्हाला विश्वास आहे.

बेरक्याला चार डोळे किंवा चार हात नाहीत. तोही तुमच्यासारखा सामान्य पत्रकार आहे. आमचा व्याप सांभाळत केवळ पत्रकाराच्या हितासाठी हे व्रत अंगिकारले आहे. यात आमचा कसलाही स्वार्थ नाही. तरीही आमच्याकडून काही चुकले असेल तर क्षमस्व ! कोणाचे मन दुखावले असेल तर दिलगीर आहोत. !

पुनश्च आभार !

बेरक्या उर्फ नारद

वाचत राहा
http://www.berkya.com

रविवार, ८ ऑक्टोबर, २०१७

प्रसन्न जोशी एबीपी माझाच्या वाटेवर ...

मुंबई - एबीपी माझा व्हाया जय महाराष्ट्र करून बीबीसी मराठीमध्ये गेलेले स्टार अँकर प्रसन्न जोशी पुन्हा एबीपी माझा च्या वाटेवर आहेत. जोशी एबीपी माझामध्ये आल्यास नम्रता वागळे आणि अभिजित करंडे यांची मोठी अडचण होणार आहे.
प्रसन्न जोशी सात ते आठ वर्ष एबीपी माझामध्ये होते.रात्री  नऊ वाजता होणाऱ्या माझा विशेष या डिबेट शोचे ते अँकरींग करीत होते.शांत आणि संयमी असलेले प्रसन्न जोशी समोरच्याला प्रश्नाला उपप्रश्न विचारून निरुत्तर करीत होते. त्यांचे अँकरिंग अनेकांना भावले होते. त्यांच्या डिबेट शोचा टीआरपीही  चांगला होता. पण दीड  वर्षांपूर्वी ते अचानक एबीपी माझा सोडून जय महाराष्ट्र मध्ये गेले होते. एक वर्ष काम केल्यानंतर जय महाराष्ट्र चॅनलला जय महाराष्ट्र करून चार महिन्यापूर्वी बीबीसी मराठी या  डिजिटल मीडियासाठी दिल्ली मध्ये गेले होते.
बीबीसी मराठी दसऱ्या दिवशीच सुरु झाले  होते, पण जोशी दिल्लीमध्ये फार काळ रमले नाहीत . मुळात डिजिटल मीडियात जाणे हा त्यांचा निर्णय अनेकांना चुकीचा वाटत होता. अखेर प्रसन्न जोशी एबीपी माझाच्या वाटेवर असल्याची बातमी थडकली आहे. ते लवकरच एबीपी माझा जॉईन करतील अशी शक्यता आहे.
जोशी  एबीपी माझा सोडून गेल्यानंतर माझा विशेषचे अँकरिंग नम्रता वागळे आणि अभिजित करंडे करीत होते. जोशीची घरवापसी झाल्यानंतर नम्रता आणि करंडेची मोठी अडचण होणार आहे.

महाराष्ट्र १ ची फिअरलेस मीडिया कंपनी दिवाळखोरीत

मुंबई - महाराष्ट्र १ न्यूज चॅनल शेवटची घटका मोजत आहे. या चॅनलने फिअरलेस मीडिया कंपनी दिवाळखोरीत काढून जुन्या ११६ कर्मचाऱ्याचा जवळपास ६ महिन्याच्या पगार बुडविला आहे. पैकी अनेक कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी नोंदवल्या आहेत.
या चॅनेलचे  ऑफिस पूवी लोअर परेलला होते, ते आता अंधेरीला हलवण्यात आले आहे.जुने सर्व कर्मचारी निघून गेले आहेत. नव्यावर रडतपडत चॅनल सुरु आहे. हे चॅनल अनेक डिश तसेच केबलवरून गायब झाले असले तरी सध्या पेडन्यूज घेणे सुरु आहे. नव्या रिपोर्टरना पेड न्यूज घेण्यासाठी सक्ती केली जात आहे.
चॅनेलचे तिन्ही पार्टनर नव्या बकऱ्याच्या शोधात आहेत. मध्यतंरी संजय घोडावत यांना घोड्यावर बसवण्याचे प्रयत्न झाले, पण घोडावत चॅनल ऐवजी विमान सेवेत गुंतले. आता नवा घोडा कोण मिळतो याकडे लक्ष वेधले आहे.

फेसबुक वर शेअर करा

Facebook